Saturday, November 30, 2019

कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।




एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पूर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच. बदल हाच निसर्गाचा नियम आहे, पण आत्मज्ञानात बदल होत नाही. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।
तवं कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ।। 129 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेलीं सालपटें वैगरे गळून पडतात न पडतात इतक्‍यांत कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते.

आताचे युग हे कलियुग आहे, असे म्हटले जाते. एक युग संपले की लगेच दुसऱ्या युगाचे फुटवे फुटू लागतात. युगामागून युगे येत राहतात. आता तंत्रज्ञानाचे युग आहे. नवनवे शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार होत आहे, पण या युगालाही अंत आहे. तंत्रज्ञानाने खनिजाचे साठे शोधले जात आहेत. खनिज तेल आणि अन्य खनिजामुळे झपाट्याने प्रगती होत राहीली. पण हे खनिजाचे साठे संपत आहेत. यासाठी अन्य पर्याय शोधले जात आहेत. तेलाचे साठे संपले तर गाड्या कशा पळणार. विद्युत गाड्यांचाही वापर आता होऊ लागला आहे. सौर ऊर्जेचा पर्याय आपण आता शोधला आहे. नवे पर्यायही शोधले जात आहेत. अणुऊर्जेचाही पर्याय निवडला जात आहे. कारण भावी काळातील विजेचा तुटवडा कसा पूर्ण करणार, यावर सर्व अवलंबून आहे. कोळसा संपला तर पुढे काय? याला उत्तर हवेच. यामुळे एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पूर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच. बदल हाच निसर्गाचा नियम आहे, पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते, पण आत्मज्ञान पूर्वी होते, आताही आहे आणि यापुढेही ते राहणार आहे. परंपरेनुसार ते पुढे धावत राहणार. युगे येतात जातात. त्यानुसार ज्ञानही बदलत राहते, पण आत्मज्ञान आहे तसेच राहते. त्यात बदल होत नाही. जे सत्य आहे तेच शाश्‍वत आहे. तेच टिकते. यासाठी कायम सत्याची कास धरायला हवी. सत्याला ओळखायला शिकावे. खरे सुख समजून घ्यायला हवे. सत्य हाच खरा धर्म आहे. त्याचा अंगीकार करायला हवा. युगानुयुगे या ज्ञानाची परंपरा चालत आहे. यापुढेही ती चालत राहणार आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment