Saturday, June 16, 2018

सन्यास

सन्यास

राजे सन्यास घ्यायचे. सर्व संपत्तीचा, राजसिहासनाचा त्याग करून ते जंगलात राहण्यासाठी जात. हिमालयातही साधनेसाठी जात. हे पूर्वीच्या दंतकथातून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात सन्यास या शब्दाचा वेदोक्त अर्थच या कथा कादंबऱ्यातून मांडला गेलेला नाही. राज्याने सन्यास घेतला म्हणजे त्याने राजेशाही थाट सोडून हातात कटोरा घेऊन मादूगरी मागत हिंडायचे. दारोदारी भीक्षा मागायची आणि साधना करायची असा त्याचा नित्यक्रम असल्याचेच चित्र कथातून मांडले जाते. सन्यासाचा खरा अर्थच अशा कथानकांमुळे जगासमोर येऊ शकला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर अनेक राजे काही वर्षांनी सन्यास घेतल्याचे सांगितले जाते. पण सन्यास कशासाठी घेतला जातो. त्या राजाच्या पुढच्या पिढींनी कोणते कार्य करायचे. त्या राजाच्या पुढच्या पिढीनेही सन्यास धर्माचा स्वीकार करायचा का. पण कोठेपर्यंत आणि हा सन्यास असतो तरी काय. सर्वसामान्य व्यकीनेही सन्यास घेतल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांनी असेच भटकत राहायचे काय. पूर्वीच्याकाळी अशा पद्धती नव्हत्या. सन्यास या शब्दाचा चुकीचा अर्थ मांडला गेल्याने मुळ सन्यास धर्मच विसरला गेला आहे. राजा असो व सर्वसामान्य माणसाचा सन्यास असो प्रंपच धर्माचे पालन करत त्याने परमार्थाचा स्वीकार करायचा असतो. 

सन्यास हा एक पवित्र धर्म आहे. या धर्माचा स्वीकार केल्यानंतर वेदोक्त आदेश काय आहे हे यासाठीच जाणून घेण्याची गरज आहे. 
 
सन्यासाचा वेदोक्त आदेश...
1. सकळ विश्वशांतीसाठी झटावे. 
2. दैन्य दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे 
3. जीवाजीवाची अध्यात्मसंवेदना जागी करावी 
4. त्रिभुवन आनंदाने भरावे 

सन्यास घेतल्यानंतर या चार गोष्टीचे पालन करावे असा वेदोक्त आदेश आहे. सन्यास म्हणजे सर्व संग परित्याग असा अर्थ नाही. राजा असो व सर्वसामान्य व्यक्ती सर्वांसाठी हा वेदोक्त आदेश समान आहे. पण दंतकथानकांमुळे मुळ नियमच बाजूनला राहीले गेले. अध्यात्माची मोड तोड करून खरे अध्यात्मशास्त्रच मुळात दुषित केले गेले. यासाठी अध्यात्मशास्त्राचा दंतकथातून नव्हे तर वेदावर, गीतेवर आधारित ग्रंथातून अभ्यास होण्याची गरज आहे. यातूनच खरे अध्यात्म विकसित होऊ शकेल. 

पण सध्याच्या नव्या पिढीत हे अध्यात्म आता रुजेल का. असा प्रश्न आपणास पडला असेल किंवा पुर्वीच्या अध्यात्माचे नियम आत्ताच्या नव्या तंत्राच्या युगात लागू होतील का असेही आपणास वाटणे स्वाभावीक आहे. काळ कोणताही असो. अध्यात्म हे शास्त्र आहे. शास्त्रातील प्रयोगाचा सिद्धांत हा कधी बदलत नसतो. मग अध्यात्मातील प्रयोगांचे सिद्धात कसे बदलले जातील. राजेशाही संपली. राजे राजवाडे आता राहीले नाहीत. आता लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये राजेशाहीतील कायदे बदलले आहेत. म्हणजे अध्यात्याचे नियम आणि कायदेही बदलले असे होत नाही. पण आज काय अध्यात्मिक मठांचे कायदे लोकशाहीत बदलले आहेत. खरतर इथेच खरी मोठी चुक झाली आहे. मठाचे कायदे बदलले. मठाच्या नियमानुसार आजकाल कोणीही मठाधिष, मठाधिपती होऊ लागले आहेत. स्वयंघोषित मठाधिपती, स्वयंघोषित महाराज यांचा सुळसुळाट याचमुळे तर पाहायला मिळत आहे. भगवी वस्त्रे घातली आणि तोंडात चार मंत्र पुटपुटले की झाले महाराज. चार चाैघांना सल्ले दिले की थाटला मठ आणि झाले मठाधिपती. अशीच आजकालची स्थिती झाली आहे. जुन्या मठांची कागदपत्रे गोळा करून हक्क दाखवून जमिनी लुबाडूनही मठाधिपती झाले आहेत. खरेतर नव्या कायद्याने मठाधिपती होण्याचा अधिकार त्यांना मिळालाच कसा. अध्यात्माचा गंधही नसणारे आजकाल मठाधिपती झाले आहेत. अध्यात्माच्या नियमांची मोडतोड करून संपत्तीच्या हव्यासापोटी, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, चंगळवादी संस्कृतीने खऱ्या अर्थाने या समाजमनावर आक्रमण केले आहे. समाजाची मनेही त्यांनी बदलवली आहेत. सरकारने अध्यात्मिक मठांचे नियम करताना काही कायदे हे अध्यात्माच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने अध्यात्म संस्कृतीचा, अध्यात्म शास्त्राचा विकास होईल. अन्यथा अध्यात्माच्या नावाने थोतांडशास्त्र विकोपाला जाईल. यातून ढोंगी, स्वयंघोषीत महाराजच तयार होतील. त्यांना राजआश्रयही दिला जात आहे. अशाने अशा मठात आत्महत्या, गुन्हे हे घडणारच. हे थांबवायचे असेल तर अध्यात्माच्या नियमांनुसार कायदे कडक करण्याची गरज आहे. 

गोड बोलणे, माया करणे, लोकांना आपलेसे करणे त्यांच्यावर छाप पाडणे हे ज्यांना जमते ते निश्चितच स्वयंघोषित महाराज होतात. स्वच्छ कपडे परिधान करायचे, चार गोड शब्द दुसऱ्याच्या मनाला स्पर्श करतील अशा पद्धतीने बोलायचे थोडे नेतृत्त्व काैशल्य आत्मसात केले की झाले. जय हो जय हो म्हणत मग महाराज होण्याचा मार्ग मोकळा. जनतेलाही अशीच व्यक्ती आपलीसी वाटते. यातून आपले शोषण कधी होते याचे भानही त्यांना राहात नाही. इतके ते त्यात गुंतलेले असतात. अशा महाराजांचे खरे स्वरूप उलघडले तरी ते स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. त्याच्यावरही त्यांचा विश्वास नसतो इतके ते यामध्ये गुरफटलेले असतात. 

यावर खऱ्या साधुसंतांनी उपाय सांगितले आहेत. अशा ढोंगी साधुंची लक्षणे वारंवार सांगितली आहेत. अध्यात्माचे परखड सत्य संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितले आहे. गीतेत सांगितले आहे. तरीही आपण ते स्वीकारत नाही. पान, फुल, फळाव्यतिरिक्त कोणतेही दान संत स्वीकारत नाहीत. तेही प्रेमाने, श्रद्धेने दिले तरच ते स्वीकारतात. तरीही जनता लाखोच्या देणग्या आेतून संतांना विकत घेतल्याची भाषा करतात. संत हे सर्वांचे असतात. त्यांना सर्वजण सारखेच असतात. दान न देणारा व कोठ्यावधीचे दान देणारा दोघेही त्यांच्यासाठी समान असतात. फक्त नामाचे दान ते स्वीकारतात. त्यांना नामाने जिंकता येते. नामानेच त्यांचे मन जिंकता येते. त्यांनी दिलेले नाम सदैव जपले तर ते सदैव आपल्या पाठीशी असतात. आपणास आधार देतात. नाम हे धनाने घेता येत नाही. नाम हे अंतकरणातून घ्यावे लागते. नामास्मरणातूनच मोक्ष प्राप्त होतो. सद् गुरूंच्या नामस्मरणातून आत्मज्ञान प्राप्त होते. नामासारखे दुसरे साधन नाही. साधनाही त्याचीच करायची असते. आणि आत्मज्ञानी व्हायचे असते. तरच खरा सन्यास सार्थकी लागेल. सन्यासाची चारसुत्री आत्मज्ञान प्राप्तीनंतरही जोपासायची असते. सकळ विश्वशांतीसाठी झटावे. दैन्य दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे. जीवाजीवाची अध्यात्मसंवेदना जागी करावी. त्रिभुवन आनंदाने भरावे यासाठीच सन्यास घ्यायचा असतो. सन्यास म्हणजे संसाराचा त्याग नव्हे. संपत्तीचा त्याग नव्हे. तर हा पवित्र धर्म या चारसुत्रीत सांगितला आहे. त्याचे पालन करणे हा सन्यास आहे. 

No comments:

Post a Comment