Thursday, September 29, 2011

आळस

मनशुद्धीचां मार्गी। जैं विजयी व्हावे वेगीं ।।
तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ।।
एखाद्या गोष्टीत विजयी व्हावे अशी जर इच्छा असेल तर ती गोष्ट मनापासून करायला हवी. ती करताना आळस करून चालणार नाही. नाहीतर विजय हस्तगत करता येणार नाही. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळसामुळे माणूस संपतो. राज्ये बरखास्त होतात. सीमेवर पहारा देणारा सैनिक जर आळशी असेल तर राज्य कसे टिकेल. परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांने आळस केला तर काय होईल? आळस केल्यावर गुणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल. यासाठी कामात आळस हा असताच कामा नये. आळस करून विजयाची अपेक्षा ठेवणे चुक आहे. विजयी व्हायचे असेल तर प्रथम आळस हा झटकायलाच हवा. तलवार जर तशीच ठेवली तर तिला गंज चढतो. तिची धार कमी होते. भाजी चिरायच्या विळतीचेही तसेच आहे. वापर नाही केला तर तिचीही धार कमी होते. गंजामुळे धार जाते. जीवनाचेही तसेच आहे. आळस, कंटाळा केलातर त्यालाही गंज चढतो. जीवनाची धार कमी होते. धार येण्यासाठी नियमीतपणा हवा. रोजच्या वापरात असणाऱ्या विळीला चांगली धार असते. भाज्या कापून कापून तिचा धारधारपणा वाढतो. दररोज फरशी पुसली तर तिची जशी चकाकी वाढते. तसे जीवनात कंटाळा घालवला तर नेहमीच ताचे तवाने राहता येते. मन प्रसन्न ठेवता येते. आळस हा मनातच असतो. तो घालविण्यासाठी मनाची शुद्धता गरजेची आहे. अध्यात्मिक वाचनातून, पारायणातून मनाला शुद्धता येते. या शुद्धतेनेच धार चढते. कर्माने त्रास होतो म्हणून त्याचा कंटाळा करणे योग्य नाही. नोकरीत त्रास होतो म्हणून नोकरी सोडून कसे चालेल. हा त्रास सोसायलाच हवा. आळस झटकायला हवा. आळस माणसाला संपवतो. तो कधीही संपत नाही. यासाठी आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

No comments:

Post a Comment