Thursday, July 24, 2014

झुंज

म्हणोनियां देवा। जळो जळो झुंज । माने ना हें मज। कांही केल्या ।। 335 ।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

ही झुंज कोणाशी आहे ? स्वतःच स्वतःशी ही झुंज आहे. पण मी पणामुळे ही झुंज नकोशी झाली आहे. हे माझं आहे? ते माझं आहे? या मोहाने लढण्याची इच्छाच नष्ट होऊ लागली आहे. धकाधकीच्या जीवनात साधना करायला वेळच नाही. एक-एक मिनिट मोलाचा झाला आहे. एक मिनिटात आपण साऱ्या जगभरात संदेश पोहोचवू शकतो. विकासाने इतका वेग घेतला आहे. विकासाच्या या वेगासोबत आपणाला राहावे लागणार आहे. हा वेग पकडला तरच उज्ज्वल भवितव्य घडणार आहे. हा वेग पकडण्यातच सगळा वेळ जात आहे. दैनंदिन जीवनात थांबायलाही वेळ नाही. अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. अशावेळी साधनेसाठी वेळ कसा देता येऊ शकेल. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी झुंज देण्यास वेळच नाही. दररोजच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशावेळी आत्मज्ञानाचा विचार कसा येईल. ताज्या घडामोडीतच सगळा वेळ जात आहे. विश्रांती म्हणून फिरायला गेले तरीही तेथेही तेच सुरू होते. मोबाईल फोनमुळे सारे जीवनच व्यस्त झाले आहे. रेल्वेतून जाताना खिडकीतून डोकावायलाही वेळ नाही. निसर्गाचा स्वाद घेऊन मन मोकळे करायलाही वेळ नाही. जेवतानाही टिव्हीत डोकावतच जेवन होते. जेवनही त्याच विचारात होते. अशा धकाधकीच्या जीवनात साधनेचा विचार कसा येऊ शकेल. इतके व्यस्त जीवन झाले आहे. आत्मज्ञानासाठी झुंजण्याचा विचारच नकोसा झाला आहे. आत्मज्ञानी होऊन करायचे तरी काय? तिन्ही जगाचे ज्ञान घेऊन काय मिळवायचे? यापेक्षा नको ते आत्मज्ञान रोजचे जीवन धकाधकीचे असले तरी सुंदर आहे. सुखी आहे. या मोहाने आता आपण ग्रस्त झालो आहोत. जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास आपणास वेळच नाही. समजून घेऊन तरी काय करणार? अशा विचाराने आता लढण्याचे सामर्थ्यही उरलेले नाही. अशा विचाराने आपण आत्मज्ञानी होऊ ही आशाच आता संपली आहे. अशा या ग्रस्तव्यक्तिला स्वामीनी सल्ला दिला. स्वामी म्हणाले अरे तुला कोण लढायला सांगते, फक्त निमित्त मात्र तर तुला व्हायचे आहे. लढाई तर तू लढतच आहेस. फक्त या लढाईकडे तुला लक्ष द्यायचे आहे. तु नको म्हणालास तरी ही तुझी लढाई सुरूच आहे. सुरूच राहणार आहे. फक्त तुझे अवधान हवे आहे. श्‍वासाची ही लढाई थांबली तर तुझे जीवनच संपणार आहे. फक्त सुरू असणाऱ्या या लढाईकडे अवधान दे. दिवसातील काही क्षणजरी तू दिलेस तरी तुझा विजय निश्‍चित आहे. सोऽहम, सोऽहम चा अखंड स्वर हा सुरूच आहे. तो फक्त तुला तुझा कानांनी ऐकायचा आहे. मनाने तुला तो अनुभवायचा आहे. त्या स्वरावर तुला तुझे मन नियंत्रित करायचे आहे. त्या स्वरात डुंबायला शिक. म्हणजे तुझा आत्मज्ञानावर विजय निश्‍चित आहे. या लढाईत फक्त तु निमित्त मात्र हो.

No comments:

Post a Comment