Sunday, February 27, 2011

माहेर

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजें जी ।।

माहेर म्हणजे आई वडीलांचे घर. महिलांना माहेरची अधिक ओढ असते. सासरी कितीही प्रेम मिळाले, कितीही संपन्नता असली तरी माहेरच अधिक प्रिय असते. काही झाले तरी लगेच माझ्या माहेरी असे नाही. माझे माहेर तसे होते अशी उदाहरणे, टोमणेबाजी सुरू होते. माहेर विषयी कोणी वाईट बोललेले त्यांना सहन होत नाही. माहेरचे कौतूक त्यांच्या तोंडी नेहमीच असते. माहेर सारखे प्रेम या जगात कोठेच नाही असे त्यांना वाटते. असे प्रेम सासरी असले तरी माहेरची बरोबरी होत नाही असे त्यांना वाटते. माहेरमध्ये सर्व हक्काचे असते. आपलाच अधिकार असतो. सासरी आल्यावर तसा अधिकार सासरी मिळत नाही. काही स्त्रिया आपला अधिकार राहावा, वचक राहावा यासाठी माहेरकडचाच एकादा गडीमाणूस खास कामासाठी नेमतात. सासरचा गडीमाणूस त्यांना फारसा आवडत नाही. माहेरकडची सर्व माणसे त्यांना प्रेमळ वाटतात. हवी हवीशी वाटतात. बदलत्या काळात आता असे माहेरचे प्रेमही बदलत चालले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या या संस्कृतीत माहेरविषयीच प्रेम राहीले नसेल तर सासर विषयी प्रेमाची कशी स्थिती असेल हा मोठा प्रश्‍न आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर- माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. खरे प्रेम लुप्त होत चालले आहे. काळाच्या ओघात माणसामधील स्वार्थी वृत्ती वाढल्याने हा फरक पडला आहे. पण समाधानासाठी माहेर सारखे सुख कोठेच नाही. खरे प्रेम हे माहेरीच असते. तेच खरे प्रेम आहे. तीच खरी प्रेमाची ओढ आहे. तिच खऱ्या प्रेमाची ओळख आहे. तेथेच खरे प्रेम मिळते.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406

Monday, February 21, 2011

भजन

म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।
गगन जैसें अलिंगना । गगनाचिया ।।

सद्‌गुरुचे, देवाचे नामस्मरण म्हणजे भजन. भक्‍तीची गोडी भजनाने लागते. सध्याच्या नव्या पिढीत भजनाची आवड निर्माण होणे, याची गोडी लागणे या गोष्टी अशक्‍यच आहेत. नव्या पिढीला पैशाची गुर्मी आहे. सर्वच गोष्टी ते पैशाने मोजतात. भक्ती, अध्यात्म या गोष्टीही ते पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण या गोष्टी पैशाने विकल्या जात नाहीत. याची कल्पना त्यांना नाही. याचेच मोठे दुःख वाटते. या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. भगवंताना फक्त मनाने विकत घेता येते. फक्त फुल, फळ तेही शुद्ध भावनेने दिलेले ऐवढेच ते स्वीकारतात. महालक्ष्मी या नावातच लक्ष्मी आहे. पण या मंदीरातही दानपेटी असते. त्यात ते दान टाकतात. काही मंदीरात, धर्मात तर दान टाकण्याची स्पर्धा असते. सर्वाधिक दान देणाऱ्यांचा सत्कारही होतो. सर्वाधिक मान पैशाने मोजला जातो. याचे लिलावही चालतात. हे अध्यात्म नाही. ही भक्ती नाही. कारण देवाला याची काहीच गरज नाही. भक्तीत याची आवश्‍यकता नाही. निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. तीच खरी श्रद्धा आहे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406

Monday, February 14, 2011

गुरु शिष्य ऐक्‍य

पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ।।

बदलत्या काळानुसार गुरू आणि शिष्य या नात्यातही मोठा बदल होत आहे. पूर्वीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना हातात छडी घेऊन शिकवत होते. विद्यार्थीही त्यांचा मार खात असे पण त्यांनी मार का दिला याचा विचार करून त्याच्या मनामध्येही बदल होत असे. तो सकारात्मक बदल असे. काही विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्या शिक्षकांनी असा मार दिला, असे त्यांना समजावले त्यामुळे ते इतके मोठे होऊ शकले. त्यातून अनेक बोध घेऊ शकले असे सांगतात. हे अनुभव ऐकताना नव्यापिढीला खूपच आश्‍चर्य वाटते. आता काळ बदलला आहे. तसे गुरू-शिष्याचे नातेही बदललेले आहे. पूर्वीच्या काळातील गुरू हे त्यागी होते. शिष्याला मोठा करण्याची धडपड त्यांच्यात होती. शिष्य मोठा झाला तर त्यांना खरा आनंद मिळत असे. शिष्याच्या प्रगतीतच त्यांना समाधान वाटत असे. इतका जिव्हाळा या नात्यामध्ये होता. प्रसिध्दीचा मोह सुद्धा त्यांना कधी नव्हता. असे गुरू नव्यापिढीत पहायला मिळत नाहीत. शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे. तसे गुरू-शिष्य या नातेसंबंधातही मोठा बदल होत आहे. पाश्‍चिमात्य गुरूंमध्ये त्याग, आत्मियता, जिव्हाळा, तळमळ पहायला मिळत नाही. हीच संस्कृती सध्या नव्यापिढीत जोपासली जात आहे. नाती आता पैशाने मोजली जात आहेत. सध्या पदव्याही विकत मिळतात. शिक्षणासाठीचे वाढते शुल्क विचार घेता त्यानुसारच शिक्षण मिळत आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी अधिक पैसा मोजावा लागत आहे. त्यानुसार तसे विचार प्रवाहही बदलत आहेत. शिक्षणाच्या या व्यापारामुळे गुरू- शिष्य संबंधालाही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशाच्या तुलनेत शिक्षण दिले जात आहे. अशा शिक्षण संस्थात त्याग, पुज्यता, गुरूंचा सन्मान या गोष्टी कशा काय शिल्लक राहतील. वर्गात किती तास शिकवले यावरच त्यांची पात्रता ठरवली जाते. त्यावरच त्यांना पगार मिळतो. शिष्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी तीही पैशाच्या तुलनेत मोजली जाते. अशा या नव्यापिढीला त्यागी गुरू कसे मिळतील. पूर्वी गुरू शिष्याला त्याच्या पदी बसविण्यासाठी उत्सूक असत. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. तिच खरी त्यांना मिळालेली दक्षिणा असायची. पण सध्या असे गुरू मिळणे अशक्‍यच आहे. हे त्यागाचे संस्कार आता टिकवायला हवेत.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Friday, February 11, 2011

युग

कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।
तवं कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ।।

आताचे युग हे कलियुग आहे असे म्हटले जाते. एक युग संपले की लगेच दुसऱ्या युगाचे फुटवे फुटू लागतात. युगामागून युगे येत राहतात. आता तंत्रज्ञानाचे युग आहे. नवनवे शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार होत आहे. पण या युगालाही अंत आहे. खनिजाचे साठे संपत आहेत. पर्याय शोधले जात आहेत. सौर उर्जेचा पर्याय आपण आता शोधला आहे. नवे पर्यायही शोधले जात आहेत. अणुउर्जेचाही पर्याय निवडला जात आहे. कारण भावी काळातील वीजेचा तुटवडा कसा पूर्ण करणार? यावर सर्व अवलंबून आहे. कोळसा संपला तर पुढे काय? याला उत्तर हवेच. यामुळे एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पुर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच. बदल हाच निसर्गाचा नियम आहे. पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते. पण आत्मज्ञान पूर्वी होते. आताही आहे आणि यापूढेही ते राहणार आहे. परंपरेनुसार ते पुढे धावत राहणार. युगे येतात जातात. त्यानुसार ज्ञानही बदलत राहते पण आत्मज्ञान आहे तसेच राहते. त्यात बदल होत नाही. जे सत्य आहे. तेच शाश्‍वत आहे. तेच टिकते. यासाठी कायम सत्याची कास धरायला हवी. सत्याला ओळखायला शिकावे. खरे सुख समजून घ्यायला हवे. सत्य हाच खरा धर्म आहे. त्याचा अंगीकार करायला हवा. युगानुयुगे या ज्ञानाची परंपरा चालत आहे. यापुढेही ती चालत राहणार आहे.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Sunday, February 6, 2011

दैव

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।
उजू आयुष्य तै मारितें । लोभु करी ।।

दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात. अथवा जर आयुष्य अनुकूल असेल तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. इतके सामर्थ या दैवात आहे. पण दैवाचा हा खेळ कोणाला कळला? आत्मज्ञानाने दैवाचा खेळ समजतो. पण आयुष्यात घडणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही. नशिबात एखादी घटना घडणार असेल, तर ती घडतेच. अनेक नवे शोध लागले. नवनव्या तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली. पण त्सुनामी सारखी एखादी लाट क्षणात सारे उध्वस्त करते. हा दैवाचा भाग आहे. दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जिर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी. मरा मरा म्हणून जप करणारा, वाल्ह्याचा महान वाल्मीकी ऋषी झाला. कृपा कशी होईल हे सांगता येत नाही. एखाद्या चोवीस तास जप करणाऱ्या व्यक्तीलाही काहीच भेटत नाही. असेही घडते. नुसती जपायची माळ ओढून चालत नाही. तो भाव मनात प्रकट व्हायला लागतो. यासाठी सद्‌गुरुंची कृपा व्हायला हवी. मग माळा जपायची गरज भासत नाही. आपोआप साधना होते. नाही तर ती करवून घेतली जाते. दैवाच्या कृपेनेच हे विचार मनात प्रकटतात. दैवाच्या कृपेनेच,सद्‌गुरुंच्या आर्शिवादानेच तर हे लिखाण माझ्याकडून करवून घेतले जात आहे. प्रत्यक्षात लिहीत मी आहे पण हे लिहून घेणारा कोणीतरी दुसरा आहे. हे काम तो माझ्याकडून करवून घेत आहे. ते विचार तो माझ्या मनात भरत आहे. तेच इथे उमटत आहेत. त्याचे अस्तित्व माझ्यात कोठे तरी आहे. यामुळेच हे लिखाण माझ्याकडून होत आहे. यामुळे मी केले, मी लिहिले हा अहंकार आता माझ्यामध्ये उरलेला नाही. मी पणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. मनात येणारे विचार ही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. तो सो$हम चा नाद मला पकडायचा आहे. ती लय मला धरायची आहे. त्याच्यातच आता मला माझे मन रमवायचे आहे. कारण तोच ह्या सर्व विचार लहरींचा निर्माता आहे. त्याच्यातूनच हे सर्व प्रकट होत आहे. त्याच्या विचार लहरीतूनच हे विचार प्रकट होत आहेत. ते दैव मला पकडायचे आहे. दैवाला मला अनुकूल करून घ्यायचे आहे.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

Thursday, February 3, 2011

मोहाचा महारोग

तरी कृपाळु तो तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
मोहाचा फिटो । महारोगु ।।

पूर्वीच्या काळी प्लेग, देवी यासारखे महारोग होते. या साथीच्या रोगात अनेक माणसे मृत होत असत. काही वर्षापूर्वी `स्वाइन फ्लू' नावाच्या नव्याच रोगाने थैमान घातले होते. तो झपाट्याने पसरतो. तसे साथीचे रोग हे झपाट्याने पसरतात. त्यात जगभरात हजारो लोक मृत्युमुखी पडले. असाच माणसास मोहाचाही रोग होतो. हा रोग लागला तर लवकर सुटत नाही. या मोहाच्या जाळ्यात जर माणूस अडकला तर त्याचे आयुष्यही वाया जाऊ शकते. अनेक जणांना संपत्ती जमा करण्याचा मोह लागला आहे. पैसा इतका जमा केला आहे की तो इथे ठेवायलाही जागा नाही. देशात पैसे ठेवायला सुरक्षित जागा नाही म्हणून आता पैसे स्विस बॅंकेत ठेवले जात आहेत. हा सगळा काळा पैसा आहे. मोहाने जमा केलेली ही माया आहे. पण मोहाचे हे जाळे त्यांना कोणत्याही क्षणी संपवू शकते. हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जाळ्यात अडकल्यानंतर जाणीव होऊन काय उपयोग? भ्रष्टाचारही या अशा मोहानेच वाढत चालला आहे. एवढी संपत्ती मिळवूनही करायचे तरी काय हा प्रश्‍न या मोह सम्राटांना का पडत नाही? समाधान नष्ट करणारी ही संपत्ती नेमकी जमवितात तरी कशासाठी? या संपत्तीने अनेकांचा तळतळाट मागे लागलेला असतो. लुटीचा हा रोग वाढतच चालला आहे. यामुळे देशात लुटारूच वाढले आहेत. पूर्वी स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने लूट केली जात होती. हा पैसा चांगल्या कामासाठी वापरला गेला. ते अमर झाले. उद्देश चांगला होता. सर्वमान्य उद्देश होता. हेतू चांगला होता. यातून समाधान मिळणार होते. पण स्वातंत्र्यानंतर ही लूट कायम राहिली. पण ती स्वतःच्याच देशातील जनतेची असल्याने ही लूट ही चोरी ठरत आहे. हा लुटीचा रोग बळावल्यास पुन्हा नव्या स्वातंत्र्यासाठी उठाव होईल हे निश्‍चित. लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही. हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत, हे ही खरे आहे. पण मोहाचा हा रोग बळावला आहे. यासाठी मोहावर आवर हा घालायलाच हवा. मोहामुळे मोठ मोठी साम्राज्येही उद्धस्त झाली आहेत. हा महारोग नियंत्रणात येऊ शकतो. यासाठी विवेकाचा काढा प्यायला हवा. विवेकानेच हा रोग बरा होऊ शकतो.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406