Monday, July 15, 2019

तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।




विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे; पण भक्ती जर खरी असेल, तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे, याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे, याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. 

- राजेंद्र घोरपडे
तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभुही परि न जोडे । तपें करितां ।। 767 ।। अध्याय 11 वा

अर्थ - तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्‍वरूप दाखविलें ते शंकरालासुद्धा अनेक तपें केली तरी प्राप्त होत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्‍वरूप दर्शन घडविले. अनेक तपे करूनही शंकरालाही हे विश्‍वरूप प्राप्त होत नाही. यातून असे स्पष्ट होते की, विश्‍वाचे आर्त जाणण्यासाठी योगमार्गापेक्षा भक्तिमार्ग हा सहज व सोपा मार्ग आहे. यामध्ये कोणतेही कष्ट पडत नाहीत. अगदी सहजपणे हे साध्य होते. संसाराचा त्याग करावा लागत नाही. सध्याच्या बदलत्या युगातही हा मार्ग उपयोगी आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आता जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रदूषणात वाढ झाली आहे. चंगळवादी संस्कृतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. अशा काळात अध्यात्माच्या या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. याची आवड असणाऱ्यांची, ओढ असणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. लोकांध्ये धार्मिक वृत्ती जरूर आहे, पण सध्या अंधश्रद्धा आणि अज्ञानाने लोक भरकटलेले आहे. अध्यात्माची वाट चुकलेले आहेत. भक्ती म्हणजे काय, हेच ते विसरले आहेत. चंगळवादाने ते अधिकच अज्ञानी होत चालले आहेत. अध्यात्माच्या मूळ उद्देशा पासून ते दूर चालले आहेत. सध्याचे सणवार, उत्सव यामध्ये केवळ औपचारिकताच उरली आहे. त्यामध्ये अध्यात्माचे अधिष्ठानच नसते. अशा या परिस्थितीत विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे; पण भक्ती जर खरी असेल, तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे, याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे, याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. केवळ भक्तीने हे विश्‍वरूप दर्शन सहज शक्‍य आहे. यासाठी अज्ञानाच्या अंधारात भक्तीचा उजेड पडणे गरजेचे आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, July 11, 2019

अमृताचा समुद्र





साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते, पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी? इथे तर धैर्याने डुंबायला हवे.

हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ।। 624 ।। अध्याय 11 वा

अर्थ - अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असता आणि अकस्मात कोणी तेथें प्राप्त झाला, मग आपण यांत बुडून मरून जाऊं. म्हणून कोणी तरी त्याचा त्याग केला आहे काय?

साधना करताना अनेक अडचणी येत असतात. कधी वेळच मिळत नाही, तर कधी वेळ मिळाला तर मनात इच्छाच होत नाही. मनात घोळणाऱ्या अनेक विचारांनी साधनेला बसण्याचे सामर्थ्यच होत नाही. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? अशा बेचैन अवस्थेत प्रत्येक साधक असतो. साधनेसाठी बेचैन असणे हे देखील चांगले आहे. या ना त्या कारणाने सद्‌गुरूचे स्मरण तरी राहते, पण साधना सोडून देणे हे योग्य नाही. मनाच्या स्थैर्यासाठी प्रयत्न करणे, साधनेसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. साधनेचे अनेक फायदे आपणास माहीत असूनही या धकाधकीच्या जीवनामुळे याकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे सध्या कामाच्या व्यस्ततेत साधनेसाठी वेळे देणे हे एक मोठे आव्हानच आहे, पण हे आव्हान आपणास स्वीकारावेच लागेल. साधनेचे हे अमृत प्यायलाच हवे. अमृताच्या या महासागरात आपण डुंबायलाच हवे. साधनेच्या सुरवातीच्या काळात पायात मुंग्या येतात. शरीर जड होते, पण या गोष्टींची भीती बाळगू नये. अहो, अमृताच्या समुद्रात उडी घेतल्यावर मरणाला कशाला भ्यायचे? उलट साधनेच्या प्रगतीतील या पायऱ्या आहेत, असे समजून उत्साहाने साधना वाढवायला हवी. मुंग्या हळूहळू कमी होतील. साधनेच्या काळात शरीरात अनेक हालचाली होतात. पित्त जळते, पण याचा फायदा होतो. पित्त जळाल्याने आपली भूक वाढते. चेहऱ्यावरील तेज वाढते. साधनेत हळूहळू प्रगती होत राहते. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती सुधारते. हे फायदे विचारात घ्यायला हवेत व साधनेच्या काळात वाटणारी मनातील भीती दूर करायला हवी. साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते, पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी? इथे तर धैर्याने डुंबायला हवे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

कैसें अनुग्रहाचे करणे







 
संजीवन समाधीची आराधना करायला हवी. सद्‌गुरू परंपरेचा मार्ग ते निश्‍चितच दाखवतील. खऱ्या सद्‌गुरूंची भेटही ते करवून देतील, पण ही आशा सोडता कामा नये. अनुग्रह हा आत्मज्ञानी संताचाच घ्यायला हवा.

कैसें अनुग्रहांचे करणें । पार्थाचे पाहणें आणि न पाहणे ।
तयाहीसकट नारायणें । व्यापुनि घातले ।। 230।। अध्याय 11 वा

अर्थ - प्रभुच्या कृपेची करणी कशी अद्‌भुत आहे पाहा अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे हे सर्वच भगवंतानी व्यापून टाकले.

आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर गुरुकृपा हवीच. यासाठी गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. भक्ताची योग्य प्रगती पाहूनच सद्‌गुरू भक्तास अनुग्रह देतात. अनुग्रह देतात म्हणजे नेके काय करतात? हा प्रत्येक भक्ताचा उत्सुकतेचा विषय असतो. सद्‌गुरू भक्ताची भक्ती पाहतात. आत्मज्ञानी असल्याने भक्ताच्या आवडीनिवडी ते ओळखतात. त्यांची भक्तीची ओढ पाहून योग्य गुरुमंत्र ते देतात. यालाच अनुग्रह झाला, असे म्हटले जाते. नुसता अनुग्रह मिळून उपयोग नाही. गुरुकृपाही हवीच. गुरुमंत्राच्या नियमित जपाने, साधनेने आध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. गुरूविन कोण दाखवील वाट असे हे यासाठीच म्हटले गेले आहे ते यासाठीच. गुरूंच्या कृपेने हे सहज साध्य होते. यासाठी वणवण भटकावे लागत नाही. अनुग्रह ही आत्मज्ञान प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे. सद्‌गुरूंच्या कृपेने भक्त या पायऱ्या सहज पार करतो. शेवटी या नराचा नारायण होतो; पण सध्याच्या युगात आत्मज्ञानी गुरू आहेत कोठे? नुसती भगवी वस्त्रे घातली, कपाळाला टिळा लावला म्हणजे संत झाले, असे म्हणता येत नाही. संत हा बाह्यरूपावरून ओळखायचा नसतो, तर तो अंतरंगात डोकावणारा असायला हवा. मनकवडा असायला हवा. असे संतच योग्य मार्ग दाखवू शकतात. अशा संतांचे मार्गदर्शन, अनुग्रह घ्यायचा असतो, पण आजकाल असे संत विरळ झाले आहेत. नव्या पिढीला यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेनासे झाले आहे. म्हणून साधना सोडायची नाही. कारण संत हे अमर आहेत. त्यांची समाधीही अमर आहे. संजीवन आहे. ते भक्तांना मार्ग दाखवत राहतात. अशा संजीवन समाधीची आराधना करायला हवी. सद्‌गुरू परंपरेचा मार्ग ते निश्‍चितच दाखवतील. खऱ्या सद्‌गुरूंची भेटही ते करवून देतील, पण ही आशा सोडता कामा नये. अनुग्रह हा आत्मज्ञानी संताचाच घ्यायला हवा. असे संतच योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. शिष्याला आत्मज्ञानी करू शकतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, July 10, 2019

दुधसागर (व्हायरल व्हिडिओ)


कर्नाटकातील दुधसागर धबधबा याचे सौंदर्य नेहमीच सर्वांना आकर्षित करते. पावसाळ्यात या भागात भ्रमंती करणे येथील निसर्गाचा आनंद घेणे ही नेहमीच सुखकारक असे आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनामध्ये येणारा थकवा हे आल्हादायक वातावरण पाहून  निश्चितच नाहिसा होतो. मनाला मोहून टाकणारा हा परिसर नेहमीच पर्यटकांना खुणावत आला आहे. दूध साखरचा हा व्हायरल व्हिडिओ. 


कृषी तंत्रज्ञान आलं दारी..... जेंव्हा कृषी अधिकारी येती बांधावरी …

वरुणराजाच्या कृपेने शाहुवाडी तालुक्याला आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला आणि बळीराजाच्या कामाला वेग आला....शिवारात शेतकरी बांधवांची लगबग सुरु झाली..... अन भात रोप लावणीला चांगलीच गती आली.....अन अशातच शिवारात बळीराजाच्या मदतीला कृषि विभागाची फौज धावून आली......


स्थळ आंबार्डे तालुका शाहुवाडी जि. कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुर्यकांत पांडुरंग पाटील (आप्पा पाटील) यांच्या शेतावर कोकण कृषि विद्यापिठाचे सुधारित ‘चारसूत्री भात लागवड’ प्रात्यक्षिकाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी, शाहुवाडी यांचेकडून करण्यात आले. चारसूत्री पद्धतीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी मा. श्री स्वप्नील पाटील यांचेकडून करण्यात आले.  यामध्ये हिरवळीचे खत म्हणून  गिरीपुष्पाचा वापर, रोप लागणीतील अंतर २५ सेमी × १५ सेमी राखण्याच्या उद्देश्याने लाईन दोरीवर रोप लागण तसेच युरिया ब्रिकेटचा वापर करण्यात आला. या वेळी स्वतः कृषी अधिकाऱ्यांनी पावसाची तमा न बाळगता  गुडघाभर चिखलात उतरून  चार सुत्री पद्धतीने रोप लावण करून दाखवली.  त्याच बरोबर ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अंतर्गत कृषि यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना दिलेला पॉवर टीलर कृषी अधिकारी श्री अतुल जाधव यांनी स्वतः चालवत चिखलणीसाठी  होणारा वापर पाहून योजना सार्थकी लागल्याचे समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री जयसिंग देसाई यांनी विविध योजनांची महिती दिली. श्री संदीप शेळक़े यांनी भातावरील किड व रोग व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन केले तर श्री गिरीगोसावी यांनी भात पिकातील तण नियंत्रनासाठी उपाय सांगितले.

चार सूत्री भात लागवड करताना ‘लर्निंग बाय डूईंग’ या विस्तार शिक्षणाच्या तत्वाचा अनुभव शेतकऱ्यांना आला. चार सूत्री भात लागवड तंत्रज्ञानाबद्दल  माहिती मिळाल्याने व शंकांचे  समाधान झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे आभार मानले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी मा. श्री. स्वप्नील पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री. जयसिंग देसाई, श्री. अतुल जाधव, श्री. संदीप शेळके व श्री. नामदेव गिरीगोसावी यांनी केले. तसेच सर्व  शेतकऱ्यांनी  सुधारित चारसूत्री पद्धतीने भाताची लागवड  करण्याचे आवाहन केले.

भविष्यात अशा प्रकारचे शेताच्या बांधावर येवून प्रात्यक्षिकांद्वारे अनमोल मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा व्यक्त करत प्रगतीशील शेतकरी श्री. सुर्यकांत पाटील यांनी आभार मानत प्रात्यक्षिकाचा समारोप केला.

(शब्दांकन – प्रा. डॉ. सौ. आर. एस. शेळके )

Tuesday, July 9, 2019

योगियांचे समाधिधन


सद्‌गुरू समाधिस्थ झाले. तरीही ते आपल्या परमभक्तांना अनुभव देत असतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभूतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.
- राजेंद्र घोरपडे

हा योगियांचे समाधिधन । कीं होऊनी ठेलें पार्था अधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ।। 174।। अध्याय 11 वा

अर्थ - योगी ज्यांचे सुख समाधींतच भोगतात, असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचें ऐश्‍वर्य असून, तो अर्जुनाच्या अगदीं आधीन झाला आहे. याकरितां राजा धृतराष्ट्रा, माझें मन आश्‍चर्य करतें.

रणभूमीवर मनाने खचलेल्या, युद्ध न करण्याच्या मनःस्थितीत असलेल्या अर्जुनाला भगवान कृष्ण युद्ध करण्यासाठी प्रेरित करत आहेत. अर्जुनाची मनःस्थिती सुधारण्यासाठी भगवंतांना स्वतःचे विश्‍वरूप दाखवावे लागले. हे सर्व प्रसंग पाहण्याचे भाग्य भगवंताच्या कृपेने संजयाला मिळाले आणि याचे सर्व वर्णन संजय अंध धृतराष्ट्राला सांगत आहे; पण धृतराष्ट्रावर याचा काहीही परिणाम झाला नाही. यामुळे कौरव कुळाचा सर्वनाश झाला. यासाठी नुसती सद्‌गुरूंची कृपा असून चालत नाही, तर योग्य दृष्टी असावी लागते. भगवंत अर्जुनासाठी विश्‍वरूपमय झाले. यासाठी अर्जुनासारखी भक्ती असावी लागते. दुष्ट-दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे, पण हे कृत्य ते आपल्या परमभक्ताकडून करवून घेऊ इच्छित आहेत. यासाठी केवळ निमित्तमात्र होण्याचे आवाहन भगवंत अर्जुनास करत आहेत. माऊली दृष्ट-दुर्जनांच्या मनातील दुष्टपणा काढून प्रोची शिकवण देऊ इच्छित आहेत. यासाठी अर्जुनासारखे परमभक्त होण्याचे आवाहन ती करत आहे. जगात सुखशांती, समृद्धी नांदावी यासाठी आत्मज्ञानी सद्‌गुरू नेहमीच प्रयत्नशील असतात. हाच तर त्यांचा धर्म आहे. हीच तर खरी भारतीय संस्कृती आहे. सद्‌गुरू आत्मज्ञानाचा ठेवा कसा मिळवायचा, हे सांगत आहेत. तो मिळविण्यासाठीच युद्ध करण्याची प्रेरणा ते देत आहेत. अपयशाने दुःखी कष्टी होऊन, मनाने खचल्यानंतर अनेक जण अध्यात्माकडे वळतात. तसा ते योग्य मार्ग स्वीकारतात, यात शंकाच नाही, पण धृतराष्ट्रासारखी दृष्टी नसावी. अर्जुनासारखी वेध घेणारी नजर असावी. खऱ्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याचे सामर्थ असावे. तरच ते या अपयशातून योग्य मार्गावर येतील. सद्‌गुरू योगीरूपाने त्यांना योग्य वाटेवर आणतात. अर्जुनासारखा भक्त भेटला तर ते त्याला आपल्या पदावर बसविण्यासाठी धडपडतात. भक्ताने मात्र यासाठी निमित्तमात्र व्हायचे असते. सद्‌गुरू समाधिस्थ झाले. तरीही ते आपल्या परमभक्तांना अनुभव देत असतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभूतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, July 7, 2019

आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज



भक्तिमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।
तो सद्‌गुरू असे जोडला । किरीटीसी ।।334।। अध्याय 10 वा

अर्थ - प्रल्हादानें माझा नारायण सर्व पदार्थांत व्पाप्त आहे असे हिरण्यकश्‍यपूस सांगितल्याकारणानें तो विषाहीसकट सर्व पदार्थ आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्‌गुरू लाभला होता.

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा काळात प्रल्हादाच्या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. या दंतकथा आहेत. ती अतिशोक्ती वाटते, पण शास्त्रावर आधारित लिखाण करणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी हे मग लिहिले कसे, हा प्रश्‍न पडतो.तसे दंतकथा आणि वास्तव यामध्ये बराच फरक आहे. इतिहासावर आधारित लिहिल्या गेलेल्या, दंतकथेतून सांगितल्या जाणाऱ्या रंजक कथानकामुळेच आज खरा इतिहास शोधणे कठीण जात आहे. ते रंजक कथानकच आपण खरे समजत असल्यानेच गैरसमज वाढत आहेत. यासाठी या कथांचा खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्या असे लक्षात येईल, की त्या काळातील तंत्रज्ञानही उच्च होते. कारण त्या काळातील अनेक चमत्कारिक शोधांचा, वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांचा उलगडा सध्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही होऊ शकला नाही. एकाच दगडात मंदिराचा कळस बांधला कसा गेला असेल? हा दगड नेका इतक्‍या उंचीवर कसा नेला गेला असेल? असे प्रश्‍न काही पौराणिक मंदिरे पाहताना आपणास सहजच पडतात. कारण त्या काळात आताच्या सारख्या क्रेन नव्हत्या. मग हे शक्‍य कसे झाले? याचाच अर्थ, त्या काळातही प्रगत तंत्रज्ञान होते, पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले. प्रल्हादावर विषाचा परिणाम झाला नाही. हे कसे शक्‍य आहे? उपचारही केले गेले नाहीत. मग तो इतके भयंकर विष पचवू कसा शकला, हा प्रश्‍न सहजच आपल्या मनात डोकावतो; पण साधनेने हे शक्‍य आहे. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते. साधनेच्या काळात पित्ताशयात अनेक रसायने तयार होतात. त्यांचा शोध सध्याच्या काळातही लावता आलेला नाही, हे परखड सत्य आहे. साधनेत शरीरात तयार होणाऱ्या द्रव्यातून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. विष पचविण्याची ताकतही या द्रव्यात असते. भक्तिमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Friday, July 5, 2019

जया सद्‌गुरू तारू पुढे ।


कधी स्वप्नात येऊन सद्‌गुरू दृष्टांत देतात. या स्वप्नानेही मनाला धीर मिळतो. मनातील विचारांना चालना मिळते. हे विचार सद्‌गुरूच आपल्या मनात उत्पन्न करत असतात, असा भाव असायला हवा, पण हे होत नाही. यामुळेच अनुभूती मनाला भावत नाही.

जया सद्‌गुरू तारू पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे ।
जया आत्मनिवेदन तरांडे । आकळिले ।। 98 ।। अध्याय 7 वा

अर्थ - ज्यास सद्‌गुरू हा पुढें तारणारा (नावाडी) आहे. ज्या साधकांनी आत्मनुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदनरूपी ताफा प्राप्त झाला आहे.

सद्‌गुरूंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते, पण प्रत्यक्षात ही साधना सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरुमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्‌गुरू देतात. त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्‌गुरूंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत, अशी अनुभूती येते; पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी अवधानाचा वाफसा असणे आवश्‍यक आहे. तरच गुरुमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. हे बीज वाया जाणार नाही ना? अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहतात. काळजी वाटते, पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरविते हे सद्‌गुरूच आहेत, हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. आपल्या डोळ्यांवरची ही झापड सद्‌गुरू दूर करतात आणि आपणास दृष्टी देतात. जीवनात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगात सद्‌गुरूंची साथ असते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणारे स्वामी सदैव साथ देत असतात. फक्त आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, यावर ही अनुभूती अवलंबून आहे. सद्‌गुरूंचा हा उपदेशच मनाला मोठा धीर देतो. त्यांच्या या नुसत्या शब्दानेच मोठा आधार मिळतो. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धाडस अंगात उत्पन्न होते. कामांध्ये आधार मिळतो. या आधारावरच समोरच्या समस्या आपोआपच सुटतात. प्रश्‍न मार्गी लागतात. कधी स्वप्नात येऊन सद्‌गुरू दृष्टांत देतात. या स्वप्नानेही मनाला धीर मिळतो. मनातील विचारांना चालना मिळते. हे विचार सद्‌गुरूच आपल्या मनात उत्पन्न करत असतात, असा भाव असायला हवा, पण हे होत नाही. यामुळेच अनुभूती मनाला भावत नाही. सद्‌गुरू सदैव आपल्या सहवासात असतात. फक्त त्यांचे अस्तित्व आपणास जाणवले पाहिजे. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. तरच अनुभूती येते. अनुभूतीतूनच आध्यात्मिक प्रगती होत राहते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Wednesday, July 3, 2019

जेथ जेथ संपत्ति आणि दया ।





धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला हवे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. हाच आपल्या संस्कृतीचा धर्म आहे.
- राजेंद्र घोरपडे

जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूती माझी ।। 307 ।। अध्याय 10

अर्थ - अर्जुना, ज्या ज्या पुरूषाच्या ठिकाणी ऐश्‍वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील, तो तो पुरूष माझी विभूति आहे, असे समज.

अनेक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतात. पैसा त्यांना अति प्रिय असतो. तसा ते अमाप पैसाही कमावतात, पण त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सर्वत्र पैसाच दिसतो. या पैशाच्या गर्वाने ते सर्वसामान्य जनतेचा द्वेष करतात. दानाची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी विकत घेतल्याची ते भाषा करतात, इतकी मग्रुरी त्यांच्यात असते. अहो, इतकेच काय, पण स्वतःच्या घरच्यांच्यासाठीही पैसा खर्च करण्यासाठी ते नाही होय, नाही होय करतात. पैसा काय फुकट येतो काय? पैसा काय झाडाला लागतो काय? अशी त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. पैशाने माणसे विकत घेता येतात, पण प्रे, आशीर्वाद, कृपा विकत घेता येत नाही. यासाठी अंगात दानशूरपणा असावा लागतो. अंगात दयाभाव असावा लागतो. पैशाने अंगात आलेल्या र्गुीने तो इतका अंध झालेला असतो की, घरात भेटायला आलेल्या व्यक्तीचा आदर करणेही तो विसरतो; पण पैशाची ही र्गुी योग्य नाही. कारण पैसा हे द्रव्य आहे. ते नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही, पण घरात लक्ष्मीशिवाय शांती नाही, हेही तितकेच खरे आहे. लक्ष्मी घरात सुखशांती, समाधान घेऊन येते; पण ते टिकवून ठेवणे, आपल्या हातात आहे. आपल्याजवळच्या पैशाने गरजूंना मदत केली तर ते आपल्या कठीण प्रसंगात निश्‍चितच मदतीला धावतील, यात शंकाच नाही. यासाठी दयावान व्हायला शिकले पाहिजे. धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला हवे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. हाच आपल्या संस्कृतीचा धर्म आहे. जगा व जगू द्या असा आपला धर्म सांगतो. हे सांगण्यामागचा उद्देश समाजात शांती नांदावी हा आहे, पण आजकाल धर्माची व्याख्याच बदलली आहे. धर्म म्हणजे अनेक बंधणे, असा अर्थ काढला जात आहे; पण ही बंधणे काय आहेत, हे तरी जाणून घ्यायला नको का? नियम कोणते आहेत, हे अभ्यासायला हवे. जगातील कोणताही धर्म हेच नियम सांगतो. कारण सर्व धर्मांचा मार्ग हा एकच आहे- भगवंतांची प्राप्ती. त्यामुळेच सब का मालिक एक असे म्हटले गेले असावे. दया हा धर्म आहे. तेथे भगवंताची वस्ती निश्‍चितच आहे.
 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Monday, July 1, 2019

जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।


फळ नासके जरी लागले तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे.
- राजेंद्र घोरपडे
जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्‍चित । जाण माझा ।। 118 ।। अध्याय 10 वा

अर्थ - जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावें. हा माझा भक्तियोग आहे असे निश्‍चित समज.

व्यक्ती तितक्‍या प्रकृती. दोन जुळे भाऊ असले तरी त्यांच्यात सुद्धा बराच फरक असतो. प्रत्येक पिकाच्या अनेक जाती आहेत, पण त्या प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. पिकात उपजलेले धान्य किंवा एकाच झाडाला लागलेली फळे एकसारखी नसतात. प्रत्येक फळाच्या चवीत थोडाफार तरी फरक असतोच. काही नासके असतात. काही कडवट असतात, तर काही अति गोड असतात. काहींना तर चवच नसते; पण प्रत्येक शेतकरी चांगली फळे लागतील, याचाच प्रयत्न करत असतो. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे साहजिकच अन्नधान्याची, फळांची मागणी वाढतीच राहणार आहे. यासाठी उत्पादनात वाढ कशी होईल, यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर धान्याची प्रत कशी सुधारेल, त्याची गोडी, त्याचा आकार आदीचाही प्रयत्न केला जात आहे. नुसते दिसायला चांगले असून चालत नाही. ज्याला गोडी चांगली आहे त्यालाच बाजारात अधिक मागणी असते. त्यालाच चांगला भाव मिळतो. फळ नासके जरी लागले तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे. सध्याचा काळ बदलला आहे, असे म्हटले जाते. माणूसही बदलला आहे. माणसाची मने बदललेली आहेत, असे सांगितले जाते. सत्याचा पुरस्कार करणाऱ्याला आज जगात फारशी किंमत नाही, असेही सांगितले जाते; पण खरे पाहता चांगल्या गोष्टीलाच टिकाऊपणा असतो. तो एकदा डावलला जाईल, दोनदा डावलला जाईल, पण तिसऱ्यांदा त्याचीच गरज वाटू लागेल. एखादा दुष्ट-दुर्जन जरी आपणास भेटला तरी त्याच्यात काही ना काही तरी चांगल्या गोष्टी निश्‍चितच असतात. त्याच्या चांगल्या गोष्टी घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सत्‌ार्गाचा, चांगल्या गोष्टींचा ध्यास सतत करायला हवा. कारण जो चांगला आहे, सत्याचा पुरस्कार करणारा आहे, तोच या जीवनात अमर होतो.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।