Wednesday, September 11, 2013

आगळा वेगळा "सकाळ परिवार'


दहा सप्टेंबर माझा वाढदिवस. हा दिवस नेहमीच माझ्या आयुष्यात सकाळ आणि माझे एक आगळेवेगळे नाते निर्माण करत राहीला आहे. 1992 मध्ये सकाळने वाचक मेळावे सुरू केले होते. याची सुरवात सकाळने रुकडी येथून केली. तो दिवस दहा सप्टेंबरच होता. या दिवशी या कार्यक्रमामध्ये सकाळने वाचकांना बोलण्याची संधी दिली. सकाळ नेहमीच असा काही ना काही नवा उपक्रम सातत्याने राबवत आला आहे. अशा या संधीमुळे अनेक वाचक सकाळने जोडले आहेत. अनेकांना वेगवेगळ्या संधी मिळवून दिल्या आहेत. सकाळ वाचकांना नुसते लिहायला नाही तर बोलायलाही प्रोत्साहित करतो. वाचकांचेही व्यक्तिमत्व घडवतो. यामध्ये मला प्रथम बोलण्याचे धाडस झाले. चार लोकांच्या समोर उभे राहून बोलण्यासही धाडस लागते. बोलायला हातात माईक घेतल्यानंतर काय बोलायचे हे सुचले पाहीजे. लोकांना बोलायला लावणारा सकाळ अशी ओळख त्यावेळी सकाळ ने निर्माण केली. त्यावेळी वाचकांनी रुकडी या ग्रामीण भागातून बातमीदार असावा अशी मागणी केली. तेव्हा सकाळचे तत्कालिन संपादक अनंत दीक्षित यांनी तुमच्यातील कोणी इच्छुक असेल तर भेटा त्याचा विचार आम्ही जरूर करू असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी मी दीक्षित सरांना भेटलो आणि त्यांनी सकाळमध्ये बातमीदार म्हणून लगेच नियुक्ती पत्रही दिले. मला वाटलेही नव्हते सकाळमध्ये आपली नियुक्ती इतक्‍या झटपट होईल.
सकाळमध्ये बातमीदार म्हणून मी निवडलो गेलो. पण बातम्या कश्‍या लिहीतात. बातमी कशाला म्हणतात याचे कोणतेही ज्ञान त्यावेळी मला नव्हती. मी त्यावेळी बारावी पास होतो. पदवीचे शिक्षण घेत होतो. समाज दैनिकातून काही लेख माझे प्रसिद्ध झाले होते व वाचकांची पत्रे नियमीत लिहीत होतो. वाचकांच्या पत्राला सकाळने पुरस्कारही दिला होता. इतकाच माझ्याकडे अनुभव होता. अशावेळी फक्त लिखानाची आवड, आणि लिखान इतकेच काय ते भांडवल होते. बातमी लिहीणे याचा अभ्यास लागतो. बातमी कशाची होते याचेही ज्ञान नव्हते. पण मी बातमीदार म्हणून निवडलो गेलो. मला त्यावेळी सांगण्यात आले दररोजच्या वृत्तपत्रात जशा बातम्या येतात तशाच पद्धतीच्या बातम्या आपण पाठवत जा. रुकडी त्यावेळी दहा हजारच्या आसपास लोकसंख्या असलेले ठिकाण होते. सकाळचा खपही फारसा नव्हता. केवळ 35-50 अंक खपत होते. अशा ठिकाणी बातम्या तरी किती असणार? कार्यक्रमा व्यतिरिक्त बातम्या तरी येथे काय असणार? तेव्हा कार्यक्रमही फारसे होत नव्हते. मी गावाचा सर्वांगिण विचार केला व बातम्या काय घडू शकतात याचा विचार माझ्या मनात घोळू लागल्या. ग्रामीण भागात फारसे काही घडत नाही. क्रामिकच्या घटनाही क्वचितच. मुळात पोलिस ठाणेच रुकडीत नसल्याने तोही बातमीचा विषय नव्हता. मला आता येते बातम्या शोधायच्या होत्या. बातम्या काय द्यायच्या हाच प्रश्‍न माझ्या मनाला सतावू लागला. त्यावेळी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाने (माझ्याच शाळेने) दीक्षित सरांना कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानासाठी निमंत्रित केले असे समजले. मी याचा पाठपुरावा घेण्यासाठी सकाळ एमआयडीसी कार्यालयात गेलो. दीक्षितसर नेमके त्या दिवशी नव्हते. उपस्थित उपसंपादकांना हा विषय सांगितला. त्यांनी मला ताबडतोब एखादा चांगला विषय निवडून बातमी करण्यास सांगतले. गावात बातमीचे विषय नसतात हे सांगून आता येथे भागणारेही नव्हते. तसे उपसंपादकांचा फारसा परिचय नसल्याने व आपणाला काही येत नाही हे बाहेर पडू नये यासाठी मी बोलण्याचे टाळलो. जे सांगतात ते शांतपणे ऐकून घेतले व तेथून निघालो. 22 सप्टेंबरला कार्यक्रम होता. दोन-चार दिवसांचा कालावधी माझ्याजवळ होता. बातमी शोधण्यासाठी मी गावभर हिंडलो. मला काहीच सुचत नव्हते. शेवटी रेल्वे स्टेशनवर निवांत बसलो होतो. त्यावेळी एक धनगर तेथे आला. शाहूवाडीतील तो धनगर होता. सोबत मेंढरे होती. स्टेशनवर निवांत पडण्यासाठी तो जागा शोधत होता. मेंढरे स्टेशनच्या मागेच खुराड्यात ठेवली होती. तो मी बसलेल्या बाकावर बसला. त्यावेळी स्टेशनवर फारशी बाकडीही नव्हती. तो कंटाळाला होता विसावण्यासाठी तो बसला आहे हे मी ओळखले. मी सहज त्याला विचारले कोठून आला आहात. तो म्हणाला मी विजापूरहून आलो आता असे मुक्काम करत शाहुवाडीला जाणार. महिनाअखेरीपर्यंत शाहुवाडीत जाणार. त्याच्याशी गप्पा मारल्या. मी ठरवले आता हीच बातमी करायची आणि द्यायची दुसरा विषयही नव्हता. बातमी तयार केली. विजापूरहून धनगर परतीच्या प्रवासाला...बातमी सकाळच्या कोल्हापूर शहर कार्यालयात देण्यासाठी निघालो. तेवढ्यात रस्त्यात मला कडकलक्ष्मी दिसली. रेल्वेला वेळ होता. मी ठरवले धनगरांच्या परतीची बातमी होऊ शकते तर कडकलक्ष्मीची बातमी का होणार नाही. ते सुद्धा दसरा-दिवाळीच्या काळातच ग्रामीण भागात येतात. माळावर पाल्यात राहातात. त्याचीही बातमी मी तयार केली. कडकलक्ष्मीचे रुकडीत आगमन...दोन्ही बातम्या तयार करून शहर कार्यालयात देण्यासाठी गेलो. पाकीट बंद केले होते कोणी फोडणार नाही याची दखल मी घेतली होती. कारण कोणी येथेच फोडले आणि असल्या बातम्या वाचून माझीच टिंगल करणार नाही ना अशी भीती होती. संपादकीय विभागाने काय तुला काय दिसतय ती बातमी होते असे सांगितलेच होते. समोर काय घडत आहे याची बातमी होते एवढेच मला बातमी बाबतीत माहित होते. विचारले तर तुम्हीच सांगितले होते असे म्हणायला मी मोकळा होतो. शहर कार्यालयात सुधाकर काशिद, सोपान पाटील, विजय चोरमारे आदी होते. मी बातमी दिली. विशेष म्हणजे बातमी कोणी फोडली नाही. ते पाकीट तसेच त्यांनी पार्सलच्या खोक्‍यात टाकले. मी घरी परतलो.
दररोज बातमी आली आहे का ते आवर्जुन पाहात होतो. दोन दिवस बातमी काही लागली नाही. दीक्षितसरांचा कार्यक्रम 22 तारखेला होता. बातमी प्रसिद्ध न झाल्याने मी कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवले. बातमीदारी आपणाला जमणार नाही. असा पक्का निर्धार माझा झाला होता. इतक्‍या लहान गावात बातम्या कोठल्या असे म्हणून बातमीदारीला आता रामराम...असे म्हणून मी माझ कॉलेज गाठले. माझे कॉलेज सकाळी 8 वाजता असायचे. त्यामुले मी सकाळी सह्याद्री एक्‍सप्रेसने सहा वाजताच कोल्हापूरात आलो होतो. इतक्‍या सकाळी पेपर कोठेच वाचायला मिळत नाही. आठ ते दहा माझा तास होता. दोन्ही वर्ग संपल्यानंतर मी कॉलेजच्या लायब्रित आलो. सवयीप्रमाणे सर्वात प्रथम सकाळ चाळला. आतल्या पानात तीन कॉलमात बातमी प्रसिद्ध झाली होती. विजापूरहून धनगर परतीच्या प्रवासाला....हेडिंग नेहमी वेगळ्या पद्धतीत इटालिक केले होते. बातमीही इटालीक होती. लेफ्ट अलाईन केली होती. इतर बातम्यापेक्षा बातमीला वेगळी ट्रिटमेंट दिली होती. बातमी पाहून मला प्रथम आश्‍चर्यच वाटले. हा बातमीचा विषय होतो हेच मुळात मला पटत नव्हते. आता बातमीतर मीच दिली होती. दुसऱ्या एका पानावर कडकलक्ष्मीचे आगमन... ही बातमीही प्रसिद्ध झाली होती. आता मात्र माझा विश्‍वासच उडाला. मी पुन्हा पुन्हा या बातम्या पाहू लागलो. मला पटतच नव्हते. मी पटकण रेल्वेस्टेशन गाठले व रुकडीला आलो. दीक्षितसरांचे व्याख्यान दुपारी होते. त्याला उपस्थित राहीलो.
व्याख्यानाची बातमी घेऊन दुसऱ्या दिवशी एमआयडीसी कार्यालय गाठले. दीक्षितसर नव्हते. बातमी दिली. कालच्या बातम्याबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते याबाबत मला उत्सुकता होती. शीतल महाजणी मॅडम होत्या त्या म्हणाला सकाळ सर्वांनाच बरोबर घेऊन जातो. कडकलक्ष्मी ही सुद्धा व्यक्तीच आहे. त्यांचे जीवन, त्यांचे राहणीमान, धनगरांचे जीवन यावर बातम्या होऊ शकतात. ग्रामीण जीवन वृत्तपत्रात यावे या उद्देशानेच सकाळने ग्रामीण भागात बातमीदार नियुक्त केले आहेत. दररोजच्या घटनांपेक्षा वेगळे देण्याचा प्रयत्न नेहमीच सकाळ करतो आहे. लोकांना वाचणीय लोकांना आवडेल लोकांच्या मनाला पटेल लोकांना आपलस वाटेल असे लिखान करण्याचा सकाळचा प्रयत्न असतो. त्यानंतर सकाळमधून रुकडीतून बातमीदार म्हणून अनेक बातम्या दिल्या. साखर कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळघरे फायदेशीर, उसापेक्षा सोयाबिन फायदेशीर असे अनेक लेख लिहीले.
शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात गेलो. पुण्यात पुन्हा संध्यानंदमध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. काही वर्षे केसरीतही उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर मल्हार अरणकल्ले सर व सुनिल चव्हाण यांनी ऍग्रोवनमध्ये घेतले. पुन्हा एकदा सकाळ परिवारात सामिल झालो. सकाळ परिवाराचे वैशिष्ठ म्हणजे येथे आपणास भरपूर संधी मिळतात. लिखानाला मोठा वाव मिळतो. लिहायला न येणारा मनुष्यही येथे लिहायला शिकतो. बोलायला न येणाराही मनुष्य येथे वक्ता होऊ शकतो. सकाळ परिवार माणसे घडवतो. स्नेह वाढवतो. अमाप प्रेम येथे मिळते.
नुकताच माझा दहा सप्टेबरला वाढदिवस साजरा झाला. सकाळ परिवारने माझा वाढदिवस साजरा केला. मुख्य संपादक श्रीराम पवार, निवासी संपादक मनोज साळुंखे, संजय पाटोळेसर, शेखर जोशी, सर्व उपसंपादक यांच्या उपस्थितीत केके कापून वाढदिवस साजरा झाला. असा सोहळा घरीही कधीही झाला नाही. सकाळ कर्मचाऱ्यांचे असे वाढदिवसही येथे साजरे केले जातात. आज पुर्वीच्या व्यक्ती येथे नसतील पण पूर्वीचे वातावरण मात्र येथे कायम आहे. तो स्नेह, जिव्हाळा येथे कायम आहे. काम करण्यासाठी उत्तम वातावरण सकाळमध्ये आहे. पुर्वीही होते तसेच आहे. माणसे आली गेली. बदलली तरी वातावरण, उद्दिष्ठ मात्र येथे तेच आहे. फक्त कार्यक्रमाचे स्वरूप बदलले आहे. अशा या आगळ्यावेगळ्या परिवारात नेहमीच राहावे असे वाटतो. तो स्नेह कायम असावा असे वाटते.

राजेंद्र घोरपडे

2 comments:

  1. khup manapasun lihilet...khup chan....

    ReplyDelete
  2. shabaas mi hi sarv vatchal pahileli aahe. great amd congrats.

    ReplyDelete