Tuesday, December 28, 2010

अनुभूती

जय जय सर्व विसांवया । सोsहं भाव सुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ।।

अनुभवाशिवाय बोलू नये असे म्हटले जाते. नोकरीमध्ये सुद्धा अनुभव पाहिला जातो व त्यानुसार तुमची पात्रता ठरविली जाते. आत्मज्ञानी संतांकडे गेल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय त्यांच्या विषयी बोलणे हे व्यर्थ आहे. अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच येथे प्रगती साधता येते. आत्मज्ञानी सद्‌गुरू शिष्यांना अनुभव देतात. ते मनकवडे असतात. ते भक्तांच्या मनातील इच्छा, आकांछा जाणतात. त्यांना भूत- भविष्याचे ज्ञान असते. ते शांतीचे सागर आहेत. त्यांच्या दर्शनानेही मनाला शांती, समाधान वाटते. ते समाधिस्थ झाले, तरीही ते भक्तांना मार्गदर्शन करत असतात. अनुभव देत असतात. भक्तांचे दुःख ते दूर करत असतात. संकटकाळी मनाला त्यांचाच आधार असतो. पुरात सापडलेल्या व्यक्तीला एखादा लाकडी ओंडका मिळाला तर तो तरू शकतो. तो बुडण्यापासून वाचू शकतो. तसे सद्‌गुरू संकटकाळात लाकडी ओंडका होतात. शिष्याला संकटकाळात आधार देतात. त्यांचे जीवन तारतात. संकटात तरलेले भविष्यात फार मोठी कामगिरी करू शकतात. कारण त्यांनी दुःख पचवायला शिकलेले असते. दुःखावर मात करायला ते अनुभवलेले असतात. अनुभवामुळे भविष्यात चुका होत नाहीत. प्रगती होत राहते. वाट सापडते. वेगवेगळे मार्ग सुचतात. सद्‌गुरू शिष्याला योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशा दाखवतात. प्रगतीच्या वाटा सांगतात. आध्यात्मिक अनुभव देतात. असे हे सद्‌गुरू जगासाठीही विश्रांतीचे स्थान असतात. त्यांच्याजवळ आनंद ओसंडून वाहत असतो. खचलेल्या मनात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ या आनंदात आहे. सद्‌गुरू शिष्याला त्याची खरी ओळख करून देतात. मी ब्रह्म आहे याचा अनुभव ते सतत शिष्याला देत राहतात. यासाठी त्यांच्या संगतीत जाऊन तो अनुभव घ्यायला हवा. संकटकाळीच लोक देवाकडे जातात पण जे नियमित जातात त्यांना अनुभवाने देवपण प्राप्त हो
ते.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Sunday, December 26, 2010

रसज्ञ

तेथ सुगरणी उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।
मिळती मग अवतरे । हातु जैंसा ।।

सिंहगडावर मिळणारी झुणका भाकरी कधी खाल्ली आहे का? लोट्यातून दहीही मिळते. त्याची चव चाखली आहे का? याची गोडी काही औरच असते. एखाद्याच्या हातचा गुणच वेगळा असतो. प्रत्येकाला ते जमत नाही. एखाद्या ठिकाणचे पदार्थही वेगळ्याच गोडीचे असतात. सध्या धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याची चवही कशी सुधारता येईल हेही पाहिले जात आहे. पण या संकरित जाती फार काळ टिकत नाहीत. पारंपरिक जातीमध्ये जे गुण होते ते गुण या संकरित जातीत आढळत नाहीत. यासाठी धान्याच्या पारंपरिक जाती जतन करण्याची गरज आहे. पण या जातींचे उत्पादन कमी असते. यामुळे काळाच्या ओघात या जाती नष्ट होत आहेत. सध्या नव्याने अनेक संकरित जाती येत आहेत. जैवतंत्रज्ञानाने तर यामध्ये मोठी क्रांतीच केली आहे. उत्पादन वाढीचा उच्चांक गाठणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. पण या जाती खाण्यास योग्य आहेत का? याचे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात. याबाबत संशोधकातही एकमत नाही. बीटी वांगे यामुळेच चर्चेत आहे. वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी उत्पादन वाढीची गरज आहे. 2050 पर्यंत देशाच्या कृषी उत्पादनात 70 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे, म्हणून कशाही प्रकारे उत्पादन घेऊन चालणारे नाही. आरोग्याचीही काळजी घेणे आवश्‍यक आहे. उत्पादन वाढीबरोबरच त्याची उत्तमता, प्रत, गोडी तसेच आरोग्यास लाभदायक असे गुण टिकवणे हे आव्हान संशोधकांसमोर आहे. नुसतेच भरघोस उत्पन्न घेऊन चालणार नाही. त्याने समाधान होणार नाही. त्याला गोडीही असेल तरच मागणी राहते. भरघोस उगवते, गोडीही आहे आणि शिजवलेही उत्तम जाते, मग याच्या ग्रहणाने तृप्ती ही निश्‍चितच येणार. मनाला तृप्ती आली की चेहराही तजेलदार होतो. साधनेलाही गोडी लागते. कीर्तनकारास प्रेक्षकांची साथ मिळाली तर कीर्तन सांगणाऱ्यासही जोर चढतो. गोडीने ऐकणारे असल्यावर सांगणाऱ्यासही गोडी वाटते. संगीताचेही तसेच आहे. गायकास रसिकांची दाद मिळाली तर त्यालाही स्फुरण चढते. तसे आत्मज्ञानी सद्‌गुरूंकडे ओसंडून वाहणाऱ्या या ज्ञानरसात मनमुराद डुंबणारे शिष्य भेटले तर ते ही तृप्त होऊन जातात. सद्‌गुरुंच्या ज्ञानरसाने शिष्यही तृप्त होऊन जातो. मनाची तृप्ती अनुभवतो. खाणारा आवडीने खात असेल तर भरवणाराही आवडीने भरवतो. शिष्य आवडीने खात असेल तर सद्‌गुरूही आवडी भरवतात. मग अशा शिष्याला तृप्ती का येणार नाही? मनाची स्थिरता का साधता येणार नाही? स्थिरता आली की मन आपोआप साधनेत लागते. फक्त आवड पाहिजे.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Friday, December 24, 2010

राजहंस

तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ।।

दुधात पाणी मिसळले तर दूध पातळ होते. पण राजहंस हा असा पक्षी आहे जो त्यातील फक्त दूधच पितो व पाणी शिल्लक ठेवतो. इतके चातुर्य त्याच्याकडे आहे. आपणास आवश्‍यक ती गोष्टच तो घेतो. राजहंसाप्रमाणे आपणही या मोहमयी जगातील केवळ चांगल्या गोष्टींचे ग्रहण करायला शिकले पाहिजे. या मोहजालात न अडकता यातून योग्य काय व अयोग्य काय हे ओळखायला शिकले पाहिजे. यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. मनाच्या स्थिरतेसाठी अशी दृष्टी गरजेची आहे. साधनेत मन रमण्यासाठी स्थिरता ही आवश्‍यक आहे. चांगल्या गोष्टीतून मनाला आनंद होतो. त्या गोष्टीच सतत ग्रहण करत राहिले तर स्थिरता आपोआप येते. दुष्ट विचारांनी मन चलबिचल होते. मनाची चलबिचलता दूर करण्यासाठी सन्मार्गाची सवय लावायला हवी. वाईट आणि चांगले यातील केवळ चांगल्या गोष्टी उचलायला हव्यात. आत्मा व देह वेगवेगळे आहेत. दुधात जसे पाणी मिसळले आहे तसे देहात आत्मा आला आहे. देहापासून आत्मा वेगळा आहे. हे जाणण्यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. देहाचा क्षणभंगूरपणा ओळखायला हवा. आत्म्याचे अमरत्व अनुभवायला हवे. आत्म्याची अनुभूती यायला हवी. सद्‌गुरू त्यांच्या अनुभवातून ही अनुभूती शिष्याला देत असतात. शिष्याने फक्त जागरूक असायला हवे. राजहंसासारखे ओळखायला व टिपायला शिकले पाहिजे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील फरक, देह आणि आत्मा यातील फरक ओळखायला हवा. हे ज्ञानदृष्टीने जे जाणतात तेच खरे राजहंस. तेच आत्मज्ञानाचे लाभार्थी होतात. तेच त्या परमपदाला पोहोचतात.

राजेंद्र घोरपडे,
संपर्क क्र. 9011087406

Thursday, December 16, 2010

देह आणि आत्मा

या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।
पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ।।

देहात आत्मा आला आहे. पण तो देहापासून अलिप्त आहे. देह हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. यामुळे तो क्षणात नाश ही पावणारा आहे. मृत्यूनंतर देहाला अग्नी दिला तर त्याची राख होते आणि उघड्यावर पडला तर तो सडून जाईल किंवा कुत्री, मांजरे, गिधाडे यांचे भक्ष्य होईल. किड्यांचा ढीगही साचेल. इतकी वाईट अवस्था या देहाची आहे. यासाठी या देहाचा मोह नको. सौंदर्य सुद्धा टिकून राहात नाही. तारूण्यातले सौंदर्य म्हातारपणापर्यंत तसेच टिकून राहात नाही. यासाठी या सौंदर्याचा गर्व असणेही योग्य नाही. जे टिकत नाही ते टिकवून ठेवण्यात सध्या माणसाची खटपट सुरू आहे. सौंदर्यप्रसादनावर किती मोठा खर्च होतो हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. साबणाच्याच किती जाहिराती दूरदर्शनवर झळकतात. अमूक एक साबण वापरला तर तुमचा चेहरा अधिक उजळेल. तजेलदार होईल. अशा या जाहिराती प्रचार सुरू असतो. साबणाचा वापर शरीरावरील कीटक, घाण घालवण्यासाठी होतो ही सांगणारी अपवादाने एखादीच जाहिरात असते. अशा साबणाला मागणीही तितकी कमी असते. खरे तर साबणाचा वापर हा स्वच्छतेसाठी केला जातो. त्याने सौंदर्य क्षणिकच वाढवले जाते. पण आपण त्याच्याकडेच आकर्षित होतो. क्षणिक सुखाच्या मागे माणसे धावत आहेत. देहाचा मोह त्यांना असतो. अशा या देहाचा नाश व्हायला क्षणही लागत नाही. पण या देहात आलेला आत्मा हा अमर आहे. त्याचा नाश होत नाही. त्याला देहाप्रमाणे आकार नाही. त्याचे देहाप्रमाणे प्रकारही नाहीत. काळा, गोरा असा भेदभाव त्यामध्ये नाही. देहात आल्यामुळे तो युक्त नाही. पण तो बद्धही नाही. सृष्टीच्या निर्मितीमुळे तो तयार झाला असेही नाही किंवा सृष्टीचा विनाश झाला तर तो नाश पावणाराही नाही. त्याचे मोजमाप ही करता येत नाही. इतका मोठा, इतका लहान असे वर्णनही करता येत नाही. देहाच्या ठिकाणी असून तो देहापासून अलिप्त आहे. अशा या आत्माला ओळखणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, December 13, 2010

ब्रह्मसंपन्नता

एऱ्हवी तैचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना ।
जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ।।

अग्नीतून निघणारी प्रत्येक ठिणगी जरी वेगळी दिसत असली तरी त्या सर्व ठिणग्या एकच असतात. सूर्यापासून निघणारी किरणे कधी सोनेरी, कवडशातून कधी लख्ख पांढरी अशी वेगवेगळी वाटत असली तरी ती सर्व किरणे ही एकच असतात. ही किरणे प्रिझममधून गेली तर ती सप्तरंगी होऊन बाहेर पडतात. पण ही सप्तरंगी किरणे ही एकाच किरणांपासून तयार होतात. या सातही रंगात एकच किरण सामावलेला आहे. प्रत्येक देहात असणारा आत्मा हा वेगवेगळा वाटत असला तरी तो एकच आहे. हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी. हे जाणणे हेच खरे ज्ञान. आत्माला जाणणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. हे जो जाणतो तोच ब्रह्मज्ञानी होतो. ब्रह्मसंपन्न होतो. सद्‌गुरू ब्रह्मत्वास स्वरूपाच्या ठायी स्थिर करून, धारण करून, स्वात्मबोधी व ब्रह्मबोधी होतात. ते ब्रह्म बोधाचे सुख, सद्‌गुरू स्वतः आपल्या शिष्याच्या ठायी ओतत असतात. या क्रियेने स्वाभाविकच शिष्य हा गुरूरुप होतो. गुरूचे गुरूत्व हे त्यांच्या आकाराने विसर्जित होऊन शिष्याच्या आकाराने मंडित होते. ब्रह्मसंपन्नता आल्यावर गुरू- शिष्य हा भेद राहात नाही. त्या शिष्यातून ती ब्रह्मसंपन्नता, ते ज्ञान ओसंडून वाहू लागते. यासाठी गुरूंकडून मिळत असलेल्या ज्ञानात, आनंदात डुंबायला शिकले पाहिजे. ते सतत ओतत असलेल्या ज्ञानाचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. प्रत्येकजण ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. येथे ना जातीची अट आहे, ना गरीब श्रीमंतीचे बंधन आहे. प्रत्येक जीव ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. फक्त त्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाला सारखाच हक्क आहे. कोणताही भेदभाव नाही. यासाठी आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. ते ज्ञान आत्मसात करायला शिकले पाहिजे. मी एक आत्मा आहे याचा बोध यायला हवा. ज्याने यावर विजय मिळवला तोच आत्मज्ञानी. मनाचा तसा निग्रह करायला हवा. मन यावर स्थिर करायला हवे. जो हे करतो तोच खरा गुरूंचा शिष्य असतो. गुरूकृपेनेच तो ब्रह्मसंपन्न होतो.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, December 9, 2010

महाशुन्य

नभाचे शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन ।
ते शून्यतें महाशून्य । श्रुतिवचन संमत ।।

गणितात शुन्याला महत्त्व आहे. आलेखात शून्य हा केंद्रस्थानी असतो. शुन्यापासूनच चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाची सुरवात होते. शून्य समही नाही विषमही नाही. जीवनात चढ उतार असतात. पण स्थिरतेला महत्त्व आहे. अध्यात्मात शून्य अवस्थेला खूप महत्त्व आहे. विचार शून्य व्हायला हवेत. सध्याच्या युगात हे कसे शक्‍य आहे. पण प्रत्यक्षात शब्दशः असा अर्थ नाही. अध्यात्मातील अर्थ समजून घ्यायला हवेत. विचार शून्य व्हायला हवेत म्हणजे विचार थांबायला हवेत. त्यामध्ये स्थिरता यायला हवी. मन स्थिर व्हायला हवे मन "सो s हम' वर स्थिर व्हायला हवे. असा याचा खरा अर्थ आहे. साधनेचा खरा आनंद घ्यायचा असेल तर विचार शून्य व्हायलाच हवेत. विचार शून्य कसे होतात? विचार कसे थांबतात? खर तर विचार हे येतच राहतात. त्यांना थांबवणे अशक्‍य असते. आज यावर विजय मिळवला तर उद्या काय त्याच्याकडून पराभूत झालो. यातून सुख-दुःखे उत्पन्न होत असतात. विजयाने आनंद तर पराभवाने दुःख होते. पण विजय मिळाला म्हणून हुरळून जायचे नाही व दुःखाने खचून जायचे नाही. यासाठी मन उदास व्हायला हवे. मी कोण आहे? हे जाणणे हाच खरा विजय आहे. आत्मज्ञान प्राप्ती हेच ध्येय असावे. त्यानंतर सर्व आनंदी आनंद आहे. दुःख नाहीच. मनाला या खऱ्या आनंदाची ओढ लावायला हवी. आपल्याकडे अमाप गोष्ट असते तेव्हाच आपण त्यातील थोडी दुसऱ्याला वाटू शकतो. आपल्याकडे अमाप आनंद असेल तरच आपण दुसऱ्याला आनंदी करू शकू. आत्मज्ञानी व्यक्तीकडे आनंद ओसंडून वाहत असतो. त्याच्या ज्ञानातून वाहणाऱ्या या आनंदात डुंबायला शिकायला हवे. मनाला या आनंदाची गोडी लागली की आपोआप स्थिरता येते. मनात मग तोच विचार घोळत राहतो. साधनेत आपोआप मन लागते. विचार शून्य होतात. शुन्याची बेरीज व वजाबाकी शून्यच येते. शुन्याला भागच नाहीत त्यामुळे त्याचा भागाकार होत नाही. आणि गुणाकार केला तर उत्तर शून्यच येते. विचारांचा गुणाकार केला तर विचार पटीत वाढतात. पण विचाराला शुन्याने गुणले तर विचार शून्यच होईल. शुन्याची ही अवस्था जाणून घ्यायला हवी. त्याची व्यापकता जाणून घ्यायला हवी. आकाशाची पोकळी किती मोठी आहे. अनंत विस्तार असणाऱ्या या आकाशाचे मोजमाप अद्याप कोणालाही करता आले नाही. कारण ते एक शून्य आहे. शुन्याचे मोजमापच होत नाही. शुन्याचे मोजमाप शून्यच आहे. हे महाशुन्य जाणून घ्यायला हवे. मग विचार आपोआपच शून्य होतील.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, December 6, 2010

अज्ञानवेली

तया शरीर जे जालें । तें अज्ञानाचें बी विरूढलें ।
तयाचें वित्पत्तित्त्व गेलें । अज्ञानवेली ।।

ज्वारीचे बी पेरले की ज्वारीचेच पीक येते. आंब्याचे बी पेरले की आंब्याचे रोपच उगवते. तसे अज्ञानाचे बी रुचले की तेथे अज्ञानाचाच वेल उगवतो. ज्याचे आपण बी पेरतो त्याचेच रोपटे उगवते. अफूचे बी पेरल्यावर अफूच उगवणार. यासाठी शेती कशाची करायची हे आपण ठरवायचे असते. पेरणी ही आपणालाच करावी लागते. ज्ञानाची पेरणी केली की निश्‍चितच तेथे ज्ञानाचे रोपटे उगवेल. तणाचे बी पेरावे लागत नाही ते आपोआपच उगवते. तणांचा नाश केला तरी शेतात तण हे उगवतेच. असेच अज्ञानाचे आहे. अज्ञानाचे बी एकदा शेतात पडले तर त्याचा फैलाव जोरदार होतो. त्याचा समूळ नाश करावा लागतो. शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर तणांचा नाश करावा लागतो. शेतातील तणे काढून टाकावी लागतात. तरच पिकाची वाढ जोमदार होते. तणे शेतीतील अन्नद्रव्ये शोषतात. तणांची वाढ जोरात होते. पण ती फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच जमिनीत गाढली तर ती कुजल्यानंतर त्याचे खत होते. याचा उपयोग पिकाच्या वाढीला होतो. यासाठी अज्ञान फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच गाढावे. म्हणजे ते कुजून त्याचे खत होऊन ज्ञानाचे रोप जोमात वाढेल. अज्ञान वाढू न देण्यातच ज्ञानाची प्रगती आहे. काही तणे ही परोपजीवी असतात. यामुळे मुख्य पिकाची वाढ खुंटते. अज्ञान सुद्धा एक परोपजीवी तणच आहे. यामुळे ज्ञानाची वाढ खुंटते. ज्ञानाची वाढ जोमाने होण्यासाठी अज्ञानाच्या तणाची खुरपणी ही व्हायलाच हवी. अज्ञानाचे तण न काढताच खते टाकली तर ज्ञानाच्या पिकापेक्षा अज्ञानाच्या तणांची वाढ जोमाने होईल. पुन्हा त्या शेतात ज्ञानाच्या पिकाची पेरणीही करणे शक्‍य होणार नाही. यासाठी अज्ञानाच्या तणांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, December 2, 2010

संस्कार

चित्त आराधीं स्त्रियेचें । स्त्रियेचेनि छंदे नाचे ।
माकड गारूडियाचे । जैसे होय ।।

सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष असा भेदभावही जवळपास संपला आहे. पुरुष प्रधान संस्कृती आता मागे पडत आहे. आर्थिक संपन्नतेमुळे सामाजिक बदलही झाला आहे. चंगळवादी संस्कृती सध्या पाय रोवू लागली आहे. याचा कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका पोहोचू शकतो. संपन्नतेने शांती येतेच असे नाही. उलट शांती कमी होताना दिसते. एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत असे अनेक प्रश्‍न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे. समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल तर कुटुंब व्यवस्थाही टिकायलाच हवी. बदलत्या परिस्थितीनुसार स्त्री- पुरुष नाते संबंधात बदलत होत आहे. किरकोळ कारणांनी मोठे वाद होतात, लगेचच घटस्फोट. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. तू नाही तर लगेच दुसरा किंवा दुसरी अशी अवस्था आज संसाराची झाली आहे. चंगळवादाने अशा समस्या उद्‌भवत आहेत. तसे पाहता पूर्वीच्या काळीही असे प्रश्‍न होते, पण त्यांचे प्रमाण कमी होते. समाजाच्या चौकटीत अशांना मान नव्हता. त्यामुळे असे प्रकार कमी घडत असत. स्त्रियांच्या प्रश्‍नावर चर्चाही केली जाते. पण स्त्री स्वातंत्र्यामुळे उलट त्याच्या सुरक्षेचाच प्रश्‍नच मोठा झाला आहे. बलात्कार, लैंगिक शोषण असे अनेक प्रकार डोके वर काढत आहेत. अशाने सामाजिक शांती नष्ट झाली आहे. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा तरच हे प्रश्‍न सुटतील. सामाजिक संस्कारांचे महत्त्व जनतेला पटवून द्यायला हवे. धर्मामध्ये स्त्रियांवर टीका केली आहे. म्हणून तो सोडून देणे योग्य नाही. टीका ही का गेली आहे याचा प्रथम विचार करायला हवा. टिके मागचा हेतू जाणून घ्यायला हवा. संस्कृतीला नावे ठेवण्याऐवजी टीकेवर चिंतन, मनन करायला हवे. भारतीय संस्कृती मनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकवते. यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ही टीका मुळात टीका नसून मन नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेले उपदेश आहेत. समाजात स्त्री- पुरुषांनी वावरताना कोणती कर्तव्य पाळावीत हे त्यामध्ये सांगितले गेले आहे. हे सर्व सामाजिक शांती, समृद्धीसाठी सांगितले गेले आहे. चंगळवादी संस्कृतीवर मात करण्याचे सामर्थ या विचारात आहे. यासाठी याचा अभ्यास करायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे