Sunday, May 27, 2012

शेतीत हवी फक्‍त जिद्द, मग सर्व काही होते साध्य

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पीकविविधतेतून केले प्रयोग
शेती थोडी काय नी अधिक काय? तुम्ही आवडीने त्यात समरस होऊन काम कराल तर ती तुम्हाला फायदा दिल्याशिवाय राहणार नाही? कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील विश्‍वनाथ सावर्डेकर यांनी केळी, हळद, गहू अशी विविध पिकांची विविधता जपत आपली शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरीतील निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीत झोकून दिले आहे.
राजेंद्र घोरपडे
शेतीची आवड असणारी व्यक्ती अगदी प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत प्रगती करतेच. अगदी माळरान जरी असले तरी ते बागायती करून त्यातून भरघोस उत्पादन घेण्याचे सामर्थ्य दाखवणे त्यातून शक्‍य होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील विश्‍वनाथ धोंडिराम सावर्डेकर हे यापैकीच आहेत. सन 2003 मध्ये नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर ते शेतीकडे वळले. स्वतः शेतात राबून सात एकराच्या माळरानावर केळी, हळद, गहू, ऊस आदी नगदी पिके घेऊन इतरांसमोर व्यावसायिक वा नगदी शेतीचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
विश्‍वनाथ हे पेठवडगाव येथे राहण्यास आहेत. मात्र त्यांची वडिलोपार्जित सात एकर शेती पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत अंबप फाटा येथे आहे. वडील धोंडिराम हे शेती करायचे तेव्हा शेती ही कोरडवाहू होती. भुईमूग, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घेतली जात. माळरान असल्याने पाण्याची सोय नव्हती. वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यामध्ये हिशेबनीस म्हणून विश्‍वनाथ यांनी 1969 ते 2003 या कालावधीत नोकरी केली. त्या काळात ते शेतीकडेही लक्ष देत. शेतीत प्रगती करायची ही त्यांची मनोमन इच्छा होतीच. यातूनच त्यांनी सन 2000 मध्ये विहीर खोदली. वडिलोपार्जित सात एकर शेती आता त्यांनी बागायती केली आहे.
गाळमातीतून सुधारणा
विश्‍वनाथ अविवाहित आहेत. त्यांचा लहान भाऊ दिलीप हा नोकरी करतो. त्यामुळे शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देणे त्यांना शक्‍य होत नाही. यामुळे विश्‍वनाथच सर्व शेती पाहतात. निवृत्तीनंतर त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. पेठवडगाव येथे पुरातन तळे आहे. जवळपास 70 वर्षांनंतर हे तळे 2003 मध्ये आटले. या वेळी या तळ्यातील गाळ काढण्यात आला. ही गाळमाती विश्‍वनाथ यांनी विकत घेतली. जवळपास एक हजार ट्रॉली काळी गाळमाती त्यांनी शेतात टाकली. दोन लाख रुपये यासाठी खर्च केले. निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाच्या पैशातून त्यांनी ही सुधारणा केली.
केळी लागवडीचा विचार
बारमाही पाण्याची सुविधा असल्याने वेगवेगळी नगदी पिके घेण्याकडे विश्‍वनाथ यांचा कल वाढला. त्याप्रमाणे उतिसंवर्धित रोपे लावून केळी लागवड सुरू केली. सन 2004 पासून अर्धा ते एक एकरावर केळीची लागवड विश्‍वनाथ करत आहेत.
पूर्वमशागत आणि लावण
दोन उभी- आडवी नांगरट करून पाच ते सात ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. सहा x सहा फुटांवर लागवड करण्यात येते. दीड महिन्यानंतर हिरवळीच्या खतासाठी ताग लावला जातो. सुमारे 50 दिवसांनंतर झाडाच्या बुंध्यात ताग मुजविण्यात येतो.
पाण्याचे व्यवस्थापन
ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची बचत होते. वेळेवर पाणी देता येते. योग्य वेळी पाणी देता असल्याने पिकांची वाढ चांगली होते. कामाचा ताण पडत नाही. पावसाळ्यात पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्या वेळी मोजकेच पाणी द्यावे लागते. पाण्याची गरज पाहून साधारणपणे 15 मिनिटे ठिबक सुरू ठेवले जाते. ऑक्‍टोबरनंतर दररोज ठिबक सिंचनाने दीड तास पाणी द्यावे लागते. जानेवारी ते मे या कालावधीत दररोज तीन ते चार तास पाणी द्यावे लागते.
खताचे व्यवस्थापन
बेसल डोस म्हणून निंबोळी पेंड, डीएपी, मुख्य अन्नद्रव्यांबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात. खतांमध्ये युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, मॅग्नेशिअम सल्फेट, डीएपी, पोटॅश आदींचा वापर केला जातो.
केळी लागवडीचा खर्च (अर्धा एकरासाठी रुपयांत)
पाच ट्रॉली शेणखत - 7500
पूर्वमशागत - 4000
उतिसंवर्धित रोपांचा खर्च - 8250
खताचा एकूण खर्च - 10,000
आंतरमशागत - 6000
पाण्यासाठीचा खर्च - 2000
अन्य खर्च- 2500
काढणी - 2000 रुपये
एकूण - 42,250 रुपये
केळीतून मिळणारे उत्पन्न ः
दरवर्षी एकरी सुमारे 30 टन उत्पादन मिळते. यंदा अर्ध्या एकरात साधारणपणे 18 टन उत्पादन मिळण्याची आशा विश्‍वनाथ यांना वाटत आहे. स्थानिक बाजारपेठेतच ते केळींची विक्री करतात. सर्वसाधारण सहा हजार रुपये प्रति टन दर मिळतो. यातून एक लाख आठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता 65 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.
घडांचे संरक्षण
उन्हाळ्यात घड येत असल्याने चांगली प्रत ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते. दोन ते तीन महिने केळीचा घड केळीच्या पानाने किंवा पोत्याने झाकण्यात येतो. यामुळे घडाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होऊन गुणवत्ताही टिकून राहते. मेच्या शेवटच्या आठवड्यात तोडणी येत असल्याने संरक्षणाची गरज भासतेच.
गव्हाचीही चांगली शेती
गेले सहा वर्षे विश्‍वनाथ ठिबक सिंचनावर गव्हाचे उत्पादन घेत आहेत. एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन त्यांना मिळते. यंदा त्यांनी पंधरा गुंठ्यावर गहू घेतला आहे. घरगुती वापरासाठीच त्याचा वापर होतो.
हळदीचेही नियोजन
गेली दोन वर्षे विश्‍वनाथ हळदीची लागवड करत आहेत. हळदीच्या सेलम वाणाचे एकरी 30 क्विंटल उत्पादन ते घेतात. हळदीसाठी त्यांना एकरी 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो. गेल्या वर्षी त्यांनी 20 गुंठ्यांत 15 क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले. क्विंटलला त्यांना 14 हजार रुपये दर मिळाला. उत्पादन खर्च वजा जाता दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसेच हळदीचे बेणेही त्यांनी यातूनच राखून ठेवले. यंदा 30 गुंठ्यावर हळदीची लागवड केली आहे. साधारण क्विंटलला पाच हजार दर मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
हवे फक्त एक एकर शेत
विश्‍वनाथ म्हणतात शेतीवर तुम्ही नियमित हजर राहाल, शेतीची कामे वेळेवर कराल तर शेतीत फायदाच फायदा आहे. फक्त एक एकर बागायती शेत, दोन जनावरे आणि एक लाखाची भांडवल गुंतवणूक असेल तर एका कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर सहज चालवणे शक्‍य आहे. नोकरीची गरज भासणार नाही. फक्त कष्ट करण्याची, शेतात राबण्याची तयारी हवी. जिद्दीने शेती करण्याची मानसिकता हवी.
विश्‍वनाथ धोंडिराम सावर्डेकर, 9923116680 पेठवडगाव, जि. कोल्हापूर

Saturday, May 26, 2012

गांडूळ खत प्रकल्प एक जोड व्यवसाय

डोंगर उताराच्या मुरमाड जमिनीत ऊस शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्याचा उद्देश पाली ( ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथील अरविंद श्रीधर नानिवडेकर यांनी ठेवला आहे. यासाठी गेल्या सात-आठ वर्षात त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. यातूनच त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. स्वतःच्या जमिनीचा पोत टिकवत गांडूळ खताची विक्री करून जोड व्यवसायाचा एक वेगळा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी तालुक्‍यातील पश्‍चिम घाटाच्या रांगेत कासारी नदीकाठी पाली हे गाव वसले आहे. करंजफेन या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये या गावाचा समावेश होतो. या गावात अरविंद नानिवडेकर यांची वडीलोपार्जित 14 एकर शेती आहे. 1983 साली अरविंद एम. ए. झाले. उच्चशिक्षीत होऊनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडीलोपार्जित शेतीचा व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला. अरविंद यांचे वडील श्रीधर यांना जनावरे पाळण्याचा शौक होता. वडीलांच्या काळात गोठ्यात जवळपास 60 जनावरे असत. आजही अरविंद यांच्या गोठ्यात 10 संकरित गायी, दोन संकरित म्हैशी आहेत. येथील हवामान जनावरांच्या संगोपनासाठी पोषक आहे. तसेच येथे उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाईही भासत नाही. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न पशुपालनाच्या व्यवसायातून मिळविणे सहज शक्‍य आहे.
डोंगर उतारावर ऊस शेती
अरविंद यांची शेती ही डोंगरमाथ्यावर आहे. बरेचसे शेत हे उतारावर असल्याने ते पडीकच ठेवणे भाग होते. पण अरविंद यांनी या पडीक जमिनीत ऊस शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. येथील बरेचसे शेतकरी डोंगर उतारावर शेती करताना डोझरच्या सहाय्याने जमिन समपातळीत करून घेतात. यासाठी लाखो रुपये खर्च करतात. कर्ज काढून इतका खर्च करणे अरविंद यांना मान्य नव्हते. त्यांनी डोंगर उतारातच ऊस शेतीचा निर्णय घेतला. दरवर्षी करण्यात येत असलेल्या नांगरटीमधून हळूहळू ही जमिन समपातळीत करण्याकडे त्यांचा कल आहे.
अरविंद यांचे उसाचे एकूण क्षेत्र 14 एकर आहे. यातील डोंगर उतारात दोन एकर क्षेत्र आहे. यातून एकरी 25 टन उसाचे उत्पादन ते घेतात. तर इतर क्षेत्रातून एकरी 40 टन उत्पादन त्यांना मिळते. खोडव्याचे उत्पादन 30 ते 35 टनापर्यंत मिळते.
गांडूळ खत निर्मितीकडे...
डोंगर उतारात नांगरट केल्यानंतर अरविंद यांच्या शेतात माती ऐवजी मुरुमच अधिक होता. या शेतात पिके कसे उगविणार आणि यातून उत्पन्न तरी किती मिळणार? या प्रश्‍न अरविंद यांना सतावत होता. यावर कृषी मदतनीस शिवाजी ढवळे आणि तालुका कृषी अधिकारी डी. डी. धुमाळ यांनी अरविंद यांना गांडूळ खताचा पर्याय सुचविला. 2005 मध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी कृषी विभागामार्फत अनुदानही वाटप केले जात होते. गांडूळमुळे जमिनीची मशागतही होईल व सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोतही सुधारला जाईल. यासाठी अरविंद यांनी गांडूळ खत निर्मितीचा निर्णय घेतला.
शेड उभारणीसाठी शासनाचे अनुदान
अरविंद यांनी गांडूळ खताच्या निर्मितीसाठी शेडची उभारणी केली. या शेडमध्ये 20 फुट लांब, 3 फुट रुंद आणि अडीच फुट उंचीचे हौद बनविले. या हौदात गांडूळ खत निर्मितीसाठी त्यात सुरवातीला वाळलेला काडीकचरा त्यावर शेण, परत ओला काडीकचरा, त्यावर शेणकाला असे करत हौद संपूर्णपणे भरला. त्यात सतत ओलसरपणा राहील इतके पुरेसे पाणी टाकले. त्यात 25 किलो गांडुळ कल्चर टाकली. शेड उभारण्यासाठी आणि हौदांच्या निर्मितीसाठी अरविंद यांना 60 हजार रुपये खर्च आला. यात कृषी विभागाने शेड उभारणीसाठी 15 हजार रुपयांचे अनुदान दिले. तसेच दहा हजार रुपयांचे जयसिंगपूर येथील गांडूळ प्रकल्पातून गांडूळ कल्चरही उपलब्ध करून (गांडूळ बीज) दिले. चांगल्या प्रतिचे गांडूळ खत तयार होण्यासाठी साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी लागतो. दोन महिन्यानंतर हे खत काढून त्यामध्ये पुन्हा नव्याने खतासाठी शेण व कल्चर टाकण्यात येते. साधारणपणे एका हौदात दोन टन खत तयार होते. वर्षातून चार ते पाच टप्प्यात खत तयार केले जाते. खताच्या निर्मितीसाठी अर्धवट कुजलेलेच शेण ते वापरतात. ताजे शेण वापरल्यास उष्णतेमुळे गांडूळचे बीज मरून जाण्याचा किंवा गांडूळांची वाढ योग्य प्रकारे न होण्याचाही धोका असतो.
वीस टन खताचे उत्पादन
अरविंद दरवर्षी साधारणपणे 50 ते 60 टनापर्यंत खताचे उत्पादन घेतात. पण बायपास सर्जरीमुळे यंदा त्यांनी फक्त 20 टन खताचे उत्पादन घेतले आहे. खत उत्पादनातील 10 टन खत स्वतःच्या शेतीसाठी वापरतात तर अर्वरित खताची ते विक्री करतात. साधारणपणे साडेतीन रुपये किलो दराने खताची विक्री केली जाते. कोकणात शेणखताची टंचाई असल्याने फळबागांसाठी सेंद्रीय खताची टंचाई भासते. कोकणातील हे फळबागायतदार सेंद्रीय खत विकत घेऊन जातात.
कल्चरची निर्मिती
गांडुळ कल्चर निर्मितीसाठी तीन फुट रुंद दोन फुट उंच दहा फुट लांबीच्या खड्ड्यामध्ये करण्यात येते. पालापाचोळा, शेणखत टाकुन दोन महिन्यात गांडूळ कल्चर तयार केले जाते.
दुग्ध व्यवसायातून लाखाची कमाई
अरविंद यांनी गांडूळ खतासाठी जनावरांचे संगोपन केले आहे. 10 गायी, दोन म्हैशी यांच्या संगोपनातून दररोज 40 ते 50 लिटर दुध उत्पादन होते. तसेच गांडूळ खतासाठी आवश्‍यक असणाऱ्या शेणही मिळते. दररोज साधारणपणे 100 किलो शेण मिळते. अरविंद दररोज 35 लिटर गायीचे दुध व 6 लिटर म्हैशीचे दुध डेअरीला घालतात. यातून वर्षाला अडीच लाख रुपयांची कमाई होते. गांडूळ खत निर्मिती व जनावरांच्या संगोपणाचा खर्च वजा जाता यातून वर्षाला त्यांना दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
चारा व्यवस्थापन
जनावरांना बारमाही चारा मिळावा यासाठी एक एकरावर बाजरी व एक एकरावर यशवंत गवताची लागवड अरविंद यांनी केली आहे. या व्यतिरिक्त वाळलेले गवत, उसाचा पाला यांचाही वापर ते चारा म्हणून करतात.
अरविंद श्रीधर नानिवडेकर, पाली, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर. संपर्क ः 02329 - 233818

Sunday, May 20, 2012

नैसर्गिक जलस्त्रोत जपत सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न

कोल्हापुर जिल्ह्यातील येळवडीतील हरिजनवाडीत यशस्वी प्रयत्न
गावात विकासकामे करायची असतील तर गावातील सक्षम राजकीय नेतृत्व गरजेचे आहे. अनेक गावांमध्ये केवळ राजकीय नेतृत्व चांगले नसल्याने विकासकामे खुंटलेली दिसतात. लहान लहान गावे, वाड्या वस्त्यात तर ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. कोल्हापूर जिल्ह्यातील येळवडी येथील हरिजनवाडी मात्र याला अपवाद ठरलेय. स्वत:च्या गरजा स्वत:च ओळखून ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या सहकार्याने पाईपलाईन करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला आहे. नैसर्गिक जलस्त्रोत जपत सायफन पद्धतीने पाणी गावात आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविलाच. पण दुभत्या जनावरांचीही परवड पाण्यासाठीची परवड थांबविली...
राजेंद्र घोरपडे
पश्‍चिम घाटाच्या डोंगरकपारीतील पावसाळ्यात मुबलक पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाण्याची टंचाईही भासतेच. त्यातच येथील लोकवस्तीस ग्रामपंचायत नसल्याने येथे शासनाच्या योजनांही राबविण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे या वाड्यावस्त्या विकासापासून नेहमीच वंचीत राहतात. याचा विचार करून कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने या वाडी वस्तींच्या विकासासाठी विशेष योजना आखली आहे. त्या अंतर्गत तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार लोकसभागातून तेथे योजना राबविण्यात येतात.
येळवडी हे गाव मरळे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येते. यामुळे या गावच्या वाड्यावस्त्यांच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी थेट निधी उपलब्ध होत नव्हता. दरवर्षी मार्चनंतर गावच्या वाड्या वस्त्यात पाणी टंचाई भासतेच. या गावची 200 लोकवस्ती असणाऱ्या हरिजनवाडीस पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पिण्याला पाणी नाही, तेथे जनावरांना पाणी कुठून आणणार? यामुळे वाडीचा विकासही रखडला होता. यावर जिल्हा कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सायफनने हरिजनवाडीस पाणी पुरवठा करून येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी विचार झाला. याकामी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, कृषी पर्यवेक्षक एस. व्ही. सानप, कृषी सहाय्यक एस. एस. गावडे, तालुका कृषी अधिकारी एच. वाय. इंगवले, मंडल कृषी अधिकारी एस. एम. नांगरे आदींनी यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले.
आजारपणाच्या समस्येतून मिळाला उपाय
पाण्यासाठी भटकंती ही या हरिजनवाडीस नित्याचीच होती. वाडीस कुपनलिका आहे. पण लोकवस्तीचा विचार करता कुपनलिकेवर पाण्यासाठी गर्दी होत असे. पाणी ओढून महिलांना अनेक आजारही जडले आहेत. मार्च-मे दरम्यान कुपनलिकेचे पाणी कमी होत असे. यामुळे इतर स्त्रोत्रांचा शोध घेण्याची गरज भासत असे. तीन चार किलोमिटरवरून पाणी महिलांना डोक्‍यावरून आणावे लागत होते. पाणी कमी झाल्यानंतर पाण्याचे प्रदुषणही वाढते. कावीळ, साथीचे आजारांनाही वाडीस धोका कायम होता. याचा विचार करून पाणी समस्येवर हरिजनवाडीने यावर मात करण्याचा विचार केला.
शासनाच्या कामात ग्रामस्थांचे श्रमदान
हरिजनवाडीचे सामाजिक कार्यकर्ते दिनकर लहु कांबळे यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. सायफनने वाडीत पाणी आणण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोतांचा शोध घेतला. उन्हाळ्यातही जीवंत राहणारे जलस्त्रोत शोधून तेथून थेट पाईपलाईनने वाडीत पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पाणलोट विकास समिती मरळे अंतर्गत या योजनेसाठी एक लाख 97 हजार रुपयांना निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. साधारणपणे 6500 फुट पाईपलाईन टाकून वाडीमध्ये पाणी आणण्यात आले. यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी खुदाईकामात श्रमदान केले.
स्वखर्चातून पाईपलाईन
कृषी विभागाच्या सहकार्याने डोंगरातील नैसर्गिक जलस्त्रोतातून सायफनने वाडीत पाणी आणले, पण यंदाच्या कडक उन्हामुळे एप्रिलमध्ये हा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताचे पाणी कमी झाले. पुढील दीड महिन्याच्या काळात पाणी टंचाईची समस्या भेडसावू नये यासाठी हरिजनवाडीने स्वखर्चातून 200 फुट दिड इंची पाईपलाईन टाकून पूर्वीच्या सायफनच्या कुंडात दुसऱ्या ठिकाणच्या जलस्त्रोतातून पाणी सोडले व समस्येवर मात केली. यंदाच्या कडक उन्हातही मुबलक पाणी वाडीस उपलब्ध आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने वाडीमध्ये समाधान आहे. तसेच दुभत्या जनावरांनाही पाणी उपलब्ध झाल्याने वाडीची पाण्यासाठी होणारी परवड आता थांबली आहे.
वनविभागाच्या रोपवाटीकेला आधार
यंदा उन्हाचा तडाखा अधिक असल्याने नेहमीचे जलस्त्रोत आटले आहेत. याचा फटका पेंडाखळे वनविभागाच्या रोपवाटीकेसही बसला आहे. मार्चनंतर ही रोपवाटीका वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला. याचा विचार करून वाडीने या रोपवाटीकेस पाणी उपलब्ध करून दिले आहे. या रोपवाटीकेत मोरआवळा, जांभूळ, नरक्‍या, मोरवेल, सुरू, निलगिरी, सुबाभूळ, शिसव, बांबू आदी जवळपास एक हजार रोपे आहेत. या रोपांना वाडीने पाणी पुरवठा करून ही रोपे जगविली आहेत. वाडीने पाणी पुरवठा केला नसता तर ही रोपे तशीच वाळून गेली असती.
यंदा सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असतानाही वाडीस पाणी उपलब्ध झाल्याने समाधान वाटत आहे. याच पाण्यावर पुढील काळात वाडीची पंचवीस हेक्‍टर जमीन बागायती करण्याचाही विचार सुरू आहे. आता पावसाने ओढ दिली तरी भातशेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने पिके वाळून जाण्याचा धोका आता टळला आहे.
- दिनकर लहू कांबळे, हरिजनवाडी, येळवडी
वाडीची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी 10-20 लाखाच्या पाण्याच्या योजनेची गरज होती. पण वाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने इतके अनुदान उपलब्ध होत नाही. लोकवस्तीच्या प्रमाणात निधी खर्च करावा लागतो. ग्रामपंचायतीमध्ये इतर गावांच्याही समस्या असतात. अशा वस्तीसाठी कमी खर्चात सायफनने पाणी पुरवठा करणेच अधिक हितावह होते. यासाठी वाडीने एकीने श्रमदान केल्याने त्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.
- एस. व्ही. सानप, कृषी पर्यवेक्षक