Friday, January 11, 2019

त्यागाची भावना म्हणजे संन्यास

   
 
  आत्मज्ञान हे सद्‌गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पिडा करण्याची गरज नाही. केवळ क्षणभर स्मरणानेही कृपा होऊ शकते. फक्त त्यात भक्तीचा भाव असावा. यासाठी प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.                           - राजेंद्र घोरपडे     मोबाईल 9011087406
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।। 20 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 5 वा

ओवीचा अर्थ - आणि ज्यांच्या अंतःकरणामध्यें मी आणि माझे यांचे स्मरणच राहिलें नाहीं, अर्जुना, तो सदोदित सन्यासीच आहे, असे तूं जाण.

संन्यास म्हणजे घरदार सोडायचे. एकांतात जाऊन भगवंताचे स्मरण करायचे. हिमालयात, जंगलात जायचे असाच समज आहे. बारा वर्षांचे तप केल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होते असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात किती संन्यासी आत्मज्ञानी झाले आहेत. अनेकांनी संन्यास घेतला, पण आत्मज्ञानाचा लाभ एखाद्यालाच झाला किंवा तेही घडत नाही. असे का? आज भारतात अनेक थोर संतांचे मठ आहेत. तेथेही आत्मज्ञान प्राप्तीसाठी शिक्षण दिले जाते. अनेकजण घरा-दाराचा त्याग करून तेथे जातात. पण तेथेही एखाद्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होतो किंवा तेही नाही. असे का घडते? कारण आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणाऱ्या गोष्टीचा त्यांनी संन्यासच केला नाही. आत्मज्ञान प्राप्तीमध्ये घरदार सोडणे म्हणजे संन्यास होत नाही. यासाठीच आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक गोष्टींचा अभ्यास प्रथम करायला हवा. मी पणाच गेला नाही तर घरदार सोडूनही आत्मज्ञान होत नाही. स्वतःतील मीचा विसर हाच खरा संन्यास आहे. हे मी केले. हे माझ्यामुळे झाले. हा मी पणा, हा अहंकार सोडायला हवा. त्याचा त्याग करायला हवा. हे सोडण्यासाठी घरदार, संसार सोडण्याची गरज नाही. बारा वर्षांच्या संसार त्यागाने जे प्राप्त झाले नाही, ते मी पणा सोडण्याने केवळ एका क्षणात प्राप्त होऊ शकते. बारा वर्षांच्या तपाने ज्ञान प्राप्त होऊ शकते. काही मठामध्ये दहा- बारा वर्षांच्या तपानंतर आचार्य, संत अशी पदवी दिली जाते. पण हे पुस्तकी, पंडिती ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे. अशी आचार्य प्राप्त व्यक्ती आत्मज्ञानी असेलच असे नाही. हे ज्ञान सद्‌गुरूंच्या कृपार्शिवादाने प्राप्त होते. यासाठी सद्‌गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. ज्ञानेश्‍वरीमध्ये संसार करता करताही परमार्थ साधता येतो. असा मार्ग सांगितला आहे. संसारात राहूनही मोक्ष मिळविण्याचा मार्ग सांगितला आहे. मी पणा ज्याने सोडला तो खरा सन्याशी. यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. आत्मज्ञान हे सद्‌गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पिडा करण्याची गरज नाही. केवळ क्षणभर स्मरणानेही कृपा होऊ शकते. फक्त त्यात भक्तीचा भाव असावा. यासाठी प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हे सर्व कार्य भगवंत आपणाकडून करवून घेतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. असा विचार प्रकट व्हायला हवा. तशी समर्पणाची, त्यागाची भावना मनात उत्पन्न व्हायला हवी. ही त्यागाची, समर्पणाची भावना म्हणजेच संन्यास.