Monday, October 29, 2012

एकाग्रता मनाची



अर्जुना तुझे चित्त । जऱ्ही जाहले द्रवीभूत ।

तऱ्ही हें अनुचित । संग्रामसमयीं ।।



रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग..सीमेवर लढणाऱ्या शिपायाची हीच अवस्था असते. सदैव त्यांना सतर्क राहावे लागते. कोठून गोळी येईल याचा नेम नाही. डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. डोळा जराही लागला तरी काहीही घडू शकते. सतर्कता ठेवावी लागते. जो झोपला, तो संपला. हे जसे सीमेवर पहारा देणाऱ्या शिपायाचे जीवन आहे तसे प्रत्येकाच्या जीवनातही अशी जागरूकता असावी लागते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागते. गाडी मारणाऱ्या चालकाचा ताबा सुटला तर अपघात घडू शकतो. प्रत्येकाने त्याच्या जीवनात सतर्कता ठेवावी लागते. यासाठीच साधना आहे. ही सतर्कता, जागरूकता ध्यानातून येते. मानसाच्या मनाला यामुळे उभारी मिळते. मन प्रसन्न राहते. सतर्क राहण्यासाठी प्रसन्न असणे गरजेचे आहे. मनाला जर गंज चढला तर तो उतरविणे महा कठिण असते. यासाठी मनाला गंज येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. गंज येऊ नये यासाठी वस्तूला तेल, ग्रीस लावावे लागते. तसेच मनाचे आहे. मनाला गंज येऊ नये यासाठी मन चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवावे लागते. मनाला शांतता ही गरजेची आहे. ध्यानामध्ये मन रमले तर मनाला आनंद मिळतो. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकाग्रतेने मन विचलित होत नाही. मनाला या गोष्टीची सवय लागली तर मनाची प्रसन्नता कायम राहाते. सदैव मन आनंदी ठेवावे. राग, द्वेष, मत्सर, लोभ नसावा. मन प्रसन्न ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. दैनंदिन जीवनात असे वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला तर प्रत्येकाचे जीवन आनंदाने फुलून जाईल. यासाठी तसे विचार आत्मसात करावे लागतील. विचाराने माणसात बदल घडतो. मनात प्रसन्नतेचा विचार घुसला तर बदल निश्‍चितच घडेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मन खचू देता कामा नये. ते प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहिले तर जीवनात सहज विजय संपादन करता येऊ शकतो. यासाठीच ध्यान धारणा आहेत.





Saturday, October 13, 2012

जन्म लावा सार्थकी

जन्म लावा सार्थकी



ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे ।

हे जन्ममरण तैसे । अनिवार जगीं ।।



जन्माला आल्यानंतर त्याला मरण हे आहेत. प्रत्येक सजिव वस्तूचा हा गुणधर्म आहे. वयोमानानुसार त्याची रुपेही बदलणार. ते बदलणे मानवाच्या हातात नाही. हे बाह्यगुण आहेत. सूर्य उगवताना सुंदर दिसतो. मनाला मोहून टाकणारा प्रकाश त्याच्यातून ओसंडून वाहत असतो. त्याच्या ह्या सौदर्यांने मन प्रसन्न होते. लहान मुलेही असेच मनाला आनंद देतात.ती हवीहवीशी वाटतात. त्यांच्यासोबत बागडताना मनाचा थकवा दूर होतो.पण जसजसा दिवस वर येऊ लागतो तसे त्याची धगही जाणवू लागते. उन्हाळ्यात सूर्याची धग असह्य होते. मानवाचेही तसेच आहे. जसेजसे त्याचे वय वाढेल तसे त्याचा प्रपंच वाढत राहातो. अनेक गोष्टीचा त्रास वाढतो. पण त्या सहन कराव्या लागतात. उन्हाची धगही आवश्‍यकच आहे. यामध्ये अनेक कीड, रोग नष्ट होतात. पण ही धग ठराविक मर्यादेतच हवी. तसेच मानवाचे आहे. मानवाच्या रागात अनेकांची मने दुखावली जातात. यासाठी रागाची धग किती असावी यालाही मर्यादा आहेत. यासाठी नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा. मन नेहमी आनंदी ठेवायला हवे. धग किती असावी याचे नियंत्रण आपल्या मनावर अवलंबून आहे.या धगीत दुसऱ्याला त्रास होणार नाही अशी मृदुता असायला हवी. तरच आपण नेहमी आनंदी राहु शकू. मनाला तशी सवय लावून घ्यायला हवी. मनाला एकदा जर याची सवय झाली तर सारे जीवनच आनंदी होऊन जाईल. आपल्या वागण्याचा इतरावरही प्रभाव पडेल. असे वागणे नेहमीच फायद्याचे ठरू शकेल. मृत्यूनंतरही आपली आठवण इतरांच्या हद्‌ययात कायम राहील. झालेला जन्म यामुळे निश्‍चितच सार्थकी लागेल.



राजेंद्र घोरपडे

Monday, October 8, 2012

साखर कारखाने स्वयंपूर्ण व्हावेत


राज्यात 202 नोंदणीकृत साखर कारखाने आहेत. पण यामध्ये जवळपास 30 ते 40 टक्के सहकारी साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेले हे कारखाने बंद का ? याचा विचार होणार का? यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यामुळे शहराकडे वाढणारे लोंढे कमी होतील. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकडे सरकारने विचार करायला हवा.



40 टक्के कारखाने तोट्यात

उत्पादन सुरु असलेल्या साखर कारखान्यांची संख्या 2010 मध्ये 110 होती. पण यामधील 40 कारखाने हे तोट्यात होते. 2011 मध्ये 123 साखर कारखान्यात उत्पादन करण्यात आले. तेव्हा यातील 48 साखर कारखाने हे तोट्यात होते. सुरु कारखान्यामध्ये जवळपास 40 टक्के साखर कारखाने हे तोट्यातच असतील तर साखर उद्योगात राज्य भरभाराटीत आहे असे कसे म्हणता येईल. हा उद्योग भावी काळात टिकवायचा असेल तर यावर ठोस उपाय योजने गरेजेचे आहे असे सरकारला वाटत नाही का?



घटीचा आढावा घ्यावा

गेल्या 50 वर्षांचा आढावा घेतल्यास उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात आठ पटीने वाढ झाली आहे. त्याच प्रमाणात वाढ उसाच्या उत्पादनात झाली आहे. क्षेत्राच्या प्रमाणात उत्पादन वाढ बरोबर दिसून येत असली तरी सुधारित जातींचा वापर वाढून झालेली उत्पादन वाढ कोठेच दिसत नाही. मग क्षेत्र वाढले पण उत्पादन घटले असेच चित्र उभे राहाते. एकरी उत्पादकता कमी झाली आहे का? याचा विचार व्हायला नको का? उसाच्या वारंवार लागवडीमुळे जमिनीच्या उत्पादकतेवर परिणाम झालेले आहेत का? याचा आढावा घ्यायला नको का? जर घेतला असेल तर यावर कोणते उपाय योजले आहेत? मग आकडेवारीत फरक का दिसत नाही? याचा विचार व्हायला हवा.





गेल्या पन्नास वर्षातील उसाच्या लागवडीची आकडेवारी ः

ऊस तोडणी क्षेत्र ऊसाचे उत्पादन

( हजार हेक्‍टरमध्ये ) ( हजार टनात)



1960-61 155 10,404

1970-71 167 14,433

1980-81 258 23,706

1990-91 442 38,154

2000-01 595 49,569

2009-10 756 64,159

2010-11 965 85,691

2011-12 1,022 85,635





घाटमाथ्यावर उत्पादकता वाढीची गरज



पश्‍चिम घाटमाथ्यावरील 80 टक्के शेतकऱ्यांचे उसाचे एकरी उत्पादन 25 ते 35 टन इतकेच आहे. इतक्‍या कमी उत्पादनात शेतकरी परवड नसुनही ऊस शेती करत आहे. याची कारणेही अनेक आहेत. काही झाले तरी उसाला ठराविक दर निश्‍चित मिळतो. तसा दर भाजीपाला किंवा इतर शेतमालाला मिळतोच असे नाही. भाजीपाल्यास चांगला दर मिळाला तर ठिक नाहीतर काहीवेळा भाजी फुकट वाटूनही कोणी घ्यायला तयार होत नाही. रस्तावर फेकून देण्याची किंवा जनावरांना चारा म्हणून वापरण्याचीही वेळ येते. शेतमाल हा नाशवंत आहे. ठराविक कालावधीत त्याची विक्री होणे गरजेचे असते. नेमके ही गरज व्यापारी ओळखून शेतकऱ्याची फसवणूक करतात. यावर पर्याय म्हणून शेतकरी ऊस शेतीकडे पाहातो. पाण्याची गरज उसाला किती आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवे. कृषी विभागाने उपलब्ध योजनांचा लाभ शेतकऱ्याला करून द्यायला हवा. पश्‍चिम घाटमाथ्यावरील उसाचे वाढते क्षेत्र विचारात घेता या उसाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामुळे निश्‍चितच फायदा होईल.



उसाला हवा योग्य दर



साखरेचा भाव तीस ते चाळीस रुपये किलोवरही गेला तरी उसाला कधीही त्या प्रमाणात दर मिळाला नाही. मग महागलेल्या साखरेचा नेमका फायदा होतो कोणाला? दलाली, मध्यस्थी, आदीमध्ये शेतकऱ्यांची होणारी लुट थांबविण्यासाठी सहकार क्षेत्र उभे राहीले, मग हे सहकारी साखर कारखाने साखरेला मिळणाऱ्या दराच्या प्रमाणात ऊसाला दर का देऊ शकत नाहीत. यामागील कारणे शोधण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्याला दोन हजार ते अडीच हजारच्यावर कधीही उसाला दर मिळाला नाही. महागाई मात्र वाढतच राहीली. खताचे दर, कीडनाशकांचे दर, आदी कृषी निविष्ठांचे दर वाढतच आहेत. शेतमजूरीही वाढतच चालली आहे. साहजिकच ऊसाच्या उत्पादन खर्चात दुपट्टीने वाढ झाली आहे. मात्र या वाढत्या महागाईचा विचार करुन साखर कारखान्यांनी कधीही उसाची दर वाढ दिली नाही. पण आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे.



इथेनॉलला दर मिळावा



साखर कारखान्यांनी उद्योगवाढीसाठी उपउत्पादनावर भर देण्याची गरज आहे. राज्यातील चालु कारखाने विचारात घेता केवळ 50 टक्केच कारखाने साखरे व्यतिरिक्त इतर उत्पादने घेतात. राज्यात आजच्या घडीला 65 साखर कारखान्यामध्ये आसवानी प्रकल्प आहे. पण इथेनॉलचे उत्पादन घेऊनही त्याला योग्य दर मिळत नसल्याने कारखान्यांना म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. यासाठी कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साखरेसह इतर उत्पादनांनाही योग्य दर मिळावा यावर शासनाने भर द्यायला हवा. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर योजले जाणारे पर्याय विचारात घ्यायला हवेत.



सहवीजनिर्मितीवर भर द्यावा



कारखान्यांनी त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करायला हवा. यासाठी विविध पर्यायांचा विचार करायला हवा. सहवीज निर्मितीवर यासाठीच भर द्यायला हवा. 2010 मध्ये राज्यात 27 कारखान्यात सहवीजनिर्मिती केली जात होती. यातून 349 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली. 2011 मध्ये 32 कारखान्यातील सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 425 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली. सर्वच कारखान्यांनी सहवीजनिर्मिती करून कारखाना स्वयंपूर्ण केल्यास साखर उद्योग निश्‍चितच भरभराटीला लागेल. याचा फायदा शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर देण्यात होईल.



राज्यातील साखर उत्पादन

(लाख मेट्रीक टनात)

वर्ष साखर उत्पादन

2010 71.69

2011 90.72

Saturday, October 6, 2012

योग्य तेच स्वीकारा

योग्य तेच स्वीकारा




या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।

तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।।



चांगल्या गोष्टी निवडण्याची सवय हवी. यामुळे सकारात्मक विचारसरणी होते. मनाला नकाराची सवय लागली तर विचारसरणीही नकारात्मक होते. हे नको, ते नको. असे करता करता काहीच करायला नको. असा मत प्रवाह होतो. नेहमी नाकारत राहीले तर इतरही तुम्हाला नाकारतात हे लक्षात घ्यायला हवे. यासाठीच विचार सकारात्मक असायला हवेत. यामुळे मन आशावादी राहाते. उत्साही राहाते. नकारात्मक विचाराने मन खिन्न, दुःखी होते. निराशवादी बनते. यातूनच मग आत्महत्या घडतात. नव्या पिढीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक वाद, नैराश्‍य, कर्जबाजारीपणा, अपयश ही यामागची कारणे सांगितली जातात. पण आत्महत्या हा जीवनाचा शेवटचा पर्याय नाही. संघर्षमय जीवनाची अखेर आत्महत्येत असू नये. धीर सुटता कामा नये. वाळुचे कणही रगडता तेल गळे तसे सतत संघर्ष करत राहीले तर निश्‍चितच त्यात यश मिळते. यासाठी सतत सकारात्मक विचार करत राहायला हवे. आज हे साध्य झाले नाही. पण उद्या ते मी हस्तगत करेण अशी आशा बाळगायला हवी. पण यासाठी निवडलेला मार्ग हा सत्याचा असेल. हे ही विसरता कामा नये. उद्दिष्ठ साध्य होत नाही म्हणून अनैतिक मार्ग स्वीकारणे योग्य नाही. अयोग्य मार्ग कधीही योग्य होऊ शकत नाही. त्याची सवय लागते. आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे असे म्हटले जात आहे. पण तो मार्ग शेवटी अयोग्यच आहे. एकदा का त्यात सापडला तर सर्व जीवन निरर्थक होते. यासाठीच मार्ग निवडतानाच योग्य ती काळजी घ्यायला हवी. चुकीचे पाऊल पडले तर वेळीच सुधारायला हवे. मांत्रिक, तांत्रिक काही सोपे मार्ग सांगतात. पण ते मार्ग अयोग्य आहेत. चुकीचे आहेत. अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत. खरा मार्ग कोणता आहे. याचा विचार करायला हवा. खरे संत माणसामध्ये दडलेले चैतन्य स्वीकारतात. त्यालाच परमेश्‍वर मानतात. त्याचाच ध्यास करतात. काशी, मथुरेची वारी करुनही जे हस्तगत होत नाही ते एका जागी शांत बसून ध्यान करण्याने मिळते. प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करण्याऐवजी मनाने केलेला नमस्कार देवाजवळ लगेच पोहोचतो. यासाठी मनामध्ये तो भाव असायला हवा.



राजेंद्र घोरपडे

Wednesday, October 3, 2012

सत्याची कास

सत्याची कास




तू अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न सांडिसी ।

तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ।।



व्यक्तिमत्व कसे असावे? व्यक्तिमत्व विकासासाठी काहीजण शिक्षण घेतात. आजकाल त्याची गरज झाली आहे. लोकांशी कसे बोलावे? कसे वागावे? समोरच्या व्यक्तिवर प्रभाव कसा पाडावा? यासाठी शिक्षण दिले जाते. व्यवसायात प्रगती करायची असेल तर हे सर्व गरजेचे आहे. सर्वच गुण अंगभूत असतात असे नाही. काही गोष्टी ह्या शिकाव्याच लागतात. सर्वांना या गोष्टी जमतात असे नाही. पूर्वीचे ग्रंथ पाहिले तर यामध्ये हेच शिकवले गेले आहे. मनाचे श्‍लोक काय सांगतात? आपणास काय शिकवतात? याचा विचार करायला नको का? मन स्थिर कसे ठेवावे? मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हेच तर सांगतात ना. व्यक्तिमत्व विकासात याची गरज वाटत नाही का? चांगले शिक्षण, संस्कारच यातून शिकवले जातात ना. मग आजकाल हे श्‍लोक ऐकायला कोठेच मिळत नाहीत? असे का? गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात. याचा विचार करायला नको का? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का? गणेश उत्सवात, नवरात्र या सणांमध्ये असे श्‍लोक शिकवले गेले तर व्यक्तिमत्व विकास होणार नाही का? असे वाटत नाही का? मग या गोष्टींचा विचार ज्येष्ठांनी तसेच तरूणपिढीने करायला नको का? योग्य ते संस्कार करण्यासाठी असे सण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. हे विचारात घ्यायला हवे. पैशाच्या जोरावर दंगामस्ती करणारी आपली चंगलवादी भारतीय संस्कृती नाही हे लक्षात घ्यायला हवे. पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा हे आपल्या संस्कृतीत शिकविले जाते. अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी, अपयशाचा वासही नसणारी अशी आपली संस्कृती आपण का विसरतो आहोत. याचा विचार व्हायला हवा. जग कितीही बदलले तरी सत्य बदलत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. या सत्याची कास धरायला शिकले पाहिजे. तर केव्हाच आपल्या पदरी अपयश येणार नाही.



राजेंद्र घोरपडे