Wednesday, September 17, 2014

सुख - निद्रा

सांग विस्तवाचे । अंथरुणावरी । लागेल का तरी । सुख-निद्रा ।। 946 ।।
स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

आपल्या नावडत्या गोष्टींनी आपले मन विचलित होते. पण आवडत्या गोष्टींनीही आता मन विचलित होऊ लागले आहे. बदलती संस्कृती, वॉट्‌सअँप, स्मार्टफोनच्या जमान्यात साधा फोन जरी आला नाही, संवाद झाला नाही, पोस्ट टाकली नाही, कोणी लाईक केले नाही यामुळेही बेचैनी वाटू लागते. सारा वेळ यामध्येच जाऊ लागला आहे. संवाद आता कृत्रिम झाला आहे. विचार शांत होण्याऐवजी तो वेगाने वाढतच आहे. अशाने मनाची शांतीच नष्ट झाली आहे. विस्तवाच्या अंथरूणावर झोपण्याचा प्रयत्न केल्यास झोप कशी लागणार? पण आता नव्या जमान्यात या विस्तवाच्या अंथरुणावरच झोपावे लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्याची सवय आता करावी लागणार आहे. बदलत्या परिस्थितीत कसे वागायचे, हे अध्यात्म शिकवते. काळ बदलला आहे. या परिस्थितीत मनाचा समतोल ढळू देऊ नये. कोणी पोस्ट टाकली नाही, कोणी आपला विचार केला नाही, कोणी बोलले नाही म्हणून नाराज होण्याची गरज नाही. मनाचा समतोल ढळू न देणे हेच अध्यात्म शिकवते. मन शांत ठेवावे, मनातील विचार शांत व्हावेत. यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठीच साधना आहे. साधनेने हे साध्य होते. पण साधनेतही मन रमत नाही. विचार राहात नाहीत. साधना करतानाही मोबाईलची रिंगटोन वाजते. कोणाचा मेसेज असेल या उत्सुकतेने आपण त्याकडे वळतो. इतकी सवय या मोबाईलची झाली आहे. रटाळ मेसेज असेल तर मन भडकून उठते. आता ठरवायचे साधनेच्या वेळेत फोन कडे लक्ष द्यायचे नाही. थोडावेळ तरी शांत बसता आले तरी आपण नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ. पण निर्णयच घेतला नाही, मोबाईल मागे धावतच सुटलो तर मग शांती कशी मिळेल. मोबाईल ही सुख वस्तू आहे. त्यापासून सुख घ्यायला हवे. पण मनाची शांती विचलित करून दुःख देत असेल तर त्यातील सुख कसे मिळवता येईल याचा विचार करायला हवा. सुखाच्या वस्तूतून समाधान घ्यायला शिकले पाहिजे. सुख-दुःखाचा विचार करत न बसता मनाला या विस्तवावर झोप लागेल याकडे लक्ष द्यायला हवे. तशी सवय अंगी लावायला हवी. बदलते जग वेगाने बदलत आहे. हा वेग पकडण्याच्या मागे आपण लागलो आहोत, पण सुखाने त्याचा वेग पकडायला हवा. दुःख गिळायला शिकले पाहिजे. तितके सामर्थ्यवान आपण व्हायला हवे. सुख-दुःख पचविण्यासाठी साधनेची गरज आहे. शांतीची गरज आहे. मनाला ही सवय लावायला हवी. तरच मनशांती भेटेल.

No comments:

Post a Comment