Monday, July 13, 2020

कशावरून संशोधकांनी दावा केला आहे हीच रामायणातील संजीवनी



सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या वनस्पतीची वैशिष्ट्ये आणि त्याचे उपयोग आणि आढळ विचारात घेता ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

रामायणातील संजीवनी वनस्पतीचा शोध अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर काही शोधनिबंधनही प्रकाशित झाले आहेत. उत्तराखंडमधील आयुष विभागाने संजीवनी बुटीच्या शोधासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. यापूर्वीही या संदर्भात संशोधन झालेले आहे. याच संशोधनाच्या आधारावर सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या वनस्पतीची वैशिष्ट्ये आणि त्याचे उपयोग आणि आढळ विचारात घेता ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
 
डॉ. संदीप पांडे, आरती शुक्‍ला, सुप्रिया पांडे, अंकिता पांडे या संशोधकांच्या गटाने सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती उष्माघात, उष्णतेमुळे झालेले विकार, खोलवर झालेल्या जखमा, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवरील मृत झालेल्या पेशी, स्त्रियांचे प्रजननासंबंधीचे आजार आदीवर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
के. एम. गणेशाय, आर. वासुदेवा आणि आर. उमाशंकर या संशोधकांनी लक्ष्मणास मर्छिता अवस्थेतून बाहेर काढणारी संजीवनी वनस्पती सिलाजीनेला असल्याचे काही उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. उष्णतेच्या झटक्‍यामुळे किंवा तडाख्यामुळे तसेच बाणातील विषामुळे लक्ष्मण मूर्छीत पडला होता. सिलाजीनेला ही वनस्पती उष्माघात आणि विषामुळे आलेली कोमावस्ता यावरील औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते. यामुळे ही वनस्पती संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे.

संजीवनी वनस्पतीची वैशिष्ट्ये

सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती फर्न नेचे वर्गीय वनस्पतीमध्ये मोडते. वाढीसाठी पाणी मिळाले नाही, तर ही वनस्पती सुकते. पण तिच्यातील जिवंतपणा कायम असतो. पुन्हा तिला पाणी मिळाले तर ती पुन्हा फुलते टवटवीत होते. ही वनस्पती मातीत तसेच दगडावरही वाढते. हिमाचल प्रदेशातील कैलास आणि वृषभ पर्वतरांगांमध्ये ही वनस्पती मुख्यतः आढळते. उत्तरांचल भागातील डोंगर रांगांमधील जोशीमठ, कुमिन, गडवाल येथेही तिचा आढळ पाहायला मिळतो. अरवली पर्वत रांगा तसेच मध्य प्रदेशातील सातपुडा, बिलासपूर, होशांगबाद, जबलपूर, अमरकंटक चिंदवाडा, बेतुल, सेहोरे या भागामध्येही वनस्पती आढळते.

संजिवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पती

1. शास्त्रीय नाव - क्रेसा क्रिटीका ः स्थानिक संस्कृत नाव - संजिवनी, रुदंती, अमृतअश्रावा, मधुश्रावा, रोमांचिका
2. शास्त्रीय नाव - सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस ः स्थानिक संस्कृत नाव - संजिवनी, संजिवनी बुटी
3. शास्त्रीय नाव - डेसमोट्रीकम फिमब्राटम ः स्थानिक संस्कृत नाव - जीवाका, जीवा, जीवाभद्रा, जीवावनी, जीवंथी, जीवपाथ्रा, जीवापुष्पा, जीववर्धीनी, जीवधात्री, जीवया, रक्‍थंती, यशस्या, सुखंकारी, प्रांधा
4. मालाकसी ऍक्‍युमिनॅटा - जीवाका
5. मालाक्‍सी वालिची
6. मायक्रोस्टायलीस वाल्लीची - जीवाका, रिश्‍वन
7. ट्रीचोपुस झिलानिक्‍युस - जीवा
8. टर्मिनालिया चेबुला - जीवंथी, जीवंतिका, चेथ्रा
संशोधकांनी शोधलेल्या संजीवनी
स्थानिक भाषेत संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. त्यातील सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस, क्रेसा क्रिटीका, डेसमोट्रायकम्‌ फिम्ब्रियाटम या तीन वनस्पतीवर संशोधकांनी सखोल अभ्यास केला. त्यामध्ये सिलाजीनेला ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची संशोधकांनी शक्‍यता व्यक्त केली.

संजिवनी वनस्पतीच्या मुलस्थानावरून शोध

भगवान हनुमानाने संजिवनी वनस्पती ही पर्वतरांगामध्ये शोधल्याचा उल्लेख रामायणात आढळतो यावरून ही वनस्पती निश्‍चितच पर्वतरांगामध्ये असणार हे निश्‍चित. संजिवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस, क्रेसा क्रिटीका, डेसमोट्रायकम्‌ फिम्ब्रियाटम या वनस्पती पैकी क्रेसा क्रिटीका या वनस्पतीचा आधिवास हा कोरड्या असणाऱ्या दख्खनच्या पठारावर आढळते. ही वनस्पती पर्वतरांगामध्ये आढळत नाही. यावरून संजिवनी म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती रामायणातील संजिवनी नसल्याचा तर्क संशोधकांनी मांडला आहे. सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती उष्णकटीबंधीय पर्वतरांगातील जंगलात आढळते तर डेसमोट्रायकम्‌ फिम्ब्रियाटम ही वनस्पती पर्वतरांगामध्ये आढळते. यावरून या दोन्ही वनस्पतींवर संशोधकांनी भर दिला.

लक्ष्मणाच्या मुर्छीतावस्थेवर संशोधन

मज्जासंस्थेतील बिघाडामुळे अनेकजण कित्येकवर्षे कोमात असतात आणि अचानक त्यांना जागृती येते. अशाप्रकारे मृत्यूच्या दाढेतून पुन्हा जीवंत झालेल्या व्यक्तींची अनेक उदाहरण घडली आहेत. विषामुळे किंवा उष्णतेच्या तडाख्यामुळे अनेकजण कोमात जातात. लक्ष्मणाच्या बाबतही असाच प्रकार घडला असावा, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. बाणातील विषातून किंवा उष्णतेच्या तडाख्याने लक्ष्मण बेशुद्धावस्थेत गेला असावा आणि संजिवनी बुटीमुळे त्याला पुन्हा जीवंत होता आले. कोमातून तो बाहेर आला. याचाच अर्थ संजिवनी ही वनस्पती कोमातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी वापरता येऊ शकते. याचाच अर्थ या वनस्पतीमध्ये ते औषधी गुणधर्म असायला हवेत. अशी ती वनस्पती आहे. हे विचारात घेऊन संशोधकांनी अशा पद्धतीच्या वनस्पतींचा अभ्यास केला.

अशा लागला वनस्पतीचा शोध

काट्याने काट्या काढणे ही आपल्याकडे म्हण आहे. पण प्रत्यक्षात शास्त्रावर हे आधारित आहे. गोकर्णचे फुल कानाच्या आकाराचे असते. या फुलाच्या आकारावरून गोकर्ण हे कानाच्या विकारावरील औषधी तयार करण्यासाठी वापरले जाते. एखादे पान हृद्ययाच्या आकाराचे असेल तर ते हृद्‌यावर रोगावर गुणकारी समजले जाते. उदाहरणार्थ गुळवेलचे पान. गुंजाच्या बिया डोळ्याच्या आकाराच्या असतात. तर त्या डोळ्याच्या विकारवरील औषधी तयार करण्यासाठी वापरल्या जातात. अशाच गुणधर्मावरून संजिवनी या वनस्पतीचा शोध लागला. या वनस्पतीचे वैशिष्ट्य असे की पाणी मिळाले नाही तर ही वनस्पती सुकते. पण मृत होत नाही. त्यातील जीवंतपणा टिकूण राहतो. जेव्हा या वनस्पतीला पुन्हा पाणी मिळाले तर ती पुन्हा टवटवीत होते. याचा गुणधर्मावरून ही वनस्पती कोम्यामध्ये किंवा बेशुद्धावस्थेत असलेल्या व्यक्तीवर गुणकारी ठरू शकते, असे अनुमान मांडण्यात आले. सिलाजीनेला ब्रायोपटेरीस, डेसमोट्रायकम्‌ फिम्ब्रियाटम या नेचे वर्गीय वनस्पती आहेत. यातील सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती ऋषीकेश, हरिद्वार, वाराणसी आदी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संजिवनी म्हणून विक्री केली जाते. ही वनस्पती पाणी मिळाले नाही तरी जीवंत राहू शकते व पुन्हा पाणी मिळाल्यानंतर ती पुन्हा टवटवीत होते. असे गुणधर्म तिच्यात आढळतात. पण कोमामधील व्यक्तीवर तिचा औषधी म्हणून उपयोग होऊ शकतो का याची नोंद मात्र नाही. पण यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

आतुरता: कोरोना लसीची


एकमेव सजीव ग्रह असलेल्या पृथ्वीवर कोरोना विषाणूच्या रूपाने एक अभूतपूर्व संकट ओढवलेले आहे, आपण एकटेच या सजीव ग्रहाचा मालक आहोत अशा अहिर्भावात असलेल्या संपूर्ण मानवजातीला एक न दिसणारा घटक कसे जग बदलू शकतो याची प्रचिती कोरोना विषाणूने करून दिली आहे, यावरून मानवाने पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातीचा योग्य सन्मान राखण्याचा बोध घ्यावा असे मला वाटते.
डॉ निलेश पवार मोबाईल 9860282394
 
या जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी सर्व देश आपपल्या परीने प्रयत्न करत आहेत. लॉकडॉउन किंवा इतर तत्सम उपाय वापरून कोरोना विषाणू काही काळासाठी नियंत्रित करत आहेत, पण कायमस्वरूपी लस कधी येणार आणि सर्वकाही पूर्ववत कधी होणार याची आतुरता कायम आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होऊन सात महिने होऊन गेलेत तरी जग अजून या विषाणू पासून नवनवीन धडेच घेत आहे, रोज नवनवी लक्षणे किंवा इतर तत्सम नवीन माहिती मिळत आहे.
 
आपणास कल्पना आहे की, या जीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पतींना प्रामुख्याने बुरशी, जिवाणू आणि विषाणू याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतो, मानवामध्ये बुरशी आणि जिवाणूपासून होणारे रोग प्रतिजैवीकांचा वापर करून बरे होऊ शकतात, मात्र सर्वाना भीती वाटते ती विषाणूजन्य रोगांची कारण यावर प्रतिजैविकांचा फारसा फरक पडत नाही, यावर एकमेव उपाय म्हणजे लस. अस्तित्वात असलेल्या बऱ्याच विषाणू जन्य रोगांवर लसी उपलब्ध आहेत, मात्र कोरोना विषाणूचे कुळ जरी जुने असले तरी या कुळातील कोव्हीड-१९ हा विषाणू नवीन असल्याने या वर अजून लस विकसित झालेली नाही. एखाद्या नवीन प्रादुर्भाव झालेल्या विषाणूवर लस तयार करायचे असेल तर त्या साठी विशिष्ठ कालावधी लागतो आणि ते काम जगभर सर्वत्र सुरु झाले आहे.

सद्यस्थितीत जगामध्ये १५५ हुन अधिक ठिकाणी कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे, अभिमानाची बाब म्हणजे त्यामध्ये भारतातील झायड्स कॅडीला आणि भारत बायोटेक यांचा समावेश आहे, पुण्यातील सिरम सारखी संस्थाही ऑक्सफर्ड बरोबर भागीदार म्हणून काम करत आहे ही भारतीयांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे.
 
या मधील बऱ्याच ठिकाणी लस तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीना अनुसरून काम चालू आहे, ज्यामध्ये इनऍक्टिवेटेड, एटीनुआटेड, कॉन्जुगेट, सब युनिट आणि टॉक्सओईड सारख्या काही मुख्य पद्धती असलेल्या बघायला मिळतात, इनऍक्टिवेटेड मध्ये विषाणू मारला जातो तर एटीनुआटेडमध्ये त्याची रोग निर्माण करण्याची शक्ती कमी केली जाते. सर्व लसींचे एकच मूलभूत तत्व असते ते म्हणजे निरोगी माणसाच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटी बॉडी ) तयार करणे आणि ज्यावेळी तो विषाणू शरीरात प्रवेश करेल त्यावेळी त्याला निकामी करणे.
 
उपरोक्त प्रचलित पद्धतीव्यतिरिक्त अलीकडच्या काळात जनुकीय पद्धत एक अपारंपरिक पद्धत म्हणून विकसित झाली आहे, की ज्यामध्ये विषाणूचे अनुवांशिक केलेले बदल लस म्हणून वापरले जातात. ही एक तुलनेने नवीन प्रक्रिया आहे जी वैज्ञानिक म्हणतात की पारंपारिक लसी पेक्षा अधिक सुरक्षित असू शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की जनुके (डीएनए आणि आरएनए) आधारित, लस तयार करणे पारंपारिक लसीपेक्षा वेगवान आणि स्वस्त आहे. कारण पारंपारिक लस तयार करताना बहुधा "कमकुवत" किंवा "ठार झालेल्या" विषाणूच्या आवृत्त्या वापरतात, ज्यामध्ये प्रयोगशाळांना मोठ्या प्रमाणात विषाणू आणि प्रोटीन तयार करावे लागतात, या साठी खूप खर्च येतो आणि जास्त वेळ लागतो. सध्या १५५ संस्था पैकी सुमारे 34 संस्था आरएनए आणि डीएनए लस वरती काम करत आहेत.

कोणतीही लस लोकांच्या पर्यंत यायच्या अगोदर सुरुवातीला उंदीर किंवा माकड या सारख्या प्राण्यांच्यावर त्याचा वापर करून परीक्षण केले जाते ज्याला प्रिक्लिनिकल ट्रायल म्हणतात, तदनंतर दुसऱ्या टप्प्यात लसीची सुरक्षितता व त्याचे प्रमाण किती असावे याचे परीक्षण करण्यासाठी ठराविक लोंकाच्यावर याचे प्रयोग केले जातात याला फेज - १ म्हणतात, तिसरा टप्पा म्हणजे फेज - २ ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना हि लस दिली जाते आणि त्याचे परीक्षण केले जाते, फेज - ३ मध्ये लसीची कार्यक्षमता तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणांच्या लोकांवर याचे परीक्षण केले जाते. संपूर्ण परिक्षणामध्ये अगदी विषाणू निकामी होत असेल पण त्या लसीचा मेंदू, हृदय, यकृत, फुफुस, किडनी सारख्या अवयवावर काय दुष्परिणाम होतोय का हे ही पहिले जाते, हे सर्व टप्पे यशस्वी पार पडले नंतर त्या लसीला त्या त्या देशातील नियामक संस्थे मार्फत मान्यता दिली जाते. मान्यते नंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वितरण या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. या साठी साधारण दीड वर्षाच्या वर एकूण कालावधी लागू शकतो.

आपण जर सद्य स्थितीतील लस तयार करणाऱ्या प्रक्रियेचा आढावा घेतला तर जगभरात १५५ च्या वर संस्था या वर काम करत आहेत, त्यापैकी १३५ दावेदार अजून प्रीक्लीनिकल (प्राण्यांच्यावर परीक्षण) टप्प्यामध्ये आहेत, १४ दावेदार फेज १ (सुरक्षितता आणि प्रमाण) मध्ये आहेत, ११ जण फेज २ मध्ये आहेत आणि फेज ३ मध्ये ४ प्रमुख दावेदार उतरले आहेत यामध्ये १) एस्ट्रा - झेनेका, ऑक्सफर्ड (इंग्लंड) आणि सिरम इंडिया २) सायनो फार्म चीन ३) सायनो व्हॅक बायोटेक चीन ४) बी सी जी लस तयार करणारी ऑष्ट्रेलिया मधील मुरडोक संस्था यांचा समावेश आहे.
भारतात झायड्स कॅडीला आणि भारत बायोटेक यांना आत्ता फेज-१ परिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे.

एकंदरीत हा लसीचा आढावा घेतला तर नक्की कोणत्या महिन्यात लस येईल आणि ती सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल हे सांगणे कठीण आहे, पण पुढच्या वर्षी सुरुवातीला एखादी लस उपलब्ध होईल हा आशेचा किरण कायम आहे. गेल्या महिन्यात चीन च्या कॅन सिनो बायोलॉजिक्स या कम्पनीला काही प्रमाणात लस वापरायला परवानगी मिळाली आहे पण त्याचे अजून सार्वत्रीकरण झालेले नाही.

खरतर परिसंस्थेमध्ये एखाद्या प्रजातीची संख्या जास्त झाली तर निसर्ग स्वतःच त्याचे नियमन करत असतो, परंतु कोरोनाच्या बाबतीत अजून तरी निसर्गाने मनावर घेतलेले दिसत नाही. आपण फक्त हे ही दिवस जातील एवढीच अपेक्षा व्यक्त करू शकतो.

शेवटी रुग्णांची संख्या वाढतच आहे,सद्यस्थितीत आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून रोग प्रतिकार शक्ती संतुलित ठेवणे एवढंच आपल्या हाती आहे, लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन सर्वकाही पूर्ववत व्हावे ही आपणा सर्वांचीच इच्छा आहे. तोपर्यंत आपण सर्व मिळून शासनाच्या नियमांचे पालन करुया.

डॉ. निलेश पवार
न्यू कॉलेज, कोल्हापूर

Sunday, July 12, 2020

नीळ व निळीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

 
Indigofera tinctoria* हे निळीचे शास्त्रीय नाव असून ती Fabaceae कुळातील आहे. नीळ तयार करण्यासाठी या वनस्पतीची पाने आमवली जातात.
 प्रा. डॉ विनोद शिंपले

आज आपण जी नीळ वापरत आहोत ही प्रयोगशाळेत तयार केलेली आहे परंतु इ. स. 1850 पर्यंत जगभर नैसर्गिक रंगच वापरले जात. *Indigofera tinctoria* हे निळीचे शास्त्रीय नाव असून ती Fabaceae कुळातील आहे. नीळ तयार करण्यासाठी या वनस्पतीची पाने आमवली जातात त्यामुळे त्यातील इंडिकन नावाचे रसायन इंडिगोटीन मध्ये रूपांतरित होते आणि हीच ती नीळ. 
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील भारतीयांसाठीचा पहिला स्वातंत्र लढा म्हणजे 'चंपारण्य सत्याग्रह'. चंपारण्य हा गंगा नदीच्या किनारी थेट हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळच्या शेजारी वसलेला मुलुख. तसेच याची दुसरी ओळख म्हणजे ही जनक राजाची भूमी. 
 
भारतात इ स 1750 साली इस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना नीळ शेतीसाठी प्रोत्साहन दिले व त्याचा योग्य तो मोबदला दिला. त्यामुळे नीळ ही एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाऊ लागले. भारतातून ही नीळ युरोप, चीन इ. देशांना निर्यात होऊ लागली.
परंतु इ स 1915 साली जर्मनीने कृत्रिम नीळ तयार करण्यात यश मिळविले. त्यामुळे साहजिकच नैसर्गिक निळीची मागणी कमी झाली. सहाजिकच शेतकरी नीळ शेतीस तयार होत नसे. परंतु तोपर्यंत इंग्रजांनी भारतावर आपला कब्जा घेतला होता. त्यांनी शेतकऱ्यांना नीळ शेती करणे बंधनकारक केले परंतु त्याचा योग्य तो मोबदला देऊ केला नाही. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या शेतीपैकी तीन विसाऊंश शेती निळीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. त्यास त्यावेळी 'तीन कठिया' असे संबोधले जायचे. या कारणांमुळे शेतकरी हैराण झाले. याची माहिती महात्मा गांधींजीना मिळाली त्यामुळे ते साबरमतीहुन चंपारण्य येथे दाखल झाले.
 
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यासाठी सह्यांची मोहीम राबविली. सदर कारणासाठी इंग्रजांनी त्यांना अटक केली व 18 एप्रिल 1917 रोजी चंपारण्य कोर्टासमोर हजर केले, यावेळी त्यांच्या समर्थनार्थ दोन हजार शेतकरी हजर होते. यांच्या या दबावामुळे इंग्रजांनी त्यांची मुक्तता तर केलीच पण त्याच वेळी नीळ कमिशनची स्थापना करून गांधीजींना यात सदस्य म्हणून स्थान दिले गेले. आणि कालांतराने 'तीन कठिया' पद्धत बंद करावी लागली. 
 
या लढ्याचे यश पाहून गांधीजी खूप समाधानी झाले, इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार यामुळेच भारतात गांधीवादास सुरुवात झाली. माझ्या मते नीळ वनस्पतीस यात महत्वाचे स्थान आहे.

- प्रा डॉ विनोद शिंपले, 
वनस्पती शास्त्र विभाग,  
न्यू कॉलेज, कोल्हापूर

नैसर्गिक जांभळ्या रंगाचा उगम कोठे झाला? जाणून घेण्यासाठी वाचा

 
आपणास दिसणाऱ्या प्रत्येक रंगाचा आपल्या चेतन व अचेतन मनावर परिणाम होत असतो. निसर्गात तसे बरेच रंग आपणास पहावयास मिळतो. जांभळा रंग तसा कमी प्रमाणात दिसतो. तो कसा तयार होतो व त्याचा शोध कसा लागला याबद्दल थोडस. 
 - डॉ विनोद शिंपले

कवी वा. न. सरदेसाई यांच्या कवितेच्या ओळींनुसार
'निळ्या नदीत बुडवा ढग तांबडेलाल फिक्की जांभळं बघून नाचायला लागाल.' म्हणजेच निळा व तांबडा रंग मिळून जांभळा रंग तयार होतो. 

जांभळा रंग मनाची उमेद वाढवणारा, उदात्त आणि राजसवृत्ती निर्माण करणारा अस म्हटलं जातं. या नैसर्गिक रंगाचा शोध पण खूप आश्चर्यकारक लागला आहे. 

एकदा सायरस नावाचा पर्शियन राजा आपल्या पाळीव कुत्राबरोबर व प्रेयसीसमवेत समुद्र किनारी फिरत होता. फिरत असताना त्यांनी पाहिले की आपल्या कुत्राचे तोंड जांभळे झाले आहे. या रंगाच्या मोहात पडून त्याच्या मैत्रिणीने त्या रंगाचा आग्रह धरला.
 
सहाजिकच राजाने आज्ञा केली व शोध घेण्यासाठी आपले सैनिक पाठवले. चौकशीअंती असे निदर्शनास आले की कुत्र्याने समुद्रकिनारी असणारे काही शंख-शिंपले खाल्ले होते. त्या शंखाचे शास्त्रीय नाव *Bolinus brandaris*. या शंखापासून निघणार जांभळा रंग खूप कमी प्रमाणात निघत असे. साधारणतः अडीच लाख शंख गोळा केल्यानंतर एक औशं जांभळा रंग निघत असे. त्यामुळे साहजिकच हा रंग महागडा व फक्त राजघराण्यातील लोकच खरेदी करू शकत, त्यामुळे याचा रंग हा राजघराण्याचा आहे असे समजले जाई.
 
परंतु सदरच्या शंखाच्या अतिवापरामुळे सदरची प्रजाती ही आज जगातून नाहीशी झाली आहे. आज फक्त आपण त्याचे जीवाष्मच बघू शकतो.
 
एखाद्या गोष्टीचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे ती नष्ट होते याचे हे ज्वलंत उदाहरण देता येईल. त्यामुळे कुठल्याही नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आपण योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.

प्रा डॉ विनोद शिंपले
वनस्पतीशास्त्र विभाग,
न्यू कॉलेज, कोल्हापूर 🙏🏻🙏🏻

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर



दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने सन २०१९ मधील ग्रंथ पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. पुरस्कारासाठी वासंती मेरु, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

देवदत्त पाटील पुरस्कार - मृत्यूस्पर्श - डॉ. सतीश कुमार पाटील (कादंबरी), शंकर खंडू पाटील पुरस्कार - सत्यवादी - बजरंग दत्तू (कथासंग्रह), अण्णा भाऊ साठे पुरस्कार - उद्ध्वस्त मनाचा गाभारा - वासंती मेरु (सामाजिक), कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार- सत्यशोधकीय नियतकालिके - डॉ. अरुण शिंदे (संकीर्ण), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) - न बांधल्या जाणाऱ्या घरात - डॉ. सुप्रिया आवारे (कवितासंग्रह), शैला सायनाकर पुरस्कार - शेणाला गेलेल्या पोरी - चंद्रशेखर कांबळे (कवितासंग्रह) आणि बालवाड्मय पुरस्कार - बार्बी डॉल - वर्षा चौगुले.

विशेष पुरस्काराचे मानकरी :
सखा कलाल पुरस्कार - फास (बाळासाहेब पाटील), अनुराधा गुरव पुरस्कार – अरुणोदय (स्वाती शिंदे-पवार).

इतर पुरस्कारांचे मानकरी :
सूर्य गोंदला भाळी (जगजित महावंश), त्यांचे जिणे (मंगेश मंत्री), कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे (लवकुमार मुळे), वारणेची लेकरं (विठ्ठल सदामते), सावज (सुनील देसाई), गंध सोनचाफी (गौतम कांबळे), निर्भय (उमेश सूर्यवंशी), भारतीय संविधान आणि लोक (विश्वास सुतार).

परीक्षक म्हणून कादंबरीकार नामदेव माळी, समीक्षक डॉ. जी. पी. माळी, कवी गोविंद पाटील, दयासागर बन्ने यांनी काम पाहिले. कोविडची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जाहीर कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, असे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी कळवले आहे.

Friday, July 10, 2020

...म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य



जेणेकरून तुझा हा युवराज असे स्वराज्य स्थापन करेल व यवनांच्या तावडीतून जनतेला मुक्त करेल. राजाचा विचार आज्ञा समजून तिनं हे स्वराज्य उभे केले. हे स्वराज्य सुराज्य ठरले कारण ते राजाच्या नावाने प्रजेने उभे केलेले राज्य होते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल ८२३७८५७६२१

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडवं होते । कां राक्षसां दिलो पाहे । राती होऊनि ।। ७२४।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ : आणि राजा ज्या वाटेनें जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते अथवा राक्षसांना दिवस उजाडला असता ते रात्र आहे असे वाटते.

राजा ज्या  वाटेने जातो त्या वाटेवरती सत्याची पेरणी होते. सत्य टिकवणे हा त्याचा राजधर्म आहे. सत्याला न्याय देणे त्याचा राजधर्म आहे. तो त्याला पाळावा लागतो. राजधर्माचे पालन करणे त्याचे कर्म आहे. ‌मग तो राजा संन्याशी जरी असला किंवा त्याला दारिद्र्य जरी प्राप्त झाले असले तरीही त्याला या कर्मापासून मुक्ती नसते. धर्म त्याला पाळावा लागतो, म्हणूनच राजा जरी गरीब  झाला तरी तो राजा असतो. जरी तो संन्यासी असला, तरीही तो राजा असतो. कारण त्याने संपत्तीचा, ऐश्वर्याचा त्याग केलेला असतो.  राजधर्म मात्र त्याला पाळवा लागतो. जोपर्यंत तो राजा राजधर्माचे पालन करत असतो, तोपर्यंत त्याच्यातील राजा जिवंत असतो. राजधर्माचे पालन करताना राजाला स्वतःचा जीव जरी गमवावा लागला तरी राजधर्म त्याच्यापासून सुटत नाही.

पूर्वीच्या काळी राजदंड ज्याच्याकडे तो राजा असे मानले जायचे. राजदंड ज्याला माहित आहे. त्यांना गादीचा वारसा दिला जायचा. त्यालाच गादीवर राजा म्हणून मान्यता दिली जायची. पण हा राजदंड आहे तरी काय ?राजदंड म्हणजे एक काठी.? छे!  हा राजदंड मग कोणीही लपून ठेवेल आणि शोधून काढेल. यात वैशिष्ट्ये असे काय?  मग राजदंड म्हणजे काय? राजधर्माचे जो पालन करतो त्याच्याकडे हा राजदंड. म्हणजे राजधर्माचे पालन करणारा राजा असा याचा सरळ साधा अर्थ आहे.

अध्यात्मिक दृष्ट्या विचार केला, तर राजा हा केवळ निमित्तमात्र असतो. राजधर्माचे पालन त्याच्याकडून आपोआप होत असते. राजधर्म पालन करण्यासाठीच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. धर्म रक्षणासाठी तो केवळ निमित्तमात्र हो, असे श्रीकृष्ण म्हणाले. राजा केवळ निमित्तमात्र असतो.
 
राजा  ज्या वाटेने जातो, त्या वाटेवर धर्माचे रक्षण होते धर्म म्हणजे सत्य. न्याय. ह्या सर्वात राजा केवळ निमित्तमात्र असतो. अशा स्वराज्यात सुराज्य कसे स्थापन होते. कारण तेथे सत्य लपून राहत नाही. ते प्रकट होते. संत्र्याचा विजय होतो.

एकदा एक राजा रस्त्याने जात होता. यांचं वाटेवर एक कुंभाराची मुलगी मडक्याला आकार देत होती. राजाला पाहताच ती एकदम उत्साही झाली. तिची काहीतरी समस्या होती. ती राजा समोर प्रकट करणार होती पण राजा पुढे गेला. तिच्या जीवनातील ती गुढ समस्या ती व्यक्त करू शकली नाही. पण ज्यांच्यामुळे ती एका समस्येत गुरफटलेली होती त्यांना मात्र राजाची दहशत वाटू लागली. ती राजा समोर समस्या प्रकट करेल याला घाबरुन तिला तिचे असणारे गुढ सांगण्यात आले व ती त्या समस्येतून मुक्त झाली. कुंभाराची ती मुलगी खूप आनंदी झाली. जीवनातील हे गुपित तिला राजा मुळे समजलेले असते.

या आनंदाच्या भरात ती राजाला तिचे सर्वस्व अर्पण करायला सुद्धा तयार झाली. राजा तिच्या विचाराने भारावून गेला. पण भानावर आला. आपण जर तसे केले तर ते जनतेचे शोषण ठरेल. म्हणून त्या स्त्रिचा मान राखत त्याने तिला समजावले.
 
राजा त्या कुंभाराच्या मुलीला  म्हणाला यवनांच्या सत्तेमुळे माझी जनता भरडली जात आहे. आणि त्यातच माझा हा दहा वर्षांचा मुलगा फारसं अभ्यासात लक्ष देत नाही. या दोन्ही चिंता मला सतावत आहेत. तुला माझे उपकार फेडायचे असतील तर तुला यात तुझे योगदान देता येऊ शकते. देव, देश अन् धर्मासाठी तु तुझे योगदान दे. 

मडक्याला आकार देण्या ऐवजी तू या युवराजला स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करुन त्याला योग्य आकार दे. सुंदर मडकी घडवतेस तसं तु आता सुंदर विचारांची  स्वराज्यासाठी योगदान देणारी माणसं घडव व या युवराजला ही घडव. जेणेकरून तुझा हा युवराज असे स्वराज्य स्थापन करेल व यवनांच्या तावडीतून जनतेला मुक्त करेल. राजाचा विचार आज्ञा समजून तिनं हे स्वराज्य उभे केले. हे स्वराज्य पुढे सुराज्य ठरले कारण ते राजाच्या नावाने प्रजेने उभे केलेले राज्य होते. यातून एकच बोध होतो राजा फक्त निमित्तमात्र असतो. पण तो राजधर्म पाळणारा असतो. लोकशाहीचा पाया सुद्धा यात आहे पण लोकशाहीत अशा विचारांची माणसं घडवणाऱ्यांची तितकीच गरज आहे.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  
 





Thursday, July 9, 2020

निंब जिभे कडवटु । हिरडा पहिले तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

 
देशी वृक्षांच्या जातींचे संवर्धन हे व्हायला हवे. बोटॅनिकल सर्व्हे झाला. पण आता त्या सर्व्हेमध्ये नोंद असलेल्या वनस्पती, वृक्ष आता आढळतच नाहीत. अशी स्थिती आहे. ते दुर्मिळ झालेले सर्व वृक्ष या जागेमध्ये संवर्धित करायला हवेत. असे एखादे मॉडेल विकसित झाले तर निश्‍चितच जैवविविधता जोपासली जाऊ शकते. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

निंब जिभे कडवटु । हिरडा पहिले तुरटु ।
तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ।। 186 ।। अध्याय 18 वा श्री ज्ञानेश्‍वरी


ओवीचा अर्थ - प्रथम कडुनिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो. त्याप्रमाणे कर्माची आरंभाची बाजू त्रासदायक असते.

चांगल्या कर्मामध्ये अनेक अडचणी येतात. अनेक प्रश्‍न, समस्या उभ्या राहतात. म्हणून ते कर्म सोडायचे नसते. जिद्दीने ते कर्म स्वीकारायचे असते. कारण त्या कर्माचा शेवट हा गोड असतो. त्यातून होणारे उत्पन्न हे मनाला समाधान देणारे असते. निंब, हिरडा अशा अनेक वनौषधी आज दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. हे एक आव्हान आज नव्या पिढीसमोर आहे. झपाट्याने विकास व्हावा यासाठी औद्योगिकरणाला चालना दिली जात आहे. पण त्यासाठी वनांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा या वनांमध्ये अनेक वनौषधींची जोपासना होत होती. नैसर्गिकरीत्या त्यांची वाढ होत होती. पण आता वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वनौषधींचे उपयोग माहीत नसल्याने आता त्यांची बेसुमार तोड होत आहे. जैवविविधता धोक्‍यात आली आहे.

प्रत्येकाला वाटते आपणच जैवविविधता का पाळायची? आम्हालाही विकास हवा आहे. आम्हालाही भरघोस पैसा हवा आहे. जैवविविधतेचा ठेका आम्हीच का घ्यायचा? असे म्हणून विकासासाठी जैवविविधतेवर कुऱ्हाड चालवली जात आहे. प्रत्येकाला विकासाची गती पकडायची आहे. गतीची मानसिकता भावीकाळात मोठे संकट उभे करणार आहे. याची जाणीवही त्यांना राहिलेली नाही. जैवविविधता जोपासण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करण्यात कमी पडत आहे. ग्रामीण जनतेची बदललेली मानसिकता विचारात घेऊन त्यांना विकासाचे मॉडेल त्यांना देण्याचे गरजेचे आहे. केवळ जैवविविधता जोपासण्याचे डोस पाजून आता जैवविविधता जोपासता येणार नाही. तर ते जोपासण्यासाठी त्यांच्याही विकासाचे मॉडेल सरकारला द्यावे लागेल. कायदे करूनही जैवविविधता जोपासता येणार नाही. कायदा हा अडचणीचा ठरतो.

गावांना वनराई, देवराई विकासासाठी वेगळे मॉडेल सरकारला करावे लागेल. रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची उत्तम योजना आखली गेली. तशी वनराई, देवराईच्या संवर्धनासाठी योजना आखायला हवी. प्रत्येक गावाला, शहरालाही वनराई, देवराईची सक्ती करायला हवी. रोजगार हमी योजनेतून याचे आदर्श मॉडेल तयार करायला हवे. दुर्मिळ होत चाललेल्या वनौषधी, दुर्मिळ होऊ लागलेल्या देशी वृक्षांच्या जाती यांचे संवर्धन करायला हवे. शहरातील बागांमध्ये यासाठी स्वतंत्र जागा हवी. तसेच प्रत्येक गावाला वनराई, देवराईची सक्ती हवी. प्रत्येक गावात पन्नास एकर जागा त्यासाठी राखीव असायला हवी.

लोकसंख्येच्या प्रमाणात ही सक्ती केली जाऊ शकते. दहा हजार लोकसंख्येमागे पन्नास एकरांच्या वनराईची, देवराईची सक्ती झाल्यास हे सहज शक्‍य आहे. शहरासाठीही हाच नियम लागू करायला हवा. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तितकी मोठी देवराईची सक्ती असायला हवी. तेथे वड, पिंपळापासून देशी वृक्षांच्या जातींचे संवर्धन हे व्हायला हवे. बोटॅनिकल सर्व्हे झाला. पण आता त्या सर्व्हेमध्ये नोंद असलेल्या वनस्पती, वृक्ष आता आढळतच नाहीत. अशी स्थिती आहे. ते दुर्मिळ झालेले सर्व वृक्ष या जागेमध्ये संवर्धित करायला हवेत. असे एखादे मॉडेल विकसित झाले तर निश्‍चितच जैवविविधता जोपासली जाऊ शकते. नष्ट होत चाललेले वृक्ष तसेच पक्षीही येथे राहू शकतील. नैसर्गिकरीत्या यांचे संवर्धन कसे होईल यावर भर द्यायला हवा. विकासाच्या मॉडेलमध्येच याचा समावेश हवा.

हिरडा चवीला तुरट असतो. पण त्याचे गुण हा गोड असतो. भूक वाढविणारे, पचनक्रिया सुधारणारे असे उत्तम गुण त्यात आहेत. हिरडा हा कोरड्या रुक्ष स्वभावाचा व उष्ण गुणाचा आहे. हिरड्याचे बी काढलेल्या टरफलास हिरडा फोल म्हणतात. हे हिरडा फोल, बेहडे दळ व आवळकाढीपासून त्रिफळाचूर्ण तयार केले जाते. शरीराची जाडी कमी करू इच्छिणाऱ्यांना हे चूर्ण उपयुक्त आहे. सध्या शहरामध्ये अति खाणे व कमी व्यायाम यामुळे जाडी वाढलेले अनेक गृहस्थ पाहायला मिळतात. त्यांना तर हे उपयुक्त आहे. असे फायदे सांगून या वनौषधींच्या संवर्धनासाठी त्यांना प्रोत्साहित करायला हवे. हिरडा त्वचा विकारावरही उपयुक्त आहे.
 
हिरडा उकळून काढ्याचे तयार केलेले अभयारिष्ट आव मुळव्याध, मळाचे खडे होणे इत्यादीवर उपयुक्त आहे. अभयारिष्ठमुळे भविष्यात होणारे अनेक गंभीर विकार टाळता येतात. विचारांमध्ये अडथळा आणणारी तंद्रा, जाड्य, मानसिक मूढ अवस्था याने दूर होते. अन्य कफाच्या विकारातही तो उपयुक्त आहे. पंडुरोग, यकृतरोग, प्लिहा उदररोग इत्यादी मध्ये निरोगी, देशी गाईच्या ताज्या मूत्राबरोबर हिरडा देतात. चुकीच्या आहारादिमुळे होणाऱ्या सर्व त्रासांवर त्वरित मुक्ततेसाठी भोजनोत्तर हिरडा घेतला जातो. रोज त्याचे सेवन केल्याने निरोगीपणा टिकून राहतो. डोळ्याची शक्ती वाढते. आयुष्याची वृद्धी होते. इतकेच नव्हे तर या वृक्षाच्या सावलीत विश्रांती घेणाऱ्या पशुपक्षांनाही मलशुद्धीची प्रवृत्ती होते असे वर्णन अनेक ग्रंथात दिले आहे. अशा या गुणवंत वनौषधींचे संवर्धन व्हायला नको का?

निंब जिभेला कडू वाटतो पण त्याचेही गुण गोड आहेत. कडूनिंबावर कावळा, मैना, टिटवी, कोकिळा, शिंपीण, आयोरा, मॅगपाय, रॉबिन (दयाए), लालबुड्या, बुलबुल, मिनिव्हेट, शिंगचोच्या, हळद्या आदी पक्षी राहातात. कडुनिंबाचा वापर आता कीडनाशकात होऊ लागला आहे. सुमारे दोनशे जातींच्या कीटकांवर कडुनिंब परिणाम करतो. बटाटा, तंबाखू, कापूस, कोबी, तांदूळ, कॉफी, सोयाबीन अशा अनेक पिकांवर कडुनिंबाची फवारणी उपयुक्त ठरत आहे. या फवारणीमुळे कीड झटपट मरते. कीड्यांचे सुरवंट पतंगात रूपांतरित होत नाहीत. यामुळे त्यांची पुढची पिढीच जन्मत नाही. पुनरावृत्तीच थांबते. काही किडे कोषावस्थेत जातात व अपंग होऊन बाहेर पडतात. त्याचा पिकांना त्रास होत नाही. कडुनिंबात कीटकांना मारक ठरणारी ट्रायटर्पिनस, लिमोनॉइड्‌स, ऍझाडिरॅक्‍टिन, सॅलमिन, लिमोनॉइड ही द्रव्ये आहेत. नऊ प्रकारच्या ज्ञात लिमोनॉइडपैकी ऍझाडिरॅक्‍टिन, सॅलमिन, मेलिऍन्टिऑलव निबिन ही सर्वात जास्त प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. याचा विचार करून तरी अशा वृक्षांची लागवड करायला हवी. शेतकऱ्यांनीच आता यासाठी पाऊल उचलायला हवीत. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  
 

Wednesday, July 8, 2020

बैल विकूनि गोठा । पुसां लावोनि गांठा । इया करणीं कीं चेष्टा । काइ हंसों ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

 
शेती हा अडाण्याचा धंदा नाही. व्यापाऱ्यापेक्षाही अधिक जागरूकता त्याच्याजवळ असावी लागते. संत ज्ञानेश्‍वरांनीही हाच नियम बाराव्या शतकात सांगितला आहे. शेती करताना नियोजन असायला हवे. नियोजन नसेल तर लोक आपल्यावर हसणार. चुकीच्या पद्धतीने शेती करून स्वतःचे हसे करून घेऊ नये. हा संदेश त्यांनी ज्ञानेश्‍वरीत दिला आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

बैल विकूनि गोठा । पुसां लावोनि गांठा ।
इया करणीं कीं चेष्टा । काइ हंसों ।। 233 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य म्हणावें किंवा चेष्टा म्हणाव्यात ? कां यांना हसावे ?

शेती करताना नियोजनाचा अभाव दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कोणत्याही कामाचे योग्य नियोजन असायला हवे. बैल विकत घ्यायचा असेल तर तो बांधण्यासाठी गोठा बांधावा लागतो. चारा-पाण्याची व्यवस्था करावी लागते. नुसता बैल विकत आणला म्हणजे काम संपले असे होत नाही. बैल विकत घेतला पण त्याचा शेती कामासाठी उपयोग व्हायला हवा. हे सर्व पाहणे गरजेचे असते. सध्या आधुनिक शेतीत जनावरांची जागा आता यंत्राने घेतली आहे. पण त्यातही नियोजन असायला हवे.
 
बैलांची गरज संपली आहे मग गोठा कशासाठी बांधायचा. नको त्या गोष्टीत गुंतवणूक कशासाठी करायची. चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केले तर नुकसान होणारच. खर्च करताना विचार करायला हवा. खर्च करायचा आहे तर त्याचे नियोजन हवे. खरीप पिकाची कापणी केल्यानंतर खरिपाचे बियाणे खरेदी करून कसे चालेल. योग्यवेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. पैसा आहे म्हणून वाट्टेल तसा पैसा खर्च करू नये. कोणत्याही धंद्यात हाच नियम आहे.
 
शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे. याची जाणीव ठेवून नियोजन करायला हवे. पिकावर कीड दिसते. पण किडीचे प्रमाण किती आहे याचा विचार करून फवारणी करायला हवी. किडीचे प्रमाण कमी असेल तर फवारणीसाठी खर्च करणे योग्य नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी शेती करताना शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हव्यात. शेतीमध्ये नेमके हेच होत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता नसते. अशावेळी अशा ठिकाणी उसाची लागवड कशी फायदेशीर राहील.
 
उन्हाळ्यात पिकास पाण्याचा ताण सहन होत नाही. उसाची वाढ खुंटते. याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. काही ठिकाणी तर ऊस वाळून जातो. तरीही शेतकरी उसाचीच लागवडीच्या मागे धावतो. प्रत्येक पिकाचा खर्च विचारात घेऊन लागवड करायला हवी. तितकी खर्च करण्याची आपली क्षमता आहे का? त्या पिकासाठी लागणारे खत, पाणी याची उपलब्धता होऊ शकते का? हा विचार करून पिकांची निवड करायला हवी. कोणते पीक कोणत्या जमिनीत येते याचाही विचार व्हायला हवा.
 
खडकाळ जमिनीवर उसाचे उत्पादन किती येते? हे विचार करायला नको का? पिकाच्या जातीनुसार सुद्धा जमिनीची निवड करायला हवी. पिकांच्या जातींचा अभ्यास यासाठी हवा. कोणती जात पाण्याचा ताण सहन करू शकते. कोणती जात कोणत्या किडींना बळी पडते. कोणत्या रोगाची प्रतिकारक्षमता त्या जातीमध्ये आहे. हे सर्व विचारात घ्यायला हवे. हवामान, जमिन याचा विचारच शेतकरी करत नाहीत.
 
कपाशीची लागवड करताना तापमान किती असावे लागते याचा विचार करायला हवा. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान 15 ते 35 अंश सेल्सिअस तापमान लागते. लागवडीच्या कालावधीत तापमान 35 अंशांपेक्षा कमी असायला हवी. मे मधील तापमानाचा विचार केल्यास या महिन्यात पिकाची लागवड कशी करता येईल. 40 च्यावर पारा गेला आहे. मे च्या शेवटच्या आठवड्यातही अशीच स्थिती असते. तापमान 40 च्या आसपास असते. अशावेळी पेरणी केली तर त्याचा परिणाम पिकाच्या उगवणीवर होतो. 25 मे नंतर तापमान कमी असते. पण ते तापमान 35 अंशापेक्षा कमी असायला हवे. या तांत्रिक गोष्टी शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हव्यात.
 
उत्पादन का कमी होते? याची कारणे शेतकऱ्यांनी शोधायला हवीत. त्यानुसार नियोजन करायला हवे. पेरणी करताना या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. मग उत्पादन घटले व उत्पादन खर्च वाढला यावर ओरड करणे कितपत योग्य आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल व तेही योग्य प्रतीचे उत्पादन हवे. याचा विचार शेतकऱ्यांनीच केल्यास भेडसावणाऱ्या समस्या जाणवणार नाहीत. कपाशीत दिवसाचे तापमान 38 अंशांपेक्षा जास्त राहिले व ते दीर्घकाळ टिकून राहिले व त्यातच पाण्याचा ताण बसल्यास पिकाच्या वाढीवर याचा परिणाम होतो. पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रिया शास्त्रावर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून जलवाहिन्या फुगीर होतात. नलिका बंद होते. झाडाची पाने, फुले. बोंडे यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो. पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते. हे शास्त्र शेतकऱ्यांनी जाणून घेऊन शेती करायला हवी.
 
पूर्वीच्या काळी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली जात होती. यामुळेच त्या काळातील उत्पादन हे उत्तम होते. ज्याला शास्त्र जमले त्यालाच शेती जमते. यासाठी शेतकऱ्यांची वृत्ती ही संशोधकाप्रमाणे हवी. कमी शिकलेला शेतीकडे वळतो. शेती करतो. असा आजचा नियम आहे. पण येथे तर जास्त शिकावे लागते याचा विचार व्हायला हवा. शेती करणाऱ्याला कमी शिकलेला म्हणून हिणवणे योग्य नाही. उलट शेती करताना त्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. शास्त्रज्ञाप्रमाणे त्याला प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक विचार करावा लागतो.
 
शेती हा अडाण्याचा धंदा नाही. व्यापाऱ्यापेक्षाही अधिक जागरूकता त्याच्याजवळ असावी लागते. संत ज्ञानेश्‍वरांनीही हाच नियम बाराव्या शतकात सांगितला आहे. शेती करताना नियोजन असायला हवे. नियोजन नसेल तर लोक आपल्यावर हसणार. चुकीच्या पद्धतीने शेती करून स्वतःचे हसे करून घेऊ नये. हा संदेश त्यांनी ज्ञानेश्‍वरीत दिला आहे.
 
शेतीमध्ये सध्या 50 टक्के शेतकरी हे कमी शिकलेले आहेत. पण त्यातील अनेक शेतकरी हे तज्ज्ञांच्या पेक्षाही उत्तम शेती करतात. कारण ते मनापासून शेती करतात. मनापासून केलेली कोणतीही गोष्ट फळते. त्यात उत्तम यश प्राप्त होते. कोणतीही गोष्ट मनापासून व नियोजनानुसार केली तर त्यात सहज यश मिळते. देवाची साधना असो किंवा कोणताही व्यवसाय असो. यात यश मिळवायचे असेल तर हा नियम आहे. स्वतःचे हसे होऊ नये यासाठी नियोजनानुसार काम करायला हवे. आपण कोणती कृती करतो याचा विचार करायला हवा. चुकीचे तर करत नाही ना. याचा विचार करायला हवा.
 
चुका अनवधानाने होतात. पण अडाण्याप्रमाणे व्यवहार करणे ही सर्वांत मोठी चूक आहे. अनवधानाने झालेली चूक माफ होऊ शकते. पण अडाणीपणे केलेल्या चुकीस माफी नाही. यासाठी चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. चुका का होतात याचाही विचार करायला हवा. जो चुकतो तो शिकतो. हे लक्षात ठेवून त्यातून शिकायला हवे व सुधारायला हवे.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे   
 

Monday, July 6, 2020

सपुष्प मृतोपजीवी वनस्पती - इपोपोजियम रोसियम


 
ऑर्किड हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. जमिनीवर वाढणारे व झाडाच्या फांदीवर चिकटून वाढणारे असे हे प्रकार आहेत. झाडाच्या फांदीवर म्हणजे ते परोपजीवी असा अनेकांचा गैरसमज होतो; पण तसे नाही. ते फक्त आधारासाठी या झाडावर वाढते. इपोपोजियम रोसियम हे जमिनीवर वाढणारे मृतोपजिवी ऑर्किड आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621 
 

पृथ्वीतलावरील प्रत्येक लहान मोठी वनस्पती ही जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मग ती अल्पजीवी असो किंवा अनेक वर्षे जगणारी असो, सर्वांचेच महत्त्व आहे. अल्पजीवी वनस्पती मात्र आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. त्यामध्ये अपुष्प वनस्पतीच्या बुरशी वर्गामध्ये मृतोपजीवी वनस्पतींची संख्या अधिक आहे; मात्र सपुष्प मृतोपजीवी वनस्पतींची संख्या अत्यंत कमी आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे व ग्लोबल वार्मिंगमुळे अशा वनस्पतींचे अस्तित्व आणखी धोक्‍यात आले आहे. या वनस्पतींचे फायदे नाहीत म्हणून त्या नष्ट झाल्या तरी चालतील, असा विचार करणे जैवविविधतेच्या दृष्टीने धोक्‍याचे आहे. या अल्पजीवी असल्या किंवा त्यांचा मानवास उपयोग नाही, म्हणून याकडे दुर्लक्ष करणेही चुकीचे आहे. याच्या संवर्धनासाठी काही नियम पाळणे आवश्‍यक आहे. या वनस्पती जंगलात वाढणाऱ्या असल्याने जंगलांचे संवर्धन योग्य प्रकारे केल्यास त्यांचे आपोआपच संवर्धन होईल. त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी या वनस्पतींची ओळख, माहिती करून घेणे गरजेचे आहे. 

Image may contain: plant, flower, nature and outdoor

यंदा जूनमध्ये आजरा तालुक्‍यात इपोपोजियम रोसियम ही सपुष्प वनस्पती वन कर्मचारी सलिम मुल्ला यांना आढळली. याबाबत वनस्पतीतज्ज्ञ मधुकर बाचुळकर यांच्याकडून अधिक जाणून घेतले असता ते म्हणाले, ""ही वनस्पती 2002 मध्ये महाराष्ट्रात प्रथमच पश्‍चिम घाटमाथ्यावर आढळल्याची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, शाहूवाडी तालुक्‍यातील गजापूरच्या जंगल परिसरात तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य परिसरात ती आढळली होती.''  या संदर्भात वनस्पतीतज्ज्ञ मिलिंद सरदेसाई, एस. आर. यादव व बाचुळकर यांचा शोधनिबंधही 2002 मध्ये प्रकाशित झाला होता. 

Image may contain: plant, flower, nature and outdoor

इपोपोजियम रोसियम हे ऑर्किड आहे. जगभरात ऑर्किडेसी कुळाच्या 25 हजारांहून अधिक जाती 600 च्यावर प्रजातीमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. यांतील 130 प्रजाती आणि 900 जाती या भारतात, तर 34 प्रजाती आणि 109 जाती महाराष्ट्रात नोंदविण्यात आल्या आहेत. 

जमिनीवर वाढणारे ऑर्किड 

ऑर्किड हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. जमिनीवर वाढणारे व झाडाच्या फांदीवर चिकटून वाढणारे असे हे प्रकार आहेत. झाडाच्या फांदीवर म्हणजे ते परोपजीवी असा अनेकांचा गैरसमज होतो; पण तसे नाही. ते फक्त आधारासाठी या झाडावर वाढते. इपोपोजियम रोसियम हे जमिनीवर वाढणारे मृतोपजिवी ऑर्किड आहे. मृतोपजिवी म्हणजे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. तर ते वनस्पतींच्या कुजलेल्या अवशेषापासून अन्न तयार करते. त्यामुळे हे ऑर्किड हे मुख्यतः घनदाट जंगलात आढळते. उन्हाळ्यात पडलेला पालापाचोळा पावसाने कुजू लागतो. या पालापाचोळ्यावर हे जगते. या ऑर्किडचे जीवनही 15 ते 20 दिवस जास्तीत जास्त महिनाभर आहे. पंधरा दिवसांत ते फुलोऱ्यावर येते. परागीकरण होते व त्यापासून बी तयार होते व पुन्हा मरून जाते. जूनमध्ये मुख्यतः हे ऑर्किड पाहायला मिळते.

Sunday, July 5, 2020

जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्‍व आघवें । म्हणोनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 
2012 मध्येही 93 टक्के पाऊस पडला. 1971 लाही भीषण दुष्काळ पडला होता. पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवते. ही परिस्थिती आता नित्याची होताना दिसत आहे. दर दोन तीन वर्षांच्या अंतराने ही परिस्थिती आता येत आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्‍व आघवें ।
म्हणोनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ।। 221 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन सर्व प्राणी जर्जर झाले म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे नाना याग वगैरे अनेक यज्ञ करावेत.

निसर्गाच्या नियमाने पाऊस पडतो. पण आता कृत्रिमरित्याही पाऊस पाडला जात आहे. यावर पुरातनकाळापासून प्रयोग केले जात आहेत. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाऊस पाडण्याचा प्रयत्न होतो. आता तर तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की पाऊस थांबताही येतो. चीनमध्ये हा प्रयोग करण्यात आला. क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत पाऊस पडण्याची लक्षणे दिसल्यानंतर तेथील ढग फवारणीकरून नष्ट करण्यात आले. इतके तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. पण ही निसर्गाशी मानसाची स्पर्धा आहे. पूर्वीच्याकाळीही ही स्पर्धा होती. विविध यज्ञ करून असे प्रयोग केले जात होते. दुष्काळी परिस्थितीत शेतीचे मोठे नुकसान होते. शेतात लावलेली पिके कधी वाया जातात.

तर पाऊस न पडल्याने जमिन पडीक ठेवण्याची वेळ येते. उत्पादनच झाले नाही तर शेतकरी जगणार कसा? पाऊस न पडल्याने जनावरांना चाराही मिळणार नाही. पाणी, चाऱ्याविना जनावरेही जगणार कशी? अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी पाऊस पाडण्याचे प्रयत्न झाले. हे योग्यच आहे. हा दुष्काळ अधूनमधून पडतोच आहे. 2009 मध्ये केवळ 78 टक्केच पाऊस पडला. 2012 मध्येही 93 टक्के पाऊस पडला. 1971 लाही भीषण दुष्काळ पडला होता. पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवते. ही परिस्थिती आता नित्याची होताना दिसत आहे. दर दोन तीन वर्षांच्या अंतराने ही परिस्थिती आता येत आहे. याला वाढते शहरीकरण, वाढती औद्योगिकता, घटणारे जंगलांचे प्रमाण आदी कारणे आहेत. सर्व जगभरातच ही परिस्थिती आहे, त्यामुळे पृथ्वीच्या तापमानातही वाढ होत आहे. पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत.

या प्रश्‍नावर मात करण्यासाठी आता जनजागृतीची गरज आहे. शासकीय पातळीवरही याबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा नुसता प्रचाराचा मुद्दा झाला आहे. काही सामाजिक संघटना हजारो झाडे लावतात असे सांगतात. दरवर्षी उद्‌घाटनाचे कार्यक्रम केले जातात. वृत्तपत्रात त्याच्या बातम्याही येतात. केवळ या प्रसिद्धीसाठी पर्यावरण जागृती केली जाते. प्रत्यक्षात त्यांनी लावलेली झाडे जगतात का हे सुद्धा पाहिले जात नाही. हजारो झाडे लावली, मग झाडे कमी कशी झाली? याचा विचार कोण करत नाही. वनक्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे.

दरवर्षी हजारो झाडे लावली मग वने कमी कशी होत आहेत. खाणींच्या उत्खननांना परवानगी देताना त्यांनी किती जंगले उभारली? कोठे उभारली? कशी उभारली याचा विचार केला जातो का? तसे होत नसेल तर मग खाणींसाठी जंगले नष्ट होणारच. पर्यावरण संवर्धनासाठी नुसती झाडे लावण्याचा प्रचार करून काय उपयोग? झाडे कोणती लावली जातात याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. अनेक वृक्षांच्या जाती आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. ही झाडे जगविण्यासाठी प्रयत्न तर गरजेचे आहेतच त्याबरोबर या वृक्षामुळे तयार होणारी जैवविविधताही जोपासणे गरजेचे आहे. वनांचे संवर्धन झाले तरच पर्जन्याचे प्रमाण राखता येईल. दुष्काळ का पडतो? याचा विचार झाला नाही तर दुष्काळाचा सामना कसा करता येईल बरे.

पूर्वी उन्हाळ्यात 35 ते 38 अंशापर्यंत असणारे तापमान आता 40 अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या शहरीकरणावर यासाठीच उपाय योजायला हवेत. सिमंटची जंगले उभारताना वनराई तिथे कशी उभी करता येईल याचा विचार करायला हवा. नैसर्गिक टेकड्यातर आता शहरात दिसेनाशा झाल्या आहेत. टेकडी नष्ट करून तेथे सपाटीकरण करून सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. पूर्वी या टेकड्यांमुळे वाहणारा वारा तटत होता. या टेकड्यांमुळे वाऱ्याचा वेग कमी केला जात होता. या टेकडीवर असणाऱ्या थंड वातावरणामुळे या परिसरात पाऊसाचे प्रमाणही अधिक होते. आता वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण टेकडीसारखे कार्य त्यांच्याकडून होत नाही. जरी पाऊस पडला तरी पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. कारण तेथे जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागाच नाही.

भूजलपातळीही यामुळे खालावली आहे. अशा अनेक कारणांमुळेच तापमान वाढत आहे. कोकणात तर फारच भयाण परिस्थिती आहे. खाणींच्या उत्खननामुळे परिसरातील पाणी पिण्यायोग्यही राहिलेले नाही. दरवर्षी सरासरी इतका पाऊस पडूनही येथे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवतेच. पाण्याच्या प्रदूषणाने येथे रोगराई पसरत आहे. याला जबाबदार कोण? मानवच याला जबाबदार आहे. माणसाची हावच याला कारणीभूत आहे. अवृष्टीला जबाबदार मानवच आहे. मानवाने यासाठी आता वेळीच जागे व्हायला हवे. अवृष्टीची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 35 टक्के वनक्षेत्र उभे राहिले तरच पावसाचे प्रमाण टिकून राहील. वन टिकवायचे असेल तर तसे कायदे करावे लागतील.

केवळ कायदे करून चालणार नाही, तर वनांचे संवर्धन हे शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवे. वनराईची जैवविविधताही जोपासण्याचा प्रयत्न व्हायला हवा. दुर्मिळ होऊ लागलेल्या वनौषधींची लागवडही होणे गरजेचे आहे. रसायनांच्या फवारण्याकरून कृत्रिम पाऊस पाडता येईल. पण तो एकदा-दोनदा पाडता येणे शक्‍य होईल. अशा पाऊस पाडण्यासाठी करोडोंचा खर्च करावा लागणार आहे. पाऊस पाडण्यासाठी इतका खर्च करण्याऐवजी आत्तापासूनच जंगलांच्या संवर्धनावर हा खर्च झाला तर ही वेळ येणार नाही. पर्जन्ययाग करून कमी खर्चात पाऊस पाडणेही शक्‍य आहे. पण नेहमीच असे यज्ञ करणे शक्‍य नाही. पाऊस पाडण्यासाठी वातावरणात तशी स्थितीही असणे आवश्‍यक असते. तरच हा पाऊस पडू शकतो. ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी तरी वनांची गरज भासणार आहे. वने उभारण्याचाच संकल्प आता करायला हवा.

वड, पिंपळ, शिसव, करंज असे मोठे मोठे वृक्ष लावून शाश्‍वत वृक्षांची जोपासना करायला हवी. पावसासाठी तोच खरा मोठा यज्ञ आहे. अवृष्टीने नेहमीच त्रस्त असणाऱ्या भागात आता वने उभारायला हवीत. दुष्काळग्रस्त भागात बाभळीची झाडे होती. आता ती दिसेनाशी झाली आहेत. पूर्वीचे काटेरी वृक्ष आता कमी होऊ लागले आहेत. ही नष्ट होत चाललेली वनसंपदा जोपासायला हवी. दुष्काळी भागात असे वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचे. पण बागायती शेतीमुळे बाभळी नष्ट झाल्या. पण आता पाऊसही घटल्याने बागायतीही नष्ट होऊ लागली आहे. चला आता एक वृक्ष नव्हे एक वनच उभारू. एका वृक्षाने आता भागणारे नाही. जंगलच उभे करावे लागेल.


  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` याला फाॅलो करायला विसरू नये.
 
 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे