Wednesday, September 29, 2010

संजीवन समाधी

सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधे निजविसी । बुझाऊनी ।।

सद्‌गुरू समाधिस्थ झाले तरी ते भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची आध्यात्मिक प्रगती साधण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन असते असे मानले जाते. संतांच्या अनेक लीला सांगितल्या जातात. अनेक भक्तगण त्यांचे अनुभव नेहमीच सांगत असतात. समाधिस्थ झाल्यानंतरही सद्‌गुरू भक्तांना अनुभव देतात. हे नव्या पिढीला पटणे जरा कठीणच वाटते. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. असे ही नवीपिढी समजते. असे कधी असणे शक्‍यच नाही, असे त्यांचे मत असते. मग कोणत्याही देवळात गेल्यावर मनाला प्रसन्न वाटते असे का म्हणता? पूर्वीच्या काळी जे तंटे वर्षानुवर्षे चावडीवर सुटत नसत, ते देवळात झालेल्या एका बैठकीत सुटल्याची अनेक उदाहरणे देता येतील. हे कसे शक्‍य आहे. असा चमत्कार घडलाच कसा? याचे आश्‍चर्यही वाटते. मंदिर, संतांची समाधी स्थळे या पवित्र जागा आहेत. या जागांची वैशिष्ठे विचारात घ्यायला हवीत. संतांच्या समाधीच्या जागेतील वातावरणात विशिष्ट लहरींचा वावर असतो. त्या लहरीतून मनाला आनंद, उत्साह प्राप्त होतो. या वातावरणात आल्यानंतर या लहरींची लय, तो नाद आपल्या शरीरात प्रवेश करतो. यामुळेच हे बदल घडतात. साधना म्हणजे तरी काय? "सो..हम...सो..हम..' ची लयच तर आपणाला पकडायची असते. त्याच्यावरच तर लक्ष केंद्रित करायचे असते ना? ही लय ज्याला सापडली, पकडता आली तोच खरा आत्मज्ञानी. सद्‌गुरू ही लय भक्ताला पकडायला शिकवतात. त्यांच्या लयात आपली लय मिसळायला हवी. ती मिसळावी यासाठीच तर सगळे प्रयत्न सुरू असतात. एकदा का तो सूर, तो नाद, ती लय सापडली की मग पुन्हा विसरणे नाही. पुन्हा ती सुटून जाणे शक्‍य नाही. समाधिस्थ झाले तरी ती लय सुटत नाही. म्हणूनच तर भक्तांना अनुभव येत राहतात. संत, सद्‌गुरूची समाधी संजीवन आहे हे यासाठीच तर म्हटले जाते. ते भक्ताला त्यांच्या लयीत ओढण्याचा प्रयत्न करतात. भक्ताला आत्
मज्ञानी करण्याचा प्रयत्न करतात.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, September 28, 2010

आनंदाचा अखंड झरा

जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनव्रत आनंदे । वर्षतिये ।।

सद्‌गुरुंचे अंतःकरण शुद्ध आहे. ते उदार आहेत. गुरुकृपेने त्यांच्यातून अखंड आनंदाचा झरा ओसंडून वाहत आहे. अशा या सद्‌गुरूंना माझा नमस्कार. सद्‌गुरुंच्या कृपार्शिवादाने आत्मज्ञान प्राप्तीसाठीची ओढ वाढत आहे. कारण त्यांच्या सहवासात आल्यानंतर मनातील मरगळ दूर होते. त्यांच्या प्रेमाने, त्यांच्यातून ओसंडून वाहणाऱ्या आनंदाच्या झऱ्याने मनाला एक वेगळीच स्फूर्ती चढते. शरीरात तेज संचारते. आळंदीला संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या भेटीला गेल्यानंतर दर्शनासाठी नेहमीच मोठी रांग असते. तेव्हा इतका वेळ त्या रांगेत आपण उभे राहू शकू का? असा प्रश्‍न कधीच पडत नाही. पाय दुखतील का? याचीही चिंता वाटत नाही. संजीवन समाधीच्या दर्शनाच्या ओढीने हा थकवा दूर होतो. कारण सद्‌गुरुंच्या सहवासात अखंड आनंदाचा झरा वाहत असतो. हीच तर खरी अनुभूती आहे.
मोटारगाडीतील इंधन असेल तरच ती धावते. त्यातील इंधन संपणार नाही, मोटारगाडी बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठी ठराविक कालावधीने सतत इंधनाची टाकी भरावी लागते. तसे अनेक भक्तजन या देहाचा गाडा अखंड कार्यरत राहण्यासाठी ठराविक कालावधीने आळंदीला जातात. गाडीला जसे इंधन लागते तसे या भक्तांना सद्‌गुरुंचा सहवास लागतो. त्यांच्या सहवासात या भक्तांच्या देहाच्या गाड्याला इंधन मिळते. आनंदाच्या डोहातून हे इंधन त्यांना मिळते. याने त्यांना नवी स्फूर्ती मिळते. कामाला नवा उत्साह येतो. काम करण्याची हुरूप वाढते. यासाठी ते काही ठराविक कालावधीने ते आळंदीच्या वाऱ्या करतात. हीच त्यांची भक्ती आहे. श्रद्धा आहे.
श्री ज्ञानेश्‍वरीच्या नियमित वाचनातून आत्मज्ञानाची ओढ वाढत राहते. मनाला आनंद मिळून साधनेला स्फूर्ती मिळते. पंढरीची वारीही याचसाठी केली जाते. वारीच्या आनंदात डुंबल्याने मनाची सगळी मरगळ दूर होते. सगळ्या चिंता दूर पळतात. हा आनंदाचा अखंड वाहणारा झरा आहे. त्यातील गोड पाणी पिण्याची इच्छा मात्र मनात असावी लागते. या गोडीने अध्यात्माची आवड हळूहळू वाढते. श्री ज्ञानेश्‍वरी वाचनाची गोडी लागते. सद्‌गुरुंचे प्रेम वाढते. मग द्वैत आपोआपच दूर होते.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, September 27, 2010

अहंकार

तसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।
अहंकार लोपीं अवधारी । द्वैत जाय ।।

अहंकाराने अनेक मोठमोठ्या व्यक्तींना पराभव पत्कारावा लागला आहे. कोणाला विद्वत्तेचा अहंकार असतो. कोणाला पैशाचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो. अहंकाराने अनेकांना दुःख पोहोचते. पण अहंकारी व्यक्तींना याची साधी कल्पनाही होत नाही. पैशाचा अहंकार खूपच वाईट. मुळात पैसा हे द्रव्य नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही. अहंकाराने अंध झालेल्या व्यक्तींना याची जाणीव नसते. पैसा आहे तोपर्यंत अशा व्यक्तींना मानसन्मान मिळतो. मानसन्मान पैशाने विकत घेता येतो. याचाही अहंकार अनेकांना असतो. आजकाल पुरस्कारही पैशाने विकत मिळत आहेत. पण अशा विकल्या जाणाऱ्या पुरस्कारांना फारसे समाजात कोणी मान देत नाही याची जाणीव त्यांना नसते. पैसा संपला की सर्व संपते. सर्व मानसन्मान मग गळून पडतात. तेव्हा त्यांना भगवंताची आठवण होते.
काहींना माझ्यासारखे दुसरा कोणी ज्ञानी या जगात नाही. असा अहंकार असतो. पण खऱ्या ज्ञानाची त्यांना ओळखच नसते. असे विद्वान जेव्हा एखाद्या आत्मज्ञानाच्या सहवासात येतात तेव्हा त्यांचा अहंकार सरतो. आपल्यापेक्षा कोणीतरी ज्ञानी आहे. आपल्या मनातले ओळखणारा मनकवडा कोणीतरी आहे. याची जाणीव त्यांना होते. तेव्हा असे विद्वान आत्मज्ञानी संतांच्या चरणी लीन होतात. असे लीन झालेले विद्वान, अहंकाराचा लोप पावलेले विद्वान मग सद्‌गुरुंच्या कृपार्शिवादाने आत्मज्ञानी होतात.
सद्‌गुरुंच्या साक्षात्काराने अनेकांचा अहंकार गळून पडतो. साक्षात्कार म्हणजे काय? आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे साक्षात्कार. मनुष्य अनुभवातूनच शिकत आला आहे. नोकरीमध्येही अनुभवाला प्राधान्य दिले जाते. किती वर्षांचा अनुभव तुम्हाला आहे. असे प्रथम विचारले जाते. त्यानुसार तुमची पात्रता ठरवली जाते. आत्मज्ञानाचे अनुभव सद्‌गुरू सतत देत राहतात. यातून ते साधकाची आध्यात्मिक प्रगती साधतात. हळूहळू साधकातील अहंकार मीपणा लोप पावतो व साधकही आत्मज्ञानी होतो.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, September 24, 2010

विश्‍वात्मक रूपडे

तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभुही परि न जोडे । तपें करितां ।।

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्‍वरूप दर्शन घडविले. अनेक तपे करूनही शंकरालाही हे विश्‍वरूप प्राप्त होत नाही. यातून असे स्पष्ट होते की विश्‍वाचे आर्त जाणण्यासाठी योगमार्गापेक्षा भक्तिमार्ग हा सहज व सोपा मार्ग आहे. यामध्ये कोणतेही कष्ट पडत नाहीत. अगदी सहजपणे हे साध्य होते. संसाराचा त्याग करावा लागत नाही. सध्याच्या बदलत्या युगातही हा मार्ग उपयोगी आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आता जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रदूषणात वाढ झाली आहे. चंगळवादी संस्कृतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. अशा काळात अध्यात्माच्या या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. याची आवड असणाऱ्यांची, ओढ असणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. लोकांमध्ये धार्मिक वृत्ती जरूर आहे. पण सध्या अंधश्रद्धा आणि अज्ञानाने लोक भरकटलेले आहे. अध्यात्माची वाट चुकलेले आहेत. भक्ती म्हणजे काय हेच ते विसरले आहेत. चंगळवादाने ते अधिकच अज्ञानी होत चालले आहेत. अध्यात्माचा मूळ उद्देशापासून ते दूर चालले आहेत. सध्याचे सणवार, उत्सव यामध्ये केवळ औपचारिकताच उरली आहे. त्यामध्ये अध्यात्माचे अधिष्ठानच नसते. अशा या परिस्थितीत विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल. असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. पण भक्ती जर खरी असेल तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे. याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे. याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. केवळ भक्तीने हे विश्‍वरूप दर्शन सहज शक्‍य आहे. यासाठी अज्ञानाच्या अंधारात भक्तीचा उजेड पडणे गरजेचे आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, September 23, 2010

अमृताचा समुद्र

हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ।।

साधना करताना अनेक अडचणी येत असतात. कधी वेळच मिळत नाही. तर कधी वेळ मिळाला तर मनात इच्छाच होत नाही. मनात घोळणाऱ्या अनेक विचारांना साधनेला बसण्याचे सामर्थच होत नाही. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? अशा बेचैन अवस्थेत प्रत्येक साधक असतो. साधनेसाठी बेचैन असणे हे देखील चांगले आहे. या ना त्या कारणाने सद्‌गुरूचे स्मरण तरी राहते. पण साधना सोडून देणे हे योग्य नाही. मनाच्या स्थैर्यासाठी प्रयत्न करणे. साधनेसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. साधनेचे अनेक फायदे आपणास माहीत असूनही या धकाधकीच्या जीवनामुळे याकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे सध्या कामाच्या व्यस्ततेत साधनेसाठी वेळे देणे हे एक मोठे आव्हानच आहे. पण हे आव्हान आपणास स्वीकारावेच लागेल. साधनेचे हे अमृत प्यायलाच हवे. अमृताच्या या महासागरात आपण डुंबायलाच हवे. साधनेच्या सुरवातीच्या काळात पायात मुंग्या येतात. शरीर जड होते. पण या गोष्टींची भीती बाळगू नये. अहो, अमृताच्या समुद्रात उडी घेतल्यावर मरणाला कशाला भ्यायचे. उलट साधनेच्या प्रगतीतील या पायऱ्या आहेत असे समजून उत्साहाने साधना वाढवायला हवी. मुंग्या हळूहळू कमी होतील. साधनेच्या काळात शरीरात अनेक हालचाली होतात. पित्त जळते. पण याचा फायदा होतो. पित्त जळाल्याने आपली भूक वाढते. चेहऱ्यावरील तेज वाढते. साधनेत हळूहळू प्रगती होत राहते. शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती सुधारते. हे फायदे विचारात घ्यायला हवेत व साधनेच्या काळात वाटणारी मनातील भीती दूर करायला हवी. साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते. पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी? इथेतर धैर्याने डुंबायला हवे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, September 21, 2010

कैसें अनुग्रहाचे करणे

कैसें अनुग्रहांचे करणें । पार्थाचे पाहणें आणि न पाहणे ।
तयाहीसकट नारायणें । व्यापूनि घातले ।।

आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर गुरुकृपा हवीच. यासाठी गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. भक्ताची योग्य प्रगती पाहूनच सद्‌गुरू भक्तास अनुग्रह देतात. अनुग्रह देतात म्हणजे नेमके काय करतात? हा प्रत्येक भक्ताचा उत्सुकतेचा विषय असतो. सद्‌गुरू भक्ताची भक्ती पाहतात. आत्मज्ञानी असल्याने भक्ताच्या आवडीनिवडी ते ओळखतात. त्यांची भक्तीची ओढ पाहून योग्य गुरुमंत्र ते देतात. यालाच अनुग्रह झाला असे म्हटले जाते. नुसता अनुग्रह मिळून उपयोग नाही. गुरुकृपाही हवीच. गुरूमंत्राच्या नियमित जपाने, साधनेने आध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. "गुरूविन कोण दाखवील वाट' असे हे यासाठीच म्हटले गेले आहे. ते यासाठीच. गुरुंच्याकृपेने हे सहज साध्य होते. यासाठी वणवण भटकावे लागत नाही. अनुग्रह ही आत्मज्ञान प्रातीसाठीची पहिली पायरी आहे. सद्‌गुरूंच्या कृपेने भक्त या पायऱ्या सहज पार करतो. शेवटी या नराचा नारायण होतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, September 17, 2010

योगियांचे समाधिधन

हा योगियांचे समाधिधन । कीं होऊनी ठेलें पार्था अधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ।।

रणभूमीवर मनाने खचलेल्या, युद्ध न करण्याच्या मनःस्थितीत असलेल्या अर्जुनाला भगवान कृष्ण युद्ध करण्यासाठी प्रेरित करत आहेत. अर्जुनाची मनःस्थिती सुधारण्यासाठी भगवंताना स्वतःचे विश्‍वरूप दाखवावे लागले. हे सर्व प्रसंग पाहण्याचे भाग्य भगवंताच्या कृपेने संजयाला मिळाले. आणि याचे सर्व वर्णन संजय अंध धृतराष्ट्राला सांगत आहे. पण धृतराष्ट्रावर याचा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे शेवटी कौरव कुळाचा सर्वनाश झाला. यासाठी नुसती सद्‌गुरुंची कृपा असून चालत यासाठी योग्य दृष्टी असावी लागते. भगवंत अर्जुनासाठी विश्‍वरूपमय झाले. यासाठी अर्जुनासारखी भक्ती असावी लागते. दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. पण हे कृत्य ते आपल्या परमभक्ताकडून करवून घेऊ इच्छित आहेत. यासाठी केवळ निमित्तमात्र होण्याचे आवाहन भगवंत अर्जुनास करत आहेत. सध्याच्या युगात सद्‌गुरू दृष्ट दुर्जनांच्या मनातील दुष्टपणा काढून प्रेमाची शिकवण देऊ इच्छित आहेत. यासाठी अर्जुनासारखे परमभक्त होण्याचे आवाहन ते करत आहेत. जगात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आत्मज्ञानी सद्‌गुरू नेहमीच प्रयत्नशील असतात. हाच तर खरा त्यांचा धर्म आहे. हीच तर खरी भारतीय संस्कृती आहे. यासाठी सद्‌गुरू आपणास आत्मज्ञानाचा ठेवा कसा मिळवायचा हे सांगत आहेत. तो मिळविण्यासाठीच युद्ध करण्याची प्रेरणा ते देत आहेत. अपयशाने दुःखी कष्टी होऊन, मनाने खचल्यानंतर अनेक जण अध्यात्माकडे वळतात. तसा ते योग्य मार्ग स्वीकारतात यात शंकाच नाही. पण धृतराष्ट्रासारखी दृष्टी त्यांना नसावी. अर्जुनासारखी वेध घेणारी नजर त्यांच्याकडे असावी. खऱ्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याचे सामर्थ त्यांच्यात असावे लागते. तरच ते या अपयशातून योग्य मार्गावर येतील. सद्‌गुरू योगीरूपाने त्यांना योग्य वाटेवर आणतात. अर्जुनासारखा भक्त भेटला तर
ते त्याला आपल्या पदावर बसविण्यासाठी धडपडतात. भक्ताने मात्र यासाठी निमित्तमात्र व्हायचे असते. सद्‌गुरू समाधिस्थ झाले तरीही ते आपल्या परमभक्तांना अनुभव देत असतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभुतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, September 9, 2010

युग तंत्रज्ञानाचे

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।
तो सद्‌गुरू असे जोडला । किरीटीसी ।।

सध्य तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा काळात प्रल्हादाच्या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. या दंतकथा आहेत. ती अतिशोक्ती वाटते. पण शास्त्रावर आधारित लिखाण करणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी हे मग लिहिले कसे हा प्रश्‍न पडतो. तसे दंतकथा आणि सत्य परिस्थिती यामध्ये बराच फरक आहे. इतिहासावर आधारित लिहिल्या गेलेल्या किंवा दंत कथेतून सांगितल्या जाणाऱ्या रंजक कथानकामुळेच आज खरा इतिहास शोधणे कठीण जात आहे. ते रंजक कथानकच आपण खरे समजत असल्यानेच गैरसमज वाढत आहेत. यासाठी या कथांचा सर्वांगांनी खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की त्या काळातील तंत्रज्ञानही उच्च होते. कारण त्या काळातील अनेक चमत्कारिक शोधांचा, वैशिष्ठपूर्ण बांधकामांचा उलगडा सध्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही होऊ शकला नाही. एकाच दगडात मंदिराचा कळस बांधला कसा गेला असेल? हा दगड नेमका इतक्‍या उंचीवर कसा नेला गेला असेल ? असे प्रश्‍न काही पौराणिक मंदिरे पाहताना आपणास सहजच पडतात. कारण त्याकाळात आताच्या सारख्या क्रेन नव्हत्या. मग हे शक्‍य कसे झाले. याचाच अर्थ त्या काळातही प्रगत तंत्रज्ञान होते. पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले. प्रल्हादावर विषाचा परिणाम झाला नाही. हे कसे शक्‍य आहे? उपचारही केले गेले नाहीत. मग तो इतके भयंकर विष पचवू कसा शकला. हा प्रश्‍न सहजच आपल्या मनात डोकावतो. पण साधनेने हे शक्‍य आहे. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते. साधनेच्या काळात पित्ताशयात अनेक रसायने तयार होतात. त्यांचा शोध सध्याच्या काळातही लावता आलेला नाही. हे परखड सत्य आहे. साधनेत शरीरात तयार होणाऱ्या द्रव्यातून रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते. विष पचविण्याची ताकतही या द्रव्यात असते. भक्तीमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे. हे चमत्कार नेमके काय आहेत हे समजून घेणेही गरजेचे आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, September 8, 2010

श्री गणेशा

आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्री गुरूंचे ।।

कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करताना श्री गणेशाचे स्मरण केले जाते. ही आपली संस्कृती आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. पूर्वी हा सण फक्त घरोघरी साजरा केला जात होता. पण स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्याला सार्वजनिक रूप आणले. त्यानंतर घरगुती गणपती बरोबरच गल्लोगल्लीही श्री गणेशाची प्रतिष्ठापना होऊ लागली. भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी त्या परंपरा जोपासता याव्यात यासाठी ब्रिटिशांची राजवट भारतातून हाकलून लावणे आवश्‍यक होते. या उद्देशासाठी जनतेचे एकत्र यावे. लोकांमध्ये याबाबत जागृती केली जावी. यासाठी टिळकांनी हा उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यास प्रोत्साहन दिले. पण सध्या या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. त्यातील भक्ती भाव नष्ट झाला आहे. अशा उत्सवात पाश्‍चात संगीताच्या तालावर धामडधिंगा घातला जात आहे. खरेतर भगवंताचे नाम स्मरण सतत राहावे यासाठी अशा सण, उत्सवांची सुरवात करण्यात आली. पण हा उद्देशच मुळात नष्ट झाला आहे. या चंगळवादी संस्कृतीचा वाढता प्रसार रोखणे आवश्‍यक आहे. नाहीतर आपली संस्कृती आपणास शोधूनही सापडणे शक्‍य होणार नाही. यासाठी आता भारतीय संस्कृतीच्या जतनाचा श्री गणेशा करायला हवा. एक चळवळ उभी करायला हवी. चंगळवादी संस्कृतीमुळेच सध्या ताणतणावाचे वातावरण निर्माण होत आहे. हा ताणतणाव दूर करायचा असेल तर भारतीय संस्कृतीचे जतन आवश्‍यक आहे. या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन सण, उत्सवांचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. तरूणपिढीला याबाबत मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, September 7, 2010

संपत्ती आणि दया

जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूती माझी ।।

अनेक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतात. पैसा त्यांना अति प्रिय असतो. तसा ते अमाप पैसाही कमावतात. पण त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सर्वत्र पैसाच दिसतो. या पैशाच्या गर्वाने ते सर्व सामान्य जनतेचा द्वेष करतात. दानाची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी विकत घेतल्याची ते भाषा करतात. इतकी मगरूरी त्यांच्यात असते. कमावलेला पैसा गरिबांना दान करण्यास त्यांना जड जाते. अहो इतकेच काय पण स्वतःच्या घरच्यांच्यासाठीही पैसा खर्च करण्यासाठी ते नाही होय नाही होय करतात. पैसा काय फुकट येतो काय? पैसा काय झाडाला लागतो काय? अशी त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. पैशाने माणसे विकत घेता येतात पण प्रेम, आशीर्वाद, कृपा विकत घेता येत नाही. यासाठी अंगात दानशूरपणा असावा लागतो. अंगात दयाभाव असावा लागतो. पैशाने अंगात आलेल्या उर्मीने तो इतका अंध झालेला असतो की घरात भेटायला आलेल्या व्यक्तीचा आदर करणेही तो विसरतो. पण पैशाची ही गुर्मी योग्य नाही. कारण पैसा हे द्रव्य आहे. ते नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही. पण घरात लक्ष्मी शिवाय शांती नाही. हे ही तितकेच खरे आहे. लक्ष्मी घरात सुख शांती समाधान घेऊन येते. पण ते टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे. आपल्या कडील पैशाने दहा गरजूंना मदत केली तर ते आपल्या कठीण प्रसंगात निश्‍चितच मदतीला धावतील यात शंकाच नाही. यासाठी दयावान व्हायला शिकले पाहिजे. अशा व्यक्ती कडे भगवंत वसती करतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, September 6, 2010

चांगल्यालाच मागणी

जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्‍चित । जाण माझा ।।

व्यक्ती तितक्‍या प्रकृती. दोन जुळे भाऊ असले तरी त्यांच्यात सुद्धा बराच फरक असतो. प्रत्येक पिकाच्या अनेक जाती आहेत. पण त्या प्रत्येक जातीची वैशिष्ठे वेगवेगळी असतात. पिकात उपजलेले धान्य किंवा एकाच झाडाला लागलेली फळे एकसारखी नसतात. प्रत्येक फळाच्या चवीत थोडाफार तरी फरक असतोच. काही नासके असतात. काही कडवट असतात. तर काही अति गोड असतात. तर काहींना चवच नसते. पण प्रत्येक शेतकरी चांगली फळे लागतील याचाच प्रयत्न करत असतो. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे साहजिकच अन्नधान्याची, फळांची मागणी वाढतीच राहणार आहे. यासाठी उत्पादनात वाढ कशी होईल, यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर धान्याची प्रत कशी सुधारेल, त्याची गोडी, त्याचा आकार आदीचाही प्रयत्न केला जात आहे. नुसते दिसायला चांगले असून चालत नाही. बाजारात ज्याला गोडी चांगली आहे त्यालाच अधिक मागणी असते. त्यालाच चांगला भाव मिळतो. फळ नासक जरी लागल तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे. सध्याचा काळ बदलला आहे असे म्हटले जाते. माणूसही बदलला आहे. माणसाची मने बदललेली आहेत. असे सांगितले जाते. सत्याचा पुरस्कार करणाऱ्याला आज जगात फारशी किंमत नाही असेही सांगितले जाते. पण खरे पाहता चांगल्या गोष्टीलाच टिकाऊपणा असतो. तो एकदा डावलला जाईल. दोनदा डावलला जाईल. पण तिसऱ्यांदा त्याचीच गरज वाटू लागेल. एखादा दुष्ट दुर्जन जरी आपणास भेटला तरी त्याच्यात काहीना काही तरी चांगल्या गोष्टी निश्‍चितच असतात. त्याच्या चांगल्या गोष्टी घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सतमार्गाचा, चांगल्या गोष्टींचा ध्यास सतत करायला हवा. कारण जो चांगला आहे, सत्याचा पुरस्कार करणार आहे. तोच या जीवनात अमर होतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Saturday, September 4, 2010

भक्ती

तरि झडझडोनी वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।।

आत्मज्ञान प्राप्तीचा साधा सोपा मार्ग म्हणजे भक्ती. मनापासून केलेली भक्ती निश्‍चितच फळाला येते. योगाचा मार्ग हा कष्टदायक आहे. त्यासाठी काही जण संसाराचाही त्याग करतात. वणवण भटकतात. तरीही मनःशांती होत नाही. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी बाराबारा वर्षे तपश्‍चर्या करावी लागते. बरेच कष्ट पडतात. शरीराला त्रास होतो. एवढे करूनही आत्मज्ञान मिळेलच याची खात्री नाही. अनेक साधू शांतीच्या शोधात हिमालयात जाऊन साधना करतात. पण सध्या खऱ्या आत्मज्ञानाच्या शोधात फिरणाऱ्या साधूंची संख्या कमी झाली आहे. संधी साधूच अधिक आहेत. काही साधूंना आत्मज्ञान प्राप्ती झाली तरीही त्यांचा उपयोग समाजासाठी करणारे फारच कमी आहेत. खडतर तपश्‍चर्या करून आत्मज्ञान प्राप्तीपेक्षा भक्तीचा मार्ग हा सोपा आहे. सद्‌गुरुंच्या भक्तीत मन रमवणे सहज शक्‍य आहे. यासाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही. संसारात राहूनही मुक्ती मिळवता येते. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसती ज्ञानेश्‍वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्‌गुरुंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी करतात हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार आहे. भजन, कीतर्न हे सुद्धा भक्तीचेच मार्ग आहेत. भजन, कीर्तन, निरूपण, पारायण हे ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. यात सद्‌गुरुंचे स्मरण होते. नुसत्या श्रवणाने सुद्धा येथे मोक्ष सिद्धी होऊ शकते. यासाठी संत सहवासात जाणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांची, गोष्टीची, उपक्रमांची सवय लावून घेणे गरजेचे आहे. यातून मन आनंदी राहते. चांगल्या गोष्टींची सवय लागायला थोडा वेळ लागतो. मनाला ते लवकर रुचत नाही. पण साधासोपा भक्तीचा मार्ग अवलंबणेच या बदलत्या युगात सोईस्कर आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, September 3, 2010

विषयांचे सुख

तेविं विषयांचे जे सुख । ते केवळ परमदुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ।।

हे माझे, हे माझे असे करत मनुष्य सतत विषयांच्या, वासनेच्या मागे धावत असतो. भोगाकडे त्यांचा कल अधिक असतो. त्या शिवाय त्याला तृप्त झाल्यासारखे वाटत नाही. पण हे सुख क्षणिक असते. ते त्याच्या कधीही लक्षात येत नाही. तेवढ्यापूर्वीच ही तृप्ती असते. या क्षणिक सुखाच्यामागे मुर्खासारखे तो सतत धावत असतो. स्पर्धेच्या युगात स्पर्धा कशाची करायची हे सुद्धा महत्त्वाचे आहे. सुख मिळते म्हणून धामडधिंगा घालायचा. हा चंगळवाद आहे. पाश्‍चिमात्यांचे अनुकरण करत आपल्याकडे सध्या वाट्टेलत्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याचा परिणाम येथील पारंपरिक उत्सवावरही झाला आहे. गोकुळअष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. पण सध्या या उत्सवात स्पर्धाच अधिक वाढली आहे. दहीहंडीला आता राजकीय पाठबळाबरोबरच कॉर्पोरेट कवचही मिळाले आहे. हा कार्यक्रम आता बाळगोपाळांचा, व्यायामशाळांच्या उत्साहाचा, भाव भक्तीचा राहिला नाही. हंडी फोडण्यासाठी किती मोठा थर उभा केला याची स्पर्धा यात आता लागलेली आहे. यंदा नऊ थराची हंडी होती. या झटपटांत यंदा 273 गोविंदा जखमी झाले. यातील काही जण गंभीर अवस्थेत आहेत. अशा या उत्सवाच्या स्पर्धेतून शेवटी दुःखच पदरात पडत आहे. दहा थरांचा विक्रम यंदाही मोडता आला नाही. हे दुःख आहेच. उत्साहासाठी उत्सव असावा. मनाला त्यातून समाधान मिळावे. पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ऊर्मी त्यातून मिळायला हवी. पण सध्याचे उत्सव हे चंगळवादी संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. यातून शेवटी काय साधले जाते. उत्सव कशासाठी असतो त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. धार्मिक उत्सवात सध्या भावभक्तीचा उल्लेखही होत नाही. मग खऱ्या ज्ञानाच्या, सुखाच्या प्राप्ती यातून कशी होणार. यातून केवळ परमदुःखच हाती लागणार.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, September 1, 2010

अमरत्वाचे सिंहासन

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानी भुवन । अमरावती ।।

सद्‌गुरू कृपेनंतर नराचा नारायण होतो. अज्ञानाच्या अंधकारातून तो बाहेर पडतो. आत्मज्ञानाच्या सिंहासनावर तो विराजमान होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. मुळात तो अमरच असतो. पण अज्ञानामुळे तो भरकटतो. सध्या देशात नवनवीन तंत्रज्ञानात बराच विकास झाला आहे. तसेच त्यात प्रगतीही होत आहे. आपला देश आता महासत्तेकडे वाटचाल करत आहे. असे सांगितले जाते. पण दुसरीकडे दारिद्र रेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे, असेही स्पष्ट केले जाते. मग नेमके आपण आहोत कोठे? जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. अशाने नेमका कोणता विकास साधला हेही एक गूढच आहे. जनतेचे अज्ञान दूर करून जो राज्यकर्ता प्रगती साधतो तोच खरा समाजसेवक असतो. त्यांचे नाव अमर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात असे राज्यकर्ते होते. म्हणूनच आपण स्वतंत्र झालो. अशा राज्यकर्त्यांची सध्या देशाला गरज आहे. जनतेला ज्ञानी बनविणारे राज्यकर्ते हवेत. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसविणारेच खरे सद्‌गुरू असतात. त्यांची परंपरा पुढे चालते. आदिनाथापासून सुरू झालेली संत परंपरा आजही तशीच पुढे सुरू आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे