Sunday, April 26, 2015

भास-अभास

अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें । 

तेंचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ।। 97 ।। अ. 4 था 

विहिरीच्या काठावर उभे राहून विहिरीत पाहिले, तर आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते. ते आपले प्रतिबिंब असते. आपण स्वतः तेथे नसतो. म्हणजे तो आणि मी वेगळे आहोत. याची जाणीव आपणास असायला हवी. मडक्‍यात पाणी भरून मडके बाहेर ठेवले तर त्यात आकाश दिसते. मडक्‍यातही ते आकाश सामावते. पण ते मडके फुटले तर ते आकाशही नाहीसे होते. याचा अर्थ मडक्‍यात असणारे आकाश हे खरे नव्हते. त्या आकाशाची ती प्रतिमा होती. नावेमध्ये किंवा रेल्वेतून प्रवास करताना आपणास बाहेरची झाडे मागे मागे पळत जात आहेत असे वाटते. प्रत्यक्षात झाडे आहेत तिथेच असतात आपण पुढे जात असतो. त्यामुळे आपणास तसा भास होतो. आपणाला जे भासते ते खरे नसते. खरे काय आहे हे ओळखायला हवे. दृष्टीभासाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. यातून सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की सत्य परिस्थिती काय आहे हे ओळखायला हवे. आपण म्हणजे कोण आहोत? आपले नाव म्हणजे आपण आहे का? नाही, कारण एकाच नावाची अनेक माणसे असू शकतात. मग आपण कोण आहे? हे नाव शरीराला दिले आहे. मग आपण म्हणजे शरीर आहोत का? पृथ्वी, आप, वायू, तेज, गगन या पंच महाभूतांनी हा देह, हे शरीर तयार झाले आहे. ते आपण आहोत का? नाही कारण आपण मेल्यानंतर हे शरीर पंचत्वात विलीन होते. विविध रसायनांनी युक्त असणारे हे शरीरही आपण नाही. कारण या शरीरात जो पर्यंत जीव आहे तोपर्यंत हे शरीर जिवंत आहे. तो जीव गेला की शरीराची क्रिया संपते. त्या शरीराला मग किडा मुंगा लागतात त्या लागू नयेत यासाठी ते शरीर जाळले जाते. किंवा त्यापासून रोगराई पसरू नये यासाठी ते जमिनीत गाढतात. म्हणजे शरीर हे नष्ट होते. मग या शरीरात असणारा जीव आपण आहोत का? हा जीव, हा आत्मा म्हणजे मी आहे का? मी आत्मा आहे. हे खरे आहे. पण प्रत्येकाच्या शरीरात आहे. शरीराची नावे वेगळी असली तरी आत्मा हा एकच आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा हा एकच आहे. सबका मालिक एक हे यासाठीच म्हटले आहे. हा आत्मा अविनाशी आहे. तो ओळखायला हवे. शरीरात आल्यामुळे तो आपणास वेगळा वाटत नाही. प्रत्यक्षात शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे ओळखायला हवे. हे ज्याने ओळखला तोच आत्मज्ञानी होतो. 

Monday, April 13, 2015

स्वधर्म

म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयाचें ।। 112 ।। अध्याय 3 रा ज्ञानेश्‍वरी


स्वधर्म कोणता? हे येथे जाणून घेणे आवश्‍यक आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचा आचरण करावयाचा धर्म. आपण कसे वागायाचे? कसे बोलायचे? कसे संवांद साधायचे? कोणती क्रिया करायची? हे सर्व स्वधर्मामध्ये मोडते. प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःकडून करावी लागणारी कृती यालाच स्वधर्म म्हणतात. विद्यार्थ्यांने विद्यार्थी दशेत अभ्यास करणे हा त्याचा धर्म आहे. सतत अभ्यास मग्न राहाणे हे त्याचे कर्तव्य आहे. यातच त्याची प्रगती आहे. सैनिकांनी सीमेवर सतत सावध राहाणे हा त्यांचा धर्म आहे. या सेवेत कसर पडली तर स्वतःचे प्राण गमवावे लागतात. आईचा धर्म कोणता? मुलांचा, कुटुंबाचा सांभाळ करणे हा आईचा धर्म आहे? घरात शांती, सुख-समाधान नांदायचे असेल तर आईने सर्वांना सांभाळूण घेणे गरजेचे असते. सावलीसारखे आपल्या कुटूंबास छत्र उभा करणे हा तिचा धर्म आहे. कुटूंब व्यवस्थेतील तो एक स्तंभ आहे. खूर्चीला चार पाय असतात. एक पाय जरी मोडला तरी खूर्चीवर नीट बसता येत नाही. घराचा एक खांब जरी ढासळला तर घर कोसळू शकते याची जाणिव असायला हवी. शिक्षकाचा धर्म कोणता? अध्यापन करणे हा शिक्षकाचा धर्म आहे. ज्ञानदान हा गुरुचा धर्म आहे. विद्यार्थ्यांना-शिष्यांना ज्ञानी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. गुरुदक्षिणेची अपेक्षा न ठेवता हे ज्ञानदान करावे. पण सध्याच्या बदलत्या युगात ज्ञानाची मंदिरे ही आता नोटा तयार करण्याचे कारखाने झाले आहेत. शिक्षण संस्था ह्या पैसा कमावण्याचा उद्योग झाला आहे. असे असले तरी कोणती संस्था टिकते. ज्ञानदानाचे कार्य उत्कृष्टपणे करणारी संस्थाच टिकू शकतो. हा धर्म संस्थेने पाळला नाही तर थोड्याच कालावधीत ती संस्था मोडकळीस निघते हे विसरता कामा नये. म्हणून स्वधर्म कोणता याचा विचार, चिंतन, मनन हे करायला हवे. तो सोडला तर अस्तित्व संपते हे विचारात घ्यायला हवे. स्वधर्म चुकला की शिक्षा ही आहेच. यासाठी स्वधर्माचे पालन होणे आवश्‍यक आहे. साधकाचा स्वधर्म कोणता? सद्‌गुरुंनी पेरलेल्या बीजाची जोपासणा करणे हा साधकाचा धर्म आहे. दिलेल्या मंत्राची साधना करणे हा त्याचा धर्म आहे. तरच त्याची प्रगती होऊ शकेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी या सर्व गोष्टी आवश्‍यक आहेत. स्वधर्म पालन हे यासाठीच गरजेचे आहे. 

श्री अथर्व प्रकाशनची पुस्तके 
  • इये मराठीचिये नगरी..............80 रुपये 
  • अनुभव ज्ञानेश्‍वरी..................50 रुपये 
  • कृषि ज्ञानेश्‍वरी....................100 रुपये 
  • संपर्क ः राजेंद्र घोरपडे मोबाईल....................9011087406

Saturday, February 28, 2015

ग्रामीण जनतेचे स्वावलंबन हेच "स्वयंसिद्धा' चे ब्रीद

आई उद्योजक झाली तर पुढची पिढीही उद्योजक होईल. यासाठी फावल्यावेळेत महिलांनी उद्योग करून स्वतःला स्वयंपूर्ण करावे या उद्देशाने कोल्हापूरातील "स्वयंसिद्धा' ही संस्था कार्य करते. सामुदायिक उद्योग, बचतगट, सामुदायिक शेती, कंत्राटी शेती, श्रमदानातून विकासकामे यातून ग्रामीण विकासाला डॉ. व्ही. टी. फाऊंडेशनने वाहून घेतले आहे. संघटन-सहकार्य-सद्‌भाव या त्रिसुत्रीने ग्रामीण जनतेला स्वावलंबी करणे हेच या दोन्ही संस्थेचे उद्दिष्ट आहे. श्रीमती कांचन परुळेकर संचलित या संस्थांच्या कार्या विषयी थोडक्‍यात.....
- राजेंद्र घोरपडे

देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. यासाठीच प्रथम महिलांचा विकास व्हायला हवा. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी. महिला अर्थकारणात सबळ झाल्या पाहिजेत. तरच त्या स्वतःच्या घराचा विकास करु शकतील. साहजिकच त्या देशाच्या विकासाचे नेतृत्वही करु शकतील. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन 1992 मध्ये डॉ. व्ही. टी. पाटील यांनी स्वयंसिद्धा ही संस्था स्थापन केली. स्त्री शिक्षणासाठी अविरत श्रम घेणाऱ्या डॉ. व्ही. टी. पाटील यांचे स्मारक संस्थेच्या रुपाने उभे राहावे या उद्देशाने कांचनताईंनी 1994 मध्ये डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनची स्थापना केली. कोल्हापूर शहरासह राज्यातल्या ग्रामीण भागातही या दोन्ही संस्थेनी विविध उपक्रम राबवून महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा वसा घेतला आहे.

संस्थेची उद्दिष्ट्ये ः
  • ग्रामीण जनतेला स्वावलंबी करण्यासाठी अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था करणे.
  •  स्वयंनिर्भयतेसाठी संघटना, कमावतं साधन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक भान यासाठी आधारसेवा उपलब्ध करून देणे.
  • मनुष्यबळाचा सर्वांगीण विकास, महिला सबलीकरण यासाठी योगदान.
  • विकासोन्मुख अशी ग्रामीण पुनर्रचना करणे.

संस्थेचा विस्तार....
  •  2500 महिला उद्योजिका
  • 150 ट्रेनर्स
  • 50 स्वयंसेवी कार्यकर्त्ये कार्यरत
  • गेली दहा वर्षे राधानगरी, चंदगड तालुक्‍यात कार्य
  • गेली तीन वर्षे शाहुवाडी तालुक्‍यात कार्य

प्रबोधनाचे वेगळे फंडे
  • पाहा पाहण्यामध्ये दिसणे येऊ दे या उद्देशाने सीडीच्या माध्यमातून विविध उद्योगांची माहिती दिली जाते. गाणी. मनोरंजन यातून उद्योजकते वळावे यासाठी मनाची तयारी केली जाते. माहिती व ज्ञान हे सोपे करून सांगणे हाच यातील मुख्य उद्देश आहे.
  •  मुलींसाठी माहेरची झाडी ः बायफ संस्थेने तयार केलेल्या वृक्षारोपन संदर्भातील सिडीद्वारे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्या मुलीला एक झाड भेट दिले जाते. हे झाड त्या मुलीने स्वतःच्या घराच्या अंगणात लावायचे. लग्नानंतरही माहेरच्या या वृक्षाची जोपासणा त्या मुली करतात. यातून पर्यावरण व निसर्ग प्रेमाचे संवर्धन
  •  विक्री योग्य वस्तु उत्पादनाचे प्रशिक्षण ः करवंद, केळी, दुध, नाचणी, तांदूळ, आंबा, काजू आदी शेतमालावर प्रक्रियेचे प्रशिक्षण, फराळ, लोणची, पापड आदी खाद्य पदार्थासह शिवण, लोकरीपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण.
  •  उत्पादित मालाला बाजारपेठ कशी मिळवायची यासाठी प्रशिक्षण, बोलायचे कसे मालाची विक्री कशी करायची. स्पॉट सेल, प्रदर्शने आदी.
  • विविध संस्थांना भेटी देऊन प्रबोधन
  •  आंबा येथे कृषि पर्यटन वाढीसाठी प्रशिक्षण
  • ग्रामीण कलांचे संवर्धन ः चाळणवाडी येथे तेथील गावातील प्रसिद्ध जाखडी नृत्य व गजनृत्यांची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न
  • शाळा मध्येच सोडलेल्या मुलांना अनौपचारिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न

स्वयंनिर्भयतेसाठी आठवडी बाजार
फावल्यावेळेत महिला हळद पावडर, जॅम, लोणची, पापड, पान मसाला, शेगदाणे लाडू, चिक्की, चकली आदी विविध प्रकारची उत्पादने तयार करू शकतात. पण त्यांची विक्री ही सर्वात मोठी समस्या असते. त्यासाठी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साईक्‍स एक्‍सटेंन्शनमधील स्वयंसिद्धाच्या जागेमध्ये आठवडी बाजार भरविला जातो. दर बुधवारी दुपारी एक ते तीन या वेळेमध्ये हा बाजार भरतो. शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिला येथे त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात.

मल्लेवाडीत सामुदायिक शेती
नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात राहणाऱ्या अनेक व्यक्तींची शेती मल्लेवाडीत पडीक होती. ही शेती स्वयंसिद्धा गटामार्फत सामुदायिकरित्या केली जाते. या शेतात भुईमुग, भाजीपाला पिके, भात आदी पिके घेतली जातात. यामध्ये बियाणे व खताचा खर्च शेत मालकातर्फे केला जातो. गटातील महिला नांगरट, भांगलणीपासून उत्पादन घेण्यापर्यंत एकत्रितपणे काम करतात. आलेल्या उत्पादनाचा अर्धा हिस्सा शेत मालकाला व अर्धा हिस्सा महिला गटात विभागला जातो. गटाच्या या कार्यामुळे पडिक जमीनींचा विकासही होतो व गावातील सर्वसामान्य कुटूंबाना उपजिविकेसाठी उत्पन्नही मिळते.

जे टिकते त्यावर प्रक्रिया
शेतीमध्ये उत्पादित होणारा माल हा नाशवंत असतो. यासाठी वेळीच त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. प्रक्रियेच्या अनेक पारंपारिक पद्धती आजही गावामध्ये आहेत. या पद्धतींना आधुनिकतेची जोड देण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. महिलांचे संघटन करून बजत गटांना याबाबत मार्गदर्शन केले जाते. फळपिकांपासून लोणची, जॅम, ज्यूस आदी विविध प्रकारची उपउत्पादने घेतली जातात. हे पदार्थ करून त्याची विक्री कशी करायची याबाबतही संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात येते.

महामार्गावर स्टॉलसाठी सहाय्य
शाहुवाडी तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. पण महाबळेश्‍वरमधील स्ट्रॉबेरी जेव्हा बाजारात येते तेव्हा स्ट्रॉबेरीचा दर अचानक कोसळतो. अशावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये यासाठी येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांचे गट तयार करण्यात आले. या गटांना स्ट्रॉबेरीवरील प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील अनेक शेतकरी आता विविध उपपदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री करत आहेत. मलकापूर-निळेपासून आंबाघाटापर्यंत 22 स्टॉलवर स्ट्रॉबेरी तसेच विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री केली जाते. या गटांना संस्थेमार्फत प्लास्टीकचे टेबल, उन्हापासून संरक्षणासाठी छत्री व दोन खुर्च्या दिल्या आहेत. तसेच त्या शेतकऱ्यांना विक्रीबाबतचे प्रशिक्षणही संस्थेने दिले आहे. स्ट्रॉबेरीच्या हंगामात चार महिने हे स्टॉल कार्यरत असतात.

शहरात मोक्‍याच्या ठिकाणी प्रदर्शने
  • स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याला दोन प्रदर्शने भरविण्यात येतात.
  • स्वयंसिद्धा मार्फतही शहरात विविध ठिकाणी दोन प्रदर्शने भरविली जातात.
  • चार दिवसांच्या एका प्रदर्शनासाठी जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो. यामध्ये 15 लाखांच्या आसपास उलाढाल होते.

प्रयोगापुरते बियाणे वाटप 
पश्‍चिम घाटमाथ्यावरील शेतकरी पाण्याची सुविधा नसल्याने पावसाळी भातानंतर कोणतेही पिक घेत नाही. आठ महिने रान तसेच पडून राहते. ही समस्या विचारात घेऊन संस्थेने विविध प्रयोग केले. यामध्ये आरकेल जातीच्या वाटाणा बियाण्याचे वाटप यशस्वी ठरला. संस्थेतर्फे राधानगरी व शाहुवाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फक्त एकदाच प्रयोगापुरते आरकेल जातीच्या वाटाण्याचे बी पुरविले जाते. हा वाटाणा भात कापणीनंतर उपलब्ध असणाऱ्या ओलाव्यावर व हिवाळ्यात पडणाऱ्या धुक्‍यावर सहज वाढतो. यातून वर्षभर घराला पुरेल इतके उत्पन्न त्यांना मिळते. पाण्याची उपलब्धता असेल तर भरघोस उत्पन्नही मिळू शकते. शेतकऱ्यांना एकदा बियाणे वाटप केल्यानंतर ते शेतकरी आता दरवर्षी भातानंतर वाटाण्याचे पिक घेत आहेत.

शाळांमध्ये गांडूळ खत निर्मिती
शालेय विद्यार्थ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. वालूर, सांबू, ऐनवाडी, माळेवाडी या गावातील शाळामध्ये याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते. या गावातील शाळेच्या परसबागेतच गांडळू खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. या शाळेतील हे विद्यार्थी आता घरातील परसबागेतही गांडूळ खताची निर्मिती करत आहेत.

अंदाजे दहा वर्षापूर्वी आम्हाला "स्वयंसिद्धा'कडून पाच हजार रुपयांचे गांडूळ कल्चर युनिट मिळाले. यातून आमच्या कुटूंबाने हा उद्योग सुरु केला. शेणखताच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी पाच ते दहा टन गांडूळ खत आम्ही तयार करतो. या खताची खरेदी इंडॉल कंपनीकडूनही केली जाते. शेतकरीही खताची खरेदी करतात. 60 रुपये किलोने खताची खरेदी होते. गांडूळ कल्चरचीही विक्रीही आम्ही करतो. खताच्या विक्रीतून वर्षाला खर्च वजा जाता 40 ते 50 हजार रुपये तर कल्चरमधून अंदाजे 10 ते 15 हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त घरच्या शेतीलाही सेंद्रिय खत उपबद्ध होते. रासायनिक खतासाठी लागणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचला आहे. स्वयंसिद्धामुळेच आम्ही शेतीमध्ये स्वयंसिद्ध झालो आहोत.
- शीतल पाटील, मल्लेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

स्वयंसिद्धा संस्था, फोन ः 0231-2525129

Friday, January 23, 2015

कृषी विकासाचा सिद्धगिरी पॅटर्न

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाने धार्मिक कार्याबरोबरच आता सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, देशी गाईंचे संवर्धन असे उपक्रम राबविले आहेत. मठाचे प्रमुख श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य सुरू आहे. भारतात आढळणाऱ्या 33 देशी गाईंपैकी 20 प्रकारच्या गाईंचे संवर्धन येथे केले आहे. यातून आरोग्यास उपयुक्त असणारी विविध प्रकारची उत्पादनेही घेतली जातात. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा लखपती शेतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. विज्ञानाची कास धरून आध्यात्मिक प्रसाराचे, संस्कृतीचे संवर्धन करणारा हा मठ निश्‍चितच सर्वांसाठी एक आदर्श असा आहे.
- राजेंद्र घोरपडे

देशी गाय ही दूध कमी देते. तिचा संगोपन खर्च हा परवडणारा नाही. अशा विविध कारणांनी देशी गाईंचे संगोपन शेतकरी करण्याचे टाळतात. संकरित गाईंचे वाढते संगोपन यामुळे देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी झाली. अशाने देशी गाय दुर्मिळ होत आहे. हे लक्षात घेऊन मठाने त्यांच्या संवर्धनासाठी गोशाळा उभारली. देशभरातून या गाई मठाने गोळा केल्या. कोणताही व्यापारी हेतू न ठेवता दुर्मिळ होत चाललेल्या 20 जातींच्या देशी गाईंचे संवर्धन मठाने केले आहे. आज सुमारे 700 गाई, बैल, वासरे येथील गोशाळेत आहेत.

संगोपन केलेल्या गाईच्या जाती
साहिवाल (राजस्थान-गंगानगर), गीर (गुजरात), कॉंक्रिज (गुजरात- कच्छ, मेहसा), देवणी (लातूर, परभणी, नांदेड), लाल कंधारी (नांदेड), डांगी (नाशिक, नगर), थारपारकर (बारमेर, राजस्थान), ओंगली, राठी (नेलोरी, गुंटूर आंध्र प्रदेश), अमृतमहाल (हसन, चिकमंगळूर), हळ्ळीकर( म्हैसूर), कोकण गीड, खिल्लारी कोशी (सांगली, सातारा), खिल्लारी कजरी (सांगली, कोल्हापूर), वेच्चुर (कोट्टायम), पोंगनुर (चित्तूर), उमलचेरी (तंजावर), बारगुर (इरोडे, पेरियार), कंगायम (तमिळनाडू), गावठी गाय (वंश माहिती नसलेली गाय)

सेंद्रिय तुपास मोठी मागणी
गोशाळेत दररोज एक हजार लिटरवर दूध उत्पादन होते. यापासून तूप, ताक याची निर्मिती केली जाते. सेंद्रिय उत्पादन असल्याने तुपाला मोठी मागणी आहे, तर येणाऱ्या पर्यटकांना ताक विकले जाते. याशिवाय पंचगव्यापासून विविध उपपदार्थ तयार केले जातात. गोमूत्रापासून विविध औषधेही तयार केली जातात. याशिवाय सेंद्रिय साबण, धूप याचीही निर्मिती केली जाते. या उपपदार्थांनाही मोठी मागणी आहे. विविध असाध्य व्याधींवर उपचारासाठी देशी गाईंचे हे उपपदार्थ उपयुक्त आहेत.

गोबर गॅस प्रकल्पातून इंधननिर्मिती
गोठ्याच्या ठिकाणीच गोबर गॅसचा प्रकल्प आहे. दररोज तीस अश्‍वशक्ती ऊर्जा तयार होते. दिवसाला पाच ते सहा तास त्याचा वापर केला जातो. गोठ्याशेजारीच असणारे सिद्धगिरी इस्पितळ, गुऱ्हाळघर यांना इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो; तसेच गोबरगॅस प्रकल्पातील टाकावू शेणखतापासून गांडूळ खताचीही निर्मिती केली जाते. या गांडूळ खतासही मोठी मागणी आहे.

सेंद्रिय गुळाचे उत्पादन
मठाच्या शंभर एकरावरील शेतीमध्ये ऊस, चारा पिके, आंबा, भात, भुईमूग आदी पिके घेतली जातात. उसापासून सेंद्रिय गुळ, काकवी आदी उत्पादने घेतली जातात.

सेंद्रिय शेती प्रसाराचे कार्य
मठातर्फे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यामध्ये गांडूळ खतनिर्मिती, सेंद्रिय पद्धतीने कीडनाशक, बुरशीनाशके तयार करण्याचे तंत्र शिकविले जाते. अगदी सोप्या पद्धतीने व कमी खर्चात उत्पादित करता येणारी ही उत्पादने शेतीच्या उत्पादनास लाभदायक तर आहेतच; पण त्याबरोबरच विषमुक्त अन्नाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणारीही आहेत. जमिनीचा बिघडत चाललेला पोत सुधारण्याचेही कार्य यातून केले जाते. दोन महिन्यांतून एकदा मोफत या कार्यशाळेचे मठावर आयोजन केले जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ नारायण रेड्डी तसेच राज्यातील सेंद्रिय उत्पादक शेतकरी मार्गदर्शन करतात. त्यांचे विविध अनुभव सांगतात.

लखपती शेतीचा प्रयोग
एका एकरात वर्षभरात विविध प्रकारची 188 पिके सेंद्रिय पद्धतीने घेऊन पाच व्यक्तीच्या कुटुंबाचा चरितार्थ यशस्वीपणे करता येऊ शकतो, हे दाखविणारा "लखपती शेती'चा प्रयोग येथ करण्यात आला आहे. पिकांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास खर्च वजा जाता सव्वा लाखांचे उत्पादन एका एकारात घेणे शक्‍य आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाऊ शकते. पौष्टिक, ताजा आहार देणारी ही उत्पादने असल्याने आर्थिक प्रगती बरोबरच आरोग्यही सुदृढ ठेवले जाते.

लखपती शेतीतील पीक नियोजन
वारा पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. याचा विचार करून पश्‍चिमेला उंज वाढणारी म्हणजे उसासारखे पीक 15 गुंठ्यात घेतले जाते. त्यानंतर क्रमशः कमी कमी उंचीची पिके घेतली जातात. यामुळे वादळी वाऱ्यांने पिकांचे संरक्षण होते. नुकसान कमी होते. पिकांना सूर्य प्रकाश अधिक मिळाल्याने उत्पादनातही याचा परिणाम दिसून येतो. पिकांमध्ये व्यापारी पिके, धनधान्याची पिके, मसाला पिके, फळझाडे, कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळीचे नियोजन केले जाते. जेणेकरून कुटुंबाची वार्षिक गरज यातून भागू शकेल असे नियोजन असते. वैरणीसाठीही हत्तीगवत, मेथीघास, कडवळही पाच गुंठ्यात घेतले जाते. चाळीस गुंठ्यात इंच इंच जागेचा प्रभावी वापर केला जातो. शेताच्या सीमेवर तुरीचे पिके घेतले असून दोन तुरीमध्ये गवतीचहा, अननस, कडीपत्ता अशी अनेक प्रकारची पीकरचना केलेली आहे. भाजीपाला पिके आठ गुंठ्यात तर भात, भुईमूग, ज्वारी खरीपात व गहू, हरभरा, वाटाणा रब्बी हंगामात नऊ गुंठे जागेवर घेतला जातो. एका एकाराच्या याच जागेत तीन गुंठ्‌यात घर, तीन देशी गाईंसाठी गोठा, संडास बाथरूम, गोबरगॅस, परसबाग, गोबरगॅस आदी बांधण्यात आले आहे.

विजेच्या खांबाभोवतीही पिके
शेतात विजेचा खांब असेल तर त्या परिसरातील जागा ही वाया जाते. त्या ठिकाणी नांगरट योग्य प्रकारे होत नाही; तसेच तेथे पीकही योग्य प्रकारे वाढत नाही; पण या लखपती शेतात त्या जागेचाही सुयोग्य वापर करण्यात आला आहे. खांबाच्या भोवती गोलाकार पद्धतीने मातीचा ढीग करून त्यावर रताळीची लागवड येथे केली आहे. कंदवर्गीय पिके घेऊन या जागेचा योग्य वापरही या लखपती शेतीच्या प्रयोगात केला आहे.


माझ्या बालपणी घरात लागणारे धान्य घरातच पिकविले जायचे. सर्व भाजीपाला घरातील शेतातच पिकवला जायचा. बाजारात जाऊन धान्य, भाजीपाला विकत आणण्याची कधी गरजच भासली नाही. छोट्या शेतातही कुटुंब सुखात जगायचे. आजकाल शेती परवडत नाही ही ओरड ऐकताना तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा विचार करता खरच शेती तोट्याची झाली आहे का? यासाठी प्रयोग म्हणून हा लखपती शेतीचा प्रयोग आम्ही येथे केला आहे. एका एकरात पाच माणसांच्या एका कुटुंबाला लागणारे सर्व धान्य, भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने घेता येणे शक्‍य आहे. हे या प्रयोगातून आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. ही संकल्पना पाहून शेतकऱ्यांनीही प्रोत्साहित होऊन शेतीकडे पाहावे. आपले शेत, कुटुंब सधन, स्वयंपूर्ण, आरोग्यसंपन्न करावे हाच या प्रयोगा मागचा आमचा उद्देश आहे. देशी गाईंचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना व ग्राहकांना विषमुक्त अन्न या घटकांसाठी आम्ही गोशाळेचा उपक्रम सुरू केला आहे.

- श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य महाराज, कणेरी

Thursday, October 2, 2014

'टार्गेट' ठेवूनच शेतीचे नियोजन

'टार्गेट' ठेवूनच शेतीचे नियोजन
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर शहरातील आयुर्वेदिक डॉक्‍टर डॉ. धनंजय गिरमल यांनी वडिलोपार्जित दीड एकर शेती न विकता प्रयोगशील वृत्ती जपत ऊस उत्पादनवाढीचे "टार्गेट' ठेवले. प्रयोगशील शेतकरी आणि कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक उत्पादनात सातत्य, पीक बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी आठव्या गल्लीत डॉ. धनंजय जयपाल गिरमल यांचा दवाखाना आहे. तसेच इचलकरंजी शहरातही त्यांचा दवाखाना आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा ते इचलकरंजीला जातात. रविवारचा दिवस मात्र इचलकरंजी जवळील अब्दुललाट (ता. शिरोळ) या गावातील शेतीसाठी राखीव ठेवलेला असतो. दिवसभर थांबून वाटेकऱ्याच्या मदतीने पुढील आठवड्याचे त्यांचे शेतीचे नियोजन चालू असते.

सांगली येथून आयुर्वेद पदवी घेतल्यानंतर डॉ. गिरमल यांनी कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांचे वडीलही डॉक्‍टर होते. त्यांचा इचलकरंजी शहरात दवाखाना होता. तेथूनच ते अब्दुललाट गावातील दीड एकर शेतीचे व्यवस्थापन पाहत होते. डॉ. गिरमल यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर शेतीची पूर्ण जबाबदारी डॉ. गिरमल यांच्याकडे आली. केवळ दीड एकर शेती आहे, म्हणून सांभाळण्यापेक्षा ती विकून टाका, असा सल्ला बऱ्याच जणांनी त्यांना दिला. परंतु डॉ. गिरमल यांची शेतीची आवड त्यांना शेती विकण्यास नेहमीच नाकारत आली. काही झाले तरी शेती करायचीच, या जिद्दीपोटी त्यांनी शेतीकडे लक्ष दिले. या शेतीच्या व्यवस्थापनात त्यांना नितीन कल्लाप्पा गिरमल (होगाडे) हे चांगले वाटेकरी मिळाल्याने पीक नियोजनात अडचण आली नाही.

"टार्गेट' ठेवून शेती ः
शेतीत प्रगती करण्याचे नियोजन डॉ. गिरमल यांना गप्प बसू देत नव्हते. उसाचे एकरी शंभर - सव्वाशे टन उत्पादन घेणारे शेतकरी शिरोळ तालुक्‍यात आहेत, मग आपल्या शेतात चाळीस टन इतकेच उत्पादन कसे, हा प्रश्‍न त्यांना नेहमी सतावत होता. या प्रश्‍नातून त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. उत्पादनवाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातील डॉ. अशोक पिसाळ, डॉ. ए. पी. पाटील यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी ऊस उत्पादनवाढीकडे लक्ष दिले. पीक नियोजन केले. याच काळात त्यांनी "ऍग्रोवन'मधील तांत्रिक लेख, शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांची नोंद ठेवण्यास सुरवात केली. त्यानुसार पीक व्यवस्थापनात बदल केले.

पीक लागवडीचे नियोजन ः
- डॉ. गिरमल यांची शेती पूरक्षेत्रापासून थोड्याच अंतरावर आहे. शेती दीड एकर असल्याने व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांनी ऊस लागवडीवरच भर दिला.
- पारंपरिक पद्धतीने उसाचे एकरी केवळ चाळीस टन उत्पादन मिळायचे. परंतु चांगले बेणे, बेणेप्रक्रिया, सुधारित पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर दिला, तर निश्‍चितपणे उत्पादनात वाढ होते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी वाटेकऱ्याच्या मदतीने नियोजन केले. दरवर्षी किमान पाच टनांनी ऊस उत्पादनवाढीचे टार्गेट ठेवले.
- काही वेळा नियोजनात चूक होते, अपेक्षित पीक उत्पादन येत नाही. परंतु निराश न होता चुकांची दुरुस्ती आणि अभ्यास करून पुढील वर्षीच्या पीक नियोजनात सुधारणा केली जाते.
- डॉ. गिरमल उसाची लागवड जूनमध्ये न करता ऑगस्टमध्ये करतात. त्यापूर्वी साडेचार फुटांवर सऱ्या पाडून पावसाच्या पाण्यावर सोयाबीनच्या जेएस-335 या जातीच्या बियाण्याची सरीच्या एका बाजूला एक फूट अंतरावर टोकण करतात. सोयाबीन पेरणीपूर्वी बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केली जाते. एक एकरासाठी आठ किलो बियाणे लागते. तीन महिन्यांत सोयाबीन कापणीयोग्य होते. कापणीनंतर सोयाबीनचा पाला, कुट्टी सरीत कुजवली जाते. चांगल्या शेणखताची उपलब्धता नसल्याने सोयाबीनचा पाला फायदेशीर ठरतो.
- सोयाबीनचे अंदाजे आठ क्विंटल उत्पादन मिळते. त्यातील चौथाई वाटेकऱ्यास दिली जाते. सोयाबीन पिकास सरासरी सहा हजार रुपये व्यवस्थापन खर्च येतो. सोयाबीन विक्रीतून सरासरी सोळा हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
- उसाच्या को-265 या जातीची लागवड सोयाबीन काढणीच्या वेळी करतात. पाच वर्षांपूर्वी ऊस लागवड करताना ते बेणेप्रक्रिया करत नव्हते, परंतु बेणेप्रक्रियेचे फायदे लक्षात आल्यानंतर आता ते बेणे लागवड कीडनाशक, तसेच जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करूनच करतात.
- शिफारशीनुसारच रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून आहे. पिकाच्या गरजेनुसारच पाणी व्यवस्थापन केले जाते. उसामध्ये एक आड एक सरी पाचट कुजविले जाते. यामुळे जमिनीची सुपीकता आणि ऊस उत्पादनात फरक दिसतो आहे.
- पूर्वी उसाचे एकरी 40 टन उत्पादन येत होते. आता एकरी सत्तर टनांपर्यंत उत्पादन पोचले आहे. तसेच खोडव्याचे उत्पादन एकरी 50 ते 55 टनांपर्यंत मिळते.
- शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यातील कृषी अधिकाऱ्यांचेही ते मार्गदर्शन घेतात.

वाटेकऱ्यास चौथाई
शेतीमध्ये मजुरांची मोठी कमतरता आहे. मजुरांच्या कमतरतेमुळेच ते स्वतः मजुरांचे नियोजन करीत नाहीत. वाटेकरी मजुरांचे नियोजन करतो. वाटेकऱ्यास उत्पन्नातील चौथा हिस्सा दिला जातो. तसेच शेतीसाठी लागणारा सर्व खर्च स्वतः डॉ. गिरमल करतात. सोयाबीनचे दीड एकरातून दोन ते चार क्विंटल व उसाचे 17 ते 20 टनांचे उत्पन्न वाटेकऱ्यास मिळते.

औषधी वनस्पतींची लागवड ः डॉ. गिरमल यांनी इचलकरंजी येथील घराच्या परसबागेत कोरफड आणि अडुळसा लागवड केली आहे. कोरफडीचा रस आणि खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाच्या मिश्रणातून त्यांनी आयुर्वेदिक तेल तयार केले आहे. केसांच्या समस्येवर हे तेल उपयुक्त ठरले आहे. येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार औषधे मिळावीत हाच त्यामागचा उद्देश आहे. कफ, दम्याच्या औषधांसाठी अडुळशापासून त्यांनी औषधे तयार केली आहेत. शेतीची आवड असल्याने औषधी वनस्पतींची लागवड करून त्यापासून उपयुक्त औषधी बनवून ते रुग्णांना देतात.

"ऍगोवन' हा खरा मार्गदर्शक... दै. ऍग्रोवनमधील विशेष पुरवण्या, तांत्रिक लेख आणि यशोगाथांनी डॉ. गिरमल यांना शेती प्रगतीची दिशा दाखविली. याबाबत ते म्हणतात, की उसाविषयीची सर्व माहिती मी संग्रहित केली आहे. त्याचबरोबरीने भाजीपाला पिके, चारा पिके, जनावरांसाठी मुरघास, आंतरपीक पद्धती याविषयांच्या लेखांचाही संग्रह केला आहे. पुढे शेतीमध्ये पीक बदल करताना हा संग्रह दिशा देणारा आहे. शेतीमधील अनुभव आणि माहितीच्या संग्रहामुळे पुढच्या पिढीमध्येही शेतीची आवड निर्माण झाली आहे.

पुढील टप्प्यातील नियोजन...
- एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे टार्गेट, त्यादृष्टीने पीक व्यवस्थापनावर लक्ष.
- प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी, कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांशी सातत्याने चर्चा करून पीक बदलाबाबत सल्ला.
- जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर भर.
- ऊस, सोयाबीन बरोबरीने काही प्रमाणात भाजीपाला लागवडीचे नियोजन.
- येत्या काळात अजून काही जमीन खरेदी करणार.

संपर्क ः डॉ. धनंजय गिरमल ः 9423858765

Wednesday, September 17, 2014

सुख - निद्रा

सांग विस्तवाचे । अंथरुणावरी । लागेल का तरी । सुख-निद्रा ।। 946 ।।
स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

आपल्या नावडत्या गोष्टींनी आपले मन विचलित होते. पण आवडत्या गोष्टींनीही आता मन विचलित होऊ लागले आहे. बदलती संस्कृती, वॉट्‌सअँप, स्मार्टफोनच्या जमान्यात साधा फोन जरी आला नाही, संवाद झाला नाही, पोस्ट टाकली नाही, कोणी लाईक केले नाही यामुळेही बेचैनी वाटू लागते. सारा वेळ यामध्येच जाऊ लागला आहे. संवाद आता कृत्रिम झाला आहे. विचार शांत होण्याऐवजी तो वेगाने वाढतच आहे. अशाने मनाची शांतीच नष्ट झाली आहे. विस्तवाच्या अंथरूणावर झोपण्याचा प्रयत्न केल्यास झोप कशी लागणार? पण आता नव्या जमान्यात या विस्तवाच्या अंथरुणावरच झोपावे लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्याची सवय आता करावी लागणार आहे. बदलत्या परिस्थितीत कसे वागायचे, हे अध्यात्म शिकवते. काळ बदलला आहे. या परिस्थितीत मनाचा समतोल ढळू देऊ नये. कोणी पोस्ट टाकली नाही, कोणी आपला विचार केला नाही, कोणी बोलले नाही म्हणून नाराज होण्याची गरज नाही. मनाचा समतोल ढळू न देणे हेच अध्यात्म शिकवते. मन शांत ठेवावे, मनातील विचार शांत व्हावेत. यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठीच साधना आहे. साधनेने हे साध्य होते. पण साधनेतही मन रमत नाही. विचार राहात नाहीत. साधना करतानाही मोबाईलची रिंगटोन वाजते. कोणाचा मेसेज असेल या उत्सुकतेने आपण त्याकडे वळतो. इतकी सवय या मोबाईलची झाली आहे. रटाळ मेसेज असेल तर मन भडकून उठते. आता ठरवायचे साधनेच्या वेळेत फोन कडे लक्ष द्यायचे नाही. थोडावेळ तरी शांत बसता आले तरी आपण नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ. पण निर्णयच घेतला नाही, मोबाईल मागे धावतच सुटलो तर मग शांती कशी मिळेल. मोबाईल ही सुख वस्तू आहे. त्यापासून सुख घ्यायला हवे. पण मनाची शांती विचलित करून दुःख देत असेल तर त्यातील सुख कसे मिळवता येईल याचा विचार करायला हवा. सुखाच्या वस्तूतून समाधान घ्यायला शिकले पाहिजे. सुख-दुःखाचा विचार करत न बसता मनाला या विस्तवावर झोप लागेल याकडे लक्ष द्यायला हवे. तशी सवय अंगी लावायला हवी. बदलते जग वेगाने बदलत आहे. हा वेग पकडण्याच्या मागे आपण लागलो आहोत, पण सुखाने त्याचा वेग पकडायला हवा. दुःख गिळायला शिकले पाहिजे. तितके सामर्थ्यवान आपण व्हायला हवे. सुख-दुःख पचविण्यासाठी साधनेची गरज आहे. शांतीची गरज आहे. मनाला ही सवय लावायला हवी. तरच मनशांती भेटेल.

Tuesday, September 9, 2014

समर्पण

म्हणोनि उचित । कर्मे ती आघवीं । मज समर्पावी । आचरोनि ।।311।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी ते पुस्तक सद्‌गुरुंना अर्पण केल्याचा उल्लेख असतो. तशी ही परंपरा आहे. प्रत्येक कर्म हे सद्‌गुरुंना अर्पण करावे, असा नियमच आहे. म्हणूनच तसे कसे केले जाते. पुस्तक लिहिले गेले, विचार मांडले गेले ते सद्‌गुरुंच्या कृपेमुळे सुचले. नव्हेतर ते सद्‌गुरुंनीच सुचविले असा भाव त्यामध्ये असतो. सद्‌गुरुंच्या भावातून जे प्रगटले. ते स्वतःचे आहे असे कसे म्हणता येईल. ते सद्‌गुरुंचेच आहे. सद्‌गुरुंना समक्ष भेटून जरी ते अर्पण करता आले नाही, तरी तो भाव मनात कायम असणे म्हणजे ते सद्‌गुरुंना समर्पित करण्यासारखेच आहे. समर्पण म्हणजे शरणांगती. शत्रू समोर पत्करलेली शरणांगती आणि सद्‌गुरूंच्या समोरील शरणांगती यामध्ये फरक आहे. याची गल्लत करु नये. शरण जाणे म्हणजे सर्वस्व घालविणे अशी मनाची दुर्बलता करून घेणे चुकीचे आहे. सद्‌गुरूंना शरण जाणे म्हणजे मन दुबळे होते. विचार दुबळे होतात असा अर्थ लावणे चुकीचे आहे. तसा विचार करणेही चुकीचे आहे. अध्यात्मात तसा त्याचा अर्थ नाही हे समजून घ्यायला हवे. सद्‌गुरु हे शत्रू नाहीत. मित्र आहेत. सहकारी आहेत. अशा थोर व्यक्तीच्या चरणी शरण जाणे हे सहजरित्या घडत नाही. याला काहीतरी अनुभव यावा लागतो. तरच हे घडते. देवाची आठवण ही कठीण प्रसंगी चटकण होते. इतर वेळी ही आठवण होईलच असे नाही. शरण जाणे आणि पराभूत होणे यामध्ये फरक आहे. शरण जाणे हा पराभव नाही. सद्‌गुरूंच्या अनुभवामुळे ही शरणांगती येते. जे पुस्तक आपण लिहीले ते विचार त्यांचे होते हा अनुभव जेव्हा येईल. तेव्हा ते पुस्तक त्यांचे आहे. त्यांनाच समर्पित करायला हवे. असा भाव सहजच मनात प्रगट होते. म्हणूनच धार्मिक पुस्तके ही सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण केलेली असतात. संशोधनाचे प्रबंध हे गुरुंना समर्पित करावेत. कारण ते गुरुंच्या कृपेमुळे त्यांच्या सहकार्यामुळेच ते पूर्ण झाले असतात. त्यांनीच तर ते शिकविले आहे. अशा गुरुंना तो प्रबंध समर्पित करायला हवा. अध्यात्म गुरु आणि प्रत्यक्ष शिक्षण देणारे गुरु यामध्ये फरक आहे. पण शेवटी ते गुरुच आहेत. गुरूंचा मान हा राखायलाच हवा. गुरु हे ज्ञानाचे सागर असतात. त्यांच्यातून प्रकट होणाऱ्या ज्ञानातुनच तर शिष्याचा विकास होत असतो. यासाठी सद्‌गुरुंना समर्पण करण्याचा भाव सदैव मनामध्ये असावा. हा भाव कायम राहीला तर मीपणाची भावनाच राहणार नाही. अशा भावामुळेच आत्मज्ञानी होण्याचा मार्ग सुकर होईल.

Sunday, August 24, 2014

कर्मयोगपंथ

कर्मयोगपंथ । आक्रमोनि पार्था । चढे जो पर्वता । मोक्षरुप ।। 58 ।। अध्याय 5 वा
स्वामी स्वरुपानंद अभंग श्रानेश्‍वरी

जीवन जगायचे आहे तर त्यासाठी आवश्‍यक गोष्टी ह्या कराव्याच लागतात. ध्यानाला करतो आहे. म्हणून आयते जेवनाचे ताट कोणी समोर आणून ठेवणार नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी आवश्‍यक ते नियोजन हे जीवनात करावेच लागते. मादूगरी मागूण जीवन जगता येते. पण देणाऱ्याने शुद्ध अंतकरणाने दान द्यावे इतकी पात्रता त्या व्यक्तीमध्ये असावी लागते. यासाठीही कर्माची आवश्‍यकता आहेच. मंदिर उभारले, मशीदीही आता ठिकठिकाणी दिसत आहेत. चर्चची संख्याही वाढत आहे. चांगली गोष्ट आहे. पण अशा या ठिकाणी कोणते कर्म केले जाते. कोणता विचार जोपासला जातो. कोणती सेवा दिली जाते याला महत्त्व आहे. ही ठिकाणे समस्त मानव जातीच्या रक्षणासाठी आहेत. मानव जातीच्या विकासासाठी आहेत. मानव जातीचा विकास, आध्यात्मिक विचाराचा विकास हे त्यांचे कार्य आहे. हे कार्य तेथे चालत नसेल तर ही मंदिरे ओस पडतात. वेगळ्या विचारांनी लोक एकत्र येतात. काही काळ ही एकी टिकूण राहते. पण मंदिराचे उद्दिष्ट ते नसल्याने त्याचे पावित्र्य राहात नाही. अशा मंदिरांना मग जनताच पाठ फिरवते. गावात, शहरात अशी अनेक मंदिरे आहेत. सर्वच मंदिरात गर्दी असते असे नाही. गर्दी हवीच असेही नाही. पण मंदिराचे पावित्र्य टिकूण असायला हवे. मंदिर असो, मशिद असो, किंवा चर्च असो त्याचे पावित्र्य राखायलाच हवे. यासाठी कर्म करावे लागते. तो कर्माचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे. समस्त मानव जातीच्या विकासाचा मार्ग आहे. नमस्कार सर्वच धर्मात करतात. फक्त प्रत्येकाची पध्दत वेगळी आहे. पण मनातील विचार एकच आहे. सर्वच धर्म दुष्ट विचारांना विरोध करतात. समस्त मानव जातीतील दुष्ट विचार दूर व्हावेत हेच हे सर्व धर्म सांगतात. मानव जातीच्या रक्षणाचा विचार हाच धर्म आहे. ही ठिकाणे त्याच विचारांनी विकसित करायला हवीत. तेथे हेच कर्म करायला हवे. तरच मोक्षाचे स्वरूप विकसित होईल.

Monday, August 11, 2014

नामरुपाचा विस्तार

करी पार्था, नाम - ।
रुपाचा विस्तार । सर्वथा साचार । प्रकृतिच ।। 51 ।।

स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 7 वा

नामात काय आहे? आपण साधना करतो पण फक्त तोंडाने नाम उच्चारतो पण मनाने ते उच्चारत नाही. मन मात्र भटकत राहाते. नामावर त्याचे लक्ष केंद्रित नसते. नाम हे मनाने उच्चारायला हवे. तरच साधना होते. अन्यथा ती केवळ बडबड होते. स्वरूपाचे दर्शन घडायचे असेल तर नामाचा जप मनाने करायला हवा. मनात स्वरुप पहायला हवे. साधना करताना अनेक अडचणी येतात. कधी वेळच मिळत नाही. तर कधी सर्दी पडसे झालेले असते. अशा अनेक कारणांनी साधनेत व्यत्यय येत राहातो. पण साधना सोडायची नाही. या अडचणी ह्या क्षणिक असतात. आज सर्दी झाली आहे. उद्या वेळ नाही. परवा डोक दुखत आहे. अशी अनेक कारणे असतात. पण विचार केला तर ती सर्व क्षणिक असतात. मोठा आजार किंवा मोठा आघात झाल्यानंतर मात्र देव लगेच आठवतो. भीती पोटी देवाकडे आपण वळतो. तेव्हा देवाचे स्मरण होते. स्वाभाविक आहे. गरजेच्या वेळी तरी त्याचा आधार आहे असे वाटते. मनाला आधार मिळतो. पण गरज संपली की पुन्हा त्याचे विस्मरण होते. हे ही खरे आहे की साधना मारून मुरगुटून होत नाही. साधनेसाठी मनाची तयारी असावी लागते. जबरदस्तीने साधना करता येत नाही. पण मनाला साधनेला बसण्याची सवय लावावी लागते. ही सवय आपणास जरूर लागते. चांगल्या सवयी लागण्यास थोडा वेळ लागतो. धकाधकीच्या जीवनामुळे आता असल्या सवयी लागत नाहीत. फावला वेळच नसतो. असला तरी टि. व्ही. किंवा मोबाईलवर चॅटींग करण्यातच सारा वेळ जातो. वाचण्यासाठीही सध्या लोकांना वेळ नाही. मग देवाचे स्मरण करायला, साधना करायला वेळ कोठून येणार. पण एकक्षण जरी स्मरण केले तरी पुरेसे आहे. बसल्या बसल्या देव आठवला तरी दर्शन घडते. नामाचा एक शब्दही देवाचे दर्शन घडवतो. इतके नामामध्ये सामर्थ्य आहे. नाम देवाच्या रुपाचा विस्तार करते. आपण जरी देवाचे स्मरण केले नाही तरीही त्याचा उच्चार मात्र सतत सुरू असतो. सोऽहम, सोऽहम चा नाद सदैव सुरू असतो. फक्त आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे. अवधान द्यायला हवे. आपले लक्ष नसले तरी ते सुरूच असते. सायकल चालवताना दोन्ही पायांची हालचाल सुरू असते. लक्ष जरी दुसरी कडे असले तरी ही क्रिया सुरू असते. मध्येच आडवा कोणी आला तर लगेच ही क्रिया थांबते. ब्रेक मारला जातो. तसे आपल्या शरीरातही सोऽहमचा नाद सुरू असतो. मन आपले फक्त दुसरीकडे धावत असते. आपण या नादाकडे लक्ष दिले तर तो नाद निश्‍चितच आपणाला ऐकू येतो. या नादात रमले तर त्याचा निश्‍चितच विस्तार होतो. स्वरुपाचे दर्शन घडते. फक्त हा स्वर आपण मनाने उच्चारायला हवा. मनाने ऐकायला हवा. मनाने जाणायला हवा. मन त्यामध्ये रमवायला हवे. तरच हे शक्‍य आहे.