Thursday, August 8, 2013

केळी व्यवस्थापनातून 31 महिन्यांत तीन पिके

केळीच्या काटेकोर व्यवस्थापनातून साधली 31 महिन्यांत तीन पिके


उसाचे प्राबल्य असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात केळीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. अंबप (ता. हातकणंगले) येथील प्रदीप साळोखे हे गेल्या सात वर्षांपासून केळीची लागवड करत असून, विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 30 महिन्यांत केळीची लावण, खोडवा, निडवा घेतात. यांची योग्य वेळ साधल्याने केळीनंतर सुरू उसाची लागवड करणे शक्‍य होते.

राजेंद्र घोरपडे

अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील प्रदीप साळोखे यांची वडिलोपार्जित 25 एकर शेती आहे. प्रदीप यांनी पदवीनंतर पशुधन सुपरवायझर (एलएसएस)चा अभ्यासक्रम पूर्ण करून काही काळ नोकरी केली; मात्र 1991 मध्ये त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या शेतीमध्ये दहा एकर ऊस, सव्वादोन एकर केळी, पाच एकर सोयाबीन, दीड एकर आंबा ही पिके आहेत. त्यांच्याकडे पंधरा जनावरे असून जनावरांसाठी अर्धा एकर मका, कडवळ आदी चाऱ्याची पिकेही ते करतात. या सर्व पिकांमध्ये येणाऱ्या अडचणींसाठी विविध तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेत बदल करतात. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी मंचामध्येही ते सदस्य आहेत.

पिकाची निवड करताना...

पिकाची निवड करताना त्याची बाजारपेठेत काय स्थिती आहे हे पाहणे गरजेचे आहे, असे प्रदीप यांना वाटते. यासाठी प्रथम त्या पिकाचे राज्यातील क्षेत्र किती आहे, यंदा किती क्षेत्रावर याची लागवड होण्याची शक्‍यता आहे, त्यासंदर्भात बियाण्याची विक्री किती झाली आहे, ही विक्री या हंगामात किती होण्याची शक्‍यता आहे, त्यानुसार बाजारपेठेत या पिकास किती वाव आहे याची माहिती ते बियाणे कंपन्यांच्या ऍग्रोनॉमिस्टकडून जाणून घेतात. या माहितीच्या आधारे ते पिकाची निवड करतात, त्याचे क्षेत्र किती ठेवायचे हे ठरवितात. गेल्या सात वर्षांपासून प्रदीप केळीची लागवड करत आहेत. यंदा प्रदीप यांनी केळीची निवड करताना कृषी विभाग, कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ, टिश्‍यूकल्चर लॅब, बियाणे कंपन्यांतील ऍग्रोनॉमिस्ट, ठिबक सिंचन कंपन्यांतील व्यक्तींकडून पिकाबाबत आढावा घेतला. यंदा उन्हाळ्यात राज्यात दुष्काळी स्थिती होती, त्यामुळे रोपांसाठी करण्यात आलेल्या नोंदणीच्या प्रमाणात त्यांची विक्री झाली नसल्याची माहिती तज्ज्ञांकडून प्रदीप यांना मिळाली. त्यातच रावेर, जळगाव, हिंगोलीमध्ये गारपीट झाल्याने तेथे केळीचे मोठे नुकसान झाले. यंदा सरासरीपेक्षा बऱ्याच प्रमाणात केळीचे क्षेत्र घटले असल्याचीही माहिती मिळाल्याने प्रदीप यांनी नेहमीप्रमाणे एक एकरावर केळीची लागवड न करता सव्वादोन एकरांवर केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

केळीची लागवड

लागवडीची पद्धत ः जोड ओळ पद्धत
रोपांतील अंतर ः दोन ओळींतील अंतर 4.50 फूट, दोन पट्ट्यांतील अंतर नऊ फूट, दोन रोपांतील अंतर पाच फूट (झिगझॅग पद्धतीने लागवड)
केळीची जात ः जी 9





31 महिन्यांत केळीची तीन पिके
केळीची लावण, खोडवा, निडवा अशी तीन पिके साधारणपणे 36 ते 40 महिन्यांत येतात; पण योग्य व्यवस्थापनाने ही तीनही पिके केवळ 30 ते 31 महिन्यांत घेणे शक्‍य आहे. या पद्धतीत
केळीच्या रोपांची लावण ही एप्रिलमध्ये केली जाते. यामुळे दहा- अकराव्या महिन्यात घड काढणीसाठी तयार होतात. म्हणजे पहिल्या वर्षी काढणी ही मार्चमध्ये होते. या अगोदर एक महिना म्हणजे फेब्रुवारीमध्येच खोडव्याचे व्यवस्थापन केले जाते. खोडवा पीक हेसुद्धा दहा- अकराव्या महिन्यात काढणीस येते. जानेवारीत खोडव्याची काढणी होते. त्याअगोदर एक महिना म्हणजे डिसेंबरमध्येच निडव्यासाठी मुंडवे ठेवले जातात. याची काढणी पुन्हा अकरा महिन्यानंतर म्हणजे साहजिकच ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये काढणी होते. म्हणजे अवघ्या 30 ते 31 महिन्यांत केळीची तीन पिके होतात.

खोडवा- निडवा व्यवस्थापन
- मागील वर्षी झिगझॅग पद्धतीने रोपे न लावल्यामुळे मुंडव्यांची वाढ होण्यामध्ये थोडीशी अडचण आली, त्यामुळे एक महिना अधिक लागल्याचे प्रमोद यांनी सांगितले. या वर्षी झिगझॅग पद्धतीने रोपे लावल्याने तो एक महिना वाचू शकेल. 31 महिन्यांऐवजी 30 महिन्यांत तीन पिके घेण्यासाठी ते काटेकोर प्रयत्न करत आहेत.
- पट्टा पद्धतीमध्ये दोन पट्ट्यांतील अंतर नऊ फूट ठेवण्यात येते. रिकाम्या जागेकडे झाड कलण्याचा गुणधर्म असल्यामुळे घड लागल्यानंतर केळीचे झाड हे नऊ फुटांच्या पट्ट्याकडे कलते.
- साहजिकच साडेचार फुटांच्या अंतरावरील दोन ओळींमध्ये भरपूर सूर्यप्रकाश पोचू शकतो, याचाच फायदा घेत घड काढणीस येण्याच्या अगोदर एक ते दीड महिना खोडव्या- निडव्यासाठी मुंडवे ठेवण्यात येतात.
- जोमदार वाढलेले, बुंधा जाड असणारे, तलवारीसारखी पाने असणारे मुंडवे मुख्यतः खोडव्या- निडव्यासाठी ठेवण्यात येतात.
- घडाच्या विरुद्ध दिशेचा मुंडवा खोडव्या- निडव्यासाठी ठेवला जातो.
- घडाची व केळीच्या झाडाची कापणी होते तेव्हा खोडवा- निडवा हा एक ते दीड महिन्याचा असतो, यामुळे या पद्धतीत पिकाचा कालावधी हा कमी केला जातो.

केळीनंतर सुरू ऊस लागवड
नोव्हेंबरमध्ये काढणी झालेल्या शेतामध्ये सुरू उसाची लावण केली जाते. हा ऊस पुन्हा अकरा महिन्यांत कापणीसाठी येतो. नेहमीच्या केळी लागवडीमध्ये केळीचा निडवा हा जूनमध्ये काढणीसाठी येतो. यामुळे नेहमीच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीत आणखी एक पैसा देणारे पीक घेता येणे शक्‍य होते. प्रदीप यांना उसाचे उत्पादन एकरी 60 टनांपर्यंत मिळाले.

केळीचे अर्थशास्त्र ः
पहिल्या वर्षी लावणीसाठी प्रदीप यांना एकरी एक लाख 20 हजार रुपये खर्च आला. तीन ते चार काढणीमध्ये त्यांना एकरी 40 टन उत्पादन मिळाले. टनाला सरासरी 12 हजार रुपये इतका दर त्यांना मिळाला. खर्च वजा जाता तीन लाख साठ हजार रुपये उत्पन्न मिळाले. खोडवे व निडव्यासाठी साधारणपणे एक लाख रुपये खर्च आला. अनुक्रमे एकरी 32- 35 टन उत्पादन मिळाले.

घड काढणी खर्चातही बचत
केळीचे घड काढण्यासाठी टनाला पाचशे रुपये घेतले जातात; पण पट्टा पद्धतीमुळे शेतामध्ये ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह नेता येत असल्याने जागेवरच काढणी केली जाते. नऊ फुटांच्या जागेत ट्रॅक्‍टर सहजपणे नेता येतो. काढणी उत्तमप्रकारे होते. यामध्ये घड मोडण्याचे प्रमाणही कमी असते. साहजिकच मालाची प्रत सुधारते. दरामध्ये याचा फायदा होतो. या पद्धतीत काढणीचा खर्च टनाला शंभर रुपये इतका येतो.

केळीत कोथिंबीर आंतरपीक
कोल्हापुरातील बाजारपेठेत 20 मेनंतर जूनच्या अखेरीपर्यंत कोथिंबिरीस चांगला दर मिळत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रदीप यांनी केळीच्या पिकात 30 गुंठे क्षेत्रामध्ये कोथिंबिरीची लागवड केली होती. एकरी दोन किलो धने त्यांना लागले. त्यांना 18 हजार रुपये कोथिंबिरीतून मिळाले.

प्रदीप यांच्या केळीची वैशिष्ट्ये ः
- 30-32 महिन्यांत तीन पिके ते घेतात. या पद्धतीने त्यांचे हे दुसरे केळी पीक आहे. कमी कालावधीत अधिकाधिक पिके व उत्पन्न.
- आधारासाठी बांबूऐवजी बेल्टचा वापर. एक बेल्ट साधारणपणे तीन- चार वर्षे टिकत असल्याने खर्चात बचत.
- काढणीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर केल्याने खर्चात बचत.
- केळीच्या कापणीनंतर लगेचच सुरू उसाची लागवड.
- केळीमध्ये आंतरपिकांतूनही उत्पन्न.

................
प्रदीप शंकरराव साळोखे, 9403781148