Tuesday, May 14, 2013

टुटी फ्रुटीतील "विजय'

पपई प्रक्रियेतून राशिवडेच्या तरुणाने शोधला उत्पन्नाचा स्रोत; धाडसाने उभा केला प्रकल्प समाधानकारक दर नाही म्हणून हताश होऊन बसण्याऐवजी कोल्हापूर जिल्ह्यातील विजय तापेकर पपई प्रक्रिया उद्योगाकडे वळले. त्यासाठी प्रशिक्षण घेतले. भांडवल उभे केले. धाडसाने या उद्योगाची उभारणी केली. आज पपईतून टुटी-फ्रुटीची निर्मिती करून या व्यवसायातून त्यांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. राजेंद्र घोरपडे
विजय तापेकर यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. त्यांचे वडील गणपती तापेकर केळी, आले, झेंडू, भाजीपाला आदी पिकांची लागवड करतात. गेल्या 22 वर्षांपासून त्यांच्याकडे पपईची शेती होते. अन्य शेतकऱ्यांची तीन एकर शेतीही भाडेपट्टीने कसायला घेतली आहे. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर विजय यांनीही घरची शेतीच सांभाळण्याचा निर्णय घेतला.

व्यापाऱ्यांचा थेट विक्रीस विरोध वडिलांसोबत गोवा बाजारपेठेत पपई, केळीची विक्री करण्यासाठी विजय जायचे. व्यापाऱ्यांना माल विकण्याऐवजी अधिक नफा मिळतो म्हणून विजय यांनी गोवा बाजारपेठेत थेट विक्री सुरू केली; मात्र तेथील व्यापाऱ्यांनी यास कडाडून विरोध दर्शविला. एकदा तर काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या पपईचे नुकसानही केले. त्यानंतर विजय यांनी थेट विक्रीचा नाद सोडला. काही व्यापाऱ्यांशी संबंध वाढवून नियमित विक्री सुरू केली.

प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल ... विजय यांनी स्वतःच्या पपईबरोबरच अन्य शेतकऱ्यांचीही पपई खरेदी करून गोवा बाजारपेठेत विक्री सुरू केली; मात्र समाधानकारक दर न मिळाल्याने अनेकदा नुकसान व्हायचे, पपई फेकून देण्याची वेळ यायची. बाग शेवटच्या टप्प्यात असताना शिल्लक पपई टाकून द्यावी लागे. हे नुकसान एक ते पाच टनांपर्यंत व्हायचे. इतर शेतकऱ्यांचेही असेच नुकसान व्हायचे. ही शिल्लक पपई प्रक्रियेसाठी सांगली, इस्लामपूर, सातारा जिल्ह्यात पाठविण्याचाही विजय यांनी प्रयत्न केला; पण वाहतुकीचा खर्च वगळता काहीच पैसे हाती पडले नाहीत, यामुळे आपल्याच भागात प्रक्रिया उद्योग उभारण्याचा विचार विजय यांच्या मनात घोळू लागला.

प्रकिया उद्योगाची वाटचाल प्रक्रियेतून होणारे नुकसान टाळता येऊ शकते, हे विजय यांच्या मनात पक्के रुजले. प्रक्रिया उद्योगाचा निर्धार पक्का केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ- माणगाव येथे डॉ. हेडगेवार प्रकल्प सेवांतर्गत महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचे प्रशिक्षण वर्ग चालत असल्याचे समजले. त्यादृष्टीने 2004 मध्ये फळप्रक्रिया उद्योगाचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. जेवण व राहण्याच्या सोयीसुविधेसह दोन हजार रुपये खर्च आला.

उद्योगाची उभारणी प्रशिक्षण घेतले, पण उद्योग उभारणी कशी करणार, हाच प्रश्‍न होता. भांडवल मोठे लागते. लाखो रुपयांचे कर्ज कोणी सहजासहजी देत नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तर हजारो प्रश्‍न विचारून भेडसावून सोडले. कित्येकदा प्रक्रिया उद्योगाचा नाद सोडावा की काय, असे विजय यांना वाटायचे. अखेर एका सहकारी बॅंकेने दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. विजय बायोटेक या नावाने उद्योग सुरू झाला. बांधकामासाठी चार लाख रुपये खर्च आला. पिलिंग मशिन (साल काढणी यंत्र), स्लायझिंग, क्‍युबिंग (लहान तुकडे करणारे यंत्र), 50 लिटर क्षमतेचा बॉयलर, केटल (शिजविण्याचे पात्र) आदींच्या खरेदीसाठी सहा लाख रुपये खर्च आला. कच्चा मालाच्या खरेदीसाठी बॅंकेत खेळते भांडवल चार लाख रुपये ठेवले. असा सुमारे चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च उद्योग उभारणीसाठी आला. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी 50 टक्के अनुदान मिळाले. यामध्ये कृषी अधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य झाले.

अशी होते पपई प्रक्रिया - टुटी फ्रुटी तयार करण्यासाठी तैवान 786 या जातीची कच्ची पपई लागते.
- पपई सोलणी यंत्राच्या साहाय्याने सोलून घेऊन साल काढली जाते.
- काप करून 18 टक्के मिठाच्या द्रावणात 21 दिवस भिजत ठेवले जातात.
- त्यानंतर तुकडे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन त्यांचे क्‍युबिंग मशिनच्या साहाय्याने तुकडे केले जातात.
- त्यानंतर केटलमध्ये स्टीमच्या साहाय्याने शिजवले जातात.
- उकळत्या पाण्यात शिजलेले तुकडे 65 टक्के साखरेच्या द्रावणात 24 तास ठेवले जातात.
- त्यानंतर पुन्हा केटलमध्ये शिजवून घेतले जातात. त्यात विविध प्रकारचे रंग, प्रिझरवेटिव्ह आदींचा वापर केला जातो.
- त्यानंतर ते योग्य प्रकारे वाळवण्यात येतात, त्यानंतर पॅकिंग होते.

टुटी फ्रुटीचे उत्पादन टुटी फ्रुटीचे उत्पादन - दररोज अंदाजे 300 किलो
यासाठी कच्चा माल - 700 किलो पपई

महिन्याला - पाच ते सहा टन
वार्षिक - सुमारे 50 टन

300 किलो टुटी फ्रुटीच्या उत्पादनाचा खर्च (एका दिवसासाठी) पपई 700 किलो (दर 4 रुपये प्रति किलो) ......2800 रुपये
यासह साखर, मीठ, मजुरी, इंधन, पॅकिंग मटेरिअल, रसायने, वीज, पाणी, वाहतूक आदी मिळून
अंदाजे एकूण खर्च 12 हजार रुपये. घटकांचे दर कमी- जास्त होतील तसा उत्पादन खर्च वाढतो. खर्चाच्या 15 टक्के मार्जिन पकडून दर ठरविला जातो.

विक्री - प्रति किलो - 40 ते 50 रुपये

अद्याप बॅंकेचे कर्ज आहे, त्यामुळे 15 हजार रुपयांचा महिन्याचा हप्ता येतो. दिवसाला हप्ता गृहीत धरून येणारा सर्व खर्च वजा जाता दिवसाला हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.

टुटी फ्रुटीची विक्री - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बेकरी व्यावसायिक, पान मसाला दुकानदार, कोल्ड्रिंक व्यावसायिक, होलसेल मालाचे विक्रेते टुटी फ्रुटीची खरेदी करतात. आठवड्यातून एकदाच सर्व मालाची डिलिव्हरी जागेवर केली जाते, यामुळे वाहतूक खर्च व रोजच्या मालाची ने- आण करण्याचा त्रास वाचतो.

पपईची गोव्याला विक्री उन्हाळ्यात पपई लगेच पिकते. अशी पपई टुटी फ्रुटीला वापरता येत नसल्याने गोवा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली जाते. आठवड्यातून दोन वेळा अंदाजे पाच टन माल गोवा व मुंबई बाजारपेठेला पाठवला जातो. स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रति किलो चार ते सहा रुपये दराने मालाची खरेदी होते. बाजारपेठेत सात ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतो. रमझानमध्ये हा दर 20 ते 30 रुपयांपर्यंतही जातो.

विजय तापेकर - 9420582444
राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

Friday, May 3, 2013

उसातील काकडीने दिला बाबासाहेबांना आर्थिक आधार


वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना केवळ एखाद्या पिकावर अवलंबून राहणे परवडत नाही. उत्पन्नवाढीसाठी किंवा शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध प्रयोग शेतकरी करतात. शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील गाडेगौंडवाडी येथील बाबासाहेब देवकर यांनी उसात विविध आंतरपिके घेण्याचे प्रयोग केले आहेत. यंदा दुष्काळी पार्श्‍वभूमीवर काकडीला चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी काकडीचे आंतरपीक घेतले. त्यातून फायदा मिळवताना उसातील उत्पादन खर्चही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.


राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर जिल्ह्यातील गाडेगौंडवाडी (ता. करवीर) येथील बाबासाहेब देवकर यांनी "ऍटोमोबाईल' विषयातील पदविका घेतली. सहा वर्षे कंपनीत काम केले. नोकरी करताना शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. शेतीच्या आवडीतून अखेर नोकरी सोडली. त्यांची साडेसात एकर बागायती जमीन आहे. पाण्याची सुविधा असल्याने सर्व हंगामांत पिके घेणे त्यांना शक्‍य असते. सन 1992 पासून शेती करताना विविध प्रयोगही त्यांनी केले आहेत. गेली 16 वर्षे ते पाचट जाळण्याऐवजी शेतातच कुजवत आहेत, त्यासाठी त्याची कुट्टी करून शेतात मिसळतात.

कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी- शास्त्रज्ञ मंचामुळे शेतीत नवीन तंत्रज्ञानाचे प्रयोग सातत्याने ते करतात. उसात आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान त्यांनी मंचाच्याच माध्यमातून घेतले. गेल्या दहा वर्षांत त्यांनी उसात गहू, हरभरा, कोबी, चवळी, फ्लॉवर, वैशाख मूग, जनावरांसाठी लसूणघास, कलिंगड, भुईमूग आदी पिके घेतली आहेत. आंतरपिकासाठी खते, पाणी हे घटक स्वतंत्रपणे द्यावे लागत नाहीत. उसाची आंतरमशागतही सुलभ होते. यामुळे खर्चात बचत होऊन घेतलेल्या आंतरपिकाचे उत्पादनही हाती मिळते.
आतापर्यंत घरच्या गरजा विचारात घेऊन आंतरपिकांची निवड केली. यंदाच्या वर्षी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अशोक पिसाळ व डॉ. पांडुरंग मोहिते यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन त्यांना काकडीचे आंतरपीक घेण्यास सुचवले. यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळ आहे. यामुळे उन्हाळ्यातील पिके अनेक भागांत अधिक प्रमाणात होणार नाहीत. यात मुख्यतः भाजीपाला व काकडीचे उत्पादन तुलनेने कमी राहील. बाजारपेठेत चांगला दर मिळणार, असा विचार त्यामागे होता. त्यानुसार बाबासाहेबांनी काकडीचे नियोजन केले.


असे केले लागवड नियोजन

उसाची लागवड तीन फूट सरी पद्धतीने बाबासाहेब करतात. यंदाच्या प्रयोगात प्रत्येक दोन सरींनंतर तिसऱ्या सरीवर त्यांनी काकडी घेतली. ही लागवड पूर्वहंगामी उसातील खोडव्यात केली होती, त्यामुळे काकडीचे उत्पादन उन्हाळी हंगामातच चांगल्या प्रकारे साधण्याची संधी होती. जानेवारीत ऊस तुटून गेल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिकाम्या सोडलेल्या जागेत पॉवरटिलरच्या साहाय्याने सरी काढून त्यावर काकडीच्या बियांची टोकण केली. एकरी सुमारे 1200 रोपे बसली. दोन रोपांतील अंतर सुमारे अडीच ते तीन फूट होते.
उसाला दिलेल्या सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर काकडीसाठीही झाला; मात्र काकडी दोन पानांवर आल्यानंतर आणि फुलोऱ्यावर आल्यानंतर 19-19-19 या खताचे प्रत्येकी 50 किलो डोस दिले.

पाणी व्यवस्थापन

आंतरपिके घेताना पाण्याचे व्यवस्थापन योग्य ठेवावे लागते. टोकणीनंतर तसेच काकडी फुलोऱ्यावर येईपर्यंत पाण्याच्या तीन हलक्‍या पाळ्या दिल्या. काकडी फुलोऱ्यावर आल्यानंतर दर दहा दिवसांनी सकाळच्यावेळी पाण्याची पाळी दिली. दुपारी उन्हामध्ये पाणी देण्याचे टाळले, कारण मुळांना इजा होते. यामध्ये पाण्याची बचत झाली. उसामध्ये पाचट ठेवले असल्याने पाण्याची गरज कमी झाली.

रसशोषक किडींचे नियंत्रण केले

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्बेन्डाझिमच्या दोन ड्रेंचिंग (आळवण्या) घेतल्या. विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोगाचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यावर भर दिला, त्यासाठी तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली.

वेलांना बांबूचा आधार

काकडीचा वेल जमिनीवर पसरला तर त्याची वाढ योग्य प्रकारे होत नाही; तसेच काकडी जमिनीवर लोळल्यास खराब होण्याचा धोका असतो. दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी काकडीचा वेल नायलॉन दोरीवर सोडणे उत्तम असते. यासाठी बाबासाहेबांनी प्रत्येकी आठ फूट अंतरावर बांबू उभारून त्यावर नायलॉन दोऱ्या बांधल्या. या दोऱ्यांवर वेल सोडण्यात आला. एकरी साधारणपणे 200 बांबू लागले. यासाठी चार बंडल वायर लागते.


गेल्यावर्षी बाबासाहेबांनी उसात हरभरा हे आंतरपीक घेतले होते. दोन सरींनंतर रिकामी ठेवण्यात आलेल्या सरीच्या ठिकाणी गादीवाफा करून त्यावर हरभऱ्याची लागवड केली. हरभरा उत्पादनासाठी दोन हजार रुपये खर्च आला. एकरी सुमारे दोन क्विंटल उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता दहा हजार रुपये उत्पन्न मिळाले. या व्यतिरिक्त उसाचे उत्पादन एकरी 60 टन मिळाले. याच शेतात ऊस तोडून गेल्यानंतर यंदा काकडीची लागवड साधली आहे.

....................
प्रयोगातील अर्थशास्त्र -

काकडीचा प्लॉट जवळपास संपला आहे. शेवटचे अल्प तोडेच बाकी आहेत. आतापर्यंत सुमारे साडेचार टन उत्पादन एकरी मिळाले आहे. नांदणी भाजीपाला संघामार्फत काकडीची मुंबई बाजारपेठेत विक्री केली. मुंबईतील दरानुसार किलोला 16 पासून ते 24, 26 रुपयांपर्यंत, तर सरासरी 18 रुपये प्रति किलो दर मिळाला.
एकूण 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. काकडीसाठी अंदाजे खर्च सांगायचा तर बियाणे, पेरणी, फवारणी, खते, तोडणी, मजुरी, बांबू, दोऱ्या, वाहतूक असा एकूण खर्च 35 हजार रुपये आला आहे. खर्च वजा जाता मिळालेले उत्पन्न सुमारे 45 हजार रुपये आहे. संघ वाहतूक व इतर खर्चासाठी किलोमागे चार रुपये घेतो. संघ असल्याने विक्रीची हमी मिळते. मालाला योग्य दर मिळून वेळेवर आर्थिक व्यवहार होत असल्याने योग्य नफा हाती पडतो.
बाबासाहेब अनेक वर्षांपासून ऊसशेती करतात. त्यांचे सध्याचे पूर्वहंगामी लावणी उसाचे उत्पादन एकरी 70 टन आहे, तर खोडवा उसाचे 50 ते 55 टन आहे. लावणी उसाचा उत्पादन खर्च एकरी सुमारे 40 हजार रुपयांच्या घरात, तर खोडवा उसाचा हा खर्च सुमारे 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे.
आंतरपिकांतील उत्पन्नामुळे उसाचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत झाली.
.....................
आंतरपिकाचे बाबासाहेबांनी सांगितले फायदे

- मुख्य पिकाचा उत्पादन खर्च कमी होतो.
- खते व पाण्याची बचत या अर्थाने की आंतरपिकाला स्वतंत्र देण्याची गरज कमी होते.
- मुख्य दीर्घ पिकातील भांडवली खर्च आंतरपिकांतून सुरवातीच्या तीन महिन्यांतच कमी होतो.
- दोन्ही पिकांकडे चांगले लक्ष देणे शक्‍य होते.
..................................................................

"ऍग्रोवन'मधील लेख वाचून शेती

"ऍग्रोवन'मध्ये इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग लागवड करण्यासंदर्भात चार फेब्रुवारीच्या अंकामध्ये लेख आला होता, त्यानुसार इक्रिसॅट पद्धतीने त्यांनी भुईमूग लागवड केली आहे.
.....................
संपर्क ः बाबासाहेब देवकर - 9823348700
गाडेगोंडवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर