Tuesday, January 29, 2019

नामांतर


या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.

तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।
जेविं दूधचि जाहलिया दहीं । नामरूप जाय ।। 170 ।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - तेथें त्या साम्यावस्थेंत सम (एकासारखे एक) विषम (एकाहून एक भिन्न) हे कांही दिसत नाही. म्हणून (त्या साम्यावस्थेस) भूतें असें म्हणतां येत नाहीं. ते कसे तर, ज्याप्रमाणे दूध हें दही झाल्यावर त्याचे दूध हे नांव व पातळपणाचें स्वरूप ही जातात.

शुन्य समही नाही, विषमही नाही. त्यामुळे त्याला भार नाही. सम अंक ऋण किंवा उणे असू शकतो. पण शुन्य दोन्हीही नाही. स्थिर आहे. मध्य आहे. अशी ही शुन्यावस्था आहे. येथे विचार थांबलेले असतात. अस्थिरता, चलबिचलता नसते. कमी-जास्तपणा नसतो. उच-निच भेद नसतो. ही अवस्था नेहमीपेक्षा वेगळी आहे. एकदा या अवस्थेला पोहोचल्यानंतर पुन्हा माघारी येणे नाही. दूध नाशवंत आहे. ते एकदोन दिवस उत्तम प्रकारे राहु शकते. त्यानंतर मात्र ते उत्तम राहील का? हे सांगता येत नाही. यासाठी ते वेगळ्याप्रकारात रुपांतरीत करणे गरजेचे असते. दुधाचे विरजण लावून त्यापासून दही केले जाते. दूधाचे दही झाले. अवस्था बदलली. तसे त्याचे नावही बदलले. आता दह्याला कोणी दुध म्हणेल का? उसाच्या रसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा साखरेपासून ऊस तयार करता येत नाही. ही रासायनिक प्रक्रिया आहे. एखाद्या घटकाचे रुपांतरन दुसऱ्या घटकात झाल्यानंतर पुन्हा पहिल्या घटकात त्यांचे रुपांतर करता येत नाही. पहिलीची परिक्षा पास झाल्यानंतर दुसरीच्या वर्गात जाता येते. नापास झाला तर मात्र पहिलीच्या वर्गातच ठेवले जाते. पण एकदा दुसरी, तिसरी, चौथीत गेल्यानंतर पुन्हा कोणी पहिलीमध्ये बसवेल का? तसे होत नाही. कारण त्या सर्व इयत्ताचा अभ्यास त्याने योग्य प्रकारे पूर्ण केलेला असतो. म्हणूनच पुढच्या इयत्तात प्रवेश दिला जातो. तसेच अध्यात्माचे आहे. एक-एक इयत्ता पास व्हायचे असते. सद्‌गुरू परिक्षा घेत असतात. त्यातून पास होत राहायचे असते. गुरूच प्रश्‍न करतात, गुरूच उत्तर देतात. हळुहळु साधकामध्ये ते विकास घडवत असतात. नराचा नारायण ते करतात. मग एकदा ब्रह्मत्वाला पोहोचलेल्या व्यक्तीला सर्वसामान्य कोणी म्हणेल का? कारण त्या व्यक्तीची अवस्था बदललेली असते. त्याचा विकास झालेला असतो. तो त्या पदाला पोहाचलेला असतो. आता तेथून पुन्हा माघारी येता येत नाही. वाल्ह्याकोळीचा वाल्मिकी झाल्यानंतर आता त्यांना वाल्ह्याकोळी कोणी म्हणते का? उलट त्यांना वाल्मिकी ऋषी म्हटले जाते. योग्य तो मान-सन्मान दिला जातो. हे सर्व सद्‌गुरूंच्याकृपेने होते. यासाठी कृपा होणे गरजेचे आहे. कृपेने अवस्थेत बदल होतो. ते भक्ताला त्यांच्या अवस्थेत आणतात. अवस्था बदलल्यानंतर त्यांचे नामांतर हे होतेच. विशेष पदवी प्राप्त केल्यानंतर नावापुढे त्या पदवीचा उल्लेख होतो ना? डॉक्‍टरेट मिळाल्यानंतर डॉक्‍टर हे विशेषण नावापुढे जोडले जाते ना? यासाठी या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.

Sunday, January 27, 2019

ध्यान







मृत्यू शय्येवर पडलेल्या वृद्ध व्यक्तीजवळ धर्म ग्रंथांची पारायणे करण्याची पद्धत होती. त्या वृद्ध व्यक्तीला मोक्ष मिळावा, हाच या मागचा उद्देश होता. त्या वृद्धाला अंतिम समयी भगवंताचे स्मरण राहावे व त्याला मोक्ष मिळावा. हेच यातून साध्य करायचे असते.

डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें ।
जें भावावें । बोलावें वाचें ।। 76।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीनें जें बोलावें

ध्यान करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात? ध्यान कसे करावे? हे प्रश्‍न नित्याचे असतात. संत ज्ञानेश्‍वरांनी ओव्यातून या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. हे समजावून सांगताना विविध उदाहरणेही त्यांनी सांगितली आहेत. भगवंताचे नामस्मरण सतत असावे. सद्‌गुरूंनी दिलेला गुरू मंत्र सतत जपला जावा. अनेक भक्त सतत नामस्मरण करतात. पण यातून काहीच साध्य झाले नाही. अशी त्यांची तक्रार असते. अशाने त्याचे मन विचलित होण्याचीही शक्‍यता असते. काही वेळेला या अध्यात्मावरचा विश्‍वासही उडतो. पण ध्यान करताना आवश्‍यक घटक आपण पाळले का? याचा विचार कधीही केला जात नाही. ध्यानामध्ये डोळे जरी मिटलेले असले तरी ते डोळे मनाने उघडे असतात. मनात अनेक घटना घडत असतात. ते मन सद्‌गुरूच्या रुपावर स्थिर करावे. त्या मनाच्या डोळ्यांनी सद्‌गुरूंचे रूप पाहावे. संत तुकाराम महाराज विठ्ठलाचा जप करताना डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहात. साक्षात विठ्ठल त्यांना दर्शन देत असे. ध्यानामध्ये सतत सद्‌गुरूंचे दर्शन घडणे हा सुद्धा साक्षात्कारच आहे. सद्‌गुरूंनी दिलेला मंत्र जपताना त्याचा नाद कानांनी ऐकावा. सोऽहमचे स्वर ऐकावेत. ध्यान योग्यप्रकारे लागले तर हे स्वर सहज कानाला ऐकू येतात. यामध्ये रममान होता येते. ध्यानामध्ये मनाची एकाग्रता वाढते. यामुळे श्रवणशक्ती वाढते. याचे विकारही दूर होतात. यासाठी मनात सद्‌गुरू भाव प्रकट व्हायला हवा. भक्तीमय भावातून मनाला प्रसन्नता लाभते. मन आनंदी होते. उत्साह वाढतो. साहजिकच आपल्या शारीरिक आचार-विचारातही फरक पडतो. आरोग्यही सुधारते. बोलण्यातही मृदुपणा येतो. गोडवा येतो. यासाठी ध्यान हे योग्य प्रकारे व्हायला हवे. ध्यान करताना या गोष्टींचा विचार जरूर करायला हवा. जप जपतानाही उच्चार स्पष्ट असायला हवा. ज्ञानेश्‍वरी वाचन करतानाही या गोष्टी जरूर पाळायला हव्यात. यामुळे आपल्या वाचन, श्रवण, स्मरण या शक्ती सुधारतात. उतार वयात ध्यान नित्य नेमाने करत राहिल्यास आरोग्यही उत्तम राहाते. शेवटच्या क्षणापर्यंत सतत ध्यानात रममान व्हायला हवे. देह ठेवतानाही सद्‌गुरूंचे, भगवंताचे स्मरण ठेवले तरीही मोक्षाचा लाभ होतो. यासाठी पूर्वीच्या काळी अंतिम घटका मोजणाऱ्या, मृत्यू शय्येवर पडलेल्या वृद्ध व्यक्तीजवळ धर्म ग्रंथांची पारायणे करण्याची पद्धत होती. त्या वृद्ध व्यक्तीला मोक्ष मिळावा, हाच या मागचा उद्देश होता. त्या वृद्धाला अंतिम समयी भगवंताचे स्मरण राहावे व त्याला मोक्ष मिळावा. हेच यातून साध्य करायचे असते.



Saturday, January 26, 2019

म्हातारपण




प्रेमाने वागण्यात केलेला हा बदल आयुष्याच्या उतारवयात अनेक व्याधींपासून दूर ठेवतो. मन प्रसन्न ठेवता आले तर अनेक आजारापासून मुक्ती मिळते. कारण अनेक व्याधी ह्या मनातील रागातून उत्पन्न होतात. शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. यासाठी क्रोध, राग, द्वेष यापासून दूर राहून मन प्रसन्न ठेवण्यावर अधिक भर दिला तर, आरोग्यही उत्तम राहाते.
 
 

आता वृद्धाप्याचिया तरंगा । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा ।
तेणें कवळिजताती पै गा । चहूंकडे ।। 86 ।। अध्याय 7 वा

ओवीचा अर्थ - आतां म्हातारपणरूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्यानें ते चोहोंबाजूंनी व्यापले जातात.

निवृत्तीनंतर करायचे काय हा प्रश्‍न अनेकांना पडतो. काहीजण नोकरीत कंटाळलेले असतात. त्यामुळे निवृत्तीचा त्यांना आनंद वाटतो. पण प्रत्यक्षात निवृत्तीनंतर एक-दोन महिने बरे वाटते. त्यानंतर मात्र सुट्टी नकोशी वाटू लागते. काहीजणांना पुस्तके वाचनाचा छंद असतो. ते विविध पुस्तके वाचनात वेळ घालवतात. विविध छंदात मन रमवणे याशिवाय दुसरे पर्याय दिसत नाहीत. काहीजण निवृत्तीनंतर देवदर्शनासाठी जातात. विविध गोष्टीत मन रमविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मन रमत नसेल, तर मग मात्र मनात चिडचिडेपणा वाढतो. एकाकीपणानेही मनाची स्थिरता ढळते. घरात बसलेतर घर खायला उठते. फिरायला गेलेतर विविध विषयांच्या चर्चेने त्रास होतो. मनाचा हा त्रागा शांत करायला हवा. वृत्तपत्रातील बातम्या वाचूनही मनाला त्रास वाटू लागतो. जगातील विविध प्रश्‍नांनी मनास त्रास करून घेण्यापेक्षा विरंगुळा म्हणून वाचन करायला हवे. मनास प्रसन्न ठेवणारे साहित्यच वाचायला हवे. त्यातच मन रमवायला हवे. ज्ञानेश्‍वरी वाचन करून अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. आयुष्याच्या उतारवयात तरी इतरांना त्रास होणार नाही, असे वागायला हवे. आचरणात केलेला फरकही मनाला आनंद देतो. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यात स्वतःला आनंद मिळतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यानुसार दुसऱ्यांना आनंद देत राहावे. घरातील सर्वांना प्रेम दिले तर, उतारवयात हे सर्वही तुमच्यावर निश्‍चितच प्रेम करतील. काही वेळेला हे प्रेम मुलांना नकोसे वाटते. मनाला खटकते, पण म्हणून तुम्ही तुमचे प्रेम लपवू नये. प्रेमाने वागण्यात केलेला हा बदल आयुष्याच्या उतारवयात अनेक व्याधींपासून दूर ठेवतो. मन प्रसन्न ठेवता आले तर अनेक आजारापासून मुक्ती मिळते. कारण अनेक व्याधी ह्या मनातील रागातून उत्पन्न होतात. शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. यासाठी क्रोध, राग, द्वेष यापासून दूर राहून मन प्रसन्न ठेवण्यावर अधिक भर दिला तर, आरोग्यही उत्तम राहाते. पिढीतील अंतरामुळे नातवंडावर संस्कार करण्यात तुम्ही कमी पडत असाल. पण तरीही त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यात, त्यांच्या आनंदात रमण्यातच खरा आनंद आहे. विचारांची ही तफावत पाहून मनास त्रास करून घेऊ नये. आपण आपले आचरण चांगले ठेवले तर त्यांच्यावरही चांगले संस्कार होऊ शकतात. प्रेमाने जग जिंकता येते. सर्वावर प्रेम करून त्यांच्यावर विजय मिळवावा.

Friday, January 25, 2019

वाफसा




अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्‍यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेच ही मनास वाफसा येतो. सद्‌गुरू बिजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात. गुरूमंत्र वाया जाणार नाही, यासाठी भक्तांच्या मनाचा वाफसा तपासतात. तो यावर दृढ आहे की नाही, हे पाहतात. पण ही स्थितीही त्यांच्या आर्शिवादानेच येते.

वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।। 491 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वाफसा मिळाला, म्हणून श्री निवृत्तीनाथांस पेरण्याची इच्छा झाली.

जमिनीत वाफसा असेल, तर शेतात पेरणी होऊ शकते. दलदल किंवा कठीण जमिनीत पेरणी होऊ शकत नाही. धूळ पेरणी करतानाही जमीनीची योग्य मशागत झालेली असणे आवश्‍यक असते. बियाण्यांची पेरणी करताना जमिन पेरणी योग्य आहे का नाही याची पाहणी केली जाते. जमीन पेरणी योग्य नसेल तर, पेरणी केली जात नाही. पेरणी अयोग्य असणाऱ्या जमीनीत पेरणी केली तर त्यातून योग्य उत्पन्न येईल याची शाश्‍वती देता येत नाही. अशा जमीनीत बियाणे उगविण्याचीही शक्‍यता नसते. यासाठी केलेली पेरणी वाया जाणार नाही याची काळजी घेऊनच शेतकरी शेतात पेरणी करतो. सद्‌गुरूही अनुग्रह देण्यापूर्वी भक्ताची हीच स्थिती तपासतात. भक्त गुरूमंत्राच्या बीज पेरणीस योग्य आहे की नाही, त्यामध्ये ती पात्रता आहे की नाही. हे पाहतात. जर भक्त बीज पेरणी योग्य नसेल तर त्यास अनुग्रह प्राप्ती होत नाही. यासाठी भक्तांनी स्वतःचा विकास पेरणी योग्य करून घ्यायला हवा. याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मनात झालेली विषयांची दलदल दूर करायला हवी. वाईट विचार काढून टाकायला हवेत. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आवश्‍यक आचरण करायला हवे. रागाचा चढलेला पारा उतरवायला हवा. कामाचा मोह टाळायला हवा. मनाची स्थिती सुधारायला हवी. पण असे करूनही अनेकदा अनेकांना अनुग्रह प्राप्ती होत नाही. असे का होते? तर ही स्थिती म्हणजे वाफसा नव्हे. वाफसा येण्यासाठी आवश्‍यक असणारे हे घटक आहेत. या घटकांचे ऐक्‍य हवे. मन त्यावर नियंत्रित व्हायला हवे. वाफशाची स्थिती कायम रहायला हवी. यासाठी अवधान हवे. जागरूकता हवी. वाफसा आला आणि गेला असे नको. ती स्थिती नित्य राहायला हवी. त्यात सातत्य हवे. अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्‍यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेच ही मनास वाफसा येतो. सद्‌गुरू बिजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात. गुरूमंत्र वाया जाणार नाही, यासाठी भक्तांच्या मनाचा वाफसा तपासतात. तो यावर दृढ आहे की नाही, हे पाहतात. पण ही स्थितीही त्यांच्या आर्शिवादानेच येते. त्यांच्या सामर्थ्यामुळेच प्राप्त होते. पण भक्ताचे यासाठी अवधान असायला हवे. सैनिक नेहमी सावधान स्थितीत असतात. विश्रामातही ते सावध असतात. भक्तही असा असायला हवा. विश्रामातही सावध असायला हवा. सद्‌गुरू भक्तांच्या याच स्थितीची परीक्षा घेतात आणि यामध्ये जो पास होतो त्यास सद्‌गुरूंची कृपा होते.

स्मरण गणेशाचे (व्हिडिओ)


आत्मरूप गणेशु स्मरण।  सकळ विद्यांचे अधिकरण। 
तेचि वंदू श्री चरण।  श्रीगुरूंचे ।। 1।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - सर्व विद्यांचे आश्रयस्थान जें आत्मरूप गणेशाचे स्मरण, तेच श्री गुरूंचे श्री चरण होत त्यास नमस्कार  करू. 

अभ्यास






ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पाठ असतात. त्याचे अर्थ पाठ असतात. पण त्यावर विचार केला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होणार? आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओव्या पाठ असण्याची गरज नाही. त्याचे अर्थही पाठ असून नुसते उपयोग नाही. तर ती ओवी तुमच्याशी बोलायला हवी. ती ओवी अनुभवायला हवी. त्यांची प्रचिती यायला हवी. अनुभवातूनच ज्ञान प्राप्ती होते.


इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेंनि ब्रह्मत्वा येती ।
हे सांगतियाचि रीती । कळलें मज ।। 330।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - दृढनिश्‍चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले.

एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल, तर त्याचा अभ्यास हा करायला हवा. नुसती घोकमपट्टी, पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. अभ्यास म्हणजे त्या गोष्टीचा सर्वांगाने केलेला विचार आहे. परीक्षेत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर पाठ करून दिले. पैकीच्या पैकी मार्क मिळाले. पण तो विषय समजला नसेल तर त्यात काहीच अर्थ नाही. परीक्षेत मार्क जरूर मिळवावेत पण तो विषय सर्वार्थाने समजावून घेतलेला असावा. त्या विषयाच्या सर्व बाजू, त्याचे सर्व पैलू अभ्यासले जावेत. उदाहरण सांगायचे तर रासायनिक समिकरणांची पाठ करून उत्तरे बरोबर देता येतात. एच अधिक ओटू बरोबर एचओटू म्हणजे पाणी हे सांगता येते. पण ही रासायनिक प्रक्रिया नेमकी कशी झाली, ती कशी घडते, याचा सखोल विचार करायला हवा. तसे प्रश्‍न पडायला हवेत. मनाला अशा प्रश्‍नांची सवय लावायला हवी. प्रश्‍न पडू लागले की उत्तरे शोधण्याची सवय आपोआपच लागते. यासाठी अभ्यास करताना त्या विषया संदर्भात प्रश्‍न, शंका मनात उपस्थित व्हायला हव्यात. ते प्रश्‍न सोडविण्यासाठी मन पेटून उठायला हवे. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यामध्ये मन रमायला हवे. या सवयीमुळे परीक्षेत दिलेले प्रश्‍न सहज सोडविता येतात. त्याची भीती मनात राहात नाही. मनमोकळेपणे उत्तरे देता येतात. पाठांतराने प्रश्‍नाचे उत्तर अचूक लिहिले जाते खरे पण त्यावर विचार होत नाही. लहानपणी पाठांतराने चांगले मार्क मिळतात. पण विचार करण्याची कुवत त्यामध्ये उत्पन्न होत नाही. उच्चशिक्षण घेताना मग याचा तोटा होतो. वैचारिक पातळीतील कमकुवतपणा असल्याने तेथे आपण मागे पडतो. विचार करण्याची क्षमताच नसल्याने उत्तरे देता येत नाहीत. उत्तरेच सापडत नाहीत. यासाठी लहानपणापासून केवळ पाठांतर नको तर तो विषय सर्वांगाने समजून घेण्याची सवय लावायला हवी. अध्यात्मातही असेच आहे. ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पाठ असतात. त्याचे अर्थ पाठ असतात. पण त्यावर विचार केला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होणार? आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओव्या पाठ असण्याची गरज नाही. त्याचे अर्थही पाठ असून नुसते उपयोग नाही. तर ती ओवी तुमच्याशी बोलायला हवी. ती ओवी अनुभवायला हवी. त्यांची प्रचिती यायला हवी. अनुभवातूनच ज्ञान प्राप्ती होते. यासाठी ध्यान, साधना करायला हवी. तरच ज्ञानाची अनुभूती येईल. यासाठीच याचा अभ्यास करायला हवा. त्यावर सर्वांगाने विचार करायला हवा. पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. तो विषय समजून घेऊन ज्ञान संपादन करायला हवे.

Thursday, January 24, 2019

कृष्णार्जुनसंवादु



तो कृष्णार्जुनसंवादु। नागरीं बोली विशदु।
सांगोनि दाऊं प्रबंधु। वोवियेचा।। ।। अध्याय वा

ओवीचा अर्थ - ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कृष्णार्जुनाचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट सांगून दाखवू.

गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे. गुरू आणि शिष्य यांच्यात झालेला संवाद आहे. हा संवाद आपल्या आयुष्यातही मार्गदर्शन करणारा असा आहे. युद्ध न करण्याचा निर्णय अर्जुनाने रणभूमीवर घेतला. लढायची मानसिकता तो गमावून बसला. अशावेळी त्याला त्याचे कर्म, धर्म समजावून सांगण्याचे कर्तव्य श्रीकृष्णाने येथे केले. तसेच त्यांनी जीवनाचे सारच रणभूमीवर अर्जुनास सांगितले. युद्धापासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम श्रीकृष्णाने केली. जीवनाच्या युद्ध भूमीवर आपलीही अशीच अवस्था बऱ्याचदा होत असते. आपणही असेच अनेकदा वैतागून जात असतो. अर्जुनाने जसे गांडीव खाली ठेवून नकारात्मक विचार सुरु केला. तसाच विचार आपणही जीवनात बऱ्याचदा करत असतो. अशा अवस्थेमुळे आपणास अनेकदा अपयशही पदरी पडते. पण अशा अवस्थेतून बाहेर पडून यशस्वी कसे व्हायचे, हा मार्ग आपणास गीता व ज्ञानेश्वरी वाचनातून निश्‍चितच मिळतो. यासाठीच गीता, ज्ञानेश्‍वरी ही आपणासाठी मार्गदर्शक आहे. जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर गीतेचा अभ्यास हा करायलाच हवा. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे. गीता संस्कृतमध्ये आहे, पण सर्वसामान्य माणसाला संस्कृत येतेच असे नाही. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसाच्या उद्धारासाठी ती सोप्या भाषेत सांगितली. उदाहरण देऊन सांगितले की एखादी गोष्ट समजालया सोपी जाते. ती पटकन लक्षात राहते. म्हणून अनेक उदाहरणे देऊन संत ज्ञानेश्‍वरांनी गीतेचे सार पटवून सांगितले. हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे, हे वारंवार सांगण्यासही माऊली विसरली नाही. गुरु आणि शिष्य हे नाते कसे श्रेष्ठ आहे हे सांगताना कृष्णाने हे गुह्य आपल्या प्रिय राधेसही सांगितले नाही. केवळ आपला शिष्य अर्जुनाला हे गुह्य सांगितले. गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते किती श्रेष्ठ असते हे यावरून स्पष्ट होते. गुरू शिष्याला सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करतो. पण त्याबरोबरच तो जीवनाचे मर्म सांगतो. शिष्याच्या मनातील शंका दूर करण्यासाठी, त्याच्या मनातील जळमटे दूर करण्यासाठी गुरूची धडपड असते. जीवनाचा खरा अर्थ सांगून त्याला ज्ञानी करणे व त्याला आपल्या पदांवर बसवणे हे गुरूचे मुख्य ध्येय असते. आपल्याप्रमाणे त्यालाही आत्मज्ञानी करणे हेच खऱ्या गुरुचे लक्षण आहे. यासाठी गुरू आणि शिष्यात वारंवार संवाद होणे गरजेचे असते. हा संवाद स्मरणातूनही होऊ शकतो. आपली योग्यता असेल तर स्मरणातही गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांची समाधी ही संजीवन आहे. ते समाधीस्थ अवस्थेतही खऱ्या शिष्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने शिष्याला धीर येतो. कृष्ण आणि अर्जुनातील हा संवाद श्री ज्ञानेश्‍वरांनी उघड करून जगासमोर मांडला आहे. हा संवाद सर्वांसाठी मार्गदर्शन आहे.

Wednesday, January 23, 2019

मठ

 


मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत.  


परि आवश्‍यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।। 179 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - परंतु अर्जुना, असलें स्थान जरूर शोधून ठेवावें. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावें.

सद्‌गुरू कोणत्याही साधनाने लाभत नाहीत. पण जे निष्कामभावानें, साम्यबुद्धीने सद्‌गुरूंची प्रार्थना करतात. आत्मज्ञान लाभावे अशी इच्छा करतात, त्यांना सद्‌गुरूंच्या इच्छेने या आत्मज्ञानाचा लाभ होतो. सध्या वाढत्या शहरीकरणात साधना, ध्यान-धारणा करण्यासाठी योग्य ठिकाणे सापडणे कठीण झाले आहे. पण ही ठिकाणे शोधली तर सहज सापडतात. पुणे शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणीही अशी ठिकाणे आहेत. जंगली महाराज रोड हा सदैव गजबजलेला. गोंगाट असणारा रस्ता. पण या रस्त्यावरच जंगली महाराजांचा मठ आहे. रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट असला तरी मठामध्ये शांतता आहे. झाडीमध्ये असणारे हे ठिकाण गारवा देणारे, मनाला शितलता, प्रसन्नता देणारे असे आहे. शेजारीच पाताळेश्‍वर मंदीर आहे. या दगडी मंदीरात साधनेसाठी उत्तम वातावरण आहे. धकाधकीच्या या जीवनात अशी ठिकाणे निश्‍चितच मनाला प्रसन्नता देणारी आहेत. मठ किंवा शिवालय हे अध्यात्माची पाठशालाच आहे. येथे आत्मज्ञानाच्या विकासासाठी आवश्‍यक वातावरण असते. मठामध्ये समाधी अवस्थेत सद्‌गुरुंचे नित्य वास्तव्य असते. यासाठी अशा ठिकाणी नित्य साधना करावी. कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती. गावांमध्येही मंदीरामध्ये तंटे, वादविवाद सोडविले जात होते. अशी ठिकाणे ही मने जोडणारी असतात. पण बदलत्या संस्कृतीमध्ये ही ठिकाणे मने जोडण्याऐवजी तोडण्याची ठिकाणे झाली आहेत. धर्माच्या नावावर, मंदीराच्या नावावर मने भडकवली जात आहेत. ज्या ठिकाणे मने जोडण्याचे काम चालायचे तेथे मने दुखवायची कृत्ये केली जात आहेत. अशाने अनेक मंदीरे ओस पडत आहेत. मंदीरांचा उद्देशच नष्ट होत चालला आहे. यामुळे त्या ठिकाणची ओढ कमी होत आहे. मंदीर दिसले तरी दोन मिनिटे थांबून नमस्कार केला जायचा. पण आता थांबायलाही वेळ नाही. मग नमस्कार कधी करणार अशी स्थिती झाली आहे. मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत. मनाला प्रसन्नता देणारी ही ठिकाणे आत्मज्ञानाच्या प्रगतीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतात.


परि आवश्‍यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।। 179 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - परंतु अर्जुना, असलें स्थान जरूर शोधून ठेवावें. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावें.

सद्‌गुरू कोणत्याही साधनाने लाभत नाहीत. पण जे निष्कामभावानें, साम्यबुद्धीने सद्‌गुरूंची प्रार्थना करतात. आत्मज्ञान लाभावे अशी इच्छा करतात, त्यांना सद्‌गुरूंच्या इच्छेने या आत्मज्ञानाचा लाभ होतो. सध्या वाढत्या शहरीकरणात साधना, ध्यान-धारणा करण्यासाठी योग्य ठिकाणे सापडणे कठीण झाले आहे. पण ही ठिकाणे शोधली तर सहज सापडतात. पुणे शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणीही अशी ठिकाणे आहेत. जंगली महाराज रोड हा सदैव गजबजलेला. गोंगाट असणारा रस्ता. पण या रस्त्यावरच जंगली महाराजांचा मठ आहे. रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट असला तरी मठामध्ये शांतता आहे. झाडीमध्ये असणारे हे ठिकाण गारवा देणारे, मनाला शितलता, प्रसन्नता देणारे असे आहे. शेजारीच पाताळेश्‍वर मंदीर आहे. या दगडी मंदीरात साधनेसाठी उत्तम वातावरण आहे. धकाधकीच्या या जीवनात अशी ठिकाणे निश्‍चितच मनाला प्रसन्नता देणारी आहेत. मठ किंवा शिवालय हे अध्यात्माची पाठशालाच आहे. येथे आत्मज्ञानाच्या विकासासाठी आवश्‍यक वातावरण असते. मठामध्ये समाधी अवस्थेत सद्‌गुरुंचे नित्य वास्तव्य असते. यासाठी अशा ठिकाणी नित्य साधना करावी. कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती. गावांमध्येही मंदीरामध्ये तंटे, वादविवाद सोडविले जात होते. अशी ठिकाणे ही मने जोडणारी असतात. पण बदलत्या संस्कृतीमध्ये ही ठिकाणे मने जोडण्याऐवजी तोडण्याची ठिकाणे झाली आहेत. धर्माच्या नावावर, मंदीराच्या नावावर मने भडकवली जात आहेत. ज्या ठिकाणे मने जोडण्याचे काम चालायचे तेथे मने दुखवायची कृत्ये केली जात आहेत. अशाने अनेक मंदीरे ओस पडत आहेत. मंदीरांचा उद्देशच नष्ट होत चालला आहे. यामुळे त्या ठिकाणची ओढ कमी होत आहे. मंदीर दिसले तरी दोन मिनिटे थांबून नमस्कार केला जायचा. पण आता थांबायलाही वेळ नाही. मग नमस्कार कधी करणार अशी स्थिती झाली आहे. मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत. मनाला प्रसन्नता देणारी ही ठिकाणे आत्मज्ञानाच्या प्रगतीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतात.

Tuesday, January 22, 2019

विज्ञानात्मक भाव




विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या हव्यासापोटी आपण विविध विषयांच्या मागे धावत आहोत. जगात वावरायचे तर याची गरज झाली आहे. पण ही गरज वाईट परिणाम घडवत असेल तर त्याच्या मर्यादा ओलांडता कामा नये
 
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो ।
लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ।। 88 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - अनुभवाला येणारें जें हें दृश्‍य जगत्‌ त्याचा विचार करतां, तें त्याच्या दृष्टीनें मिथ्या ठरले व मग आपण कोण आहे असें जेंव्हा तो पाहावयास लागला तेंव्हा ज्ञान तेंच आपण आहोंत असें त्यास कळलें.

विज्ञानाच्या प्रगतीने अनेक अंधश्रद्धा दूर झाल्या. खरे तर विज्ञानात्मक भावानेच अध्यात्माची प्रगती होते. हा पंचमहाभूताचा देह आहे. हा देह विविध रासायनिक मुलद्वव्याने तयार झालेला आहे. दात, हाडामध्ये कॅल्शियम आहे. कार्बन आणि त्यांच्या संयुगामुळे शरीराची कातडी तयार झाली आहे. देहातील प्रत्येक घटकांत ही मुलद्रव्ये आहेत. विविध रसायनांनी युक्त असा या देहात जेव्हा आत्मा येतो. तेव्हा त्याला जिवंत स्वरूप प्राप्त होते. आत्मा देहातून गेल्यानंतर हा केवळ रासायनिक घटकांचा सांगाडा आहे. आत्मा देहात येतो आणि जातो. पण प्रत्यक्षात तो जन्मतही नाही साहजिकच तो मृतही होत नाही. विज्ञानामुळे हे सर्व स्पष्ट होते. या गोष्टी समजण्यासाठी विज्ञानात्मक दृष्टी असण्याची गरज आहे. कोणतेही ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग हा योग्य गोष्टींसाठी व्हायला हवा. विज्ञानाने अणु-रेणुंचा शोध लागला. पण त्यापासून बॉंम्ब तयार करून जनतेमध्ये अशांती निर्माण केली जात असेल तर ते ज्ञान योग्य आहे का? कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. चांगली आणि वाईट. त्यातील कोणती निवडायची हे आपण ठरवायचे असते. विज्ञानाचा उपयोग चांगल्यासाठी करायला हवा. अध्यात्मातील प्रत्येक गोष्ट ही विज्ञानावर आधारलेली आहे. विविध विषयांची शास्त्रे आहेत. भौतिक, रसायन, जैविक असे विविध विषयांची ही शास्त्रे आहेत. या शास्त्राचा उपयोग आपण जीवनात करतो. शास्त्राला मर्यादा आहेत. ती मर्यादा ओलांडली तर ते शास्त्र फायदेशीर न ठरता नुकसानकारक ठरते. याचा विचार करून त्या शास्त्राचा उपयोग करायला हवा. इंधनासाठी लाकडाचा उपयोग होतो. म्हणून सरसकट वृक्षतोड केली तर चालणार आहे का? नाही ना? त्याचेच दुष्परिणाम आपण सध्या भोगतो आहोत. प्रदूषणाची पातळी आपण ओलांडली आहे. जागतिक तापमानवाढीचे चटके आपण सोसत आहोत. विज्ञानाच्या मर्यादा ओलांडल्याचाच हा परिणाम आहे. विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या हव्यासापोटी आपण विविध विषयांच्या मागे धावत आहोत. जगात वावरायचे तर याची गरज झाली आहे. पण ही गरज वाईट परिणाम घडवत असेल तर त्याच्या मर्यादा ओलांडता कामा नये. विषयांच्या ज्ञानाने आत्मज्ञान जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञान हे स्वतःचे ज्ञान आहे. ते म्हणजेच आपण आहोत. हे जाणून घ्यायला हवे.

Sunday, January 20, 2019

आत्मज्ञानी सूर्य









 
सृष्टीचा शोध घेण्यासाठी जगातील सर्वांत मोठा संशोधन प्रकल्प राबविण्यात आल्या. एक भला मोठा स्फोट घडविण्यात आला. यामध्ये शोधण्यात आलेल्या कणाला शेवटी गॉडपार्टीकल असे संबोधले गेले. सूर्यामध्ये अगणित स्फोट घडत असतात. असाच एक स्फोट या प्रयोगात घडविण्यात आला. सूर्याच्या या शक्तीचा शोध या संशोधकांना घ्यायचा होता. विश्वाचे आर्त जाणण्यासाठी त्यांना सूर्याच्या या शक्तीचा अभ्यास करावा लागला. या शक्तीचा आधार घ्यावा लागला तसे आत्मज्ञानाचा शोध घेतानाही आत्मज्ञानी सूर्याचे, आत्मज्ञानी सद्‌गुरूंचे मार्गदर्शन घेणेच योग्य ठरते.


जे जया वाटा सूर्य जाये । तेउतें तेजाचें विश्व होये ।
तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणउनि ।।86।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - कारण की, सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जें जें प्राप्त होते, ते त्यांचेच स्वरुप आहे.

विश्वाच्या पोकळीचा अंत अद्याप सापडलेला नाही. सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे हे ग्रह, तारका या व्यतिरिक्त या विश्वात आणखी काय काय दडलेले आहे. याचाही शोध अद्याप लागलेला नाही. जीव सृष्टी फक्त पृथ्वीवरच अस्तित्वात आहे. इतर ग्रहावर आहे का नाही याचा शोध अद्याप सुरू आहे. साधक हा सुद्धा एक संशोधकच असतो. आत्मज्ञान प्राप्ती हे त्याचे ध्येय आहे. यासाठी आवश्‍यक गोष्टींचा शोध तो घेतो. यापूर्वी यावर कोणी कोणी संशोधन केले आहे. कोण यामध्ये यशस्वी झाले आहे. अशा आत्मज्ञानी सद्‌गुरूंचा शोध तो प्रथम घेतो. त्यानंतर त्यांनी केलेल्या प्रयोगाच्या मार्गाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ही पी. एचडी सुरू असते. येथे पी. एचडी. विद्यापीठ देत नाही तर स्वतः सद्‌गुरूच देतात. गुरूंच्या आर्शिवादा शिवाय ही आत्मज्ञानाची पी. एचडी मिळत नाही. पण गुरू फक्त त्याला त्याची वाट दाखवतात. मार्ग सांगतात. उपदेश करतात. बाकीचा सर्व प्रयोग हा साधकालाच करायचा असतो. सद्‌गुरूंनीं याच मार्गाने आत्मज्ञानाची पी. एचडी. मिळवलेली आहे. यापूर्वी हा शोध त्यांनी लावलेला आहे. साधक फक्त पुन्हा हा शोध स्वतःसाठी करत असतो. विज्ञानातील संशोधकही सूर्याच्या मालिकांचा शोध घेत आहेत. सूर्याचा जन्म केव्हा झाला असेल याचे अनुमान ते लावतात. काही गणिती तत्त्वज्ञान ते मांडतात. पण त्यांच्या या संशोधनाला मर्यादा राहिल्या आहेत. ठराविक मर्यादेच्या पलीकडे ते जाऊ शकलेले नाहीत. त्याच्यापलीकडे काय आहे याचा शोध घेण्यात त्यांना अद्यापही यश आलेले नाही. या कारणानेच ते सूर्याच्या या शक्तीचे उपासक होतात. तेथे ते नतमस्तक होतात. शेवटी एक शक्ती आहे. त्यालाच देवस्वरूप देण्यात आले आहे. या सृष्टीचा शोध घेण्यासाठी काही कणांचा शोध घेण्याचा जगातील सर्वांत मोठा संशोधन प्रकल्प राबविण्यात आल्या. एक भला मोठा स्फोट घडविण्यात आला. यामध्ये शोधण्यात आलेल्या कणाला शेवटी गॉडपार्टीकल असे संबोधले गेले. हे याचमुळे असावे. सूर्यामध्ये अगणित स्फोट घडत असतात. असाच एक स्फोट या प्रयोगात घडविण्यात आला. सूर्याच्या या शक्तीचा शोध या संशोधकांना घ्यायचा होता. विश्वाचे आर्त जाणण्यासाठी त्यांना सूर्याच्या या शक्तीचा अभ्यास करावा लागला. या शक्तीचा आधार घ्यावा लागला तसे आत्मज्ञानाचा शोध घेतानाही आत्मज्ञानी सूर्याचे, आत्मज्ञानी सद्‌गुरूंचे मार्गदर्शन घेणेच योग्य ठरते.