म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।
गगन जैसें अलिंगना । गगनाचिया ।।
सद्गुरुचे, देवाचे नामस्मरण म्हणजे भजन. भक्तीची गोडी भजनाने लागते. सध्याच्या नव्या पिढीत भजनाची आवड निर्माण होणे, याची गोडी लागणे या गोष्टी अशक्यच आहेत. नव्या पिढीला पैशाची गुर्मी आहे. सर्वच गोष्टी ते पैशाने मोजतात. भक्ती, अध्यात्म या गोष्टीही ते पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण या गोष्टी पैशाने विकल्या जात नाहीत. याची कल्पना त्यांना नाही. याचेच मोठे दुःख वाटते. या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. भगवंताना फक्त मनाने विकत घेता येते. फक्त फुल, फळ तेही शुद्ध भावनेने दिलेले ऐवढेच ते स्वीकारतात. महालक्ष्मी या नावातच लक्ष्मी आहे. पण या मंदीरातही दानपेटी असते. त्यात ते दान टाकतात. काही मंदीरात, धर्मात तर दान टाकण्याची स्पर्धा असते. सर्वाधिक दान देणाऱ्यांचा सत्कारही होतो. सर्वाधिक मान पैशाने मोजला जातो. याचे लिलावही चालतात. हे अध्यात्म नाही. ही भक्ती नाही. कारण देवाला याची काहीच गरज नाही. भक्तीत याची आवश्यकता नाही. निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. तीच खरी श्रद्धा आहे.
राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406
No comments:
Post a Comment