Monday, November 29, 2010

सन्मार्गाची कास

तरि वाघाचिये अडवे । चरोनि एकवेळ आला दैवें ।
तेणें विश्‍वासें पुढती धांवे । वसू जैसा ।।

जंगलात गेलेला बैल वाघासमोरून एकदा चरून आला. पण दैवयोगाने वाघाने त्याला कोणतीही हानी पोचविली नाही. यामुळे त्या बैलाचा विश्‍वास बळावला. वाघाबाबतची भीती त्याच्या मनातून गेली व तो बैल पुन्हा तेथेच चरायला गेला. काय झाले असेल? वाघाने त्यांच्या फरशा पाडला. चोराची एक चोरी यशस्वी झाली की तो लगेचच दुसरी चोरी करण्याचा विचार करतो. त्याला चोरी करण्याचे व्यसन लागते. माणसाचे मनावर नियंत्रण नसते. सतत ते विषयांच्या मागे धावत असते. दहशतवादी कृत्येही अशाच अज्ञानातून वाढत आहेत. एखादे गैरकृत्य पचले की पुढे दुसरा गैर प्रकार करण्याची वृत्ती होते. यातून गैर कारभार करण्याची सवयच लागते. माणूस त्याच्या आहारी जातो. त्याचे मनावर नियंत्रण राहात नाही. सध्या अनेक राजकारण्यांना सुद्धा हीच सवय लागली आहे. एखादा गैर कारभार केला. तो पचला, की लगेच दुसरा करायचा. अशाने भ्रष्टाचार वाढला आहे. लोकांना तो आता शिष्टाचार वाटू लागला आहे. नियंत्रण सुटलेले आहे. पण आपण एकदा सापडलो तर कायमचे बाद हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ठेच लावल्याशिवाय भान येत नाही म्हणतात ना ते हेच. राजकारणात अशी बाद झालेली अनेक घराणी आहेत. चुकांची सुद्धा एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यावर सुधारण्यासाठीही संधी मिळत नाही. एकदा चुकल्यानंतर ती लगेच सुधारणे व पुन्हा अशी चूक न करणे यातच खरा शहाणपणा आहे. पण तसे होत नाही. ऊस गोड लागला म्हणून तो मुळा सकट खायचा नसतो. वाईट सवयीचे व्यसन लगेचच लागते. पण ते जडू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवा. तरच खरे यश संपादन करता येईल. वाईट मार्गाने कमविलेली संपत्ती फार काळ टिकत नाही. तेव्हा वाईट गोष्टींचा मोह धरू नये. तो टाळणे यातच खरे हित आहे. मोह माणसाला आवरता यायला हवा. यासाठी सन्मार्गाची कास धरायला हवी. व्यसन असावे पण ते चांगल्या गोष्टीचे असावे. वाईटाचे व्यसन हे आपणासाच खाऊन टाकते. हे विसरता कामा नये.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, November 28, 2010

मनोरथ

मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।
पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ।।

मनोरथ, संकल्प कशाचा करायचा हे सुद्धा महत्त्वाचे आहे. संकल्पाशिवाय प्रगती होत नाही. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. रात्रंदिवस झटतो. मन त्यातच गुंतते. कधीतरी तो पूर्ण होतो. कधी पूर्ण ही होत नाही. पण आपण पूर्ण होईल या आशेने त्यामध्ये कार्यरत असतो. मनोरथ पूर्ण झाला नाही तरी मन समाधानी असावे. आशा सोडायची नाही. अपयशी ही यशाची पहिली पायरी आहे. असे समजून त्यामध्ये प्रयत्न करत राहायचे. वादळे ही होतच राहतात. जीवनात चढ उतार हे येतच असतात. प्रवासात कधी डोंगर अडवा येतो तर कधी खोल दरी येते. पण प्रवास मध्येच सोडून देता येत नाही. अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर मात ही करावीच लागते. वादळ आले तर सुरक्षित जागा शोधावी लागते. यासाठी संकल्प करतात. योग्य ते नियोजनही आवश्‍यक आहे. म्हणजे येणाऱ्या अडचणीवर सहजपणे मात करता येईल. उद्दिष्ठ गाठता येईल. कामात नियोजनाचा अभाव असेल तर अपयश येण्याची शक्‍यता असते. यासाठी योग्य ती तयारी करणे आवश्‍यक आहे. नुसते प्रयत्न करून चालत नाहीत. नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत राहिल्यास प्रगती होत राहते. निराशा येत नाही. काळजी, भीती वाटत नाही. दूरगामी विचार करून नियोजन करावे म्हणजे संकल्पात येणारे अडथळे कमी होतील. मनाचा दृढ संकल्प हा उद्दिष्ठ गाठण्यात यशस्वी ठरतो हे विसरता कामा नये. लक्ष साधताना मनाची स्थिरता ही आवश्‍यक आहे. मन भरकटता कामा नये. पुरात पडलेला भोपळा प्रवाहात वाहत जातो. तसे मन भरकटते पण ते संकल्पावर स्थिर करणे आवश्‍यक आहे. आलेल्या अडथळ्यांवर मात करीत पुढे चालत राहावे. नियोजनबद्ध कार्यक्रम कधीही अपयशी ठरत नाही.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, November 25, 2010

गुरूभक्त

आतां गुरूभक्तांचे नांव घेणे । तेणे वाचे प्रायश्‍चित्त देवो ।
गुरूसेवका नांव पहा हो । सूर्य जैसा ।.

मानवाच्या स्वभावानुसार भक्तांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काहींचा स्वभाव सज्जन असतो. काहींचा कपटी असतो. मानवाचा स्वभाव केव्हा बदलेल. त्यांच्या मनात कोणता विचार येईल, हे काही सांगता येत नाही. सद्‌गुरूंना मात्र त्यांच्या भक्तांचे सर्व गुण माहीत असतात. ते सर्व जाणत असतात. ते मनकवडे असतात. भक्तांच्या चुकांकडे ते काणाडोळा करत असतात. असेच काही भक्त सद्‌गुरूंचा वापर चुकीच्या पद्धतीने करून घेत असतात. सद्‌गुरूंच्या अशा स्वभावाचा ते फायदा करून घेत असतात. विद्या घेऊन त्यांच्यावरच उलटतात. असा माज त्या भक्तांना असतो. अशा अज्ञानी भक्तांची लक्षणेही जाणून घेणे गरजेचे आहे. तसे अशा भक्ता विषयी बोलणे म्हणजे वाचेस प्रायचित्त करण्यासारखे आहे. आंबलेले, नासलेले पदार्थ खाल्ल्यानंतर जसे तोंडाची चव जाते तशी या अज्ञानी भक्तांच्या विचारांनी स्थिती होते. पण याचाही अनुभव, माहिती असणे गरजेचे आहे. कारण अज्ञानी लक्षणे जाणता आली तर आपल्या होणाऱ्या चुका आपल्या लक्षात येतील. चुका जाणून घेणे व त्या सुधारणे हा सुद्धा ज्ञानी होण्याचा मार्गच आहे.चुकातूनच प्रगती साधली जात असते. यासाठी आपल्या चुकांकडे सद्‌गुरू काणाडोळा करत असतात. एक दिवस हा सुधारेल ही भावना त्यांच्या मनात असते. असेच समजून ते आपणाला मदत करत असतात. प्रेम देत असतात. ज्ञानाचा वर्षाव करत असतात. काही चुका या मानवी स्वभावामुळे होत असतात. या चुका सुधारण्यासाठी मानवी स्वभावात योग्य ते बदल आणण्याची गरज आहे. स्वभाव बदलायला हवा. सद्‌गुरू सुद्धा गुरूभक्तच आहेत. तेही या त्यांच्या गुरूंची साधना करत असतात. खरा गुरूभक्त हा सुर्यासारखा असतो. तेजस्वी असतो. त्यांच्यातून तेज ओसंडून वाहत असते. यामुळेच अनेकांच्या जीवनात प्रकाश पडतो. तेजस्वी गुरूभक्ताचा तेजाने आपल्याही जीवन प्रकाशमान करून घ्यायला शिकलं पाहिजे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, November 21, 2010

डोळसपणा

आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।
तैसा ज्ञाननिश्‍चयो आघवा । वायां जाय ।।

जगात भौतिक प्रगतीचा वेग प्रचंड आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. शहरात प्रचंड प्रगती होत आहे. ग्रामीण भाग आजही अंधारात आहे. प्रगतीच्या वाटा आहेत पण त्यांना मार्गदर्शन करणारा त्यांची प्रगती साधणारा असा जिवाभावाचा कोणी साथीदार त्यांच्याकडे नाही. यामुळे विकासात अडथळे येत आहेत. विकासामुळे शहरातील जीवन हे धकाधकीचे झाले आहे. हे ही तितकेच खरे आहे. आठवड्याची सुटी आता सुटी वाटत नाही. निवांतपणा हा राहिलेलाच नाही. अनेक कामे बाकी राहिलेलीच असतात. अशाने शांती ही नाहीच. देहाच्या सुखासाठी सारीही धडपड सुरूच आहे. पण हे सुख क्षणभंगुर आहे, हे लक्षातही घ्यायला वेळ नाही. क्षणिक सुखाच्या मागे धावणारा हा वर्ग आता कायमस्वरूपी सुखापासून दुरावत चालला आहे. अशाने आगामी काळात शांती शोध घेऊनही मिळणे कठीण होईल असे वाटू लागले आहे. कर्म हे करावेच लागणार आहे. ते चुकणार नाही. टाळताही येणार नाही. स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेतून प्रगती होते हे ही खरे आहे. पण ही स्पर्धा कोणाशी करायची व कशाची करायची हे समजून घेणे आवश्‍यक आहे. जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याची हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत नाही. त्याला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी कोणताही व्यवहार करताना, कर्म करताना ते डोळसपणे करावे. म्हणजे योग्य मार्ग सापडतील. तरच खरी प्रगती साधता येईल. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे पण त्याचा वापर कसा करायचा हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्‍यक आहे. उपलब्ध प्रत्येक साधनाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. दुरपयोगात स्वतःचेच नुकसान आहे. यासाठी व्यवहारात डोळसपणा हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Saturday, November 20, 2010

परमात्मा

तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
तें तया दिसे । ज्ञानास्तव ।।

अध्यात्मज्ञान हे नित्य आहे. बाकीची जी ज्ञाने आहेत, ते सर्व अज्ञान आहे. आत्मा हा अमर आहे. हे जाणणे हेच खरे ज्ञान आहे. आत्मा कायमस्वरूपी आहे. तो कधीही नष्ट होत नाही. नष्ट केला जाऊ शकत नाही. हा नित्य अनुभव ज्याला असतो तो खरा आत्मज्ञानी. संसारात अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात. त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. पण आत्मज्ञानी व्यक्ती या प्रश्‍नांनी व्यथित होत नाही. संसारातील सुखाने ती कधीही हुरळून जात नाही किंवा दुःखाने ती कधीही निराश होत नाही. इतकी स्थिरता त्याच्या मनामध्ये असते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे येतच असतात. या सर्वांपासून जो विचलित होत नाही तो खरा ज्ञानी. आत्मा आणि देह हे वेगवेगळे आहेत. आत्मा हा देहात आला आहे. पण तो देहापासून मुक्त आहे. देह नाशवंत आहे. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मज्ञान प्राप्ती नंतरच आत्मा तृप्त होतो. तोपर्यंत त्याची धडपड सुरू असते. देहात येणे आणि जाणे हे चक्र सुरू असते. जन्म-मृत्यूच्या या चक्रात तो अडकलेला असतो. आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्याला या चक्रातून मुक्ती मिळते. देह आणि आत्मा वेगळा आहे. हा अनुभव ज्याला आला तो खरा ज्ञानी. आत्मा हा अमर आहे. नित्य, अविनाशी आहे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. आत्माचे येणे आणि जाणे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. या ज्ञानाच्या अनुभवासाठी जो धडपडतो तो खरा ज्ञानी. सद्‌गुरू कृपेने, भक्तीने जो हे ज्ञान हस्तगत करतो तो आत्मज्ञानी. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म-मरण नाही. म्हणूनच संतांची समाधी ही संजीवन आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, November 17, 2010

कर्माचा त्याग

परि हें मिया केलें । कीं हे माझेनि जालें ।
ऐसे नाहीं ठेविलें । वासनेंमाजीं ।।

कर्माचा त्याग करायचा म्हणजे नेमके काय करायचे हेच अनेकांना समजत नाही. याचा अर्थ अनेकजण कर्मच करायचे नाही असा चुकीचा लावतात. सध्याच्या काळात तर असे करणे शक्‍यच नाही. दिवस बदलले आहेत. काम केले नाही तर जगणेही मुश्‍कील होईल. अध्यात्मात कर्माचा त्याग म्हणजे नेमेके काय याचा खरा अर्थ समजून घेणे आवश्‍यक आहे. चुकीचा अर्थ काढून अध्यात्माची टिंगल करू नये. सध्या हेच तर केले जात आहे. दैनंदिन जीवनात कर्म हे करावेच लागते. कर्माचा त्याग म्हणजे जे काही कर्म तुम्ही करता ते सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण करणे. हे कर्म त्यांच्या कृपार्शिवादाने झाले असे मानणे. तसा भाव मनात प्रकट करणे. हाच कर्म त्याग आहे. यामध्ये स्वतःचा मी पणा, अहंकार नष्ट होतो. ही यामागची भूमिका आहे. हे जाणून घ्यायला हवे. कारण सध्याच्या नव्या पिढीला हे विचार पटणे कठीण आहे. कर्म स्वतः करायचे आणि ते त्यांच्या कृपेने झाले असे म्हणायचे. आपण परिश्रम घ्यायचे आणि ते त्यांना अर्पण करायचे हे कसे शक्‍य आहे? हा विचार सध्याच्या युगात मनाला पटणेही शक्‍य नाही. अशामुळेच मुळी अहंकार, मी पणा नव्या पिढीत वाढला आहे. पूर्वीचे लोक देवाच्या कृपेला महत्त्व देत. देव कोपल्यानेच यंदा ओला दुष्काळ पडला व त्यामुळे शेतीचे नुकसान झाले असे लोक म्हणत. एखाद्या वर्षी भरघोस उत्पन्न मिळाले तर ते त्याच्याच कृपेने मिळाले असे म्हणत. तसे पाहता निसर्गावरच शेतकऱ्याचे जीवन अवलंबून असते त्यामुळे त्यांच्याबाबत हे विचार योग्य वाटतात. ही श्रद्धा योग्य वाटते. पण इतर व्यवहारात ते शक्‍य वाटत नाही. मनाला पटत नाही. प्रत्यक्षात राबायचे आपण आणि ते देवाला अर्पण करायचे हे कसे काय शक्‍य होईल? पण नेमके या मागचा हेतू जाणून घेणे गरजेचे आहे. यश मिळाले तर अहंकार वाढू नये व अपयश पदरी आले म्हणून नैराश्‍य येऊ नये ही यामागची खरी भूमिका आहे. नैराश्‍यामुळे मन खचते. आणि यशाचा अहंकार कधीकधी माणुसकीच विसरतो. कर्मत्यागामागची ही भूमिका जाणून घ्यायला हवी. तसे पाहता आपला सर्व व्यवहार हा देवाच्या कृपेनेच सुरू आहे. कारण श्‍वास थांबला तर सर्व थांबते. श्‍वास सुरू ठेवण्याची शक्ती आपल्यात नाही. ते चालविणारे दुसरे कोणीतरी आहे हे विसरता कामा नये. सद्‌गुरू त्यावरच तर नियंत्रण मिळवायला शिकवतात. तेच आत्मज्ञान हस्तगत करायला सांगतात. आत्मज्ञानी व्हायला सांगतात.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, November 15, 2010

क्षमा

हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा ।
जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ।।

दुष्टाला शासन हे व्हायलाच हवे. नाहीतर जगात शांतीच नांदणे कठीण होऊन बसेल. दुष्ट कृत्य करणाऱ्यावर वचक हा असायला हवा. पण दुष्टांच्या मनातील दुष्टपणाच काढून टाकता आला तर ! माणसांची मने बदलता आली पाहिजेत. कायद्याचा वचक हा हवाच पण दुष्टांना सुधारण्याची संधी देऊन क्षमाही करायला हवे. अनेक लोक लोभाने, लालसेने भरकटतात. वाट चुकतात. मनावर नियंत्रण न राहिल्यानेही चुका होतात. चुकीचे मार्ग पकडले जातात. पण त्यांच्या चुकांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. प्रत्येक गोष्ट ही कायद्याने सुटतेच असे नाही. काही गोष्टी तडजोडीने सोडविल्या जाऊ शकतात. चुकीला शासन हे व्हायलाच हवे. पण त्यांच्याकडून चूक का झाली, याचाही विचार व्हायला हवा. पुन्हा अशा चुका होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कारण या चुका इतरांकडूनही होऊ शकतात. यासाठी दुसऱ्यांकडून ही चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. असे प्रयत्न झाले तर, निश्‍चितच समाजात सुख शांती नांदेल. नुसते कायदे कडक करून किंवा त्यांच्या कडक अंमलबजावणीने सुख शांती नांदते असे नाही. एखाद्याने जर स्वतःवर हल्ला केला तर त्याच्यावर प्रती हल्ला करून प्रश्‍न सुटत नाही. तो हल्ला त्याने का केला याचा विचार व्हायला हवा. समाजातील आर्थिक असमानतेमुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. नुसते कायदे करून हे प्रकार कमी होणार नाहीत. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा. ही आर्थिक असमानता कशामुळे निर्माण होते, यावर विचार व्हायला हवा. सर्वांना समान अधिकार कसे देता येईल हे पहायला हवे. सूर्य प्रकाशाचे वाटप करताना याला कमी, त्याला जास्त असा भेदभाव करत नाही. परिस्थितीनुसार प्रत्येकाला असा भेदभाव झाल्याचे वाटते. सद्‌गुरूही प्रत्येक भक्तावर असेच ज्ञाना
चा अखंड वर्षाव करत असतात. पण भक्ताला त्याच्या स्थितीनुसार भेदभाव वाटतो. सद्‌गुरू सर्वांना समान लेखतात. दुष्टांनाही ते क्षमा करतात. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा कसा काढता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. सुधारला तर तोही आत्मज्ञानी होऊ शकतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, November 12, 2010

अहिंसा

कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार ।
कुचंबैल केंसर । इया शंका ।।

माणसांच्या मनातील राग, द्वेषातून हिंसा घडते. स्वार्थ, लोभामुळे मन अस्थिर होते. या अस्थिरतेतूनच मन भरकटते. नव्या पिढीत अस्थिर मनामुळे हिंसेचे प्रमाण वाढत आहे. दहशतवाद, नक्षलवाद यासारख्या हिंसक प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. समाजातील असमानताही यासाठी तितकीच कारणीभूत आहे. असमातेतून होणारे शोषणाने हिंसकवृत्ती बळावत आहे. पण या हिंसेवर अहिंसेच्या मार्गानेच मात करता येते. सात्त्विक विचारांची बैठक मनातील हिंसक प्रवृत्ती शांत करू शकते. यासाठी समाजात सात्त्विक वृत्ती वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे. पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली आहे असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्‍यक आहे. रस शोषताना भुंगा सुद्धा कमळाला इजा होणार नाही इतक्‍या हळुवारपणे त्यावर पाय ठेवतो. इतकी सात्त्विक वृत्ती त्याच्यामध्ये असते. मग माणसामध्ये ही वृत्ती का वाढू नये? यासाठी प्रयत्नच केला नाही तर कसे शक्‍य होईल ? भरकटलेली मने बदलायला हवीत. मने बदलूनच हिंसेवर विजय मिळवता येईल. भ्रष्टाचारी, गुंड वृत्तीच्या लोकांना शासन हे व्हायलाच हवे पण त्याबरोबर त्यांच्यातील दुष्टप्रवृत्तीही नष्ट करायला हवी. मनातील दुष्ट विचार नाहीसे झाले तर हिंसक घटना निश्‍चितच कमी होतील. समाजात सुख शांती नांदेल. साधनेसाठीही मन स्थिर असणे आवश्‍यक असते. अस्थिर मनाला अहिंसेच्या विचारांनी स्थिर करायला हवे.


राजेंद्र घोरपडे, पुणे.

Thursday, November 11, 2010

सात्त्विक भाव

परोपकारू न बोले । न मिरवी अभ्यासिलें ।
न शके विकूं जोडले । स्फीतीसाठी ।।

प्रत्येकाला स्वतःची प्रगती व्हावी ही मनोमन इच्छा असते. प्रगती झाली तर त्याचा नावलौकिक वाढतो. पत वाढते. समाजात मान मिळतो. पण स्वतःच्या प्रगतीचा डांगोरा पिटणे योग्य नाही. दुसऱ्याला यातून चिडविणे योग्य नाही. दुसऱ्याची यातून निंदा नालस्ती होईल असे करणेही योग्य नाही. झालेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त करणे. त्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येणे शक्‍य आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. प्रगतीतून समाधान मिळते. शांती मिळते. ते समाधान, ती शांती कायमस्वरूपी टिकवून कशी ठेवता येईल हे पाहणे आवश्‍यक आहे. स्वतःच्या प्रगतीतून दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचीही वाच्यता करणे योग्य नाही. यामुळे दुसऱ्यांचे मन दुखावले जाऊ शकते. दुसऱ्याला दुःख होणार नाही याची काळची घ्यायला हवी. अनेक संतांच्या अशाच शिकवणी असतात. संतांच्या या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो. यासाठी संतांच्या उपदेशाचे आचरण करणे गरजेचे आहे. संतांच्या शिकवणीचा अभ्यास, चिंतन, मनन केले जावे. ज्ञानाचा गर्वही नसावा. सध्याच्या युगात दररोज नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. यामुळे तुमचे ज्ञान यामध्ये छुल्लक ठरू शकते. यासाठी शाश्‍वत ज्ञानाची ओढ मनाला लागायला हवी. त्याचा अभ्यास करायला हवा. या अभ्यासाचाही डांगोरा पिटाळणे योग्य नाही. डांगोरा पिटाळून मनाला समाधान मिळत नाही उलट यातून दुःखच मिळत राहते. साधनेसाठी मन समाधानी राहणे आवश्‍यक आहे. संतांच्या शिकवणीतून समाधान टिकवून कसे ठेवता येते याचा विचार करायला हवा. यातून सात्त्विक विचारांची बैठक उभी राहू शकते. समाधानी चित्तच साधनेत रमते. साधनेत बाधा येणार नाही यासाठी अंगात सात्त्विक भाव कसा जागृत होतो याचा अभ्यास करायला हवा. त्याचे आचरण करायला हवे. संतांच्या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे.

Wednesday, November 3, 2010

गुरुसेवा

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।।

प्रत्येक भक्त आत्मज्ञानी व्हावा, हीच सद्‌गुरुंची इच्छा असते. यादृष्टीने ते सतत भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. भक्तांच्या साधनेत येणारे अडथळे ते दूर करत असतात. अनेक समस्यांत गुरफटलेल्या भक्ताला ते आत्मज्ञानाची गोडी लावतात. भक्ताचीही तशी दृढ भक्ती असते. अनेक भक्त गुरूकृपेसाठी सतत सद्‌गुरुंची सेवा करत असतात. गुरूंनी दिलेल्या नियमांचे पालन करून दिलेल्या गुरूमंत्राची साधना ते करत असतात. काही भक्त तर यासाठी संसाराचाही त्याग करतात. सतत त्यांना सद्‌गुरू सेवेचाच ध्यास असतो. ते ज्ञान गुरुकृपेने प्राप्त होते असा त्यांचा दृढ विश्‍वास असतो. यासाठी गुरूसेवेत ते त्यांचा जन्म ओवाळून टाकतात. जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते. बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र नाहीसे करते अशा या आत्मज्ञानाची ओढ त्यांना सतत लागलेली असते. काहीजण संसारात राहूनही गुरुसेवा हीच खरी सेवा मानून आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. संसारातील प्रत्येक गोष्ट ही गुरूंच्या कृपेने मिळते अशी त्यांची धारणा असते. इतकी दृढ श्रद्धा, भक्ती त्यांची गुरुप्रती असते. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुसेवा हाच सोपा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी गुरूंच्या घरी राहून गुरूंची सर्व कामे करून त्यांची सेवा केली जात होती. गुरूंच्या घरी राहूनच ज्ञान प्राप्त केले जात होते. सध्याच्या आधुनिक युगात असे आश्रम आणि असे गुरू फारच क्वचित पाहायला मिळतात. अशी गुरुसेवा आता दुर्मिळ झाली आहे. कारण तसे योग्य आत्मज्ञानी गुरूही भेटणे आवश्‍यक आहे. पण यामुळे नाराज होण्याचे काही कारण नाही. आयुष्यातील प्रत्येकक्षणी गुरूंचे स्मरण ठेवणे ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे. कारण चराचरांत गुरूंचे अस्तित्व आहे. त्यांच्या नित्य स्मरणानेही, नित्य भक्तीनेही आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. सद्‌गुरुंचे नित्य स्मरण हीच खरी गुरुसेवा आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे.