Thursday, May 3, 2018

आत्मज्ञानाचा लढा

अर्जुना तुझें चित्त । जऱ्ही जाहलें द्रवीभूत ।
तऱ्ही हे अनुचित । संग्रामसमयीं ।। 183 ।। अध्याय 2 रा


ओवीचा अर्थ - अर्जुना, तुझे चित्त जरी दयेनें विरघळून गेले, तरी तें तसें होणें या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही.

जगात स्वयंघोषित महाराज गल्लोगल्ली आढळतात. जनता सुद्धा त्यांच्या नादात फसते. राजकीय नेतही अशा महाराजांच्या आश्रयाला असतात. जे खरे संत असतात. ते आत्मज्ञानी असतात. ते स्वतःला कधीच महाराज म्हणवून घेत नाहीत किंवा तसल्या फंदातही पडत नाहीत. ते कर्माने संत होतात. कर्मच त्यांना हे देवत्व देते. यासाठी त्या कर्माला महत्त्व आहे. हे कर्म कर असे सद्‌गुरू शिष्याला शिकवतो व शिष्याला गुरुपदावर नेऊन ठेवतो. हीच परंपरा आजपर्यंत अध्यात्मात सुरू आहे. सद्‌गुरू झाल्यानंतर असे आत्मज्ञानी शिष्य घडविणे हेच त्यांचे कर्म असते. शिष्याला तो यासाठी प्रेरित करत असतो. हा लढा देण्यासाठी शिष्याला तो प्रोत्साहित करत असतो. हा युद्धाचा प्रसंग आहे. अशावेळी अनेक आमिषे, मोह माया यांचा मारा होत असतो. त्यातून या शिष्याला सावरण्याचा, त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला सद्‌गुरू हे देत असतात. बाहेर पडणे म्हणजे मनाने या गोष्टीबाबत विरक्त होणे. पाय जमिनीवर ठेवून वागणे. सत्कर्म करत राहणे. सौजन्य पाळणे. पण हे सहज शक्‍य होत नाही. यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. मनाचा दृढ निश्‍चय करावा लागतो. चूक प्रत्येकाकडून होत असते. पण ती सुधारता येणे गरजेचे आहे. सुधारत राहणे यातच खरी प्रगती आहे. सद्‌गुरू ही सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिष्याची प्रगती हेच गुरूचे आद्य कर्तव्य असते.

शिष्याच्या मनात सुधारणा घडवणे. त्याच्या बोलण्यात, वागण्यात सौजन्य उत्पन्न करणे हेच त्यांचे ध्येय असते. मनाला बळकटी सद्‌गुरू देत असतात. भोंदू साधू हे करत नाहीत. शिष्यांचे शोषण हेच त्यांचे ध्येय असते. पण जनता येथेच फसते. गुरू कसा असावा हे यासाठीच समजून घेणे गरजेचे आहे. गुरू कोणाला करावे? गुरू कोणाला म्हणावे? आध्यात्मिक गुरूचे कर्तव्य काय आहे. हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी गुरू आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या शिष्याच्या शोधात असतात. यासाठी त्यांचा संग्राम सुरू असतो. यासाठी त्यांनी चळवळ उभी केलेली असते. तेच कर्म ते करत असतात. मादुगरी मागूण स्वतःची ही चळवळ ते पुढे नेत असतात. समाजाला ज्ञानी करणे, समाज जागृत करणे हेच त्यांचे कर्म असते. समाजाची स्वच्छता, मनाची स्वच्छता ते घडवत असतात. मन स्वच्छ असेल तर त्यात उत्पन्न होणारे विचारही स्वच्छ असतात. अशा स्वच्छ विचारांनी, आचारांनी शिष्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू असते. अशा शिष्यास आत्मज्ञानाच्या वाटा सापडतात. तो ठेवा तो सर्वोच्च आनंद त्याला प्राप्त होतो. यासाठी त्याचा हा लढा सुरू असतो.