Thursday, July 26, 2018

जागृती


सायंकाळची वेळ होती. रामू कृषी पदवीधर होऊन गावाकडे परतला होता. एस.टी.तून उतरताना त्याचा मित्र सुनिल त्याला भेटला.
काय रे राम्या, कसं येण झालं ? गावकडची आठवण बिठवण कशी काय आली ? 
अरे सुनिल, खूप गावाची खूप आठवण येते रे. सह्याद्रीच्या डोंगरकपारीत वसलेलं आपुला हा गाव खूपच सुंदर आहे रे. येथून जाण्याची इच्छाच होत नाही. तु कसा आहेस ? 
"बरा आहे. पण काय र समदा बदलाईस बर का? आवाजात सुद्धा शहरी बाज आलाय तुझा. पण काय रे समद्या सामानासह तू कसा काय परतलाय?'
"अरे माझे शिक्षण पूर्ण झाले. आता मी कृषी पदवीधर झालो आहे. वाटत आता गावाच्या विकासातच लक्ष घालाव. गावातील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान शिकवाव व प्रगतीशील शेतकरी बनवाव'
" अर पण तु गावात राहून करणार काय? सगळी शिकल्याली पोर शहराकडे जायची भाषा करतात. त्यासाठी आईबापाशी भांडतात. अन तू शिकून इथ येऊन गावात या खोपटात बसतान मांडणार?'
" हो, मी इथेच येणार गावातील आपल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आहे. फळबाग लागवड, पोल्ट्री उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग उभे करणार आहे.'
"बरं बाबा मी चलतो. आपण उद्या चावडीच्या पारावर भेटू'
बऱ्यांच दिवसांनी रामू आपल्या गावच्या वाड्यात प्रवेश करतो. रामूचे वडील शाळेत मुख्याद्यापक आहेत. पण कामानिमित्त ते बाहेरगावीच असतात. आठवड्यातून घरी येतात. आई घरकाम पाहात शेती पाहाते. 
दुसऱ्या दिवशी रामू गावच्या चावडीच्या पारावर जातो. सगळी शेतकरी मंडळी नेहमी प्रमाणे राजकिय गप्पात रंगलेली असतात. वृत्तपत्राची पाने चाळत त्यांच्या राजकिय गप्पा अधिकच रंगत असतात. 
"काय पाव्हन, कनच्या गावच'
" आबा, तुम्ही ओळखल नाही मला. मी मुख्याद्यापकांचा मुलगा'
" आरं, रामू किती मोठा झालास. वळखलाच नाहीस किंर. कसा आहीस. बर चाललय नव्ह'
"हो ठिक चाललय. आबा आपल्या गावात सोसायटी होती ना?'
" हो व्हती बाबा पण समद बंद पडलय आता. कर्जाच्या ओझ्यान सगळ बुडाल. मधमाशापालनाचा व्यवसायही गेल्या तीन चार वर्षापासून बंद पडलाल. समद राजकारणात बुडाल रे"
"काय म्हणता काय?'
"तू त्यात पडू नक बाबा शाहण्याच काम नव्ह ते. ते समद घाणेरड राजकारण हाय. समद्यांची वाट लागलीया. पतसंस्था बुडाली. त्यात गोरगरीबांची पुंजी अडकलीया'
हे ऐकून रामू नाराज होतो. गावाचा फेर मारण्यासाठी आणि गावात आणखी काय बदल झालेत हे पाहण्यासाठी तेथून बाहेर पडतो. 
दुसऱ्या दिवशी रामू असाच गावचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. गाव कामगार पाटलाच्या लिंबूच्या बागेत त्याला लोकांची गर्दी दिसली. गर्दी कसली जमली आहे या उत्सूकतेने तो तेथे गेला. पण त्यांने पाहीले की लिंबावरील "लिफ मायनर' या किडीची पुजा गावकरी करीत आहेत. यामध्ये गावातील प्रतिष्ठीत सुशिक्षित महिलाही आहेत. हे पाहून तो आश्‍चर्यचकीत झाला. 
"काय कसली पुजा चालली आहे.'
" अरं रामू पाटलांच्या लिंबावर नागाच्या छटा उमटल्यात. त्याची पुजा चाललीया'
रामू हे पाहून हसू लागला. त्यांने गावकऱ्यांना ही पानावरील किड असल्याचे समजाविण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी त्यालाचा खुळ्यात काढले. 
"अहो, माझ समजून घ्या. ही किड लिंबूवर्गीय फळझाडाची नंबर एकची शत्रू आहे. या किडीची अळी कोवळी पाने पोखरून पानातील हरितद्रव्य खात पुढे जाते. त्यामुळे तिच्यामागे पानावर पारदर्शक नागमोडी पोखरलेली चंदेरी पट्टे पडत जातात. यालाच तुम्ही नागछटा म्हणून पुजा करत आहात. ही सगळी अंधश्रद्धा आहे.'
पण गावकऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. अशा घटनांना रामू नाराज झाला. त्यांने गाव सोडून शहरात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांना समजावणे तितके सोपे नाही. असे त्याला वाटते. जाताना तो गावच्या चावडीच्या फळावर या किडीबाबत माहिती मात्र लिहीतो.
पानातील हरितद्रव्य हे झाडाचे अन्न तयार करण्याचे मूळ साधन आहे. तेच ही किड खावून नाहीसे करते. त्यामुळे किड लागलेली पाने आकाराने लहान होतात व चुरगळली जातात. पाने आखडतात. सुकतात. गळून पडतात. झाडाची वाढ खुंटते. असा मजकूर तो फलकावर लिहीतो.
काही दिवसांनी गावकामगार पाटलाची बाग सुकल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येते. रामू सांगत होता. ते खरे आहे. हे लक्षात येते. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. व रामूला गावात बोलावून घेता. 
रामू आता गावात सुधारणा करू लागला आहे. पाण्याची समस्या त्याने सोडवली आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ केली आहे. फळावर प्रक्रिया करणारे उद्योग त्यांने सहकारातून उभारले आहेत. आज तो गावातील एकटाच प्रगतशील शेतकरी नाही तर सारा गावच त्यांने प्रगतशील शेतकऱ्यांचा केला आहे.