शेतकरी राजा जागा राहा
"पेरलं म्हणजे उगवतयं' अशी शेती करण्याचे दिवस आता संपले आहेत. शेतीमध्ये नैसर्गिक आपत्ती बरोबरच आता कृत्रिम समस्याही वाढल्या आहेत. शेती करताना टंगळामंगळ करून चालणार नाही. जागरूक राहूनच शेती केली तरच ती तग धरू शकणार आहे. पूर, कीड, रोग, दुष्काळ हा आता नेहमीचाच आहे. जागतिक तापमानवाढीनंतर ही संकटेही वाढतच चालली आहेत. या संकटाबरोबरच खते, बियाणे टंचाई आणि यात होणारी फसवणूक या समस्यांनाही शेतकऱ्यांना आता भेडसावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबिनचे बी उगवलेच नाही. बियाणे उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अशी फसवणूक कशी काय झाली? याचा विचार होण्याची गरज आहे. कृषि विभागाने वेळीच जागरूक राहून उगवणीसाठी अप्रमाणित असलेल्या सोयाबिनच्या 231 क्विंटल बियाण्याची विक्री बंदीचा आदेश दिला. यामुळे होणारे नुकसान टळले आहे. पण हातकंणगले तालुक्यातील रुकडी येथे जवळपास 80 एकरावर जुनमध्ये झालेल्या सोयाबिनची पेरणीही उगवली नव्हती. संबंधीत बियाणे उत्पादक कंपनीने लगेचच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन हे प्रकरण मिटवले खरे. पण शेतकऱ्यांनी असे प्रकार घडल्यानंतर याची तक्रार कृषि विभागाकडे करायला हवी. अन्यथा हे प्रकार वाढतच राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळेच अशा प्रकारावर वेळीच प्रतिबंध बसू शकेल. बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवयला हव्यात. अन्यथा नुकसानभरपाई मिळण्यातही अडचणी येऊ शकतात. याची काळजी घ्यायला हवी. यंदा कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लवकर सुरू झाला. यामुळे पेरण्या वेळेवर झाल्या. समाधानकारक पाऊसही पडत आहे. निसर्गाची शेतकऱ्यांना चांगली साथ मिळत आहे. पण बोगस बियाण्यांच्या अशा घटनांनी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसानभरपाई देऊन झालेले नुकसान टाळता येणारे नाही. वेळेवर पेरणी झाली नाही, तर सोयाबिनवर किड-रोगाचा प्रादुर्भाव होतो. यामुळेही नुकसान होते. तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची झालेली दगदग विचारात घ्यायला हवी. शासनाची जागरूकताही महत्त्वाची आहे. पण शेतकऱ्यांची तक्रारच नाही असे सांगून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते. हे करून चालणार नाही. बोगस बियाण्यांची विक्री कंपन्यांकडून होणार नाही यासाठी कंपन्यावर काही बंधणे घालायला हवीत. असणारे कायदे कडक करायला हवेत. कंपन्यांच्या या कारभारावर शासनाचा वचक असायलाच हवा. शेतकऱ्यांनीही यासाठी वेळीच आवाज उठवायला हवा. केवळ नुकसानभरपाई घेऊन गप्प बसण्याचे दिवस आता संपले आहेत.
No comments:
Post a Comment