Saturday, March 25, 2017

मातीच्या कलाकृतींनी दिली सुमनताईंना वेगळी ओळख

कोल्हापूर शहरातील सुमन बारामतीकर यांनी महिला बचत गटाची स्थापना केली. पापड-लोणची, चटणी मसाले या नेहमीच्या उद्योगापेक्षा काहीतरी वेगळा उद्योग असावा, या उद्देशाने मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू तयार करून विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेल्या बारा वर्षांत त्यांनी या उद्योगात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.
राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरातील सुमन चंद्रकांत बारामतीकर यांनी घरकामानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळात स्वतःचा काही लघू उद्योग असावा, या उद्देशाने २००४ मध्ये वरद महिला बचत गट सुरू केला. शिवणकाम, पापड-लोणची, चटणी-मसाले निर्मितीवर महिला बचत गटांचा भर असतो. मात्र, यापेक्षा वेगळे उत्पादन असले पाहिजे असे सुमनताईंना नेहमीच वाटायचे. पण कशाचे उत्पादन करायचे? हा विचार त्यांना नेहमीच सतावत होता. याच काळात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेमध्ये चहा पिण्यासाठी मातीचे कुल्हड वापरण्यावर भर दिला होता. मातीचे कुल्हड तयार करण्यासाठी रेल्वेने महिला बचत गटांनाही प्रोत्साहन दिले. रेल्वेच्या आश्‍वासनाचा सकारात्मक दृष्टीने विचार करून सुमनताईंनी मातीचे कुल्हड करण्याचा निर्णय घेतला.
सुमनताईंचे दीर यशोवर्धन बारामतीकर हे खादी ग्रामोद्योगमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार सुमनताईंनी खानापूर (जि. बेळगाव) येथे खादी ग्रामोद्योग केंद्राच्या कार्यालयामार्फत मातीपासून कुल्हड तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. कच्चा मालाची उपलब्धता विचारात घेऊन त्यांनी खानापूर येथेच भाडेतत्त्वावर जागा घेऊन कुल्हड उत्पादन सुरू केले; पण काही दिवसांतच रेल्वेने कुल्हडची मागणी बंद केली. त्यामुळे तयार कुल्हड विकायचे कोठे? असा प्रश्‍न सुमनताईंना पडला. हे कुल्हड भांडी म्हणूनही वापरता येऊ शकतात, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी दही भांडी म्हणून त्याची विक्री सुरुरू केली. ग्राहकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुमनताईंचा उत्साह वाढला. त्यामुळे त्यांनी मातीपासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचे ठरवले.


लघुउद्योगाला सुरवात ः


सुमनताईंनी गार्डन पॉट (झाडे लावायच्या कुंड्या) तसेच शोपीस प्रकारामध्ये घंटा, अगरबत्ती स्टॅंड, पेन स्टॅंड, ग्लास, मुखवटे, भातुकलीचा सेट, विविध आकाराचे गणपती, महादेवाची पिंड, वाद्य वाजविणाऱ्या कलाकरांचा सेट, विविध प्रकारचे कॉर्नर पॉट, फुलदाण्या तसेच स्वयंपाक घरात लागणारी विविध आकारांतील दही भांडी, पाण्याचे ग्लास, माठ, मातीचा फिल्टर, मातीची बाटली, दीपावलीनिमित्त दिवे, पणत्यांचे विविध प्रकार आदी उत्पादनांची खानापूर येथे निर्मिती सुरू केली. यासाठी पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली. विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी सुमनताईंनी वीस हजार रुपयांचे इलेक्‍ट्रीक व्हील खरेदी केले. सोबत प्रशिक्षित कारागीर घेतले. मातीची भांडी भाजण्यासाठी सध्या त्या लाकडी भट्टीचा वापर करतात.
वस्तूनिर्मितीबाबत सुमनताई म्हणाल्या, की वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे सहज उपलब्ध होत असल्याने तेथेच उत्पादने घेण्याचा निर्णय घेतला. उत्पादनासाठी मुख्य गरज असते ती मातीची. शोपीससाठी लाल माती, चिकण माती, गाळाची माती व पांढरी माती (शाडू) लागते. स्वयंपाकाच्या भांड्यासाठी लाल माती, चिकण माती, रेती लागते. भट्टीसाठी लाकडे लागतात. बाजारपेठेच्या मागणीनुसारच वस्तू तयार केल्या जातात. दर महिन्याला स्वयंपाकाची भांडी अंदाजे ५०० नग, दह्याची भांडी अंदाजे एक हजार नग, शोपीसचे विविध प्रकार अंदाजे एक हजार नग इतकी निर्मिती केली जाते.
सुमनताईंनी सहा महिला कामगार आणि चार पुरुष कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. यांना वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच सुमनताई स्वतः वस्तू तयार करतात. माती कालवणे, उत्पादनानुसार मातीचे मिश्रण तयार करणे आणि भट्टीसाठी पुरुष कामगार लागतात; परंतु महिला, पुरुष असा फरक न करता वस्तूंच्या नगावर कामगारांचा पगार ठरविला आहे. नियमित काम असतेच असे नाही. तसेच निर्मिती करताना बराच माल वाया जातो. काही वस्तू व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. मातीच्या वस्तू असल्याने फुटण्याचा धोका अधिक असतो. हे सर्व टाळण्यासाठी कामगारांना चांगल्या नगाच्या उत्पादनावरच पगार दिला जातो. विविध प्रकारानुसार नगाला ८ ते १२ रुपये कामगारांना देण्यात येतात.

स्वयंसिद्धा, भीमथडीतून वस्तूंची विक्री ः

उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी सुमनताईंना बचत गटाचा मोठा आधार मिळाला. सुमनताईंचे माहेर वडणगे (जि. कोल्हापूर) असल्याने त्यांनी तेथील यशस्वी महिला बचत गटात त्या सहभागी आहेत. जिल्हा परिषदेमार्फत भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनातून विविध वस्तूंच्या विक्रीला व्यासपीठ मिळाले. वर्षातील दहा महिने प्रदर्शनात विक्री होते. सुमनताईंना मुख्य आधार मिळाला तो कोल्हापुरातील स्वयंसिद्धा या संस्थेचा. या संस्थेमार्फत विविध ठिकाणी मोठी प्रर्दशने भरविण्यात येतात. या प्रदर्शनात स्टॉल मांडून विविध वस्तूंची विक्री सुमनताई स्वतः करतात. विविध उत्पादनांची विक्री कशी करावी, यासाठी ग्राहकांशी कसे बोलायचे, कसा व्यवहार करायचा आदीचे मार्गदर्शन स्वयंसिद्धाने त्यांना दिले. याचा त्यांना मोठा फायदा झाला. पुणे येथे भीमथडी जत्रा भरविण्यात येते. या चार दिवसांच्या जत्रेमध्ये विविध वस्तूंची सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याचे सुमनताई सांगतात. याव्यतिरिक्त खादी ग्रामोद्योग प्रदर्शने, माणदेशी जत्रा तसेच पुणे, सातारा, मुंबई, ठाणे येथे भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उत्पादनांची विक्री सुमनताई करतात. ९५ टक्के मालाची विक्री प्रदर्शनातूनच होते. महिन्याला अंदाजे साठ हजार रुपयांची उलाढाल होते. विविध वस्तूंचे उत्पादन व वाहतूक, कारागिरांचा पगार, इतर खर्च वजा जाता सुमनताईंना महिन्याला पंचवीस हजार रुपये शिल्लक राहतात.

घरच्यांचेही प्रोत्साहन

प्रदर्शनासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी जावे लागते. सततचा प्रवास आणि वाहतूक यामुळे या कामात घरच्यांचा सुमनताईंना मोठा आधार मिळतो. सुमनताईंचे पती चंद्रकांत, मुलगी रूपाली, भाऊ सयाजीराव घोरपडे यांचे सहकार्य लाभते. त्यांच्या सहकार्यामुळेच व प्रोत्साहनामुळे या कामात यश मिळाल्याचे सुमनताई सांगतात. उपक्रमशीलतेची दखल घेत सुमनताईंना स्वयंसिद्धा संस्था आणि भीमथडी जत्रेतर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

संपर्क ः सुमन बारामतीकर ः ९२२५५१६१९६


Thursday, March 16, 2017

धान्यातील आर्द्रता मोजणारा मापक

ज्वारी, गहू, भात आदी तृणधान्ये कापणीनंतर उन्हामध्ये वाळवली जातात. पूर्वीच्या काळी माळावर मळणी व वाळवण चालायचे; पण सध्या जागेचा अभाव असल्याने धान्य योग्य प्रकारे वाळवले जात नाही. अशा बदलत्या परिस्थितीमुळे धान्य खराब होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धान्याची साठवणूकही करण्यासाठी पूर्वीच्या काळी हौद, कणग्या यांचा वापर केला जात होता; पण सध्या पोत्यामध्ये धान्य साठवण्यात येते. धान्यामध्ये प्रमाणापेक्षा अधिक ओलावा राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच विशिष्ट प्रकारच्या बुरशीही त्यावर वाढतात. या प्रकारामुळे हे धान्य खराब होत आहे. हा प्रश्‍न फक्त भारतातच आहे असे नाही, तर जगभर ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जगभरातील कृषी विद्यापीठांत यावर संशोधन केले जात आहे. कॅन्सस विद्यापीठ आणि कृषी संशोधन सेवा यांच्या गटाने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी विकसित केलेल्या उपकरणामुळे जवळपास 30 टक्के धान्य खराब होण्यापासून वाचण्यास मदत झाली आहे. कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ पॉल आर्मस्ट्रॉंग आणि कॅन्सस विद्यापीठाच्या संशोधकांनी धान्याच्या पोत्यातील आर्द्रता मोजणारे उपकरण विकसित केले आहे. शेतकऱ्यांना सहजपणे हाताळता येऊ शकेल, असे हे उपकरण आहे. हे उपकरण धान्यातील सापेक्ष आर्द्रता आणि तापमान मोजते व त्यावरून धान्यातील ओलाव्याचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. या उपकरणास जोडलेली सेन्सर नळी थेट पोत्यामध्ये खुपसण्यात येते. यावरून सहा मिनिटांमध्ये त्या पोत्यातील धान्यात किती ओलावा आहे हे स्क्रीनवर दिसते. सध्या हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर इथोपिया, बांगलादेश आणि ग्वाटेमाला या देशांतील शेतकऱ्यांना वितरित केले आहे. हे उपकरण वापरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आर्मस्ट्रॉंग व त्यांचे सहकारी विचारत घेत आहेत. या उपकरणात वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची क्षमता वाढविणे, सहा मिनिटांचा लागणारा कालावधी कमी करणे, स्मार्ट फोनशी हे उपकरण जोडणे आदीवर त्यांचे संशोधन सुरू आहे.

Saturday, March 4, 2017

एबीपीमाझाचे आभार

ऎबीपी माझा तर्फे कोल्हापूरातील सयाजी हाॅटेलमध्ये आयोजित रिइनव्हेंट महाराष्ट्रा ए टेक्नाॅलाॅजी या विषयाच्या सेमीनारमध्ये आज सहभागी होण्याची संधी मिळाली. माझ्या श्री अथर्व प्रकाशनकडून मी सहभागी झालो होतो. कोल्हापूरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते. आपणही एक संस्था चालवतो. याची जाणिव कधी मला झालीच नाही. पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करताना या व्यवसायात मी नवे तंत्र पुरेपुर वापरले. नोकरी करत हा व्यवसाय करताना खरंतर तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच मला प्रोत्साहन मिळाले. खरचं किती सोपे झाले आहे काम याची जाणिव या सेमिनारमुळे झाली. खरंतर प्रथम विश्वासच वाटत नव्हता आपण एक उद्योजकही आहोत याचा...पुस्तक प्रकाशित करणे हे एक आव्हान असते आणि ते खपवणे हे त्याहूनही कठीण काम असते पण हे आव्हान आपण स्वीकारले. त्यात यशही मिळाले साहित्यिक संस्थांचे पुरस्कारही मिळाले. इतके यश आपण मिळवले हजारो-हजारो प्रती खपवून आपण नावही कमावले हे कधी वाटलेही नाही पण या सेमिनारने मला त्याची जाणिव दिली. नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन धंदा आणखी वाढविण्याची उमेद माझ्यात जागी केली. यासाठी संयोजकांचे आभार जरुर मानायला हवेत. एचपीचेही आभार कारण त्यांच्या तंत्रज्ञानानेच आपण हे यश मिळवले आहे. डेलीहंटसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाची साथ तर आहेच. पण याची जाणिव झाली नवी उमेद माझ्यात जागी झाली यासाठी एबीपीमाझाचे आभार जरुर मानायला हवेत...