Sunday, June 7, 2020

शेळियेचेनि तोंडे । सैंध चारी ।।


दिवसभरात खाऊ घातलेल्या चाऱ्यात सुबाभळीच्या चाऱ्याचे प्रमाण एक तृतिअंश पेक्षा कमी ठेवल्यास कोणताही अपाय होत नाही. हे शास्त्रीय नियम पाळावेत असे ज्ञानेश्‍वर माऊलीचेच सांगणे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल - 8999732685

परदारादिक पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे ।
शेळियेचेनि तोंडे । सैंध चारी ।। 229 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - परस्त्री वैगरेंशी प्रसंग आला असता, या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत, असे त्यास वाटत नाही व मग शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चारतो.

शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण वस्त्यांमध्ये जनावरांना योग्य प्रकारचा चारा मिळत नाही अशी स्थिती आहे. जनावरांच्या पोटात प्लॅस्टिकचे कागद मिळाल्याचीही अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

कचऱ्याकुंड्यामध्ये पडलेला ओला कचरा खाता खाता ह्या पिशव्या त्यांच्या पोटात गेल्या. अशी ही जनावरे दूध तरी कोणत्या प्रतीचे देणार असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ शकतो. ग्रामीण भागातही आता हीच स्थिती निर्माण होत आहे. अशावेळी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. जनावरांच्या शरीरास पोषक आहार देणे, हे पशुपालकाचे कर्तव्य आहे. तरच ते जनावर योग्य ते दुधाचे उत्पादन देईल. दिसेल त्याला तोडं लावायची जनावरांना सवय असते. यासाठी जनावर कोठे चरते यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

काही काही जनावरांची वैशिष्ट्ये असतात. ती ठराविकच पाला खातात. शेळी करंज, रुई, निरुगुंडी, सिताफळ, लिंब, घाणेरी, गारवेल, अडुळसा, बेल, कणेरी यांचा पाला हिरवागार असला तरी त्याला तोंड लावत नाहीत. एक लिटरपेक्षा अधिक चारा देणाऱ्या शेळ्यांना प्रती दिन तीन ते चार किलो हिरवा चारा लागतो. वाळलेला चारा एक किलो लागतो. तसेच 100 ते 200 ग्रॅम खुराक देणे आवश्‍यक आहे. शेळीला शेवरी, अंजन, हादगा, बाभूळ, सुभाबुळ, बोर, वड, पिंपळ इत्यादी झाडांचा पाला व शेंगा आवडतात. शेळींची पैदास शास्त्रीयदृष्ट्या करणे महत्त्वाचे आहे.

शास्त्र म्हणजे नियम आहेत. त्याचे पालन होणे हे आरोग्यासाठी आवश्‍यक असते. योग्यवेळी भोजन, आहार याची गरज आहे. झाडपाला व चवदार खाद्य पचविण्याची क्षमता शेळीमध्ये उत्तम असते. शेळीसाठी जवळपास 70 टक्के चारा हा झाडपाल्याचा असतो. चाऱ्याच्या टंचाईच्याकाळातही योग्य खुराक देण्यासाठी बेजमी करून ठेवणे आवश्‍यक आहे. झाडपाला व झाडाच्या चिकातील शेंगा दोन प्रकारे साठविता येतात.

पहिल्या पद्धतीत झाडपालापासून मुरघास तयार केले जाते तर दुसऱ्या पद्धतीत फुलोऱ्यावर आलेला झाडपाला व चिकात आलेल्या शेंगा डहाळून सावलीत वाळविल्या जातात. अशा प्रकारे साठविलेला झाडपाला व झाडाच्या शेंगा, चारा व खुराक म्हणून टंचाईच्या काळात वापरता येते. यासाठी मेढपालांनी नियोजन करणे आवश्‍यक आहे. झाडपाला हा शेळीसाठी आवश्‍यक असला तरी सुबाभूळामध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टॅनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाऊ घातल्यास जनावरांच्या शरीरात अपायकारक पदार्थांचे प्रमाण वाढते.

सुबाभळीचा पाला जास्त खाऊ घातल्यास जनावरांच्या अंगावरील केस गळून पडतात. जनावरांची वाढ खुंटते. जनावरे रोज चारा व खुराक खात नाहीत इत्यादी अपायकारक परिणाम दिसून येतात. दिवसभरात खाऊ घातलेल्या चाऱ्यात सुबाभळीच्या चाऱ्याचे प्रमाण एक तृतिअंश पेक्षा कमी ठेवल्यास कोणताही अपाय होत नाही. हे शास्त्रीय नियम पाळावेत असे ज्ञानेश्‍वर माऊलीचेच सांगणे आहे.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे


No comments:

Post a Comment