Tuesday, April 23, 2019

पसायदान





देव म्हणाले तू अवधान राखलेस म्हणून तुला हा ठेवा मिळाला. त्यामुळेच तू या सेवेसाठी पात्र झालास. अशीच तुझी ही सेवा अखंड राहू दे. यावर भक्तही म्हणाला देवा ही सेवा तुम्हीच तर करून घेता. आता तुम्हीच ही सेवा अखंड माझ्याकडून करवून घ्या. असा आर्शिवाद आता मला द्या. हाच प्रसाद आता मला द्या.


म्हणोनि निज अवधान । मज वोळगे पसायदान ।
दीजो जी समर्थु होईन । ज्ञानदेवो म्हणे ।। 473 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - म्हणून महाराज, माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपलें अवधानरूपी प्रसादाचें दान द्यावें, म्हणजे मी समर्थ होईन, असे ज्ञानेश्‍वरमहाराज श्रोते संतमंडळीस म्हणतात.

तिरुपती बालाजीचा भक्त होता. भजन, कीर्तन, प्रवचन करणे हाच त्याचा उद्योग. विविध देवस्थानांच्या ठिकाणी तो ही सेवा देत असे. यातूनच मिळणाऱ्या पैशातूनच त्याचा चरितार्थ चालायचा. वर्षातून न चुकता एकदा तरी तो भेट देत असे. तिरुमला हे देवस्थान उंच डोंगरावर आहे. तिरुपती शहर या देवस्थानच्या पायथ्याशी वसले आहे. तिरुमलाला हा भक्त तिरुपतीतून दरवर्षी पायी चालत जायचा. नऊ किलोमीटर उंचीचा हा खडा डोंगर पायी चढायचा. पायी वारीचा आनंद काही औरच असतो. काही पायऱ्या चढायच्या दमायला लागल्यावर बसायचे. उंचावरून तिरुपती शहराचे दिसणारे सौंदर्य मनमोहक असते. शहरातील धावपळ, मोठे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ सहज दिसते. या जीवनापासून विरंगुळा म्हणून हा प्रवास निश्‍चितच मनाला उभारी देतो. तिरुमलाचा हा डोंगर खडा आहे. अगदी अर्धा किलोमीटर चालल्यावर धापा लागतात. तरीही हा खडा डोंगर हा भक्त आनंदाने चढायचा. बालाजीच्या प्रेरणेने दर्शनाच्या ओढीने चढताना वेगळी स्फुर्ती यायची. बालाजीचे सर्वांग सुंदर मुख पाहण्याची त्याची ओढ त्याला सहजच वर उचलून घेत असे. घामाच्या धारा आल्यातरी वाऱ्याची एक झुळूक त्याच्या अंगातील सर्व शीण काढून घेत असे. पहिले चार टप्पे खड्या पायऱ्यांचे अतिशय अवघड असेच आहेत. हे चढण्याचे ज्याच्याच सामर्थ आहे तो शक्तीमान, बलवान आहे. म्हणून हे टप्पे झाल्यानंतर स्वतः मारुतराय त्याच्या स्वागतासाठी उभे असतात. भगवान मारुतीची ती महाकाय मुर्ती हीच स्फुर्ती देण्यासाठी तिथे उभी आहे. तू इथे पर्यंत पायी आलास, तू आता बलशाली झाला आहेस. महाकाय बलवान असल्यानेच मी आता स्वतः तुला दर्शन देण्यासाठी उभा आहे. अशी प्रेरणा ही मुर्ती देत असावी. चपळ हरणांचे, महाकाय शिंगांच्या काळविटाचेही उद्यान याच मार्गावर आहे. हरणासारखे चपळ व्हा. अशी प्रेरणा, स्फुर्ती ही हरणे भक्तांना देत राहातात. चालणाऱ्याच्या पायांना यामुळे तशी चपळताही येते. पशू पक्षांची उद्यानेही पदपथावर आहेत. त्याचा चिवचिवाट मन टवटवीत करतो. ते मधुर स्वर ऐकल्यानंतर मनाची सगळी मरगळ दूर होते. इतके ते पक्षी गोड आहेत. सुंदर रंगीबेरंगी पक्षी, महाकाय वृक्ष, महाकाय कडे हे चढणाऱ्याला एक स्फूर्तीच देत राहतात. जीवनाची अशीच महाकाय आव्हाणे झेलण्याचे सामर्थ्यही याचमुळे पायी येणाऱ्या भक्तांना येत असावे. काही भाविक तर या मार्गावरील पायऱ्या ह्या गुडघ्याने चढतात. तरुणांचे ठीक आहे. पण वयस्कर व्यक्तीही उत्साहाने या पायऱ्या चढतात. त्यांचा तो उत्साह पाहून नवख्या तरुणांनाही स्फूर्ती मिळते. या वाटेवरच पुढे नृसिंहस्वामीचे मंदीर आहे. थकलेल्या भक्तांना येथे महाप्रसाद दिला जातो. चालून चालून थोडी भूक लागते. दमायला होते. येथे एका महाकाय वडाच्या वृक्षाखाली या प्रसादाचे वाटप चालते. हा प्रसाद घेतल्यानंतर शेवटचा एक अवघड टप्पा पूर्ण करण्यास यामुळे प्रेरणा मिळते. पायी दर्शनासाठी येणाऱ्या भक्‍तांना सर्वप्रथम बालाजी दर्शनाचा मान यामुळेच दिला असावा. बालाजीचे सर्वांग सुंदर साजिरे रूप पाहिल्यानंतर पायी चालून आल्याचा शीण सारा दूर होतो. हा बालाजीचा भक्त नेहमी पायी चालत यायचा. दर्शन घेऊन तृप्त व्हायचा. मंदीरात हुंडी आहे तेथे अनेक भक्त दान टाकतात. कोणी पैसे दान देतात. कोणी सोने, चांदी, दागिने, जडजवाहिरे दान देतात. देवाला दान देणाऱ्यांची येथे रीघच लागलेली असते. दान देण्यासाठीही येथे रांग आहे. झोळीमध्ये येथे दान स्वीकारले जाते. देवाच्या दर्शनाने तृप्त झालेला हा भक्त दान देण्यासाठी हुंडीजवळ गेला. तो मनात म्हणाला इतका श्रीमंत देव, त्याच्या चरणी साक्षात लक्ष्मी लोळण घेत आहे. तेथे केरातही लक्ष्मीच असते. इतक्‍या श्रीमंत देवाला आपण पैसे देऊन आपण देवाची चेष्टाच करत आहोत. तो लाजला. अरेरे देवाला पैशाची गरजच नाही. जिथे लक्ष्मी ओसंडून वाहते आहे. तेथे आपण टाकलेल्या नाण्यांचे ते काय मोल. त्या नाण्याने देव मला पावणार कसा? देवाला आपण वेगळे काही तरी देऊ. देव आपल्यावर प्रसन्न व्हायला हवा. असे काही तरी आपण दान देऊ? तसे तिरुमला येथे केस दानाची पद्धत आहे. पण कल्याण कट्ट्‌यावर केसदान स्वीकारले जाते. हुंडीत दान काय टाकायचे? दान हुंडीत स्वीकारले जाते. आता या श्रीमंत देवाला पैसा दान देण्याऐवजी आपण त्यानेच दिलेले ज्ञान दान देऊन टाकू. शेवटी ज्ञान हे देवाच्या चरणी अपर्ण करायचे असतेच ना. त्याने निर्णय घेतला. आपण येवढी प्रवचने, भजने, कीर्तने लिहिली आहेत ती त्या झोळीत टाकायची आणि ती सर्व त्याने देवाला अर्पण केली. देवाने ती स्वीकारली. देव प्रसन्न झाला. हा आपला वेगळा भक्त आहे. आवडीचा भक्त आहे. देव म्हणाला माग तुला काय पाहिजे ते माग. भक्त म्हणाला मी काय मागणार? जे काय मिळते ते तुम्हीच तर देता. पैसा, आकडा सर्व तुमच्या मुळेच तर मला मिळतो. जे दान दिले आहे. ते ज्ञान तर तुम्हीच दिले आहे. हे दान आता तुम्ही स्वीकारले आहे. यापुढेही ही सेवा अशीच सुरू राहू दे. हे दान करण्याची संधी मला वारंवार लाभू दे. ही ज्ञानाची स्फुर्ती आता आत्मज्ञानात परावर्तित होऊ दे. ब्रह्मज्ञानाने आता सेवा करण्याची संधी मला मिळू दे. हीच आता तुमच्या चरणी प्रार्थना आहे. जे ज्ञान तुम्ही देता तेच ज्ञान तुमच्या चरणी अर्पण केले आहे. मी एक साधा भक्त आहे. आता मागणे एकच मला ब्रह्मज्ञानाची सेवा करण्याची संधी द्यावी. असे म्हणताच देव अधिकच प्रसन्न झाले. त्यांनी त्या भक्ताला प्रसाद दिला पुढच्या वेळी तू माझ्या भेटीला येशील तेव्हा तू ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी होऊन येशील. आता तुझी ती सेवा आम्ही यापुढे स्वीकारू. भक्त आनंदी झाला. पुढच्यावर्षी बालाजी चरणी तो भक्त ब्रह्मज्ञानी होऊनच गेला. पण त्याची भजन, कीर्तन, प्रवचनाची सेवा अशीच अखंड सुरू राहिली. देव म्हणाले तू अवधान राखलेस म्हणून तुला हा ठेवा मिळाला. त्यामुळेच तू या सेवेसाठी पात्र झालास. अशीच तुझी ही सेवा अखंड राहू दे. यावर भक्तही म्हणाला देवा ही सेवा तुम्हीच तर करून घेता. आता तुम्हीच ही सेवा अखंड माझ्याकडून करवून घ्या. असा आर्शिवाद आता मला द्या. हाच प्रसाद आता मला द्या.



Monday, April 22, 2019

परान्न


अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. गरजूंना अन्न द्यावे त्यातून समाधान मिळते. आशीर्वाद मिळतात. पण त्याच्या गैरफायदा घेणे निश्‍चितच भूषणावह नाही. एका दिवसांच्या परान्नाने आपण काही त्याचे देणे लागत नाही

तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें ।
एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा ।। 227 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - एक दिवसाच्या परान्नानें जसा दरिद्री पुरूष उन्मत्त होतो, तसा जो स्त्रिया, धन, विद्या, स्तुति व बहुमान यांनी मस्त होतो.

निवडणुका हा खेड्यात उत्सुकतेचा विषय असतो. गावात गट-तट हे असतातच. गल्ली, गल्ली, घरे-घरे गटातटात विभागलेली असतात. हा या गटाचा तो त्या गटाचा असा स्पष्ट भेद असतो. इतकेच काय तर दुसऱ्या गटातील एखादी व्यक्ती तिरडीला उपस्थित राहिली तर त्याची चर्चा होते. कितीही जवळचा असला तरी गटातटांनी एकमेकांत भिंती उभ्या केल्या जातात. इतकी राजकीय परिस्थिती सध्या बिघडलेली आहे. जेवणावळीत दुसऱ्या गटातील माणूस दिसला तर हा इथे कसा? त्याच्याकडे आश्‍चर्याने पाहिले जाते. फोडाफोडी जेवणावळीतच समजते. लग्न समारंभाच्या पंगतीत ही फुटाफुट स्पष्ट दिसते. पूर्वीच्या काळीही जेवणावळी असायच्या पण त्यांचा उद्देश हा वेगळा होता. सभा-समारंभाचा उत्साह यामुळे भंग होत नव्हता. पण आता तसे होत नाही. राजर्षी शाहुंच्या काळातही जेवणावळी असायच्या पण त्याचा उद्देश समाजात एकोपा राहावा हा होता. समाजात निर्माण झालेले गैरसमज, भेदभाव दूर व्हावेत, समाजातील सर्वांनी एकत्र यावे. ही उद्दिष्टे त्यामागे होती. त्याचा परिणामही झाला. समाजातील अनेकांचे प्रश्‍न या जेवनावळीच्या निमित्ताने सोडवले जायचे. काहींना यामुळे आधार मिळायचा. समाधान मिळायचे. जमिनदार, भटभडजी मंडळींचा मात्र याला तीव्र विरोध होता. अशाने समाज बाटला जाईल असा त्यांचा समज होता. चार लोक एकत्र आले तर उद्या त्यांच्या विरोधात आवाज उठविला जाईल अशी भीती त्यांना होती. यासाठी त्यांनी समाजात भेद, दुफळी निर्माण केली होती. फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती होती. या जेवणावळींनी याला पायबंद बसला होता. यासाठी त्यांनी अशा जेवणावळींना विरोध केला. दुसऱ्याचे जेवण जेवल्याने आपण बाटतो. त्याचे पाईक होतो. असा समज त्यांनी पसरविला. आत्ताचे राज्यकर्त्येही नेमके याच भावनेचा फायदा घेत आहेत. निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या जेवणावळी सुरू होतात. या जेवणावळींनीच ते निवडणूक जिंकतात. निवडून आलेला नेता निवडणुकांनंतर दिलेल्या जेवणावळी मात्र वसूल करतो. असे हे अन्नदानाचे राजकारण केले जाते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. गरजूंना अन्न द्यावे त्यातून समाधान मिळते. आशीर्वाद मिळतात. पण त्याच्या गैरफायदा घेणे निश्‍चितच भूषणावह नाही. एका दिवसांच्या परान्नाने आपण काही त्याचे देणे लागत नाही. कोणी गैरफायदा घेत असेल तर अन्न खाऊनही त्याला विरोध केला जाऊ शकतो. इतका हक्क आपणास घटनेने दिला आहे.

Thursday, April 18, 2019

सत्यवादाचे तप





शक्ती प्रत्येक मानवाच्या ठिकाणी आहे. हेच सत्य आहे. फक्त हे सत्य त्याला पटवून द्यायचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्यामध्येच ते सत्य दडले आहे. ते सत्य जागृत करण्याचे तप आता तुला करायचे आहे. चला उठा जागे व्हा, सत्यवादाचे हे तप स्वतः स्वीकारा. याला फळ निश्‍चित येईल.
- राजेंद्र घोरपडे मोबाईल 9011087406

जिया सत्यवादाचें तप । वाचां केले बहुत कल्प ।
तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु ।। 32 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - महाराज, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पांपर्यंत केले, त्या तपाच्या फळाचे हे गीताव्याख्यानरूपी मोठे बेट तिला (माझ्या वाचेला) प्राप्त झाले.

सत्याचा आग्रह तो सत्याग्रह. स्वातंत्र्यपूर्व काळातील आंदोलनेही सत्यावर आधारित असायची. सत्य मेव जयते. सत्याचा नेहमी विजय होतो. यामुळेच ही आंदोलने इतिहासात अजरामर झाली. या आंदोलनांनीच अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीच्या विचाराने लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले. काहींनी देशासाठी प्राणही दिले. अनेकांच्या त्यागामुळेच देश स्वतंत्र झाला. पण आज या स्वातंत्र्यातही पारतंत्र्य असल्याचा भास होतो आहे. इंग्रज गेले आणि स्वकीय इंग्रजासारखे अत्याचार करू लागले. सहकारी संस्था भ्रष्टाचाराने देशोधडीला लागल्या आहेत. सरकारी कार्यालयात पैसे चारल्याशिवाय काम होत नाही. काम लवकर व्हावे सुरळीत व्हावे यासाठी सुशिक्षित मंडळीही पैसे देऊन काम करवून घेत आहेत. भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार झाला आहे. अशा या नव्या युगात आता पुन्हा एकदा सत्याग्रहाचा झेंडा फडकविण्याची गरज भासत आहे. पण हा झेंडा कोण फडकवणार? कारण फडकवणाऱ्यांच्यावरच जनतेला विश्‍वास राहिलेला नाही. आंदोलने होतात पण ती स्वतःच्या संस्था चालाव्यात यासाठी होत आहेत. राज्यकर्त्यांनीच उभे केलेले सत्याग्रही येथे आंदोलने करत आहेत. सत्याग्रही व्यक्तींचा बोलविता धनी वेगळाच आहे. काही सत्याग्रही तर आता पुन्हा राजकीय पक्ष स्थापन करत आहेत. त्यांनीही आता सत्याग्रह सोडून सत्तेचा आग्रह धरला आहे. इतिहासातही अशी पाने कित्येकदा लिहिली गेली आहेत. पण त्या प्रत्येकवेळी कोणी ना कोणी तरी वाली जन्माला आला आहे. कोणी तरी सम्राट झाला आहे. सत्याचा त्याचा लढा यशस्वी झाला आहे. अशा नैसर्गिक शक्तीमान जन्मन्याची गरज आता प्रत्येकाला वाटत आहे. पण खरे तर ही शक्ती प्रत्येक मानवाच्या ठिकाणी आहे. हेच सत्य आहे. फक्त हे सत्य त्याला पटवून द्यायचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्यामध्येच ते सत्य दडले आहे. ते सत्य जागृत करण्याचे तप आता तुला करायचे आहे. चला उठा जागे व्हा, सत्यवादाचे हे तप स्वतः स्वीकारा. याला फळ निश्‍चित येईल. आत्मज्ञानाच्या तलवारीने ही समस्त सृष्टी ब्रह्मज्ञानी करण्यासाठी तयार व्हा. याची सुरवात स्वतःपासूनच करा. स्वतः आत्मज्ञानी व्हा. इतरांनाही आत्मज्ञानी करा.

Monday, April 15, 2019

जिहीं ध्यानाचां डोळां पाहिलासी


ध्यानानंतर शरीराला जडत्व प्राप्त होते. शरीर थंडावते. म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्यात बोलण्यात फरक जाणवतो. इतर वेळी ती व्यक्ती चिडखोर असेल तर त्याचा चिडखोरपणा जाऊन त्याच्यामध्ये मृदुता, प्रेमभाव निर्माण झाल्याचे आढळते. त्याच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहू लागते. त्याच्या शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते.
- राजेंद्र घोरपडे, 9011087406


जिहीं ध्यानाचां डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी ।
जें उपसाहिलें तयांसी । तें आम्हांही करी ।। 29 ।। अध्याय 16

ओवीचा अर्थ - ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिलें व ज्या वेदादिकांच्या वाचेकडून तूं वर्णन केला गेला आहेस,त्यांचे अपराध जसे सहन केलेस तसे आमचेही करा.

ध्यानयोगी कसा असतो याचे वर्णन दिव्यामृतधारा या ग्रंथात परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर यांनी केले आहे. ते म्हणतात, ध्यानयोगी हा हठयोगाचाच मार्ग आहे. तथापि सुषुम्नामार्गे येणाऱ्या योग्याप्रमाणे दैवी सामर्थ्यलाभ होत नाही तर दैवी अवस्थानुभव उच्च भूमिकांचे ज्ञान हठयोगाप्रमाणे होत असते. हा जग व शरीर यांकडे ज्ञानयोग्याप्रमाणें दुर्लक्ष करीत नाही. तो जग विनाशी आहे असे मानत नसून ते महत्तत्त्वांत लीन होणारें आहे असे मानतो. देह सोडावा लागणार आहे. हे जरी जाणत असला तरी देहाचा-मनाचा- मुलभूत संबंध चित्तद्रव्यांशी आहे, असे तो जाणतो. देहाचा मनावर व मनाचा देहावर सतत परिणाम होते असे तो मानतो. म्हणून देहाची हेंडसाळ करणे त्याला पसंत नसते. तथापि हठयोगी जसा शरीरशास्त्रवेत्ता व नियंत्रक असू शकतो तसा ध्यानयोगी कधींच असूं शकत नाही. बाबा महाराजांनी केलेल्या या विवेचनावरून ध्यानामध्ये कोणत्या क्रिया शरीरात घडतात. याचा अभ्यास केल्यास देहावर मनाचा परिणाम सातत्याने होतो हे स्पष्ट होते. ध्यानानंतर शरीराला जडत्व प्राप्त होते. शरीर थंडावते. म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्यात बोलण्यात फरक जाणवतो. इतर वेळी ती व्यक्ती चिडखोर असेल तर त्याचा चिडखोरपणा जाऊन त्याच्यामध्ये मृदुता, प्रेमभाव निर्माण झाल्याचे आढळते. त्याच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहू लागते. त्याच्या शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते. धान्याने त्वचा तेजस्वी होते. ध्यानामध्ये पित्त जळाल्यानंतर या पित्तातून निर्माण होणारे विविध रसाने त्वचेला तेज येते. उतारवयातही त्वचा तेजस्वी दिसते. धान्याने मनाला येणारी शांती ध्यानयोग्याच्या शरीरावर परिणाम करते. याला शास्त्राचाही आधार आहे. शास्त्रानेही याला मान्यता दिली आहे. ध्यानकाळात शरीरात उत्पन्न होणारी विविध रसायने शरीरावर परिणाम करतात. ध्यानयोगी शरीराचा व मनाचा कसा संबंध आहे हे जाणतो. मन प्रसन्न असेल तर शरीर स्वास्थही चांगले राहाते. ध्यानाने मन प्रसन्न होते. याचा परिणाम शरीरावर होतो व स्वास्थ सुधारते. स्वास्थ राखण्यासाठी तरी ध्यानाची गरज आहे. पण ध्यान योग्य प्रकारे करायला हवे. चुकीच्या प्रकारे ध्यान केल्यास मनाला शांती मिळणार नाही. यामुळे शरीरस्वास्थ अधिकच बिघडण्याचा धोका असतो. यासाठी ध्यान योग्य प्रकारे करावे. यासाठी माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आमचे सर्व अपराध, चुका पोटात घेऊन आम्हाला माफ कर आणि आमच्याकडून योग्य प्रकारे साधना करून घे. आम्हाला आत्मज्ञानी कर.

Saturday, April 13, 2019

गीता





मोहाने ग्रस्त समाजास गीता हाच एक आधार आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानात मोह घालविण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी गीता समजावून घ्यायला हवी. ज्ञानेश्‍वरीतील एखादी ओवी तरी अनुभवायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे, 
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर 9011087406

तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया ।
परी आत्मज्ञानें आपणपयां । मिळिजे येथ ।।584।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें ही गीता जाणली असतां, मोह नाहीसा होतो यांत आश्‍चर्य काय आहे?, मोह तर जाईलच पण या गीतेच्या योगानें आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते.

भगवतगीता किंवा ज्ञानेश्‍वरी का वाचायची? त्यातील तत्त्वज्ञान जाणून घेण्याची गरज का आहे? हे तत्त्वज्ञान आपणास काय सांगते? काय देते? असे प्रश्‍न नव्या पिढीला पडणे स्वाभाविक आहे. कारण हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी प्रथम त्या मार्गावर जावे लागते. तशी मनाची मानसिक तयारी असावी लागते. हे तत्त्वज्ञान अनुभवातून शिकावे लागते. सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे तत्त्वज्ञान आत्मसात होते. सध्याच्या वेगवान जगात अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येचे महत्त्व सांगणे मुर्खपणाचेच ठरणारे आहे. झटपट निकाल मागणारी मंडळी या मार्गावर येणार तरी कशी हा मुळात मोठा प्रश्‍न आहे. नियोजन बद्ध, साचेबद्ध विचारसरणीमुळे अनेकांच्या जीवनात पैसा अमाप आला आहे. या पैशाने त्यांचे आयुष्य सुखकारक झाले आहे. आज इतके कमविले, उद्या तितके मिळतील नाही मिळाले तरी दुसऱ्या कामातून पैसा कसा मिळवता येतो. याचे गणित तयार असते. कधी कमी कधी जास्त असा हा प्रवास फारशी मनाला निराशा देत नाही. पण एकदा का यामध्ये निराशा शिरली की मग आत्महत्याचा मार्ग स्वीकारणारेही वाढत आहेत. अशा बदलत्या जीवनपद्धतीत थेट टोकाची भूमिका घेण्याचे प्रकारही वाढत आहेत. झटपट जीवनपद्धती जितकी चांगली आहे तितकीच ती धोकादायकही आहे. अशाने नैराश्‍येतून आत्महत्या या प्रकारात वाढ होत आहे. अध्यात्मात झटपट समाधान मिळत नसल्याने हा मार्ग स्वीकारण्यातही त्यांची मानसिकता नसते. असे मार्ग स्वीकारणे म्हणजे लाचारी पत्करणे अशी मानसिकताही झाली आहे. त्यातच आजकाल भोंदू साधूंचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या समस्यांचा फायदा उठवत त्यांना फसविणारेही अनेक भोंदू असल्याने विश्‍वास कोणावर ठेवावा हा सुद्धा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आत्मज्ञानी म्हणणारी मंडळीही गैरप्रकार करताना दिसत आहेत. राजकीय पाठबळाच्या जोरावर त्यांचे अनेक गैर उद्योग सुरू आहेत. अशा परिस्थितीत गीतेचे तत्त्वज्ञान नव्या पिढीला किती आवश्‍यक वाटणार, हा अभ्यासाचाच विषय होणार आहे. तरीही व्यक्तीची इच्छा-आकांक्षा याकडे ओढतेच. मोहाने ग्रस्त समाजास गीता हाच एक आधार आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानात मोह घालविण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी गीता समजावून घ्यायला हवी. ज्ञानेश्‍वरीतील एखादी ओवी तरी अनुभवायला हवी. यासाठीच या ग्रंथांची पारायणे करायची असतात. यातून आत्मज्ञानाचा सहज लाभ होऊ शकतो. त्याच्या प्राप्तीचा हा सोपा मार्ग आहे.

Friday, April 12, 2019

कृषी पर्यटन - उत्पन्नाचा नवा स्त्रोत






बदलत्या जीवन शैलीमध्ये पर्यटनाचे महत्त्व वाढत आहे. सध्याच्या धावपळ, धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. आठवड्याची सुट्टी शहरापासून दूर निवांत ठिकाणी घालविण्यावर भर दिला जात आहे. यातूनच ग्रामीण भागातील पर्यटनास महत्त्व प्राप्त झाले आहे. चैन म्हणून नव्हेतर गरज म्हणून आता पर्यटन केले जात आहे. यासाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पुणे, ठाणे, कोकण, नागपूर, सातारा या भागात कृषी पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कृषी पर्यटन आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाचे महत्त्व विचारात घेऊन देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे शक्‍य आहे.

- राजेंद्र घोरपडे
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर
मोबाईल 8999732685, 9011087406

रोमन कालकंखात कल्पनेचा उदय
कृषी पर्यटनाचा प्रारंभ हा मुख्यतः रोमन कालखंडात झाल्याचे आढळते. निवृत्त सैनिकांना उपजीविकेचे साधन म्हणून कसण्यासाठी शेती दिली जात असे. हे सैनिक शेतीसह ग्रामीण भागात व्यापारासाठी येणाऱ्या लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत असत. कालांतराने याकडे व्यवसाय म्हणून पाहीले जाऊ लागले. शहरातील लोक थकवा दूर करण्यासाठी ग्रामीण भागात येऊ लागले. यातूनच कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आली. शहरी लोक असे पर्यटन करणे पसंत करू लागले.

2005 नंतर महाराष्ट्रात कृषी पर्यटन विकास

शेतीचा काही भाग जाणीवपूर्वक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे म्हणजे कृषी पर्यटन. भारतात सर्वप्रथम 1970च्या दरम्यान बारामती येथे कृषितज्ज्ञ अप्पासाहेब पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृषी पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली. पण राज्यात 2005 नंतर खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनास चालना मिळाली. इंटरनेट आणि आयटीचा विकास झपाट्याने झाल्यानंतर आठवड्याची सुट्टी घालवण्यासाठी शहरातील नोकरदार लोक ग्रामीण भागात येऊ लागले. 2005 मध्ये फक्त दोनच कृषी पर्यटन केंद्रे होती. पण जसा शहरात औद्योगिक विकास झाला तसा ग्रामीण भागाकडे पर्यटन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढू लागला.
 

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास हे उद्दिष्ट समोर ठेवून 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाची (मार्ट) स्थापना करण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात कृषी पर्यटन ही नवी संकल्पना उदयाला आली. 2010 मध्ये राज्यात 80 कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत होती. पडिक जमिनीचा विकास व उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून याकडे पाहीले गेले. ग्रामीण निसर्ग सौंदर्य व संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने पर्यटनास चालना देण्यात आली. त्यामुळे 2013 मध्ये राज्यात 125 केंद्रे सुरु झाली. आता 2019 मध्ये ही संख्या 300 च्यावर गेली आहे. 

मार्टने भौगोलिक विचार करून कृषी पर्यटनाचे राज्यात सहा विभाग केले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात पर्यटन केंद्रांना भेडसावणाऱ्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या पाहणीनुसार 2014 मध्ये 4 लाख, 2015 मध्ये 5.3 लाख, 2016 मध्ये 7 लाख पर्यटकांनी कृषी पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या आहेत. यातून 358 लाख रुपये उत्पन्न शेतकरी कुटुंबांना मिळाले.

महाष्ट्रातील कृषी पर्यटनाचे सहा विभाग असे -
कोकण विभाग - मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग - पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर
नाशिक विभाग - नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगांव
औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड
अमरावती विभाग - अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ
नागपूर विभाग - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली.

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि समस्या -

1. कृषी पर्यटनासाठीचे शासनाचे धोरण अध्यापही कागदावरच आहे. कृषी पर्यटन केंद्र अशी स्वतःत्र शासन मान्यता नसल्याने या व्यवसायाच्या वाढीत अनेक अडथळे येतात.

2. कृषी पर्यटनासाठी वीज, पाणी, रस्ता, वाहतुकीची सोय या मुख्य गरजा आहेत. शासनाने या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुष्काळी पट्ट्यात पाण्याची कमतरता असल्याने तर कोकणातील अनेक दुर्गम भागात रस्ते, वाहतुकीची साधने नसल्याने पर्यटनाची केंद्रे उभारणे अशक्‍य झाले आहे; पण जेथे केंद्रे उभारणे शक्‍य आहे तेथे या प्राथमिक गरजा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

3. कृषी पर्यटन हे शेतीचा जोडधंदा म्हणून याकडे पाहिले जात नाही. अन्य व्यावसायिक धंद्याप्रमाणे यास नियम व अटी लावल्या जातात. हेच व्यवसाय वाढीस अडसर ठरत आहे. उदाहरणार्थ विजेचे बिल व्यावसायिक नियमाप्रमाणे आकारले जाते. मार्च ते मे व ऑक्‍टोंबर ते डिसेंबर असाच पर्यटन हंगाम असल्याने वर्षभर व्यावसायिक दराने वीजबिल भरावे लागते. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत वार्षिक उत्पन्न मिळत नाही.

4. परदेशी पर्यटकांना ग्रामीण भागात राहण्याची हौस असते. ग्रामीण संस्कृती पाहण्यासाठी असे पर्यटक कृषी पर्यटन केंद्रात येतात. पण ते आल्यानंतर संबंधित मालकास पी फॉर्म सादर करावा लागतो. ते आल्याची माहिती सरकारी दप्तरी द्यावी लागते. या माहितीचा हा फार्म भरण्यात ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. या फॉर्ममधील जाचक ठरणाऱ्या अटी दूर करण्याची गरज आहे.

5. कृषी पर्यटनासाठी कर्ज देण्यास बॅंकाचा नकार असतो. उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने बॅंका तयार होत नाहीत. कर्ज पुरवठ्यात अनेक जाचक अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. सवलती व अनुदानाचा लाभ व्हावा यासाठी जाचक अटी दूर कराव्यात.

6. अमरावती विभागात फक्त दिवसा पर्यटक येतात. रात्री राहण्यासाठी पर्यटक येत नाहीत. त्यामुळे येथे पर्यटनास मर्यादा आहेत. त्यामुळे या विभागात पर्यटन केंद्रांची संख्याही खूपच कमी पाहायला मिळते.

7. शेतीमधील अनेक उद्योग हे हंगामी आहेत. पर्यटकांना असे उद्योग आकर्षित करतात. कोकणात आबा प्रक्रिया, पश्‍चिम महाराष्ट्रात गुऱ्हाळघरे याचे आकर्षण पर्यटकांना असते; पण यातही अनेक अडचणी आहेत. उदाहणार्थ गुऱ्हाळ हे केवळ चार ते पाचच महिने असते. त्यातच अवेळी पाऊस पडला तर आठवडा - आठवडा गुऱ्हाळ बंद ठेवावे लागते. अशा कालावधीत काही पर्यटक आले तर त्यांना निराश होऊन परतावे लागते. अशा हंगामी व्यवसायामुळे कायमस्वरूपी पर्यटनाची जोड देण्यात मर्यादा आहेत.

8. पर्यटन केंद्रांवर काही चुकांमुळे छोटे मोठे अपघात घडू शकतात. पर्यटकांना मधमाशा, किडे, साप, विंचू, कुत्रा आदी चावण्याचा धोका असतो. पाळीव प्राणी माणसाळलेले असतात असे नाही. त्यांच्यापासूनही धोका असतो. केंद्र गावापासून दूर व जंगल परिसरात असल्यास वन्यप्राण्यांपासून धोका होऊ शकतो. वाळलेले गवत, चारा, गंज्या केंद्राच्या परिसरात असते. काही पर्यटकांना सिगारेट ओढण्याचा नाद असतो. अशातून आग लागण्याचे, वणवा पेटण्याचे प्रकारही घडू शकतात. पर्यटक शहरी असतात त्यामुळे त्यांना या गोष्टींचा धोका लक्षात येत नाही. बऱ्याचदा केंद्रावर हुल्लडबाजीसाठी, दंगामस्तीसाठीच पर्यटक येत असतात. शेतात फिरत असताना मधमाशांच्या पोळ्यांना दगड मारणे असे प्रकारही घडू शकतात. यातून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका अधिक असतो.

9. पर्यटक शहरी असल्याने त्यांना खेड्यातील बऱ्याच गोष्टींचा अंदाज नसतो. तलाव, विहीर, नदी दिसली की त्यामध्ये पोहण्यासाठी उतरणे. उत्साहाच्या भरात नकळत अनेक चुका पर्यटकांकडून घडत असतात. झाडावर चढणे असे प्रकारही पर्यटकांकडून घडतात. झाडावर चढण्याचा सराव नसतो तसेच मजबूत फांद्याही भाराने मोडण्याचे प्रकार घडतात यामुळे पडून छोटे मोठे अपघात होऊ शकतात. पोहण्यासाठी उतरल्यानंतर दुर्घटना घडण्याचा धोकाही असतो. उत्साहाच्या भरात पर्यटकांकडून घडणाऱ्या अशा घटना, पर्यटकांच्या या विविध सवयीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतात.

10. दुर्घटना घडल्यास तातडीने वैद्यकीय सेवा देणे अडचणीचे असते. ग्रामीण भागात दवाखाने, उपचार पद्धती तातडीने उपलब्ध होऊ शकत नाही. दळणवळणाचाही अभाव असतो. वाहनांची सुविधाही नसते.

11. बऱ्याचदा मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. इतकी गुंतवणूक करून व्यवसाय झालाच नाही तर याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यातच महसूलच्याही जाचक अटींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

कृषी पर्यटनातील संधी -

1. गावामधील एक पर्यटन केंद्र कमीत कमी 40 लोकांना रोजगार मिळवून देते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून याकडे पाहायला हवे.

2. व्यावसायिक वीज बिलापासून दूर राहण्यासाठी सौरऊर्जेचा पर्याय निवडता येणे शक्‍य आहे. पावसाळ्यातही चार्ज होणारे सोलर युनीट आता उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे वीज वापराचा अवाढव्य खर्च वाचविणे शक्‍य आहे.

3. शेतीमध्ये एखादी संकल्पना राबविली असेल तर पर्यटक ती पाहण्यासाठी जरूर केंद्रास भेट देतात. त्या संकल्पनेतून, त्या प्रयोगातूनच आपल्या पर्यटन केंद्राची ओळख पर्यटकांना व्हायला हवी. एका एकरात 100 पिके हा प्रयोग कणेरी येथील सिद्धगिरी मठाने केला आहे. पारंपरिक बियाणे वापरून सेंद्रिय उत्पादन यामध्ये घेतले आहे. हा प्रयोग शेतकरी पर्यटन केंद्रावर करू शकतात. या प्रयोगातून पर्यटकाच्या आवडीनिवडीनुसार ताज्या भाजीपाल्याची भाजी, उसाचा रस, कंदमुळे, विविध कडधान्याची भाजी आपण देऊ शकू. विशेष म्हणजे या प्रयोगात सेंद्रिय उत्पादन घेतले जाते. तसेच पारंपारिक बियाण्याचा वापर केला जातो. यामुळे पर्यटनासह पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही होऊ शकते. या सर्व पिकांची ओळखही पर्यटकांना करून देता येणे शक्‍य आहे. ताज्या भाजीपाल्याचा आस्वाद घेता आल्याने शहरी पर्यटकही निश्‍चितच आकर्षित होऊ शकतात.

4. शेतीमधील कोणताही एखादा विषय निवडून तो विषय वैशिष्ट्यपूर्णरित्या विकसित करायचा. त्याचे प्रदर्शन, मांडणी योग्य प्रकारे करायची यातूनही कृषी पर्यटनास चांगले उत्पन्न मिळू शकते. उदाहरणार्थ शेतामध्ये आपण वाडा बांधला किंवा आहे ते घर विकसित केले. त्याच्या आजुबाजुला केळी, आंबा, हळद अशी बागायती विकसित करायची. तसेच त्यावरील प्रक्रिया उद्योगही सुरू करायचा व या उद्योगाचे प्रशिक्षण येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून द्यायचे.

5. कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरातील पाहण्यासारखी ठिकाणे मंदीरे, डोंगर, पठारे यांची सैर पर्यटकांना घडवायची. ग्रामीण भागात पक्षी निरीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकते. पक्षी पर्यटन केंद्रात यावेत यासाठी पक्षांना खाद्य व पाणी साठे व घरटी याची सुविधा करायची. पक्षी संवर्धनासाठी योग्य उपाययोजना करून आपल्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती सांगणारे फलक उभारून पर्यटकांना त्यांच्या सहवास घडवायचा.

6. नक्षत्र गार्डन ही संकल्पनाही राबविता येणे शक्‍य आहे. 27 नक्षत्रे आणि देवता व त्यांचे वृक्ष अशी कल्पना मांडून उद्यान विकास प्रकल्प उभा करायचा. आवडत्या नक्षत्राच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी, वृक्षाच्या छायेत साधना, ध्यान-धारणा करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकते. तसेच बोटॅनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ वृक्षाचे संवर्धन करून त्यांची तोंड ओळख पर्यटकांना करून देता येऊ शकते. अशा गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात.

7. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव पर्यटकांना घेता यावा असे उपक्रम, साधने उपलब्ध करून देता येऊ शकतात. उदाहरणार्थ या, राहा, स्वतःचे जेवण ग्रामीण पद्धतीने स्वतः करा. जात्यावर पीठ दळा, त्या पीठाच्या भाकरी चुलीवर करा. पाटा-वरवंट्याने मिरच्या वाटा व त्याचा खर्डा तयार करा, झुणका भाकरीचा आस्वाद घ्या. आमराईत, द्राक्षबागेत, फळबागेत स्वतःच्या हाताने फळे तोडा. त्याचा आस्वाद घ्या, गोठ्यामध्ये जनावरांना चारा घाला, जनावरांच्या अंगावर हात फिरवा, दुध काढा, ताजे दुध प्या, मक्‍याच्या शेतात जा आणि मका आणून तो भाजून खा. अशा सोयी पर्यटकांना देता येऊ शकतात.

8. उन्हाळ्यात उकाडा असह्य होतो. अशा वेळी दुपारच्या वेळी शेतातील डेरेदार वृक्षाच्या सावलीत विसावा घेण्याचा आनंद पर्यटकांना देता येऊ शकतो. या झाडाखाली बांबू हाऊस किंवा गवताची झोपडी बांधून त्यामध्ये राहण्याचा आनंदही पर्यटकांना उपलब्ध करून देता येणे शक्‍य आहे. शहरातील उकाड्यात झोप लागत नाही पण दुपारच्यावेळी डेरेदार वृक्षाच्या सावलीत पडल्या पडल्या झोप लागते. असे निसर्गाचे अनुभव पर्यटकांना देऊन निसर्गाबद्दल त्यांची ओढ, जिव्हाळा वाढविणे शक्‍य आहे.

9. पारंपरिक खेळ, मल्लखांब, साहसी खेळ, विटी दांडू, लेझीम, धनगरी नृत्य, आदिवासी नृत्य, लोकगीते, भजन, घोड सवारी, बैलगाडी सवारी, तलावात बोटींग, फिशिंग, आपपासच्या जगंलात, डोंगरमाथ्यावर पर्यटन, सूर्योदय पॉईंट, सूर्यास्त पॉईंट, चांदणे भोजन, निसर्गाच्या सानिध्यात सहवास अशा विविध सोयी पर्यटन वाढीसाठी करणे शक्‍य आहे.

10. आपआपल्या भागातील ग्रामीण जीवन व जेवणाचा आस्वाद पर्यटकांसाठी आनंददायी ठरू शकतो. जेवणाच्या स्वादावरही पर्यटक आकर्षित होऊ शकतात.

11. वर्षा पर्यटनाचीही जोड कृषी पर्यटनास देता येऊ शकते. कोकण तसेच पश्‍चिम घाटात चिखल पेरणी, धबधब्यात आंघोळ, डोंगरमाथ्यावर पर्यटन असे पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकतात.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे शक्‍य -

1. मराठवाडा, विदर्भात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हुरडा पार्टी तर पुणे व नाशिक विभागात वांग्याच्या भरीत पार्टी होऊ शकते. कोकणात पावट्याच्या, भुईमुगाच्या शेंगाचा लोटा लावणे पद्धत आहे. या खाद्यपदार्थाची पार्टी जानेवारी ते मार्च दरम्यान होऊ शकते. कोकणात मार्चनंतर आंबा, फणस रानमेव्याचा हंगाम येतो या काळात आमरस पार्टी, रानमेवा पार्टी असे उपक्रम राबविणे शक्‍य आहे. विदर्भात संत्रा रस पार्टीचे आयोजनही शक्‍य आहे.

2. तसेच काही सण-उत्सव विचारात घेऊन त्या काळात खाद्य महोत्सव घेणे शक्‍य आहे. उदाहरणार्थ कोजागिरी पौर्णिमेला दूध पार्टी, होळीच्या वेळी पुरणपोळी पार्टी आदी, तसेच केळीचे उत्पादक शिकरण पार्टी, आंबा बागायतदार आमरस पार्टी आदी करू शकतात.

3. कृषी पर्यटन केंद्रांत टोमॅटो, स्वीटकॉर्नचे घेऊन त्याचे विविध पदार्थ पर्यटकांसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात. टोमॅटो सुप, स्वीटकॉर्न सूप असे पदार्थही पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकतात. विशेष म्हणजे हे पदार्थ शेतातच पिकवलेले असल्याने ताजे व त्वरित शिजवल्याने ते चविष्टही असतात. अशी विविध पिकांची उत्पादने घेऊन त्यांचे विविध पदार्थ पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्यास आपल्या केंद्राची ओळख त्या पदार्थावरून होऊ शकते.

शेतीतील उत्पन्नास आलेली मर्यादा विचारात घेता शेतीपूरक व्यवसायांना चालणा देणे आता गरजेचे झाले आहे. नैसर्गिक डोंगर, दऱ्या खोऱ्यात वसलेली गावे, गड-किल्ल्यांचा परिसर, निसर्ग रम्य पठारे, वनसंपदा, सागरी किनारा, धार्मिक स्थळातील कलाकुसर अशी विविध संपन्नता लाभली आहे. यासाठीच महाराष्ट्रात कृषी पर्यटन वाढीसाठी भरपूर संधी आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे. त्यातले 45.2 टक्के लोक हे शहरांत राहतात. यातील 73 टक्के जनता ही ग्रामीण भागात पर्यटनास जाऊ इच्छिते. यामुळे कृषी पर्यटन व्यवसायास वाढीस भरपूर वाव आहे. अगदी थोड्या जागेत कमीत कमी गुंतवणुकीत शेतकरी पर्यटन उद्योग सुरू करू शकतो. कृषी पर्यटनामुळे कृषी आणि सेवा ही दोन क्षेत्रे एकमेकाशी जोडली जाऊ शकतात. शेतमाल उत्पादनांना बाजारपेठही मिळू शकते. यातून रोजगार, ग्रामीण विकास, संस्कृती संवर्धन होऊ शकेल. शहरातील पैसा ग्रामीण भागात येऊ लागल्याने विकासाचा समतोलही राखला जाईल.

Thursday, April 11, 2019

मृगजळ





आत्मा आणि देह वेगळा आहे. तरीही आपण ते एकच आहे असे समजतो. अनुभवही आला तरीही आपण जागृत होत नाही. पण वारंवार याबाबत सतर्कता राहावी यासाठी ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये ही गोष्ट वेगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगितली आहे.
- राजेंद्र घोरपडे, 8999732685, 9011087406


कां रश्‍मी हन मृगजळा । पासूनि बहुवें अर्जुना ।
जागणें जैसे आना । बोधाचेंचि ।।530 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - अथवा अर्जुना, सूर्यकिरणें व मृगजळ यांहून सूर्यमंडळ जसें फारच फार वेगळें आहे. त्याप्रमाणे हा उत्तम पुरूष मागील दोन पुरूषांहून फारच फार निराळा आहे.

उन्हाळ्यात वाळलेले गवत दुरून पाहिले असता तेथे पाण्यासारखे दिसते. प्रत्यक्षात हा भास असतो. तेथे पाणी नसते. रस्त्यावरही बऱ्याचदा पाणी पडले आहे असे वाटते पण, उन्हाच्या किरणांनी तसा भास आपणास होत असतो. प्रत्यक्षात जे नाही त्याच्या मागे धावणे हा मुर्खपणा आहे. आपल्या नजरेला भास होतो. आपण मात्र या गोष्टी खऱ्या आहेत असेच जाणून चालतो. प्रत्यक्ष जीवनातही आपण अशा गोष्टींना फसतो. आपण समजत एक असतो आणि असते मात्र दुसरेच. असे कित्येकदा घडते. मृगजळाच्या आशेने आपण त्याच्यामागे धावत राहातो. ते आत्ता सापडेल मग सापडेल पण ते काही हाती येत नाही. धावून धावून आपणाला मात्र थकवा निश्‍चित येतो. जीवन जगताना अशी अवस्था होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. जागरूक रहायला हवे. जीवनात अशी मृगजळ दाखवणारी माणसे पावलोपावली असतात. येथे पैसा गुंतवा दाम दुप्पट करून देऊ. असे सांगून पैसा गोळा करणारी अनेक मंडळी फसवतात. आपण मात्र दुप्पट पैसा देतील या आशेने अशा गोष्टींच्या आहारी जातो. सर्वसामान्यच नव्हे तर गर्भश्रीमंतही यात फसतात. चार पैसे कमवायला शिका म्हणजे तुम्हाला पैशाचे मोल समजते. असा सल्ला आपणाला आईवडिलांकडून बऱ्याचदा ऐकायला मिळतो. पैसा कमवत नाही तो पर्यंत तरी हे बोल ऐकावेच लागतात. पण आईवडील सांगत असलेल्या ह्या गोष्टी किती सत्य आहेत हे आपणास आपण स्वतः पैसे कमवायला लागल्यानंतर लक्षात येतात. हाच संस्कार आपण आपल्या मुलांवर करतो. जीवनात अनुभव आल्यानंतरच जागरूकता येते. अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही हे यासाठीच म्हटले जात असावे. ठेच लागल्याशिवाय सुधारणा होत नाही हेही तितकेच खरे आहे. एकदा ठेच लागल्यानंतर दुसऱ्यांदा अशी चूक होणार नाही याची काळजी आपण घ्यायला शिकले पाहिजे. अन्यथा आपण आयुष्यभर अशाच ठेचा खात राहणार. सुधारणा कधीच होणार नाही. एकदा सांगितले आत्मा आणि देह वेगळा आहे. तरीही आपण ते एकच आहे असे समजतो. अनुभवही आला तरीही आपण जागृत होत नाही. पण वारंवार याबाबत सतर्कता राहावी यासाठी ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये ही गोष्ट वेगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. शिष्य जागा व्हावा, शहाणा व्हावा. या त्यामागचा उद्देश आहे. अनुभवातूनच शिकायचे आहे. मृगजळ आहे हे एकदा समजले की पुन्हा डोळ्याला तसा भास होणार नाही. यासाठी जागरूक राहायला हवे. अनुभवातूनच अनुभूती येते. अनुभूतीतुनच आत्मज्ञान प्राप्ती होते.

Tuesday, April 9, 2019

वैराग्य



संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल - 8999732685

तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दडवितां । पाठीं लागे ।। 39 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें या सर्व संसाराला अनित्यता आहे, असें ज्या वेळेला कळेल, त्यावेळी वैराग्याला घालवून दिलें तरी, तें वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागें लागेल.

मासे जसे पाण्याबाहेर काढल्यानंतर जिवंत राहण्यासाठी तडफडतात. तसे मनुष्य जगण्यासाठी तडफडत आहे. हे सर्वसामान्यांचे जीवन पाहून सम्राट अशोकाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. साम्राज्याचा त्याग त्याने केला. मिळालेले ऐश्‍वर्य त्यागने ही तितकी सोपी गोष्ट नाही. आरामात जीवन जगताना असे वैराग्य उत्पन्न होणे तितकी सहज घटना नाही. पुढे हा सम्राट गौतम बुद्ध झाला. मुंबईतील लोकलची गर्दी पाहून रेल्वे स्थानकावरूनच एखाद्या खेडूताने गावचा रस्ता पकडला. त्यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही. मुंबई, पुणे अशा शहरातील जीवन हे असे धावपळीचे आहे. गावाकडे कष्टाचे जीवन असले तरी अशी धावपळ नसते. त्यात एक शांती असते. समाधान असते. शेतात राबल्यानंतर दुपारची भाकरी खाऊन झाडाखाली निवांत पडले असता गाढ झोप लागते. शहरात असे होत नाही. पण शहराला सोडणे हा त्याग म्हणता येणार नाही? ही तेथील जीवनाची दगदग पाहून केलेली पळवाट आहे. हा संन्यास ही होत नाही. हे वैराग्य तर निश्‍चितच नव्हे. कामावरून आले तरी घरात शांतता नसते. एकतर सतत टीव्ही सुरू असतो. आपल्या घरात सुरू नसला तरी शेजाऱ्यांचा आवाज आपणास त्रास देत असतो. शांत पडावे म्हटले, तरी पडता येत नाही. तरीही आपण ते जीवन जगतो. त्याचा आनंद उपभोगत असतो. पूर्वीच्या काळीही नगरातील जीवन हे असेच धावपळीचे होते. जगण्यासाठी धडपड होती. संसार म्हटले की चिंता ह्या आल्याच. मुलांची चिंता, आई-वडिलांची चिंता, स्वतःची चिंता. काही ना काही चिंतेचा विषय जरूर असतोच. कोणी आजारी असेल तर त्याची चिंता. स्वतः आजारी असलो, तर स्वतःची चिंता. मन सतत अशाने विचलित होत राहाते. काहींना हा विचार इतका मनाला लागतो की ते या संसाराचा त्याग करतात. खरंतर घरच्या कटकटीतून बाहेर पडावे यासाठी संसाराचा त्याग म्हणजे पळवाट आहे. संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता असतेच. यासाठी कष्ट हे करावेच लागतात. हिमालयात गेला तर फक्त वातावरण बदलते इतकाच काय तो बदल होतो. मग घरदार सोडण्याचा फायदा काय? हिमालयात जाऊन जे करणार ते घरात राहूनही करू शकतोच ना? संसारात राहूनही सन्यस्थ जीवन जगता येते. त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. संसार होत असतो तो करावा लागत नाही. परमार्थ मात्र करावा लागतो. दैनंदिन कामकाज हे प्रत्येकालाच करावे लागते. राजा असला तरी त्याला त्याचे काम करावेच लागते. रंकात राहात असणारा नागरिकालाही काम हे करावे लागते. ते टाळता येणे शक्‍य नाही. ही दैनंदिन गरज आहे. अमाप संपत्ती असली तरी ती सांभाळण्याचे काम तरी त्याला करावेच लागते ना? हे काम आपोआप होत असते. संसारातील अनित्यता जो ओळखतो तो काही न करता परमार्थाच्या वाटेवर येतो.

मोहरूपी महारोग





मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मन सतत समाधानी राहावे अशी सवय लावायला हवी. मन समाधानी असेल तर मोह होत नाही. जे मिळते ते त्यांच्या कृपेने मिळते, त्यांच्या आर्शिवादाने मिळते. अशी समर्पनाची भावना अध्यात्मात यासाठीच निर्माण केली गेली आहे. मन समाधानी राहावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

तरी कृपाळू तो तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
फिटो । महारोगु ।। 412।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - तरी तो कृपाळू श्रीकृष्णपरमात्मा संतुष्ट होवो आणि या धृतराष्ट्रास हा आत्मानात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो. आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो.

ैसमाधान नसल्यास मोह वाढतो. एखाद्या गोष्टीने मन तृप्त व्हायला हवे. संतुष्ट व्हायला हवे. अमुक इतका पगार वाढला. आणखी वाढ हवी होती. मिळाली नाही. त्यात समाधान झाले नाही, तर पैसा कमविण्याचे इतर मार्ग शोधण्याकडे कल वाढतो. मनाप्रमाणे पैसा मिळत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. पैसा हा कमवायलाच हवा. पगारवाढ ही प्रत्येक कर्मचाऱ्याचा आवडता विषय आहे. पगार वाढत नाही म्हणून पैसा कमविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब योग्य नाही. पैसा चांगल्या मार्गाने पैसा कमविला जात असेल तर ठीक आहे. पण एकदा का गैरमार्गाने पैसा कमविण्याचा मोह लागला तर तो स्वतःचे आयुष्यही संपवू शकतो. चांगल्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागते. पण वाईट गोष्टीची सवय लगेच लागते. हा सर्वांत मोठा धोका आहे. वाईटाच्या संगतीत चांगलाही बिघडतो. तो तंबाखू खातो. आपणही जरा खाऊन पाहावी. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा ती खाण्याचा मोह होतो. नंतर ती पुढे सवयच लागते. धृतराष्टाला दुर्योधनाला महासत्ता बनविण्याचा मोह होता. इतरांपेक्षा तो श्रेष्ठ ठरावा यासाठी तो इतरांवर छलकपट करायचा. इतर अनेकजण त्याच्या मुलापेक्षा श्रेष्ठ आहेत हे ध्रुतराष्टाच्या मनाला कधी पटलेच नाही. मोहाने तो इतका आंधळा झाला होता. मोह असावा पण आंधळे होण्यापर्यंत मोह नसावा. तंबाखूने कर्करोग झाला तरीही तंबाखू खाण्याचा मोह सुटत नाही. त्यात समोर मृत्यू असूनही मोहाने तो त्याला दिसत नाही. इतके अंधत्व येते. मोह हा असा महाभयंकर रोग आहे. रोग झाला तर तो बरा करण्यासाठी औषध घ्यावे लागते. असाध्यरोग झाला तरी तो बरा होण्यासाठी औषध घेतले जाते. मोहाच्या महारोगावर औषध आहे. विवेकाने वागणे, सात्त्विक वृत्ती वाढविणे हे मोहाच्या रोगावर औषध आहे. मनात विवेक जागा राहावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मन सतत समाधानी राहावे अशी सवय लावायला हवी. मन समाधानी असेल तर मोह होत नाही. जे मिळते ते त्यांच्या कृपेने मिळते, त्यांच्या आर्शिवादाने मिळते. अशी समर्पनाची भावना अध्यात्मात यासाठीच निर्माण केली गेली आहे. मन समाधानी राहावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. अशा विचारांनी मोहापासून मन दूर जाते. मनाला मोहच होत नाही. मोहाच्या महारोगावर हे जालीम औषध आहे.

Saturday, April 6, 2019

अहं



हे माझे, हे मी कमविले, हे माझ्यामुळे झाले. असे म्हणत मेल्यानंतर ते काही आपल्या बरोबर येत नाही. चांगले काम केले तर पुढच्या पिढीत त्याची स्तुती होत राहाते. पण वाईट काम केले तर कोणी नावही काढत नाही. शेवटी काय उरते. नावच ना?
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685, 9011087406


पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिंमाचळीं ।
न्याहाळीं । अंह तैसें ।। 385।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे, त्याप्रमाणे तूं आपला मीपणा माझ्या ठिकाणी पाहा.

हिमालयात सर्वत्र बर्फच बर्फ आहे. तेथे बर्फाचे पर्वत आहेत. बर्फाचा पर्वत काय आणि एखादा बर्फाचा कण काय हे दोन्हीही एकच आहेत. दोन्हीमध्ये पाणीच आहे. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की एखादा गर्भ श्रीमंत आणि रस्त्यावरचा भिकारी दोघेही माणूसच आहेत. दोघांमध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. श्रीमंत झाला म्हणजे आत्मा काही वेगळा होत नाही. गरीब असला म्हणून काय त्याचा आत्मा छोटा असतं नाही. आत्मा हा सारखाच आहे. लहान-मोठा असा भेद तेथे नाही. अहंपणा म्हणजे मी पणा, अहंकार. मी कोण आहे? मी श्रीमंत आहे. मी गरीब आहे. मी पंडित आहे. मी ज्ञानी आहे. मी अडाणी आहे. मी खेडवळ आहे. मी सुधारलेला आहे. हा मी नेमका कोण आहे? मी गरीबही असू शकतो मी श्रीमंतही असू शकतो. गरिबाची दुःखे वेगळी. श्रीमंताची दुःखे वेगळी. अति श्रीमंत झाला म्हणून काही त्याला दुःखे नसतात असे होत नाही. चोराच्या भीतीने अनेक श्रीमंताना झोप येत नाही. गरीब मात्र कष्टाची भाकरी खाऊन निवांत, गाढ झोपी जातो. त्याला चोरीची भीतीच नसते. प्रत्येकाची सुख-दुःखे वेगळी आहेत. पण श्रीमंत आहे म्हणून श्रीमंतीचा अहंकार नसावा. गरीब आहे म्हणून गरिबीचे दुःख नसावे. सदैव समाधानी राहण्याचा प्रयत्न करायला हवा. अहंकारी माणसाला त्याचा अहंकारच मारतो. मी मोठा, मी मोठा, माझ्या सारखा कोणीच नाही. असे म्हणत तो केव्हा छोटा होतो याचे भानही त्याला राहात नाही. हे माझे, हे मी कमविले, हे माझ्यामुळे झाले. असे म्हणत मेल्यानंतर ते काही आपल्या बरोबर येत नाही. चांगले काम केले तर पुढच्या पिढीत त्याची स्तुती होत राहाते. पण वाईट काम केले तर कोणी नावही काढत नाही. शेवटी काय उरते. नावच ना? पण चांगले काम केले तरच तेच राहाते. वाईट काम केले तर सदैव त्याच्या नावाने शंख फोडला जातो. चार कामे करा. पण ती चांगली करा. त्याचा सदैव चांगला बोलबाला होत राहावा. असे ते काम असावे. थोर व्यक्तींची नावे पिढ्यांनी पिढ्या काढली जातात. त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श नेहमीच पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरतो. सद्‌गुरू परंपराही पिढ्यांनी पिढ्या चालत आली आहे. संतांची नावे आजही अमर आहेत. आदीनाथांपासूनची ही परंपरा आजही आहे. अहंकार असावा पण कशाचा स्वतःलाच स्वतःमध्ये पाहण्याचा अहंकार असावा. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा अहंकार असावा. मी आत्मा आहे. ठराविक नावाच्या देहात हा आत्मा आहे. नावे देहाला आहेत. आत्माला नाव नाही. सद्‌गुरूंच्यामध्ये असणारा आत्मा व माझ्यामधील आत्मा हा एकच आहे. सद्‌गुरू हेच ज्ञान देतात आणि आत्मज्ञानी करतात.