Thursday, March 16, 2017

धान्यातील आर्द्रता मोजणारा मापक

ज्वारी, गहू, भात आदी तृणधान्ये कापणीनंतर उन्हामध्ये वाळवली जातात. पूर्वीच्या काळी माळावर मळणी व वाळवण चालायचे; पण सध्या जागेचा अभाव असल्याने धान्य योग्य प्रकारे वाळवले जात नाही. अशा बदलत्या परिस्थितीमुळे धान्य खराब होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धान्याची साठवणूकही करण्यासाठी पूर्वीच्या काळी हौद, कणग्या यांचा वापर केला जात होता; पण सध्या पोत्यामध्ये धान्य साठवण्यात येते. धान्यामध्ये प्रमाणापेक्षा अधिक ओलावा राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच विशिष्ट प्रकारच्या बुरशीही त्यावर वाढतात. या प्रकारामुळे हे धान्य खराब होत आहे. हा प्रश्‍न फक्त भारतातच आहे असे नाही, तर जगभर ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जगभरातील कृषी विद्यापीठांत यावर संशोधन केले जात आहे. कॅन्सस विद्यापीठ आणि कृषी संशोधन सेवा यांच्या गटाने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी विकसित केलेल्या उपकरणामुळे जवळपास 30 टक्के धान्य खराब होण्यापासून वाचण्यास मदत झाली आहे. कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ पॉल आर्मस्ट्रॉंग आणि कॅन्सस विद्यापीठाच्या संशोधकांनी धान्याच्या पोत्यातील आर्द्रता मोजणारे उपकरण विकसित केले आहे. शेतकऱ्यांना सहजपणे हाताळता येऊ शकेल, असे हे उपकरण आहे. हे उपकरण धान्यातील सापेक्ष आर्द्रता आणि तापमान मोजते व त्यावरून धान्यातील ओलाव्याचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. या उपकरणास जोडलेली सेन्सर नळी थेट पोत्यामध्ये खुपसण्यात येते. यावरून सहा मिनिटांमध्ये त्या पोत्यातील धान्यात किती ओलावा आहे हे स्क्रीनवर दिसते. सध्या हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर इथोपिया, बांगलादेश आणि ग्वाटेमाला या देशांतील शेतकऱ्यांना वितरित केले आहे. हे उपकरण वापरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आर्मस्ट्रॉंग व त्यांचे सहकारी विचारत घेत आहेत. या उपकरणात वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची क्षमता वाढविणे, सहा मिनिटांचा लागणारा कालावधी कमी करणे, स्मार्ट फोनशी हे उपकरण जोडणे आदीवर त्यांचे संशोधन सुरू आहे.