Friday, November 9, 2012

भात बीजोत्पादनातून होतोय अल्पभूधारक आर्थिक सक्षम

कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्‍यात तुकड्या-तुकड्यात भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने बीजोत्पादनाचा पर्याय उपलब्ध केला. त्यांना या प्रकल्पातून सुधारित लागवड तंत्रज्ञान शिकवले. त्यातून पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादन वाढत आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळत आहे.


राजेंद्र घोरपडे



कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुके भाताचे आगार म्हणून ओळखले जातात. चंदगड, आजरा येथे उत्पादित होणाऱ्या भाताला वेगळीच चव असते. आजरा घनसाळ, काळी गजरी अशी इथल्या भाताची ओळख आहे. पारंपरिक जातींची उत्पादकता मात्र एकरी 15 ते 20 क्विंटल इतकी कमी आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता इतके कमी उत्पादन परवडत नाही. यासाठीच नवे प्रयोग करणे गरजेचे झाले आहे.



या भागातील शेती उताराची म्हणजे पायऱ्या-पायऱ्यांची आहे. त्यांचे तुकडे पडत आहेत. शेतकरी अधिकच अल्पभूधारक होत आहे. मालाला योग्य दर मिळाला तरच येथील शेतकरी शेतीत तग धरू शकणार आहे. त्यादृष्टीने बीजोत्पादन हा पर्याय चांगला वाटून येथील कृषी विभागाने बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने या भागात बीजोत्पादन प्रकल्प राबविला आहे.



...असा आहे बीजोत्पादन कार्यक्रम

आजरा, अरळगुंदी, आरदाळ, भादवण, बहिरेवाडी, चिमणे, देवर्डे, हत्तीवडे, कासार कांडगाव, किटवडे, महागोंदवाडी, मेंडोली, पोळगाव, साळगाव, सोहळे, उत्तूर, वडकशिवले, वझारे अशी अठरा गावे भात बीजोत्पादन प्रकल्पात समाविष्ट आहेत. या गावांतील 364 शेतकऱ्यांनी 234 हेक्‍टरवर आपला सहभाग नोंदवला आहे. इंद्रायणी, भोगावती, कर्जत - 5, फुले समृद्धी, रत्नागिरी 24, रत्नागिरी 1 आदी वाणांचा यात समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. सुरवातीला बीजोत्पादनासाठी शेतकरी उत्सुक नव्हते. मात्र त्याचे महत्त्व, त्याचा होणारा फायदा, तंत्रज्ञान समजावून दिल्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.



बीजोत्पादन आणि क्षेत्र

वर्ष बीजोत्पादन क्षेत्र

- 2010 100 हेक्‍टर

-2011 150 हेक्‍टर

- 2012 234 हेक्‍टर



भात शेतीमध्ये पडलेला फरक -

बीजोत्पादन प्रकल्पा आधी बीजोत्पादन प्रकल्पानंतर

1) पारंपरिक पद्धतीने लागवड 1) लागवडीच्या सुधारित पद्धतींचा वापर

2) पारंपरिक वाणांची निवड 2) सुधारित, अधिक उत्पादनक्षम जाती

3) अयोग्य अंतरावर रोपलावण 3) 10 x 15 इंच अंतरावर लावण

4) लावणीची पारंपरिक पद्धत 4) पट्टा, चार सूत्री पद्धतीने लावण

5) एका जागी 10 ते 15 रोपांची लावण 5) एका जागी दोन ते चार रोपांची लावण

6) एकरी 40 किलो बियाणे 6) एकरी 15 किलो बियाणे

7) अयोग्य अंतरावर लागवडीमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव 7) कीड, रोगाचे प्रमाण तुलनेने कमी

8) एकरी उत्पादन 15 ते 25 क्विंटल 8) एकरी उत्पादन 35 ते 40 क्विंटल





बीजोत्पादन कसे ठरले फायदेशीर?

नदी काठी शेत असल्याने पावसाळ्यात शेतात दलदल असते. पूर्वी घनसाळ वाण घेत होतो. त्याची उंची जास्त आहे. पाणथळ जमिनीत हा भात लोळतो. बीजोत्पादन योजनेत इंद्रायणी वाण गेली दोन वर्षे घेत आहे. याची उंची कमी असल्याने लोळत नाही. या वाणात पोचट दाणे किंवा चिंबण्याचे प्रमाण कमी आहे. साहजिकच उत्पादनावर अनुकूल परिणाम होतो. इंद्रायणीचे एकरी 40 पोती उत्पादन झाले. पारंपरिक पद्धतीत उत्पादन 20 पोत्यांपर्यंत मिळायचे. गेल्या वर्षी इंद्रायणीला प्रति क्विंटल 1500 रुपये दर मिळाला. बाजारभावापेक्षा हा दर 20 टक्के अधिक आहे.

- पांडुरंग कृष्णा पाटील, साळगाव



बीजोत्पादन प्रकल्पाचा लाभार्थी होण्यापूर्वी घनसाळ, कर्जत वाण घ्यायचो. पारंपरिक आडमापी पद्धतीने लागवड होती. चिखल पेरणी करताना कोठेही आळे करून रोपे लावायचो. घनसाळला फुटवे कमी असल्याने 10 ते 15 रोपे एका आळ्यात लावण्यात येत होती. यामुळे बियाणेही जास्त लागायचे. लावणीसाठी मजुरीचा खर्च जास्त होता. आता बीजोत्पादनात इंद्रायणी वाण घेत आहे. याला फुटवे जास्त असल्याने दोन ते चार रोपे एका आळ्यात लावली तरी चालतात. चार सूत्री व पट्टा पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण मिळाले. यात बियाण्याची बचत होत आहे.

- पांडुरंग श्‍यामराव पाटील, साळगाव



पूर्वी पारंपरिक पद्धतीच्या घनसाळ लागवडीत एकरी 20 पोती उत्पादन मिळायचे. तीन- चार वर्षांपूर्वी क्विंटलला 900 ते 1000 रुपये दर मिळायचा. गेल्या दोन वर्षांत क्विंटलला 2500 रुपये दर तांदूळ महोत्सवामुळे मिळत आहे. यापुढे कायम इतका दर मिळेल याची शाश्‍वती नाही. बीजोत्पादनात बाजारभावापेक्षा 20 टक्के अधिक दर देण्याची हमी दिली आहे. यात मध्यस्थीचा प्रश्‍न नाही. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, दर पाडण्याचे कारस्थान आदी समस्या भेडसावत नाहीत. बीजोत्पादनात फुले-समृद्धी वाणाची निवड केली. सुधारित तंत्र वापरल्याने एकरी 40 पोती उत्पादन मिळाले. क्विंटलला 1500 रुपये दर मिळाला. पारंपरिक पद्धतीपेक्षा निश्‍चित 10 ते 12 हजार रुपये अधिक उत्पन्न मिळत आहे. दराची हमी असल्याने अनेक प्रश्‍न सुटले आहेत.

- जयसिंग श्‍यामराव नार्वेकर, पोळगाव



यंदा प्रथमच बीजोत्पादन योजनेचा लाभार्थी झालो. अर्ध्या एकरावर बीजोत्पादन आहे. इंद्रायणी वाण घेतला. वाढ जोमदार असून किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी आहे. बीजोत्पादनामध्ये भेसळ होऊ नये म्हणून विशेष काळजी घेताना अन्य भात वाणाच्या लागवडीपासून तीन ते चार फूट अंतर ठेवून लागवड करण्यास सांगितले आहे. मुळांत पश्‍चिम घाटमाथ्यावर शेताच्या तुलनेत बांधच मोठे असल्याने दोन वेगवेगळ्या जातीच्या शेतातील अंतर साहजिकच योग्य राखले जाते. यामुळे भेसळ होण्याचा धोका कमी असतो.

- पांडुरंग गोविंद नार्वेकर, पोळगाव



दहा एकर शेती आहे. त्यातील तीन एकरांवर भात घेतो. गेली दोन वर्षे इंद्रायणी, भोगावती, फुले समृद्धी या वाणांचे बीजोत्पादन घेत आहे. गेल्या वर्षी भोगावतीचे एकरी 25 ते 26 क्विंटल उत्पादन मिळाले. क्विंटलला 1465 रुपये दर मिळाला. पारंपरिक पद्धतीत एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन होते. दर एक हजार रुपयांच्या आसपास मिळायचा. व्यापारी दर पाडतात. काढणीनंतर लगेच विक्री करावी लागत असल्याने या काळात दरही मिळत नाही. साठवणूक करणे शक्‍य नसल्याने मिळेल त्या दरात भात विकावा लागतो. याच गोष्टीचा फायदा व्यापारी घेतात. वजनकाट्यात फसवणूक होते. बीजोत्पादनात ही फसवणूक होत नाही. बाजारभावापेक्षा अधिक दर तसेच हमी मिळत असल्याने निश्‍चित फायदा होत आहे.

- बाळू गोविंद मणगुतकर, गणेशवाडी



एक एकरावर भोगावती वाण बीजोत्पादनासाठी आहे. फुटवे चांगले म्हणजे प्रति रोप 25 ते 30 आहेत. त्यामुळे लावणीवेळी रोपे कमी लागतात. यामुळे खर्चात थोडी बचत होते. आता खतांचे दर वाढले आहेत. उत्पादन खर्च एकरी 14 हजार रुपये येतो. खर्च वजा जाता 20 हजार रुपये उत्पन्न मिळते. पण हे फक्त बीजोत्पादनमध्ये शक्‍य झाले. नेहमीच्या भातशेतीत उत्पादन कमी व दराची हमी नसते. शासनाने बाजारभावाप्रमाणे भाताची खरेदी केली तर शेतकऱ्यांना निश्‍चितच फायदा होईल. व्यापारी, मध्यस्थ यांपासून होणारी फसवणूक थांबेल.

- मुकुंद लक्ष्मण तानवडे, देवर्डे



भात उत्पादकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने बीजोत्पादनाची योजना सुरू केली. शेतकऱ्यांना त्यातून चांगल्या गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध होईल. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.

- एकनाथ माने, तालुका कृषी अधिकारी

संपर्क - 9421200167

No comments:

Post a Comment