Saturday, September 29, 2012

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ
कृषी रसायने, रासायनिक खते यांच्या अति वापरामुळे शेती, पर्यावरण, मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प तेरणी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील अरुण देसाई यांनी घेतला. आज सेंद्रिय उत्पादकांचा गट तयार करून ते विविध सेंद्रिय माल पिकवतात. मालावर प्रक्रिया करून त्याला आश्‍वासक बाजारपेठही मिळविण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
राजेंद्र घोरपडे
तेरणी येथील अरुण देसाई यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची कास धरली. रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर ते पूर्वी करायचे. द्राक्षाचेही काही काळ उत्पादन घेतले. द्राक्षात अनेक फवारण्या कराव्या लागायच्या. दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे येथील निसर्गशेती विज्ञान शिबिरात भाग घेतला. शेती, पर्यावरण आणि मानव या सर्वांच्या आरोग्याचे हित याबाबत ते गंभीर झाले. त्यानुसार त्यांनी 1991 च्या सुमारास सेंद्रिय शेतीची कास धरली. प्रयोग परिवारचे संस्थापक श्री. अ. दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग सुरू केले. गांडूळ शेती सुरू केली. आजऱ्याचे मोहन देशपांडे यांचे मार्गदर्शन घेतले. एका चौरस फुटामध्ये पडणारा सर्व सूर्यप्रकाश पकडण्याचे दाभोळकरांचा सिद्धांतही त्यांनी उपयोगात आणायला सुरवात केली. सेंद्रिय पदार्थांचे जमिनीत पुनर्भरण करीत राहणे आणि जैविक घटकांचा वापर यावर त्यांचा भर आहे. शेतातीलच उपयोगी जैविक घटक वाढविण्यावरच त्यांचा अधिक भर आहे. या पद्धतीने हळद, ऊस, सोयाबीन, भाजीपाला, आंबा, तूर आदी विविध पिके ते घेतात. हळदीबाबत प्रातिनिधिक बोलायचे तर लागवडीपूर्वी शेतात एकरी 10 गाड्या शेणखत मिसळतात. हळदीच्या शेतात हिरवळीच्या खताचे, म्हणजे तागाचे बियाणेही पेरले जाते. पुढे ताग कापून तिथेच गाडला जातो. तेरणी परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. अशावेळी तागाचा अन्नद्रव्ये मिळविण्याबरोबर मल्चिंग म्हणूनही उपयोग होतो. मल्चिंगमुळे जमिनीत उबदारपणा राहातो. यंदा हळदीच्या सेलम जातीची लागवड आहे. काढणी फेब्रुवारीमध्ये होईल. देसाई यांनी आपल्या सेंद्रिय शेती प्रयोगात तेरणीतीलच आपल्या सुमारे दहा नातेवाईक सदस्यांनाही सामावून घेतले आहे. या सर्वांच्या मिळून एकूण 55 एकर शेतीवर विविध पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. प्रत्येकाचे किमान एक ते कमाल तीन हेक्‍टर क्षेत्र आहे.
हळदीचे एकरी 12-15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उसाचे एकरी 40 टन, सोयाबीनचे 10 क्विंटलपर्यंत, भाताचे सुमारे 22 क्विंटल असे उत्पादन सरासरी होते.
सेंद्रिय शेती प्रशिक्षणात सहभाग
एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेतर्फे (एनकॉन) 2001 मध्ये औरंगाबाद येथे सेंद्रिय शेती व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण झाले. यात भाग घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेने 18 हजार रुपयांची मदत त्यांना केली. सेंद्रिय शेतीची उत्पादने, प्रक्रिया आणि विपणन यावर त्या वेळी झालेल्या मार्गदर्शनाचा देसाई यांनी फायदा करून घेतला.
शेतीमालावर प्रक्रिया करून विक्री
उत्पादन खर्च आणि अपेक्षित नफा यावर आधारित दराने विक्री केल्यास फायदा निश्‍चितच मिळतो. हे लक्षात घेऊन शेतीमालाची मूल्यवृद्धी करण्यावर देसाई यांनी भर दिला आहे. त्यांचे सुधारित पद्धतीचे गुऱ्हाळघर आहे. सेंद्रिय उसापासून सेंद्रिय गूळ तयार करताना दाणेदार गूळ, त्याच्या ग्रेड्‌स, पावडर, पॅकबंद काकवी आदी उत्पादने देसाई तयार करतात. सेंद्रिय आजरा घनसाळ, काळी गझेली या सुवासिक भाताच्या जातींचे योग्य पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते.
कृषी विभागाचे सहकार्य
देसाई यांनी आपल्या एकूण शेतीचे सामूहिक पद्धतीचे सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यासाठी दरवर्षी सुमारे 27 हजार रुपये खर्च येतो. मात्र कृषी विभागाचे यासाठी अनुदान आहे. प्रमाणीकरणासाठी तत्कालीन कृषी उपसंचालक मधुकर घाग, तालुका कृषी अधिकारी बेंदगुडे यांनी सहकार्य केले. तालुका कृषी अधिकारी श्री. डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांचे सहकार्य देसाई यांना लाभले आहे.
सेंद्रिय उत्पादनांसाठी बाजारपेठ
-
सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी गडहिंग्लज येथील तत्कालीन सहायक निबंधक विजयराव देसाई यांनी अरुण देसाई यांना सहकारी संस्था काढण्याची कल्पना सुचविली. त्याप्रमाणे संस्था स्थापन करून आपल्या गटातील सर्व शेतकरी सदस्यांचा शेतीमाल वा प्रक्रियायुक्त उत्पादनांची विक्री या संस्थेद्वारे होते. सेंद्रिय प्रमाणित उत्पादनांना बाजारपेठ शोधणे, त्यात सातत्य ठेवणे, दर चांगला मिळणे हे आव्हानात्मक काम आहे. देसाई आपल्यापरीने त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पुणे, मुंबई, बंगळूर, गोवा, वर्धा आदी ठिकाणाहून त्यांनी खरेदीदार शोधले आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड, मंडई, कोथरूड, कॅम्प येथेही त्यांचे व्यावसायिक ग्राहक आहेत. मुंबईतील जसलोक रुग्णालयाशेजारील हेल्थ शॉप, एका महिला व्यावसायिकेचे संडे मार्केट, पॉंडिचेरी येथेही त्यांचा सेंद्रिय माल विकला जातो. आजरा घनसाळ भात किलोला 50 ते 60 रुपये दराने त्यांनी विकला आहे.
हळदीची औषधी कॅप्सुल्स
हळद पावडरही तयार केली जाते. ती किलोला 200 ते 300 रुपये दराने विकली जाते. बाजारात औषधी कंपन्यांनी हळदीची कॅप्सुल्स उपलब्ध केली आहेत. या धर्तीवर औषध कंपन्यांच्या सहकार्याने अशी कॅप्सुल्स तयार करण्याचे देसाई यांचे प्रयत्न आहेत.
अवजारांत सुधारणा
देसाई अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असल्याने अवजारात सुधारणा करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. सुधारित पद्धतीचे कोळपे त्यांनी तयार केले आहे. एका बैलाच्या मदतीने सहज नांगर ओढता यावा यासाठी त्यात सुधारणा केली आहे. उसामध्ये भरणीवेळी निंबोळी पेंड, एरंड, करंजी पेंड देताना ते हा नांगर वापरतात. देसाई यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, कृषी विभाग, ग्रामपरिवर्तन, पुणे यांचे सन्मानपत्र, शाहू किसानशक्ती, आदर्श कृषी भूषण असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
संपर्क - अरुण देसाई, 9423987202
सेंद्रिय मालाला परदेशात मागणी आहे. काही खरेदीदार परदेशातही तो पाठवतात. सरकारने तशी संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवी. परदेशात प्रदर्शन, महोत्सवांचे आयोजन करून बाजारपेठा उपलब्ध होण्याची गरज आहे. त्यातून सेंद्रिय मालाला निश्‍चितच चांगला दर उपलब्ध होईल
अरुण देसाई

No comments:

Post a Comment