Saturday, July 21, 2018

भगवंतपण


किती वाढविसी या उग्ररूपा । आंगीचें भगवंतपण आठवीं बापा ।
नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ।। 443 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ -
या उग्र रूपाला तूं किती वाढवीत आहेस ? देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण आठव नाही तर माझ्यापुरती तरी कृपा कर.

भगवंतांनी अर्जुनाला विश्‍वरूप दर्शन दाखवले. भगवंताचे हे उग्ररुप पाहून अर्जुन घाबरला. यासाठी त्याने भगवंताकडे त्याच्या मुळ रूपात येण्यासाठी प्रार्थना केली. भगवंताने अर्जुनालाच फक्त विश्‍वरूप दाखवले. पण भगवंत प्रत्येक भक्ताला त्याचे हे विश्‍वरूप दाखवत असतो. आजकाल आपल्या सभोवती अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्यातून आपल्या मनात भीतीही उत्पन्न होते. या घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना या भगवंताचे उग्ररूप आहे. कोठे पुर येतो. पुरात मोठे नुकसान होते. पुरात अनेकजण व्हावून जातात. सुनामी येते. सुनामीच्या तडाख्याने क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीचे मोठे नुकसान होते. भुकंपाने उभ्या इमारती कोसळतात. त्यात हजारोंची हाणी होते. मुंगीचे वारूळ नष्ट व्हावे तसे मानवाचा हा संसार कोलमडून पडतो. काही क्षणातच सारे नष्ट होते. निसर्गाचा हा रुद्रावतार भगवंताचेच उग्ररुप आहे. याकडे बारकाईने पाहिले तर भगवंताने दाखवलेले हे विश्‍वरूपच आहे. असे मानायला काहीच हरकत नाही. मुंगीसारखे आपणही या विश्‍वात एक सुक्ष्मजीव आहोत. याचीच जाणीव यातून करून दिली जाते. मानव जरी स्वतःला फार मोठा समजत असला तरी त्याने त्याचे खरे रूप ओळखावे. जन्माचा अर्थ समजून घ्यावा. त्याच्यामध्ये असणारा अहंकार नष्ट व्हावा, हाच भगवंताचा या मागचा उद्देश असतो. अहंकार, गर्वामुळे मानव उद्धट होऊन अनेक दुष्कृत्ये करत आहे. भगवंताचे हे उग्ररुप भक्ताला भीती दाखवण्यासाठी नाही. तर भक्तातील अहंकार, गर्व नष्ट करण्यासाठी आहे. अहंकार, गर्व गेल्याशिवाय भक्तीचा मार्ग सुकर होत नाही. बऱ्याचदा आपणास खूप आजारी पडल्यानंतर भगवंताची आठवण होते. इतर वेळी आपण देवाकडे ढुंकुणही पाहात नाही. पण संकटाच्यावेळी आपणास देव आठवतो. ही संकटे ही भगवंताची उग्ररुपे आहेत असे समजण्यास काहीच हरकत नाही. आपल्यातील अहंकार, गर्व जावा आपल्या मनाला भक्तीची ओढ लागावी व आपल्यामध्ये भगवंतपण जागृत व्हावे यासाठीच भगवंत अशी रुपे घेत असावेत. अंगी भगवंतपण येण्यासाठी भगवंताच्या भक्तीचा मार्ग भक्ताने स्वीकारावा. भक्तीतून मुक्ती मिळवावी. भक्तीतून सर्वज्ञ व्हावे. आत्मज्ञानी व्हावे व भक्तीची ही परंपरा पुढे अशीच जागृत ठेवण्यासाठी झटावे. सर्व विश्‍व भगवंतमय करावे हाच अध्यात्माचा खरा उद्देश आहे.

No comments:

Post a Comment