Sunday, December 15, 2019

आळसाचाच आळस करायला शिका





आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे

मनशुद्धीचां मार्गी। जैं विजयी व्हावे वेगीं ।।
तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ।। 139 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - मनाची शुद्धता होण्याच्या मार्गांत आपण लवकरच विजयी व्हावें असे वाटत असेल, तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करूं नये.

एखाद्या गोष्टीत विजयी व्हावे अशी जर इच्छा असेल तर ती गोष्ट मनापासून करायला हवी. ती करताना आळस करून चालणार नाही. नाहीतर विजय हस्तगत करता येणार नाही. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळसामुळे माणूस संपतो. राज्ये बरखास्त होतात. सीमेवर पहारा देणारा सैनिक जर आळशी असेल तर राज्य कसे टिकेल? परीक्षेच्या काळात विद्यार्थ्याने आळस केला तर काय होईल? आळस केल्यावर गुणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल? यासाठी कामात आळस हा असताच कामा नये. आळस करून विजयाची अपेक्षा ठेवणे चूक आहे. विजयी व्हायचे असेल तर प्रथम आळस हा झटकायलाच हवा. तलवार जर तशीच ठेवली तर तिला गंज चढतो. तिची धार कमी होते. भाजी चिरायच्या विळतीचेही तसेच आहे. वापर नाही केला तर तिचीही धार कमी होते. गंजामुळे धार जाते. जीवनाचेही तसेच आहे. आळस, कंटाळा केला तर त्यालाही गंज चढतो. जीवनाची धार कमी होते. धार येण्यासाठी नियमितपणा हवा. रोजच्या वापरात असणाऱ्या विळीला चांगली धार असते. भाज्या कापून कापून तिचा धारधारपणा वाढतो. दररोज फरशी पुसली तर तिची जशी चकाकी वाढते तसे जीवनात कंटाळा घालवला तर नेहमीच ताचेतवाने राहता येते. मन प्रसन्न ठेवता येते. आळस हा मनातच असतो. तो घालविण्यासाठी मनाची शुद्धता गरजेची आहे. आध्यात्मिक वाचनातून, पारायणातून मनाला शुद्धता येते. या शुद्धतेनेच धार चढते. कर्माने त्रास होतो म्हणून त्याचा कंटाळा करणे योग्य नाही. नोकरीत त्रास होतो म्हणून नोकरी सोडून कसे चालेल? हा त्रास सोसायलाच हवा. आपण याकडे आळसाने पाहिले तर आपलेच नुकसान होणार आहे. आळस झटकायला हवा. आळस माणसाला संपवतो. तो कधीही संपत नाही. यासाठी आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Saturday, December 14, 2019

खरा धर्म


दुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते.
- राजेंद्र घोरपडे


पैं वासरूवाचा भोंकसा । गाईपुढे ठेवू जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ।। 386 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या दुभत्या गायीच्या पुढे मेलेल्या वासराचा भोत ठेवून तिच्या कासेंत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात.

हुशार मंडळी ही एखादे आमिष दाखवून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असतात. युद्धात शत्रूची चाल जाणून घेण्यासाठी हेरांना आमिषे देऊन बातम्या काढून घेतल्या जातात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही लाच देऊन फितूर केले जाते; पण हे कार्य सर्वांनाच साधता येते, असे नाही. ही एक कला आहे. बोलण्याची ही पद्धत अवगत करून घ्यावी लागते. तसे अशी कामे करणारी माणसे ही वेगळ्याच पद्धतीची असतात. सर्वांनाच हे जमत नाही. काही माणसे ही सरळ मार्गी असतात. काही माणसे वाकड्या चालीची असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सरळ मार्गाने सर्वच गोष्टी साध्य करता येतात, असे नाही. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी वाकडे मार्ग सुद्धा स्वीकारावे लागतातच. लोण्याच्या गोळ्यातून लोणी काढताना बोट सरळ ठेवून चालत  नाही. ते वाकडे करावेच लागते. सरळ बोट ठेवून लोणी काढण्याचा प्रयत्न असफलच होणार. बोट वाकडे केले तरच लोणी मिळू शकेल. यासाठीच वाकड्या वाटांचा वापर योग्य कामासाठी करायला हवा. तसे सर्वच वाकडे मार्ग योग्य असतात, असे नाही; पण एखादे चांगले काम यशस्वी करण्यासाठी वाकड्या वाटेचा अवलंब केला, तर तो अधर्म होत नाही. खरे तर प्राप्त परिस्थितीत जे आवश्‍यक कर्म केले जाते यालाच धर्म असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीसाठी एखादे वाईट कर्म करावे लागले तर तो अधर्म होत नाही. माणसाने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. हाच त्याचा धर्म आहे. एकदा एक शाकाहारी मनुष्य जंगलात वाट चुकला. त्याला रस्ता सापडेना. तो भटकत राहिला. खायला काहीही मिळाले नाही. शेवटी त्याला एक झोपडी दिसली एक म्हातारी त्यामध्ये राहात होती. भुकेने व्याकुळ झालेला हा शाकाहारी मनुष्य या म्हातारीच्या झोपडीत गेला आणि त्याने ह्या म्हातारीकडे भोजनासाठी याचना केली. ही म्हातारी कोंबड्या पाळत होती व कोंबड्यांची अंडी खाऊन ती जीवन जगत होती. त्या मनुष्याला अंडी देण्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हते. वेळ रात्रीची होती, त्यामुळे शेतात जाऊन भाजी तोडून आणणेही शक्‍य नव्हते. भुकेने व्याकुळ झालेल्या, थकलेल्या मनुष्यास काही तरी खाणे आवश्‍यक होते. उपाशीपोटी राहून शरीराला त्रास देणे योग्य नव्हते, पण या परिस्थितीत उपाशी तरी किती दिवस राहणार? अशा परिस्थितीत त्याने त्याचे शाकाहारी व्रत तोडणे आवश्‍यक आहे. यामुळे त्याचा धर्म भ्रष्ट होत नाही. प्राप्त परिस्थितीत त्याने भोजन करणे हे महत्त्वाचे आहे. ते शाकाहारी आहे, की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही. स्वतःचे जीवन संपविण्याऐवजी त्याने अंडी खाऊन स्वतःचे प्राण वाचविणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ही हिंसा नाही. परिस्थितीनुसार स्वीकारलेला तो मार्ग आहे. पर्याय आहे. दुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते. तिला त्या वासरूची काळजी वाटते. त्याला पाजविणे, त्याची भूक शमविणे यातच त्या गायीला आनंद वाटतो. हिंदू धर्मात गायीला देवता माणले जाते. कारण त्या गायीपासून घेण्यासारखे काही गुण आहेत. ते दैवीगुण मानव जातीने आत्मसात करावेत, हा त्या मागचा उद्देश आहे; पण तसे होत नाही. दयेचा, मायेचा गुण हा जनावरांध्ये आहे, पण माणसाला त्याची दया, माया वाटत नाही. जनावरांवर प्रेम केले तर ती सुद्धा कठीण प्रसंगी आधार देतात. मानवता धर्म मनुष्याने पाळायला हवा. प्रेमाने जग जिंकता येते. यासाठी दुसऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला हवा. प्रेमाने दुखावलेले अनेक जण राग विसरून जाऊ शकतात. मनुष्य मात्र काही विचित्र नियमात अडकून स्वतःच त्रागा करत बसतो. हे योग्य नाही. खरा धर्म माणसाने ओळखायला हवा. अहिंसेचा खरा धर्म ओळखायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Friday, December 13, 2019

धनलोभी


पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला की मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. 
- राजेंद्र घोरपडे

ऐसेनि धना विश्‍वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
दिठी पडे तया । उरों नेदी ।। 351 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - अशा रितीने विश्‍वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याला मी शिल्लक ठेवणार नाही.

पैसा हा सध्याच्या नव्या युगाची अत्यावश्‍यक गोष्ट आहे. पैसा असेल तर सर्व काही सुलभ होते. पैशाशिवाय आज माणसाला काहीच किंमत नाही. यामुळे प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे. या धनाच्या लोभातूनच अनेक प्रश्‍न उत्पन्न होत आहेत. खून, मारामाऱ्या तर आजकाल नेहमीच्याच घटना झाल्या आहेत. तसे पूर्वीच्या काळीही ह्या समस्या होत्या. राजेशाहीत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी, वाढविण्यासाठी लढाया होत होत्या. सारा कोणी वसूल करायचा, यातून वाद होत होते. पैशासाठीच ह्या लढाया झाल्या. सध्या तर कोणताही कामधंदा न करणारे गुंड लोकांकडून हप्ते वसूल करून स्वतःचे गुंडगिरीचे साम्राज्य प्रस्थापित करत आहेत. पैशाच्या लोभानेच हे साम्राज्य उभे राहात आहे. चंगळवादातून गुन्हेगारी वाढत आहे. यामध्ये अशिक्षित आहेत असे नाही, तर सुशिक्षितांचीच संख्या अधिक आहे. अनेक शिकली सवरलेली माणसेच हे काम करत आहेत. राजकीय नेते तर ही माया जमविण्यासाठी रोज नवनव्या युक्‍त्या शोधतात. त्याचा अवलंब करतात. योजना राबविण्यापेक्षा त्यातून किती माया आपणास जमा करता येते, यावरच त्यांचा भर अधिक असतो. अशा योजनांसाठी ते दिल्ली वाऱ्या, मंत्रालयाचे खेटे मारतात. योजनेचा पैसा लाटण्यातच त्यांना अधिक रस वाटतो. पैसा कमविण्यात मठ, मंदिरेही मागे नाहीत. अशाने अध्यात्माचा खरा अर्थच नष्ट झाला आहे. अनेक साधूंनी वैराग्याच्या नावाखाली भली मोठी माया जमविलेल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वाधिक पैसा कमविणारे देवस्थान सर्वाधिक श्रेष्ठ समजले जाते. हा बदललेल्या समाजाचा आरसा आहे. उलट अशा पद्धतीने अध्यात्मातही बदल करायला हवेत, असे तत्त्वज्ञानही ही मंडळी सांगत आहेत. पैसा हेच वर्चस्व आहे, असा ग्रह त्यांचा झाला आहे. पैशाने
सारे जग जिंकता येते, असे त्यांना वाटते; पण समाधान जिंकता येत नाही, हे परखड सत्य आहे. पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला की मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Wednesday, December 11, 2019

अती तेथे माती


मानवाचा श्‍वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे, याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विंष ।। 221 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, जगण्याला कारण जें अन्न, तें खात असतांना वर्णन करून वाजवीपेक्षां जास्त खाल्लें असतां, तें अन्न विषासारखें मारक होते.

कोणतीही गोष्ट अती केली की त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. जेवण सुद्धा प्रमाणातच जेवायला हवे. अन्यथा अपचन होते. अती अभ्यासामुळे परीक्षेत नापास झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पिकांना रासायनिक खत अधिक दिल्यास पिके जळून जातात. पाणी अधिक दिल्यास पिकांची वाढ खुंटते. यासाठी कोणतीही गोष्ट प्रमाणातच असायला हवी. प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण हे आहेतच. निसर्गाची ती देणगीच आहे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा व्हायला नको. निसर्गाचे नियम हे तोडता येत नाहीत. निसर्गापुढे मनुष्य काहीही करू शकत नाही. शोध कितीही लागले, प्रगती कितीही केली तरी निसर्गाच्या शक्तीशी वैर करून चालत नाही. त्या शक्तीचा योग्य उपयोग करून घ्यायला शिकले पाहिजे. पाऊस पडतो, पण या पडणाऱ्या पावसाचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. कधी पाऊस अधिक पडतो, तर कधी पडतच नाही, पण पडणाऱ्या पावसाचा थेंब अन्‌ थेंब हा मातीत जिरवायला हवा. तो साठवता यायला हवा. नैसर्गिक पावसावरच आपले जीवन अवलंबून आहे. तो ठेवा जपायला हवा. पावसाचे प्रमाण कमी  - अधीक होत आहे. याची कारणे शोधायला हवीत. तेथील वृक्षसंपदा जपायला हवी. जगाचे तापमान वाढत आहे. ते का वाढत आहे,या मागची कारणे शोधायला हवीत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण वाढत आहे. ते रोखायला हवे. निसर्गाच्या नियमांचा आपल्या जीवनात लाभ उठवता यायला हवा. निसर्गाच्या प्रकोपालाही मानवी चुका तितक्‍याच कारणीभूत आहेत, हे विसरता कामा नये. मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्‍वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे, याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधना करायला हवी.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, December 10, 2019

आध्यात्मिक तेज

वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी हृदयाचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे. ते वाढले तर हृदयविकाराचा झटका बसू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते.
- राजेंद्र घोरपडे

ऐसें ईश्‍वराकडे निज । धावें आपसया सहज ।
तया नावं तेज । आध्यात्मिक तें ।। 189 ।। अध्यात्म 16 वा

ओवीचा अर्थ - अशा प्रकारे परमेश्‍वराकडे अंतःकरण सहज आपोआप धांव घेते, त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात.

जपानमध्ये त्सुनामी आली. ही दृश्‍ये पाहताना निसर्गाचा कोप काय असतो, हे स्पष्ट दिसते. अशा प्रसंगामुळे आपणास देवाची आठवण जरूर होते. ठेच लागल्यावर आईची आठवण होते, तोंडातून अगदी सहजपणे आई गं.. असे शब्द बाहेर पडतात. एकंदरीत, संकटाच्या काळात देवाची आठवण होते. इतर वेळी देवाची आठवण होत नाही. भीतीमुळे आपण देवाकडे वळतो. आधाराची गरज वाटते, पण प्रत्यक्षात अध्यात्मात असे काही नाही. नित्य देवाचे स्मरण करावे. आनंदी राहावे. विधिलिखित आहे ते टाळता येत नाही. घडणारे घडतच राहणार. प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे राहता येईल व दुसऱ्यांना कसे आनंदी ठेवता येईल, हेच महत्त्वाचे आहे. नव्या पिढीमध्ये देवाचा ओढा फारसा दिसत नाही. पूर्वीच्या काळी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाची स्तोत्रे म्हटली जायची. संध्याकाळची सुरवातही देवाच्या स्मरणाने व्हायची, पण आताच्या काळात असे फारसे आढळत नाही. हे संस्कार आताच्या पिढीत नाहीतच. फक्त संकटे आली की मगच देवाचे स्मरण होते. इतर वेळी नुसता दिखावा केला जातो. एवढेच काय, देवधर्म मानणाऱ्या व्यक्तीला वेळेचा दुरपयोग करणारा मूर्ख असे समजले जाते. बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला, हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग अधिक आहे. यानुसार माणसालाही धावावे लागत आहे. पूर्वी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या आता ताशी 100 ते 120 किलो मीटर वेगाने धावत आहेत. वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी हृदयाचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे. ते वाढले तर हृदयविकाराचा झटका बसू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्‍वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ लागते. हे जे सहजपणे देवाकडे ओढणे, धावणे आहे त्यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Saturday, December 7, 2019

मौन


मौनाचे अनेक फायदे आहेत, पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्व काही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो.

मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तात्री कें बांधों हाव ।
दिससी तेतुली भाव । भजों काई ।। 15 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - महाराज, मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नांव आहे. असे असल्याकारणानें मी स्तुति करण्याची उत्कृट इच्छा कोठें बाळगू ? जें तुझें स्वरूप मला दृश्‍यत्त्वेकरून दिसत आहे. तें सर्व मिथ्या आहे तर मग मी भजन कशाचे करावें ?

पाटगावचे मौनी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. ते नेहमी मौन धारण करून असत. फक्त समर्थ रामदास स्वामी यांच्याशीच ते संभाषण करत. त्यांच्यासमोरच ते हे मौन व्रत सोडत. अशा या महान गुरूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना 1676 मध्ये अनुग्रह दिला. कर्नाटक दौऱ्यांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अनुग्रहाचा लाभ झाला. गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी मोठे भाग्य लागते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पाटगावचे मौनी महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगाचे वर्णन बखरीमध्ये आढळते, पण मौनी महाराजांच्या विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते कोणत्या जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे होते, याचीही माहिती नाही. त्यांचे गुरू कोण? याचेही पुरावे उपलब्ध नाहीत. प्रसिद्धीपराडमुख असणारे संतच महान होतात. माहिती उपलब्ध नसणारे, असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचा भक्त परिवार आजही मोठा आहे. त्यांच्या महान कार्यानेच, भक्तांना अनुभव देण्याच्या सामर्थामुळेच ते महान झाले आहेत. समाधिस्थ झाले तरीही ते आपल्या भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची प्रगती साधत राहतात. अनुभूतीतून भौतिक, आध्यात्मिक प्रगती साधतात. यासाठीच त्यांची समाधी, मंदिरे ही संजीवन समजली जातात. सध्याच्या युगात मौन व्रत पाळणारे भेटणेच अशक्‍य आहे. हं, पण संसदेत मौनी खासदार म्हणून ओळखणारे अनेक जण आहेत. विशेष म्हणजे हे मौनी खासदार प्रत्येक निवडणुकीत निवडून येतात. 30-40 वर्षे तरी सलग सत्ता त्यांच्याच हातात असते. त्यांच्यावर मौनी खासदार म्हणून टीकाही होते, पण तरीही ते निवडून येतात. लोकमत त्यांच्या बाजूने असते. हे कसे? यावर संशोधन होणे गरजेचे आहे. काय खरंच त्यांना मौनाचा फायदा होतो का? कारण सध्या दंगेखोर नेत्यांपेक्षा असले मौनी नेतेच परवडले, असे जनतेला म्हणायचे तर नाही ना? सतत त्रस्त करणाऱ्या नेत्यांना जनता धडा शिकवते. ते फार काळ टिकत नाहीत. पण न बोलता कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे जनता उभी राहाते. हेच यातून दिसते. सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्‍वासने देणारे नेत सत्तेत येऊन काहीच करत नाहीत. सत्ता मिळाल्यानंतर ती उपभोगण्याकडेच त्यांचा कल असतो. अशा सत्ताधिशांची सत्ता फारकाळ टिकत नाही. चिरंतन सत्ता टिकण्यासाठी आपण काय केले? याची वाच्यता न करणे हेच योग्य आहे. याचा फायदा निश्‍चितच होतो. स्वकिर्ती कानी न ऐकावी । स्वकिर्ती मुखे न बोलावी । हाच खरा नियम आहे.यासाठीच मौनाचे महत्त्व आहे. समाजकार्य करत राहायचे. पण त्याचा डांगोरा पिटाळायचा नाही. यातच खरा विकास दडला आहे.
मौनाचे अनेक फायदे आहेत, पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्व काही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो. घरातील वादाच्या प्रसंगी,भांडण तंट्यामध्ये मौन धारण केल्यास हे वाद निवळू शकतात. मौनामुळे सहनशीलता येते. वयोवृद्ध, ज्येष्ठांना घरात उगाचच बडबड करून इतरांना त्रास देण्याची सवय असते. तसे ते मुद्दाम करत नसतात. ही त्यांची सवयच असते. याचा त्रास इतरांना होतो. हे त्यांच्या कधीही लक्षात येत नाही. तसे ही गोष्ट प्रत्येक कुटुंबात आढळतेच. यावरून वाद हे होतच असतात. ही प्रत्येक कुटुंबातील समस्या आहे. वयोवृद्धांच्या अशा वागण्यामुळेच वृद्धाश्रमांची गरज वाढत चालली आहे. शांत बसणे त्यांना कधी जमतच नाही. तारुण्यातही इतका उत्साह त्यांनी कधी दाखवलेला नसतो, पण म्हातारपणी त्यांना कामाचा मोठा उत्साह असतो. अशा गोष्टींचा कुटुंबातील घटकांना त्रास होतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी अध्यात्मातील या मौनव्रताचा अवलंब करावा, असे त्यांना वाटत नाही. आध्यात्मिक वाचन जरूर करतात, पण मौन व्रताचे पालन ते कधीही करत नाहीत किंवा करावे असे त्यांना कधी वाटतही नाही, पण त्यांनी या उतार वयात हे व्रत पाळले तर त्यांच्या इतरांना मोठा फायदा होईल, यात शंकाच नाही. मनाला आनंदी ठेवण्यासाठी, घरातील शांती कायम ठेवण्यासाठी हे मौन व्रत निश्‍चितच लाभदायक आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, December 5, 2019

संगतीचा परिणाम




दुसरा भ्रष्ट कारभार करतो, म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले तर चालते, हे चूक आहे. चांगल्या संगतीत राहिला तर चांगले संस्कार घडतील. 

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

पाणी बुडऊ ये मिठातें । तंव मीठची पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशेभय ।। 72 ।। अध्याय 16 वा

पाण्यात मीठ टाकले तर पाणी खारट होते. पाण्यात साखर टाकली तर पाणी गोड होते. पाण्याचा संग कोणाशी होतो, यावर त्याची चव ठरते. तसे चांगल्याची संगत केली तर चार चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. वाईटाच्या संगतीत चार वाईट सवयी लागू शकतात. मीठ पाण्यात टाकल्यावर ते त्यामध्ये विरघळते. यामुळे ते खारट लागते, पण अशुद्ध मीठ त्या पाण्यामुळे शुद्ध होते. अशुद्ध मीठ शुद्ध पाण्यात टाकून ते शुद्ध करता येते. शुद्ध, सात्त्विक वृत्तीच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो, पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या, हे ठरविणेच अवघड झाले आहे. मठामध्येही भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक वाईट गोष्टी मठामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. अशा वेळी सुसंस्कृत ठिकाणे कशी शोधायची, हा मोठा प्रश्‍न आहे. अशाने धर्माची बदनामीही होत आहे. याबाबत अपप्रचारही केला जात आहे. स्पर्धेच्या, चढाओढीच्या युगात प्रत्येक जण एकमेकाला खाली खेचण्याचेचे प्रयत्न करत आहे. अशाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त अशा वातावरणात सात्त्विक ठिकाणे मिळणार कोठे? चांगली ठिकाणे नाहीत याचा अर्थ धर्म संपला आहे, असे नाही. चांगला विचार हाच खरा धर्म आहे. चांगल्या विचारांची पुस्तके हीच सात्त्विक विचारांची ठिकाणे आहेत. ती शोधणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांच्या संगतीत, चांगल्या विचारांच्या पुस्तकांच्या संगतीत आपोआपच चांगल्या गोष्टींची संगत घडते. स्वतःलाच ही सवय लावली तर, इतरही त्यामध्ये सहभागी होतील. इतरांनीही ही सवय लागेल. मुख प्रचारातूनच चांगल्या गोष्टींचा प्रसार होऊ शकतो. यातूनच चांगले व्यासपीठ उभे राहू शकते. दुसरा भ्रष्ट कारभार करतो, म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले तर चालते, हे चूक आहे. चांगल्या संगतीत राहिला तर चांगले संस्कार घडतील. लोक चांगले म्हणतील. चांगल्या विचारात राहिल्यावर वाईटाची भीती कसली?

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, December 4, 2019

पै निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।




नैसर्गिक आपत्ती कमी येते. जपानमध्ये नैसर्गिक आपत्तीची मालिकाच असते. भुकंप, तर कधी त्सुनामी यांनी त्या देशाच्या प्रगतीस नेहमीच आव्हान दिले आहे. तरीही तो देश प्रगतिपथावर आहे. संकटातूनच खरी प्रगती होत राहते. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

पै निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।
तयाते निर्धन ऐसें । म्हणों ये काई ।। 36 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच येऊन बसली तर त्याला दरिद्री असे म्हणतां येईल काय ?

जपानने तंत्रज्ञानात त्यांनी मोठी क्रांती केली आहे. कितीही संकटे आली तरी ते नेहमी ताठ मानेने उभे राहिले आहेत. भूकंप हा तर त्यांना नेहमीचाच आहे, पण यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग काही कमी झाला नाही. प्रयत्नातही त्यांनी कधी कसूर मागे ठेवली नाही. चोवीस तास कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. असे कष्ट भारतीयांनी केले असते तर भारतही जगात महासत्ताक झाला असता. आपण महासत्ताक होण्याची नुसती स्वप्नेच पाहात आहोत. भारतीयांत जीव तोडून कष्ट करण्याची तयारी नाही. तशी त्यांची मानसिकता दिसून येत नाही. स्वार्थी वृत्तीने देश पोखरला गेला आहे. देशात आवश्‍यक गोष्टींची मुबलकता असेल तर कष्ट करण्याची मानसिकता नसते. भारताची पिछेहाट याचमुळे झाली आहे. देश यामुळेच आळसी बनला आहे. देशात पाण्याची मुबलकता आहे. शेतीची जमीनही सुपीक आहे. आवश्‍यक तेवढे उत्पादनही होते. यामुळे देशात समृद्धी आहे. गरजेपुरते कष्ट करण्याची तयारी भारतीयांध्ये आहे, पण भ्रष्टाचार आणि द्वेषभावनेने देश पोखरला जात आहे. नैसर्गिक आपत्ती कमी येते. जपानमध्ये नैसर्गिक आपत्तीची मालिकाच असते. भुकंप, तर कधी त्सुनामी यांनी त्या देशाच्या प्रगतीस नेहमीच आव्हान दिले आहे. तरीही तो देश प्रगतिपथावर आहे. संकटातूनच खरी प्रगती होत राहते. संकटे सहन करण्याची ताकद अंगात निर्माण व्हायला हवी. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची नेहमीच तयारी ठेवायला हवी. यातूनच प्रगती होते. इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे, पण त्यांनी उपलब्ध पाण्यावर शेतीत भरघोस उत्पादने घेतली आहेत. आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आपण त्यांचा आदर्शही घेऊ शकत नाही. आपणकडे पाण्याची मुबलकता असूनही आपण आघाडी मिळवू शकलो नाही. सांगण्याचा हेतू इतकाच की, कितीही संकटे आली तरी प्रगती करण्याची तयारी ठेवायला हवी. मन खचता कामा नये. संकटांचा सामना करूनच मोठी प्रगती साधता येते. कितीही उंचीवरून खाली पडले तरी मांजराप्रमाणे ताठ उभे राहता यायला हवे. कष्ट करणाऱ्याच्या घरी, संकटांचा सामना करण्याचे सामर्थ ठेवणाऱ्यांच्या घरी महालक्ष्मी निश्‍चितच नांदते, यावर विश्‍वास ठेवायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।


प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजें जी ।। 597 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहोत. (म्हणून) तुम्ही भेटल्यावर मी लडिवाळपणा करतो. महाराज, जो लडिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय, असे आपण समजावे.

माहेर म्हणजे आई - वडिलांचे घर. महिलांना माहेरची अधिक ओढ असते. सासरी कितीही प्रेम मिळाले, कितीही संपन्नता असली तरी माहेरच अधिक प्रिय असते. काही झाले तरी लगेच माझ्या माहेरी, असे नाही. माझे माहेर तसे होते अशी उदाहरणे, टोमणेबाजी सुरू होते. माहेरविषयी कोणी वाईट बोललेले त्यांना सहन होत नाही. माहेरचे कौतुक त्यांच्या तोंडी नेहमीच असते. माहेरसारखे प्रेम या जगात कोठेच नाही, असे त्यांना वाटते. असे प्रेम सासरी असले तरी माहेरची बरोबरी होत नाही, असे त्यांना वाटते. माहेरमध्ये सर्व हक्काचे असते. आपलाच अधिकार असतो. सासरी आल्यावर तसा अधिकार मिळत नाही. काही स्त्रिया आपला अधिकार राहावा, वचक राहावा यासाठी माहेरकडचाच एखादा गडीमाणूस खास कामासाठी नेतात. सासरचा गडीमाणूस त्यांना फारसा आवडत नाही. माहेरकडची सर्व माणसे त्यांना प्रेमळ वाटतात. हवीहवीशी वाटतात. बदलत्या काळात आता असे माहेरचे प्रेमही बदलत चालले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या या संस्कृतीत माहेरविषयीच प्रेम राहिले नसेल तर सासरविषयी प्रेमाची कशी स्थिती असेल, हा मोठा प्रश्‍न आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. खरे प्रेम लुप्त होत चालले आहे. काळाच्या ओघात माणसामधील स्वार्थी वृत्ती वाढल्याने हा फरक पडला आहे, पण समाधानासाठी माहेरसारखे सुख कोठेच नाही. खरे प्रेम हे माहेरीच असते. तेच खरे प्रेम आहे. तीच खरी प्रेमाची ओढ आहे. तीच खऱ्या प्रेमाची ओळख आहे. तेथेच खरे प्रेम मिळते. तसे संतांचे घर म्हणजे आपले माहेर घर आहे. तिथे प्रेम अधिक मिळते. तिथे आपले लाड केले जातात. म्हणून संतांचा सहवास असावा. संतांच्या संगतीत प्रेमामुळे मनातील राग, द्वेष, मत्सर नाहीसे होतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Tuesday, December 3, 2019

म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।


पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५


म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।
गगन जैसें अलिंगना । गगनाचिया ।। 564 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ( तें कसें तर ) आकाश जसें आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे.

सद्‌गुरूंचे, देवाचे नामस्मरण म्हणजे भजन. भक्‍तीची गोडी भजनाने लागते. सध्याच्या नव्या पिढीत भजनाची आवड निर्माण होणे, याची गोडी लागणे, या गोष्टी अशक्‍यच आहेत. नव्या पिढीला पैशाची गुर्मी आहे. सर्वच गोष्टी ते पैशाने मोजतात. भक्ती, अध्यात्म या गोष्टीही ते पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतात; पण या गोष्टी पैशाने विकल्या जात नाहीत याची कल्पना त्यांना नाही, याचेच मोठे दुःख वाटते. या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. भगवंतांना फक्त मनाने विकत घेता येते. फक्त फूल, फळ तेही शुद्ध भावनेने दिलेले एवढेच ते स्वीकारतात. महालक्ष्मी या नावातच लक्ष्मी आहे, पण या मंदिरातही दानपेटी असते. त्यात ते दान टाकतात. काही मंदिरात, धर्मात तर दान टाकण्याची स्पर्धा असते. सर्वाधिक दान देणाऱ्यांचा सत्कारही होतो. सर्वाधिक मान पैशाने मोजला जातो. याचे लिलावही चालतात. हे अध्यात्म नाही. ही भक्ती नाही. कारण देवाला याची काहीच गरज नाही. भक्तीत याची आवश्‍यकता नाही. निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. तीच खरी श्रद्धा आहे. देवाला काय आवडते हे ओळखायला हवे. देव देण्यासाठी बसला आहे. आत्मज्ञानाच्या प्रसादाचे वाटप त्यांच्याकडून सुरू आहे. पण हे घेण्यासाठी भक्ताला सुद्धा त्या प्रकारची भक्ती करावी लागते. म्हणजे काय तर आत्मज्ञानासाठी आवश्‍यक असणारी साधना त्याने करायला हवी. त्याला या व्यतिरिक्त काही नको आहे. आकाश जसे आकाशात सामावले आहे. तसा शिष्य सुद्धा गुरूमध्ये सामावला पाहीजे. शिष्याने सुद्धा गुरूच्या पात्रतेचे व्हायला हवे. आत्मज्ञानी व्हायला हवे. ही त्यांची अपेक्षा आहे. देवाच्या भजनास तोच योग्य आहे. त्यालाच ते आपलेसे करून घेतात आणि आपणासारखे बनवतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।