Thursday, January 27, 2011

स्वस्वरूप

स्वस्वरूप

आतां ते तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें ।
सस्यांती निवडिलें । बीज जैसें ।।

स्वतःच स्वतःचे रूप पाहायचे. स्वतःचे बाह्यरूप पाहण्यासाठी आरसा लागतो. आपल्या चेहऱ्यावर एखादा डाग लागला असेल तर तो त्यात दिसतो. चेहऱ्याचे सौंदर्य कसे आहे हे आपण त्यात न्हाहाळतो. एकंदरीत चांगले कसे दिसता येईल याचा प्रयत्न आपण त्यातून करत असतो. केस विस्कटलेले असतील तर ते आपण व्यवस्थित करतो. नीटनेटके राहण्याचा प्रयत्न करतो. बाह्य रूपात आपण चांगले राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मग अंतरंगात का करत नाही? मन स्वच्छ ठेवण्याचा का प्रयत्न करत नाही? स्वतःचे अंतःकरणही असेच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. नुसती बाह्यरुपात स्वच्छता नको, तर अंतरंगही साफ असायला हवे. अंतर्बाह्य साफ असेल तर समस्याच उरणार नाहीत. यासाठी आपणच आपले अंतरंगातील मन तपासायला हवे. स्वतःच स्वतःमध्ये पाहायला हवे. स्वतःला जाणून घ्यायला हवे. मी कोण आहे? याचा विचार करायला हवा. मी म्हणजे अमुक नावाचा आहे. तमुक गावाचा आहे. पण हे बाह्यरूप झाले. अंतःकरणात मी कोण आहे? याचा विचार व्हायला हवा. मी एक आत्मा आहे याचा बोध व्हायला हवा. अंतरंगात डोकावण्यास सुरवात केल्यावर हळूहळू आपल्या चुका आपणालाच कळू लागतात. त्या सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. यातून सात्विकवृत्तीत वाढ होते. याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात फरक पडतो. काही दुखावले गेलेलेही आपल्या जवळ येऊ लागतात. काहीजण सात्त्विक वृत्तीचे असल्याचे आव आणतात. पण त्यांचे हे नाटक फार काळ टिकत नाही. हा क्षणिक दिखावा अनेक दुःखांना कारण ठरू शकतो. यातूनही निराशा उत्पन्न होते. यासाठी सात्विकवृत्तीचा आव आणू नये. पण सध्याचा युगात असे संतासारखे वागणे मूर्खपणाचे समजले जात आहे. पण हे आजच घडत आलेले नाही. यापूर्वीही असेच घडले आहे. सतांना अनेकांनी तुच्छ लेखले गेले आहे. त्यांचे हाल केले गेले आहे. हे फक्त भारतीय संस्कृतीतच नाही. जगातील इतर देशातही असेच घडले आहे. येशूचाही असाच छळ झाला आहे. हे सर्व धर्मात असेच आहे. पण असत्याचा जेव्हा जेव्हा हाहाकार माजतो. तेव्हा तेव्हा सत्याचा जन्म होतो आणि सत्याचा विजय होतो. सत्यच शाश्‍वत आहे. सत्यच सुंदर आहे. सत्यच ईश्‍वर आहे. हे जाणून घ्यायला हवे. मी आत्मा आहे याचा बोध घ्यायला हवा. मळणीनंतर जसे धान्य स्वतंत्र होते. तसा आत्मा या देहापासून वेगळा करावा. मग पुन्हा मिसळणे नाही. देहाची मळणी करायला हवी. आत्मा वेगळा झाल्यानंतर पुन्हा त्यात तो मिसळला जात नाही. मग तो आत्मस्वरूपी स्थिर होतो.



राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Monday, January 24, 2011

सात्त्विक राजा

नगरेची रचावीं । जलाशयें निर्मावीं ।
महावने लावावीं । नानाविधें ।।

प्रत्येक मनुष्यात सत्त्व, रज, तम हे गुण असतात. त्याचे प्रमाण कमी अधिक असते. सात्त्विक वृत्तीत वाढ झाल्यास मनुष्याला देवत्व प्राप्त होते. शहरेच वसवावीत. जलाशये वगैरे पाण्याचे मोठे साठे बांधावेत. नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत. हे रजोगुणाचे लक्षण आहे. धरणांचे प्रकल्प उभारताना अनेक समस्या उभ्या राहतात. याचे वाद अनेक वर्षे चालतात. यात कोणाला न्याय मिळतो. कोणाला न्याय मिळतही नाही. ज्यांनी पाण्यासाठी घरे सोडली त्यांनाच पाणी मिळत नाही ही आजची स्थिती आहे. धरणे ही व्हायला हवीत. हेही खरे आहे. पण ती बांधताना विस्थापितांनाही त्यामध्ये योग्य न्याय द्यायला हवा. पण तसे होत नाही. धरणाचा फायदा हा प्रत्येकाला झाला पाहिजे. असे नियोजन करायला हवे. असे नियोजन असेल तर धरणाला विरोध होणार नाही. धरणाचा फायदा प्रत्येकाला समान मिळाला पाहिजे. पाण्याचे समान वाटप झाले तर वाद होणार नाहीत. पण तसे घडत नाही. प्रत्येकाचा स्वार्थ त्यामध्ये अडवा येतो. प्रत्येकजण स्वतःला अधिक कसा फायदा होईल हेच त्यामध्ये पाहतो. अशाने वाद वाढतच जातात. सात्त्विक वृत्तीने कोणी काम करण्यास तयारच नाही. स्वतःच्या व्यक्तिगत फायदा पाहणाऱ्या राजकियवृत्तीमुळेच देशाचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सामाजिक प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहेत. अन्यायामुळेच नक्षलवाद वाढत आहे. अन्यायाचा विस्फोट अशा प्रकारे होणे हे एक दुर्दैव आहे. देशांतर्गत सुरक्षा अशाने धोक्‍यात येऊ शकते. सर्वांना सम न्याय मिळाला पाहिजे. सध्या यासाठी लढा देऊन काहीही मिळत नाही. असे दिसते यामुळे हे घडत आहे. समन्यायी देण्याची वृत्तीच सरकारमध्ये नाही. मग असे प्रश्‍न उत्पन्न होणारच. असे लढे उभे राहणारच. यासाठी सरकारनेच प्रकल्पांचे नियोजन करताना समन्यायी ठेवावा. यामुळे देशात वाढणारा नक्षलवाद निश्‍चितच कमी होईल. यासाठी राज्य कारभारातच सात्वीकवृत्ती वाढीस लागायला हवी. सात्वीकवृत्तीचे राजेच आज अमर आहेत. त्यांचेच नाव होते. सर्वांना समान न्याय देणारा राजाच स्वतःचे साम्राज्य उभे करू शकतो. त्यांचे साम्राज्य टिकून राहते.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Saturday, January 22, 2011

झोप

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे ।
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ।।

महत्त्वाच्या पदावरील अनेक माणसे केवळ नाममात्र कारभारी असतात. त्यांना अनेक अधिकार असूनही ते त्याचा वापर करत नाहीत. सरकारी कार्यालयात ही परिस्थिती पहायला मिळते. नुसती हजेरी मांडून पगार तेवढा घ्यायला जातात. ही तामसवृत्ती दुसऱ्यांना सुद्धा त्रासदायक ठरते आहे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या सानिध्यातील इतरांनाही ही सवय लागते. वरिष्ठच झोपलेले असतील तर कार्यालयातील शिपायापासून सर्वजण आळशी असलेले पाहायला मिळतात. एखाद्या अधिकाऱ्याने पद मिळाले तर त्याचा वापर योग्य कामासाठी, सत्कर्मासाठी करायला हवा. अशी वृत्ती त्याच्यात असायला हवी. उच्च पदावरील तामसीवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे सरकारी कार्यालयांची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे. राज्यकर्तेही अशा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यातच राज्यकर्त्यांना अधिक रस घेतात. अशा या कारभारामुळे जनता त्रस्त आहे. किरकोळ कामासाठीही जनतेला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते आहे. काही अधिकारी याला अपवाद असतात. पण असे कार्यक्षम अधिकारी फार काळ सेवेत टिकत नाहीत असाही अनुभव आहे. कारण तामसाच्या सानिध्यात आपणही तामस होऊ का? अशी भीती त्यांना वाटते. असे हे तामसीवृत्तीचे झोपी गेलेले अधिकारी सात्त्विक होणार तरी कधी? विकासाच्या, महासत्तेच्या चर्चा करताना अशा सरकारी कारभारामुळे बाधा पोहोचते आहे. याकडे हे सरकार तरी लक्ष देते का? झोपलेल्या सरकारला जाग येईल तरी कधी? निवडून गेलेले मौनी खासदार - आमदार यांचे मौन सुटणार तरी कधी? नुसत्या शासकीय फायली इकडून तिकडे करून आयता पगार लाटण्यातच यांचे कामकाज चालते. कागदोपत्री योजनांची पूर्तता करून पैसे लाटणारे हे राज्यकर्ते कोणाच्या फायद्याचे? अशाने देशाचा विकास तरी कसा होणार? कागदावरच महासत्तेच्या गप्पा मारण्यात सर्वजण पटाईत आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती खूप गंभीर आहे. तमोगुणाचे साम्राज्य पसरलेले आहे. पूर्वीच्याकाळी अनेक राजे असे होते. सत्ता भोगण्यातच त्यांचे आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाणही नव्हती. ऐश आरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येकवर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. सरकारचे व सरकारी कार्यालयातील तामसीवृत्तीचे हे व्यसन सुटणार तरी कधी? असा हा तामसगुण केवळ त्यांच्यासाठीच नव्हेतर इतरांसाठीही हानिकारक आहे. यातून जागृती ही यायलाच हवी.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Monday, January 17, 2011

लोभीवृत्ती

जैसा मीनाचां तोंडीं । पडेना जंव उंडीं ।
तंव गळ आसुडी । जळपारधी ।।

माणूस लोभी आणि स्वार्थी असतो. अशा या त्यांच्या स्वभावामुळेच तो अनेक संकटात सापडतो. जगात वावरताना लोभ,माया, स्वार्थ बाजूला ठेवायला हवा. ताक सुद्धा फुंकून पिण्याची सवय हवी. लोभाच्या लालसेने आपण स्वतःच स्वतः समोर अनेक संकटे उभी करत असतो. अनेक शेतकरी अधिक उत्पन्नाच्या लालसेपोटी पिकांना प्रमाणापेक्षा अधिक खते टाकतात. ठराविक मर्यादेपर्यंत पिके खतांचे शोषण करू शकतात. कोणत्या पिकास किती प्रमाणात खते द्यायला हवीत. त्याची आवश्‍यकता किती आहे हे संशोधकांनी शोधले आहे. त्या प्रमाणातच खतांचा पुरवठा करणे योग्य असते. अधिक उत्पन्नाच्या लालसेने खतांची मात्रा वाढवून शेतकरी स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतो. यासाठी कोणतीही गोष्ट ठराविक एखाद्या मर्यादेपर्यंत उत्तम प्रतिसाद देते. हाव असावी पण त्याला ठराविक मर्यादा असावी लागते. खाद्याच्या आमिषाने मासा जळपारध्याच्या जाळ्यात सापडतो. सध्या समाजात अशा अनेक जळपारध्यांचा सुळसुळाट झालाय. व्यापाऱ्यांच्याही वृत्तीत मोठा बदल झाला आहे. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर प्रथम सत्तेत असणाऱ्या राज्यकर्त्यांनी लोभ सोडायला हवा. लुटारू वृत्ती सोडायला हवी. जसा राजा तशी प्रजा असे म्हटले जाते. भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या सानिध्यात भ्रष्ट लोकांचा वावरच अधिक असतो. अशा वृत्तीमुळे भ्रष्ट कारभारात वाढ होत आहे. सर्वसामान्य जनता यामुळे बदलत चालली आहे. ही जनता कधीतरी या विरोधात उठाव करणार हे निश्‍चित. जाळ्यात सापडलेल्या अनेक माशांनी उठाव केला तर, जलपारध्याने टाकलेले जाळे सुद्धा कोलमडू शकते. त्यातून मासे बाहेर पडू शकतात. यासाठी एकत्रित उठाव व्हायला हवा. या लोभीवृत्ती विरुद्ध उठाव करायला शिकले पाहिजे. सर्वप्रथम स्वतःपासून याची सुरवात करायला हवी. लालसा सोडली तर मनाची शांती टिकते. असे लक्षात येईल.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Thursday, January 13, 2011

ज्ञान-अज्ञान

ऐसी कोण्ही एकी दशा । तिये वादु अज्ञान ऐसा ।
तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नांव ।।

रात्र नाही व दिवसही नाही त्यावेळेला सांजवेळ म्हटले जाते. त्याप्रमाणे विपरीत ज्ञान नसते किंवा स्वरूपज्ञान नसते तेव्हा ते केवळ अज्ञान असते. अज्ञानात ज्ञान गुरफटलेले आहे. फळाच्या आतमधील गर खाण्यास योग्य असतो. साल टाकून द्यावी लागते. ती साल काढावी लागते तरच आतला गर खाता येतो. सालीसकट गर खाल्ला तर त्याची चव वेगळी लागते. गराची गोडी जाते. चवीचे खाणारा असतो तो साल काढून गर तेवढाच खातो. तसे ज्ञान हे अंतर्मनात असते. ते हस्तगत करण्यासाठी अज्ञानाचे पडदे दूर करायला हवेत. अज्ञानासकट ज्ञान हस्तगत करता येत नाही. यासाठी अज्ञान दूर करायला हवे. प्रकाश जिथे आहे तिथे अंधार हा सापडत नाही. तसे ज्ञान जिथे आहे तेथे अज्ञान नसते. फळ कच्चे असताना त्याच्या सालीचा रंग वेगळा असतो. सालीच्या रंगावरून फळाची परिपक्वता समजते. फळ पक्व झाल्यावर सालीचा रंग वेगळा असतो. तसे ज्ञान पक्व झाल्यावर त्या व्यक्तीमध्ये बरेच बदल झालेले दिसतात. त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात एक पक्वता असते. त्याच्या व्यवहारातही फरक जाणवतो. ही पक्वता आल्यानंतर त्याने अज्ञानाची झापड दूर करावी लागते. तरच खऱ्या ज्ञानाची आस्वाद घेत येतो. अज्ञानामुळे त्या ज्ञानाची गोडी कमी होते. पक्वता आल्यावर फळे सुद्धा आपोआप फुटतात व त्यातून बिया बाहेर येतात. गर बाहेर येतो. पक्वता आल्यावर ज्ञानही बाहेर पडते. पण पक्वता यायला हवी. ज्ञान पक्व व्हायला हवे. तरच अज्ञान दूर होईल. ज्ञानाच्या पक्वतेची जाणीव, तो बोध व्हायला हवा. सद्‌गुरूकृपेने ही पक्वता येते. जाणीव होते. त्याचा बोध होतो. त्या अनुभूतीने अज्ञान आपोआप दूर सारले जाऊन ज्ञानाची वाट सुकर होते.

राजेंद्र घोरपडे 9011087406

Thursday, January 6, 2011

नित्यता

जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता ।
परिपूर्ण पूर्णता । माझियाची ।।

एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचे असेल तर त्याचा ध्यास घ्यावा लागतो. नित्य ध्यासाने त्या गोष्टीत परिपूर्णता साधता येते. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती पाहिजे. विचारात चांगुलपणा असेल आणि कामात नित्यता असेल तर, यश सुद्धा त्याच्यापुढे लोटांगण घालते. संत गोरा कुंभार यांच्या नित्य ध्यासामुळेच विठुराया त्यांची मडकी वळायचा. सद्‌गुरुंच्या नित्य ध्यासाने सद्‌गुरू मदतीला धावून येतात. कधी ते कुणाची घरकामे करतात, तर कधी ते कुणाचे दळण दळतात. तर कधी कुणाचा रथाचे सारथी होतात. सध्याच्या युगात अशा गोष्टी मनाला पटणे कठीण आहे. नव्या पिढीला या गोष्टी समजणे कठीण आहे. पण एखाद्या कामात नित्यपणा असेल तर तुमच्या स्पर्धकांवर सुद्धा तुम्ही सहज मात करू शकता. तुमच्या नित्यपणामुळे तुमचा शत्रूही त्रस्त होऊन शत्रुत्व सोडू शकतो. अपयश आले म्हणून थांबायचे नाही. अपयश एकदा येईल, दोनदा येईल तिसऱ्यांदा यश निश्‍चितच मिळते. प्रयत्न सोडायचे नाहीत. क्रिकेटमध्ये प्रत्येक कसोटी सामन्यात फलंदाज शतक ठोकू शकत नाही. काही वेळेला तर तो सतत शून्यावरही बाद होतो. पण परिश्रमाने, प्रयत्नाने त्याच्यात सातत्य येते. नेहमी चांगल्या धावा करण्याकडे त्याचा कल राहतो. खेळाचे जसे आहे तसेच जीवनाचेही आहे. व्यवसायात रोज भरघोस उत्पन्न होईल असे नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला नेहमीच चांगला भाव मिळतो असे नाही. पण यासाठी शेतकऱ्याने शेती सोडून देणे किंवा व्यावसायिकाने व्यवसाय सोडून देणे योग्य नाही. चुका कशा होतात, का होतात याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सुधारता आल्या पाहिजेत. एखादी गोष्ट समजत नाही तर ती मनमोकळेपणाने सांगितली पाहिजे. दुःख व्यक्त केल्याने मन हलके होते. थोडा आधार होतो. कामातील नित्यतेमुळे खचलेल्या मनाला पुन्हा उभे करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकते. सततच्या ध्यासानेच नराचा नारायण होतो.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Tuesday, January 4, 2011

कर्णफुले

मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।।

साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर साधनेत लागले तर दूरचे आवाजही स्पष्ट ऐकू येतात. साधनेमुळे श्रवणशक्तीत सुधारणा होते. असे साधनेचे अनेक फायदे आहेत. यातील हा एक फायदा आहे. पण दूरच्या या आवाजांनी मन विचलित होऊ देऊ नये. मनाला सोsहंच्या ठिकाणीच स्थिर करणे गरजेचे आहे. हळूहळू प्रगती होत राहते. एकदम झटकीपट सर्वच मिळते असे नाही. सध्याच्या युगात झटपट गोष्टी मिळविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना अशाच गोष्टीत अधिक रस वाटू लागला आहे. जुन्या पिढीत असे नव्हते. जुन्या पिढीत सहनशीलता खूप होती. परवाच मी वाचले की नाशिकमध्ये कर्जबाजारीपणा आणि अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीतून द्राक्ष उत्पादकांमध्ये नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आणि यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या केलेल्या एका द्राक्ष उत्पादकाच्या वडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. ते म्हणाले की सध्याच्या पिढीला झटपट यश मिळविण्याची हाव लागली आहे. 1985 मध्ये त्यांनी एक एकर द्राक्ष बागेच्या उत्पन्नातून दीड एकर शेती विकत घेतली होती. असे यश मुलाला कमवायचे होते. पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. यात असे यश झटपट मिळणार नाही. थोडी सहनशीलता ठेवायला हवी. धीर धरायला हवा. हा विचार आताच्या पिढीत नाही. एक दोन वर्षाच्या नुकसानीतून इतके निराश होण्याची काहीच गरज नाही. निराशा त्याने बोलूनही दाखवली नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली. झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. साधनेत सुद्धा मन सुरवातीला रमत नाही. म्हणून निराश होऊ नये. मन साधनेत कसे रमवायचे हे समजून घ्यायला हवे. यासाठी स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. स्वतःचाच जप स्वतःच्या कानांनी ऐकणे ही कर्णफुले संतांना वाहावीत.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406