-पाटगावच्या मध उत्पादकाचे मत; परिसराच्या विकासाच्या दृष्टीने योजना हव्यात
राजेंद्र घोरपडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. 22 ः डोंगरीभागात राहणाऱ्यांना रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नसतात. विशेषत: पश्चिम घाटामध्ये ही स्थिती आहे. त्यातच तेथील जैवविविधता जपण्यासाठी प्रयत्न होण्याच्या दृष्टीने तेथे परंपरागत अस्तित्वात असलेले मधमाश्या पालनासारखे उद्योग जोपासणे गरजेचे आहे. पश्चिम घाटातील वनस्पतींच्या संवर्धनातही याचे महत्त्व आहे. 1994 नंतर मधमाश्यांवर आलेल्या थायी सॅक ब्रुड या रोगामुळे मधमाश्यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. यामुळे पाटगाव परिसरातील मधमाश्या पालनाचा व्यवसायच उद्ध्वस्त झाला. गेल्या चार-पाच वर्षांत हा व्यवसाय पुन्हा जोमाने वाढत आहे. मधाच्या उत्पादनातही वाढ झाली. हा व्यवसाय पुन्हा उभा राहावा, यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे, असे येथील मध उत्पादकांना वाटते.
गेल्या 40 वर्षांपासून मधुकर नाईक हे पाटगाव परिसरात हा व्यवसाय करत आहेत. येथील सहकारी मध उत्पादक संस्थेमध्ये ते संचालकही होते. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, "1994 ला मी स्वतः 1200 किलो मध संकलित केला होता. त्या वेळी पाटगाव येथे सहकारी तत्त्वावर मध उत्पादक संस्था कार्यरत होती. या संस्थेमध्ये त्यावर्षी 28 हजार किलो इतके उच्चांकी मध संकलन झाले होते. तसे दरवर्षी ही संस्था 15 ते 20 हजार किलोवर मध संकलित करत होती. पण, त्यानंतर संस्थेकडे संकलित होणाऱ्या मधामध्ये घट झाली. परिसरात थायी सॅक ब्रुड या रोगाने थैमान घातल्याने मधमाश्यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. मधाचे संकलनच नसल्याने संस्था मोडकळीस आली. आज ही संस्था अस्तित्वातच नाही.''
गेल्या चार-पाच वर्षांत परिसरातून मध संकलन चांगले होत आहे. 1994 पूर्वी मी स्वतः दरवर्षी 500 ते 600 किलो मध संकलित करत होतो. गेल्या चार-पाच वर्षांत प्रतिवर्ष इतके संकलन होत नसले तरी 300 किलोपर्यंत मजल मारता आली आहे, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.
मधमाश्या पालनाचा हा व्यवसाय पुन्हा येथे वाढावा. येथील स्थानिकांना यामुळे चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जंगलातून गोळा होणारा मध हा औषधी असल्याने, तसेच त्याची गुणवत्ता उत्तम असल्याने या मधास अधिक मागणी आहे. याला दरही चांगला मिळतो. यासाठी महाबळेश्वर येथील मध संचालन, खादी ग्रामोद्योग व जिल्हा कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन हा उद्योग पुन्हा नव्याने वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. खादी ग्रामोद्योग 120 रुपये किलोने मध विकत घेते. बाजारपेठेत हाच दर जागेवर 250 किलो इतका आहे. याचा विचार करून शासनाने मधाला योग्य दर मिळवून द्यावा. मधाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मध उत्पादक सहकारी संस्था पुन्हा कार्यरत करण्याची गरज आहे, असेही श्री. नाईक यांना वाटते.
..............
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्यावर्षी 40 शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योगतर्फे मधमाश्या पालनाचे प्रशिक्षण अनुदानावर 120 पेट्यांचे वाटप केले होते. हे सर्व लाभार्थी पाटगाव, तांब्याची वाडी, मानी, मठगाव परिसरातील आहेत. यंदाही 40 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा.
- महावीर लाटकर, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जिल्हा कृषी विभागामार्फत मधमाश्या पालन संचासाठी 50 टक्के, मधुमक्षिका वसाहत तयार करण्यासाठी 50 टक्के, मध काढणी यंत्रासाठी 50 टक्के देण्यात येते. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. हा व्यवसाय वाढीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
No comments:
Post a Comment