Monday, September 3, 2012

दुष्काळी पट्ट्यातील शेतात गरज सेंद्रिय कर्ब वाढविण्याची

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे काही अनुभव अनुकरणीय आहेत. ते म्हणतात, की गेल्या काही वर्षांत अनियमित पावसामुळे शेतीत अनेक समस्या उद्‌भवत आहेत. हवामानाच्या या बदलत्या चक्रात शेतीत बदल गरजेचा झाला आहे. यापुढे पीक नियोजन करताना शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन हा विषय प्राधान्याने विचारात घेणे गरजेचे आहे. यंदा तर दुष्काळाने देशातील अनेक भाग होरपळत आहेत. अशा परिस्थितीत पिके वाचविणे जिकिरीचे झाले आहे. जमिनीची जलसंधारण क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतकरी कोळपणी करून जमिनीवरील भेगा बुजवतात. जमिनीचा वरचा थर भुसभुशीत ठेवतात. यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून बऱ्याच कालावधीपर्यंत जमिनीत ओलावा राहातो. पण हे उपाय अपुरे पडत आहेत. यावर ठोस उपाय योजण्यासाठी शेततळी, छोटे छोटे जलसिंचन प्रकल्प उभे राहिले. पण पावसानेच दडी मारल्याने आता नवे पर्याय शेतकऱ्यांना शोधणे गरजेचे झाले आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारा ओलावा जमिनीत टिकविला पाहिजे. यंदा राज्यातील काही शेतकऱ्यांनी यावर प्रयोग केले आहेत. विदर्भातील राजेश पाटील यांनी कापसाच्या पिकात योग्य व्यवस्थापनातून ओलावा टिकविला आहे. एक पट्टा पिकांचा आणि एक पट्टा तणांचा घेऊन या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीतही चांगल्या प्रकारे पीक जगवण्याचा प्रयत्न केला आहे. एका पट्ट्यात तणे वाढवायची, फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ती जमिनीलगत कापायची. तणांचे मल्चिंग केल्याने भूपृष्ठावर ओलावा टिकवून ठेवला जातो. तणांच्या मुळ्या जमिनीत राहिल्याने जमीन भुसभुशीत राहाते. पुढे तण कुजल्याने त्याचे खत तयार होते. पिकाला त्याचा फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्यातही गाडेगोंडवाडी, हासूर दुमाला, वरणगे-पाडळी, वाघापूर येथील शेतकरी हा प्रयोग करीत आहेत. शेतात तणे नकोत असा एक मतप्रवाह आहे. पण तण हेच धन आहे यासाठी तणे वाढवा असा उलटा मत प्रवाह शेतकऱ्यांना रुचत नाही. सर्वसामान्य शेतकरी ठिबक, तुषार आदी आधुनिक तंत्राने शेती करू शकतोच असे नाही. इतका खर्च करणे त्याला परवडत नाही. लहान क्षेत्र असल्याने मोठ्या उपाययोजनाही त्याला फायद्याच्या ठरत नाहीत. खर्चिक मार्गाऐवजी सोपे, स्वस्त, सहज अवलंबता येणारे उपायच फायदेशीर ठरतात. यासाठीच सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तण काही मर्यादेत वाढवायचे व ते कुजवायचे हा प्रयोग करायला हवा. अल्पभूधारकांसाठी कमी खर्चात, कमी पाण्यावर अशा प्रकारे पिके जगवून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणे सहज शक्‍य आहे. पावसाने ओढ दिल्याच्या काळात जमिनीत ओलावा टिकविण्याची गरज असते. यासाठीच जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवत ठेवण्याचे उद्दिष्ट हवे. खतासाठी तणांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. विदर्भातील काही शेतकरी मिश्र पिके घेतात. तूर- सोयाबीन, कापूस-सोयाबीन, कापूस-तूर, तूर- मूग किंवा उडीद अशी ही शेती असते. मिश्रपीक पद्धतीमुळे मुख्य पिकास पाण्याचा ताण सहन करावा लागतो. काही वेळेला मुख्य पिके वाया जाण्याचाही धोका असतो. यासाठी मिश्रपीक घेण्याऐवजी मुख्य पिकामध्ये तणांचा पट्टा वाढविण्याचे प्रयोग सुरू आहेत. ही तणे फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्यांचा वापर मल्चिंगसाठी हिरवळीच्या खतांबरोबर करता येतो. त्यातून पाण्याची बचत केली जाते. द्राक्ष, डाळिंबाच्या बागांतही असे प्रयोग काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये बागांमधील आंतरमशागत बंद केली आहे. तणे वाढवायची व फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच ब्रश कटरने जमिनीलगत कापून त्याचे आच्छादन केले जाते. तणांच्या मुळांना धक्का द्यायचा नाही. यामुळे बागांमध्ये आंतरमशागतीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चातही बचत होते व पिकास सेंद्रिय खतही उपलब्ध होते. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. यासाठी शेतातील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतीसाठी पाण्याची कमतरता भासणाऱ्या भागात असे प्रयोग होणे गरजेचे आहे. संपर्क - प्रताप चिपळूणकर, 8275450088 (शब्दांकन - राजेंद्र घोरपडे)

No comments:

Post a Comment