Tuesday, August 31, 2010

स्वप्न

तरी स्वप्नौनी जागृती येता । काय पाय दुखती पंडुसुता ।
का स्वप्नामांजी असता । प्रवासु होय ।।

प्रत्येक व्यक्ती काहींना काही स्वप्ने उराशी बाळगत असतो. स्वप्ने असावीत. त्यातूनच नवनव्या आशा उत्पन्न होतात. विचार सुरू राहतात. प्रगती होत राहते. काही ना काही तरी करण्याची धडपड सुरू राहते. यातूनच विकासाचे खरे मार्ग सापडतात. स्वप्न भंगले. तरी निराशा येत नाही. कारण ते शेवटी स्वप्न असते. सत्य परिस्थिती नसते. स्वप्न हे नेहमी चांगल्या गोष्टीचे असावे. रात्री झोपेत सुद्धा आपणास काही स्वप्ने पडतात. ती चांगली असतात असे नाही. असे म्हणतात की पहाटेच्यावेळी पडलेली स्वप्ने ही खरी होतात. कोण जाणे. स्वप्न चांगले असेल तर ते खरे मानायला काहीच हरकत नाही. कदाचित त्यामुळेही ते स्वप्न सत्यात उतरेल. काही भीतीदायक स्वप्ने पडतात. पण ते स्वप्न असते. त्यामुळे जागे झाल्यावर त्यातील भीती नसते. अज्ञानाने आपण देहाच्या सुखामागे धावत आहोत. या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज आहे. आत्मज्ञानाची जागृती होणे गरजेचे आहे. डोळ्यावरची अज्ञानाची झापड दूर होण्याची गरज आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, August 27, 2010

अवधान

तरी अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।

गाडी चालवताना चालकाचे अवधान चुकले तर आपण लगेच त्याला ओरडतो. अवधान हे ठेवावेच लागते. नाहीतर अपघात होतात. आपण ज्या गोष्टी करतो त्याप्रत्येक गोष्टीत अवधान हे असावेच लागते. अवधान ढळले तर चुका होतात. साधनेत अवधानास खूप महत्त्व आहे. मनात काहीही विचार सुरू असतात पण क्रिया ही सुरूच असते. सायकल चालवताना आपल्या मनात विचार सुरू असतात त्यावेळी पायंडेल ही आपण मारत असतो. दोन्हीही क्रिया एकाच वेळी सुरू असतात. साधना करतानाही तसेच आहे. आपण साधनेला बसलेले असतो पण आपल्या मनात वेगळेच विचार घोळत असतात. पण त्यावेळी आपली साधनाही सुरू असते. श्‍वास आत घेतला जात असतो. बाहेर सोडला जात असतो. पण ही क्रिया आपल्या लक्षात येत नाही. यासाठी साधना करताना मनातील सर्व विचार सोडून द्यावे लागतात. हे एकदम शक्‍य होत नाही. कालांतराने विचार कमी होतात. पूर्वीच्या काळी अनेक साधू हिमालयात जाऊन बाराबारा वर्षे साधना करत असत. मन स्थिर करण्याचा प्रयत्न करत असत. पण तरीही त्यांचे मन स्थिर होत नसे. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आपणास साधासोपा मार्ग सांगत आहेत. फक्त अवधान द्यावे इतकेच त्यांचे मागणे आहे. त्यांचे हे मागणे जो भक्त पूर्ण करू शकतो. त्यालाच आत्मसुखाचा लाभ होतो. यासाठी वणवण भटकायची गरज नाही. संसाराचा त्याग करायचीही गरज नाही. फक्त साधना करताना अवधान देणे असणे आवश्‍यक आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, August 26, 2010

मोक्ष

तैसा संसारु तया गांवा । गेला साता पांडवा ।
होऊनी ठाके आघवा । मोक्षाचाचि ।।

जन्माला आलो म्हटल्यानंतर जगण्यासाठी आवश्‍यक गोष्टी या कराव्याच लागतात. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग तो सर्वसामान्य असो, की मोठा असो, किंवा साधू संत असो. त्याला या गोष्टींची गरज भासतेच. पण माणसाला जगण्यासाठी याची किती आवश्‍यकता आहे याचा विचारही प्रत्येकाने करायला हवा. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आगामी काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार हे निश्‍चित आहे. वस्त्राच्या बाबतीतही हीच स्थिती निर्माण होणार आहे आणि निवाराही मिळणे कठीण होणार आहे. सध्या लोक शहराकडे धाव घेत आहेत. पण काही कालावधीनंतर हेच लोक शहरातील धकाधकीला कंटाळून खेड्याकडे वळतील. गावातील शांतता त्यांना आकर्षित करेल. त्यांना जर शांत गावांची ओढ लागली तर पुन्हा धकाधकीच्या शहरात ते येणारही नाहीत. शहराचा ते सहजच त्याग करतील. काहीजण परमार्थासाठी संसाराचा त्याग करतात. संसार हा होत असतो. परमार्थ मात्र करावा लागतो. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत सर्व गोष्टी स्वतःहून आपल्याकडून करवून घेतल्या जात असतात. त्या करताना त्यात कंटाळा करून चालत नाही. पण परमार्थ हा करावा लागतो. माऊली येथे आयता मोक्ष सांगत आहे. संसार न त्यागताही मोक्ष कसा मिळवायचा हे सांगत आहे. लोखंडापासून सोने वेगळे केल्यानंतर पुन्हा त्याचे लोखंडात रुपांतरण करता येत नाही. किंवा उसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा त्यापासून ऊस तयार होत नाही. तसे देह आणि आत्मा हा वेगळा आहे याची अनुभूती आल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा अडकणार नाही. आत्मा हा अमर आहे. देहाचा मृत्यू होतो. आत्माचा नाही. तो आत्मा आता पुन्हा देहात अडकणार नाही. ही अनुभूती आल्यानंतर तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त होईल.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, August 25, 2010

मनाची स्थिरता

तूं मन बुद्धी सांचेसी । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।
तरी मातेची गा पावसी । हे माझी भाक ।।
अध्यात्माचा अभ्यास हा करायलाच हवा. साधनेतील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा. चक्रांचे कार्य काय आहे, ते कसे कार्य करतात? साधनेच्या काळात आपल्या शरीरात कोणत्या क्रिया घडतात? आपणास कोणते बोध होतात? कोणती अनुभूती येते? हे जाणून घ्यायलाच हवे. साधनेत अवधानाला अधिक महत्त्व आहे. नुसतेच शांत बसून राहणे म्हणजे साधना नव्हे. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राचे नामस्मरण करायला हवे. ते करताना अवधान आवश्‍यक आहे. मन भरकटते. पण मनाला स्थिर करणे आवश्‍यक आहे. साधनेच्या सुरवातीच्या काळात हे शक्‍य होत नाही. पण हळूहळू अभ्यासाने ते शक्‍य होते. मनातील विचार दूर होतात. साधनेत येणारे अडथळे हळूहळू दूर होतात. सद्‌गुरुंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या जागी मन स्थिर होते. मनाला स्थिर ठेवणे कोणास जमले ? साधना सुरू असताना विचार येतच राहतात. पण याचा तोटा काही नाही हे ही लक्षात घ्यायला हवे. या विचारांच्या जागी मन स्थिर होते. यातून एखाद्या समस्येवर उत्तर मिळते. चिंतन, मननातूनच अनेक समस्या सुटतात. योग्य मार्ग सापडतात. साधनेचे हे फायदे आहेत. यासाठी सुरवातीच्या काळात साधनेत मन रमले नाही तरी हळूहळू त्याची गोडी लागते. मनाला स्थिरता येते. विचार संपतात. मग आत्मज्ञानाच्या पायऱ्या सहज चढल्या जातात.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, August 23, 2010

अध्यात्म

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।।


भगवंतास धर्नुधर अर्जुनाने प्रश्‍न केला. ब्रह्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? अध्यात्म म्हणजे काय? तसे पाहता हे प्रश्‍न सर्वच भक्तांचे असतात. प्रत्येक भक्ताला या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असते. हे प्रश्‍न प्रत्येकाला पडायलाच हवेत. त्याच्या उत्तराच्या शोधात तरी आध्यात्मिक ग्रंथाचे पारायण होईल. उत्तरे शोधण्यासाठी आपोआपच वाचन वाढेल, नंतर त्याची सवय लागेल. हळूहळू या प्रश्‍नाची उकल होते. अनुभुतीतून प्रश्‍नांची उत्तरे मिळत राहतात. यातून मनाला वाफसा येतो. अशावेळी सद्‌गुरू गुरुमंत्राची पेरणी करतात. सद्‌गुरुंचा नित्य सहवास अंतःकरणात राहातो. अगदी सहजपणे आपणाकडून साधना घडते. कष्ट पडत नाहीत. त्रास होत नाही. सतत नामस्मरणात आपण गढून जातो. दैनंदिन घडामोडीतही नित्य सद्‌गुरुंच्या सहवासाची जाणीव होते. मनाला स्थिरता येते. यालाच अध्यात्म असे म्हणतात. यासाठी अवधान असावे लागते. तरच आध्यात्मिक प्रगती होत राहते. साधनेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. हळूहळू प्रगती होत राहते. अनुभूती येत राहते. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात हा आत्मा अडकला आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तो सर्वांमध्ये आहे. याची अनुभूती येते.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, August 22, 2010

साक्षात्कार

कृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे ब्रह्म साक्षात्कारी ।
मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ।।
आपल्या देशात राक्षसांना मारण्यासाठी भवानी, काली, दुर्गा मातेचा अवतार झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. दृष्ट दुर्जनांना मारण्यासाठी ही देवी अवतार घेत असते. या राक्षसांना मृत्यू समयी या देवीचा साक्षात्कार होतो. अनेक दुर्जन दुष्ट व्यक्तींनी साक्षात्कारानंतर सत्कर्मे केल्याची उदाहरणे आहेत. वाल्हा कोळीचा वाल्मीकी झाला. नंतर त्यांची देवळे, समाधी बांधण्यात आली. हीच आपली संस्कृती आहे. म्हणूनच अफजलखानाची समाधी छत्रपती शिवरायांनी बांधली. छत्रपतींचा तो नृसिंह अवतारच होता. अशी अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. आपणास तर भगवंत आपल्या कृपेने उपदेश करत आहेत. मग आपणास का भगवंताचा का साक्षात्कार होणार नाही. यावर विश्‍वास ठेवायला हवा. साक्षात्कारासाठी आपले अवधान महत्त्वाचे आहे. सर्व विश्‍वात भगवंताचा वास आहे. असा अनुभव यायला हवा. ब्रह्म सर्वांमध्ये आहे. सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे. कर्मामुळे प्रत्येकजण विभागला गेला आहे. समाजात सुख शांती नांदावी यासाठी निर्माण केलेली रचना आहे. सध्या जगात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. दृष्कृते करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा या बिकट काळात भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला मदत करतो. ही मदत भगवंताची आहे अशी अनुभूती यायला हवी. स्वतःमध्येही भगवंत आहे याची प्रचिती जेव्हा येईल तेव्हा आपणातील मीपणा दूर होईल. तो दूर होणे आवश्‍यक आहे.
राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, August 19, 2010

कृषी पदवी सत्रनिहाय पाठ्यपुस्तके हवीत!

कृषी पदवी सत्रनिहाय पाठ्यपुस्तके हवीत!

"ऍग्रोवन'च्या सर्वेक्षणातील सूर; "नोट्‌स'वरच झाले अनेक पदवीधर

राजेंद्र घोरपडे/अनिकेत कोनकर
पुणे ः राज्यात कृषी आणि संलग्न विषयांत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची सत्रनिहाय पाठ्यपुस्तके अधिकृतरीत्या उपलब्धच नाहीत! कृषी शिक्षणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशी पुस्तके उपलब्ध होण्याची गरज विद्यार्थी व प्राध्यापकांमधून तीव्रतेने व्यक्त होत आहे. काही प्राध्यापकांनी स्वतः काही पुस्तके लिहिली आहेत, मात्र भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद अथवा चारही विद्यापीठांनी एकत्र येऊन अशी पुस्तके तयार केल्यास राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, असा सूर "ऍग्रोवन'ने केलेल्या सर्वेक्षणातून उमटला आहे.

कृषी पदवी, तसेच संलग्न शिक्षणक्रमांसाठी असलेल्या विविध विषयांतील सर्व भाग एकाच वेळी अभ्यासाला नसतो. याची विभागणी वेगवेगळ्या सत्रांत केलेली असते. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांचा अभ्यासक्रम सारखाच असून, अकॅडेमिक कौन्सिलकडून तो ठरवला जातो. अभ्यासक्रमासोबतच तज्ज्ञांनी लिहिलेली क्रमिक पुस्तके (टेक्‍स्ट बुक्‍स) आणि संदर्भ पुस्तके (रेफरन्स बुक्‍स) यांची शिफारस केली जाते, मात्र ती केवळ एखाद्या सत्रापुरती मर्यादित नसतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी ही पुस्तके वाचणे अपेक्षित असते; मात्र काही मोजक्‍या विद्यार्थ्यांचे अपवाद वगळता ही पुस्तके वाचून, त्यातील संदर्भ घेऊन, स्वतः नोट्‌स काढून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. काही वेळा प्राध्यापक स्वतः काढलेल्या नोट्‌स देतात. त्या विश्‍वासार्ह असतात; मात्र सर्वच प्राध्यापक अशा नोट्‌स देत नाहीत, त्यामुळे बहुतांश विद्यार्थी मग तयार असलेल्या नोट्‌सचा मार्ग अवलंबतात. त्या नोट्‌स नेमक्‍या कोणी काढलेल्या आहेत, कधीच्या आहेत, त्यातील संदर्भ नेमके कशातील आहेत याची पक्की माहिती नसते, मात्र संदर्भ पुस्तके, तसेच चार-पाच टेक्‍स्ट बुक्‍समधून अभ्यासक्रमातील नेमका विषय शोधण्यात होणारा गोंधळ, त्यासाठी संयमाने घालवावा लागणारा वेळ आणि त्यासाठीचा कंटाळा, काही वेळा पुरेशा पुस्तकांची अनुपलब्धता आदी कारणांमुळे ही पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जे ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळणे आवश्‍यक आहे, ते प्रभावीपणे मिळत नाही. मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. राज्यातील बहुतांश कृषी महाविद्यालयांमध्ये हे चित्र पाहायला मिळते.

सत्रनिहाय पाठ्यपुस्तके ठरतील उपयुक्त
कृषी आणि संलग्न पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक सत्राच्या प्रत्येक विषयाचे एक पुस्तक तयार केले तर ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल. या पुस्तकांतील माहिती संबंधित विषयाच्या शिफारशीत टेक्‍स्ट बुक्‍समधून एकत्रित केलेली असेल आणि त्याची सोप्या भाषेत, सुलभ अशी मांडणी केलेली असेल. विषयानुरूप अधिक माहिती, संदर्भपुस्तके, टेक्‍स्ट बुक्‍सची नावेही त्यात दिलेली असतील. राज्यातील चारही विद्यापीठांनी एकत्र येऊन अशी पुस्तके विकसित केल्यास दर्जेदार आणि खात्रीशीर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. विशेष निधीतून ही पुस्तके विकसित केल्यास विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किमतींत उपलब्ध होऊ शकतील. कृषी शिक्षण घेऊन सध्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनीही अशी पुस्तके आवश्‍यक असल्याचे मत मांडले आहे.
..........
विविध मते..

अशी पुस्तके विद्यार्थी व प्राध्यापकांसाठीही मदतीचे होईल, त्यात नव्या अभ्यासक्रमानुसार टीचिंग शेड्यूल्सही दिल्यास परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक विभागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळेल. प्रश्‍नपेढी, बहुपर्यायी प्रश्‍नही दिल्यास विद्यापीठाच्या परीक्षेसोबतच स्पर्धापरीक्षेसाठीही उपयुक्त होईल. अशा पुस्तकांमुळे, कोणत्याही विद्यापीठातला पेपर आला, तरी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.
- डॉ. प्रमोद सावंत, प्राध्यापक, विस्तार शिक्षण, कृषी महाविद्यालय, दापोली
.................
ही संकल्पना चांगली आहे. प्रत्येक विषयाचे एक पुस्तक तयार करून, त्यामध्ये विषयाची सत्रनिहाय विभागणीही करता येऊ शकेल, जेणेकरून सर्व विषयांची अशी पुस्तके घेतली, की चारही वर्षे विद्यार्थ्यांना ती उपयुक्‍त ठरू शकतील.
- अजय राणे, सहायक प्राध्यापक, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली
..........
"पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके वाचण्याचे प्रमाण 65-70 टक्केच'
आमच्या ग्रंथालयात साठ हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. त्यामध्ये 65 ते 70 टक्के टेक्‍स्ट बुक्‍स असून, 30 टक्के संदर्भ पुस्तके आहेत. त्याशिवाय विविध प्रकारची इयरबुक्‍स, डिक्‍शनरी, विज्ञानपत्रिका, कृषिविषयक मासिके, दैनिके आणि अन्य विषयांच्या पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके
वाचण्याचे प्रमाण 60 ते 70 टक्केच आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये मात्र ते 100 टक्के आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले वाचनाचे प्रमाण आणखी वाढण्याची गरज आहे. पुस्तके वापरण्याकडे अधिकाधिक विद्यार्थी आकृष्ट होण्याकरिता आम्ही काही उपक्रम हाती घेतले आहेत. नव्याने आलेल्या विज्ञानपत्रिकांच्या अनुक्रमणिकांची झेरॉक्‍स काढून आम्ही ती संबंधित विषयाच्या विभागामध्ये नोटीसबोर्डवर चिकटवण्यासाठी पाठवतो, जेणेकरून संबंधित
विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा संदर्भ मिळतो आणि ते मूळ विज्ञानपत्रिका वाचण्यासाठी ग्रंथालयात येऊ शकतात, तसेच नवी विकत घेतलेली पुस्तके आम्ही ग्रंथालयात दर्शनी भागात डिस्प्ले करतो, त्यामुळे नव्या पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांना कळते. विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील संदर्भसाहित्याचा लाभ होण्यासाठी सुसज्ज 40 संगणकांचा विभाग सुरू करण्यात आला आहे, तसेच जुन्या विज्ञानपत्रिका आणि अन्य काही संदर्भसाहित्य सीडीच्या स्वरूपातही उपलब्ध आहे, त्याचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात.
- किशोर पाटील, ग्रंथपाल, कृषी महाविद्यालय, पुणे
.............
ऍकॅडमिक कौन्सिलने मंजूर केलेल्या अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तकांची (टेक्‍स्ट बुक्‍स) शिफारस केलेली असते. ही पुस्तके कृषी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात
या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही पुस्तके सत्रनिहाय नसून, त्यामध्ये संबंधित विषयाची विस्तृत माहिती असते. विद्यापीठांनी पुढाकार घेतल्यास सत्रनिहाय
पुस्तकेही काढता येऊ शकतात. पुस्तकनिर्मितीसाठी आयसीएआरकडून निधीही उपलब्ध होत असतो.
- डॉ. भीमराव उल्मेक, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पुणे
...................
सध्या काही प्राध्यापक स्वतःहून अशी पुस्तके लिहून प्रकाशित करीत आहेत. त्याचा वापरही मुले करत आहेत, मात्र अजून हा वापर मोठ्या प्रमाणावर होत नाही. या पुस्तकांच्या किमती विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या नसतात, त्यापेक्षा पुस्तके किंवा नोट्‌सच्या झेरॉक्‍स करून घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. विद्यापीठ पातळीवर अशी पुस्तके तयार झाली तर उपयुक्त ठरू शकेल.
- डॉ. हरिहर कौसडीकर, सहायक प्राध्यापक,
ृमृद्विज्ञान व कृषी रसायन विभाग,
कृषी विद्यापीठ, परभणी
....................
विषयांची सत्रनिहाय पुस्तके आवश्‍यकच आहेत, अशी पुस्तके लिहिण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांची निवड करावी. या पुस्तकांमध्ये ग्राफिक्‍स, आकृत्या आदींचा वापर प्रभावीपणे करायला हवा. विद्यार्थ्यांना थेट समजतील अशी उदाहरणे देऊन विषयांची सुलभ मांडणी करायला हवी. अशी पुस्तके विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तर उपयुक्त ठरतीलच, शिवाय प्राध्यापकांसाठीही एक मार्गदर्शक दिशा ठरेल.
- डॉ. रामचंद्र साबळे, माजी प्रमुख, हवामानशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
................
ना नफा, ना तोटा तत्त्वावर उपक्रम
अभ्यासक्रमात बदल होत असल्याने नव्या पुस्तकांची गरज आहे. ऍग्रोनॉमी विषयाची काही सत्रांची पुस्तके आम्ही तयार करून ना नफा ना तोटा तत्त्वावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांसाठीही याचा फायदा होऊ शकतो.
- डॉ. अशोक पिसाळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.
......................
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हवा
पुस्तके वापरण्याचे व वाचनालयात जाऊन स्वतः नोट्‌स काढण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यात सुधारणा व्हायला हवी. शासकीय महाविद्यालयांमध्ये पुस्तकांची उपलब्धता अधिक आहे, मात्र आम्हीही पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्याला योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे.
डॉ. दिनकरराव रामचंद्र थोरात, प्राचार्य, कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु., ता. कऱ्हाड, जि. सातारा
..................
बहुतांश विद्यार्थी तयार नोट्‌स वाचूनच अभ्यास करतात. सत्रनिहाय पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यास खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकेल.
- पुष्कर देवल, चतुर्थ वर्ष, बी.एस्सी. ऍग्री., कृषी महाविद्यालय, दापोली.
....................
एकाच विषयासाठी सहा-सात पुस्तके शिफारशीत केलेली असतात. आमचा अभ्यासक्रम नवा असल्याने काही विषयांची पुस्तके उपलब्ध होत नाहीत, मग उपलब्ध पुस्तके अन्‌ नोट्‌सच्या झेरॉक्‍स काढून वाचल्या जातात. विषयांची सत्रनिहाय पुस्तके उपलब्ध झाल्यास उपयुक्त ठरेल.
- आशीष पित्रे, चतुर्थ वर्ष, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली.
.........
पुस्तके फायदेशीर
उपलब्ध नोट्‌समधून विषयाची सखोल माहिती मिळत नाही, मात्र काही प्राध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आम्हाला फायदा होत आहे, त्यामुळे सर्व विषयांची अशी पुस्तके प्रकाशित झाल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
- हर्षद देशमुख, बी.एस्सी. (उद्यानविद्या), तृतीय वर्ष, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
.....................
पशुवैद्यकीय पदवीसाठी शिफारस केलेली 70 टक्के पुस्तके परदेशी लेखकांची असून, उर्वरित भारतीय लेखकांची आहेत. काही जर्नल्सचाही वापर पुस्तक म्हणून करावा लागतो; मात्र सत्रापुरतीच पुस्तके उपलब्ध केल्यास संबंधित विषयाचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात मर्यादा येतील.
- डॉ. नितीन मार्कंडेय, प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी
....................................
क्रमिक पुस्तकांची फेरमांडणी आवश्‍यक
पशुवैद्यकीय शिक्षणातील क्रमिक पुस्तकांची फेरमांडणी आवश्‍यक आहे. आपल्याकडे एक किंवा दोन तज्ज्ञांनी मिळून लिहिलेली क्रमिक पुस्तके अभ्यासक्रमामध्ये आहेत, परंतु परदेशात एकाच विषयातील 20 ते 25 तज्ज्ञांच्या संशोधनाचा आधार घेत क्रमिक पुस्तक तयार केलेले असते. त्यामुळे विद्यार्थांना एकाच विषयातील विविध स्तरांवरील संशोधनाची माहिती एकाच ठिकाणी अभ्यासण्यास मिळते.
- डॉ. रामनाथ सडेकर, पशुतज्ज्ञ
.........................................
पुस्तकांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
फोर्थ डिन्स कमिटी 2007-08 यांच्या शिफारशीनुसार तयार झालेला बी. एस्सी. (कृषी) पदवीच्या नवीन अभ्यासक्रमाची 14 क्रमिक पुस्तके आम्ही
प्रकाशित केली आहेत. विद्यार्थ्यांचा यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पुस्तकामध्ये
अभ्यासक्रमानुसार आवश्‍यक रंगीत छायाचित्रे, आकृत्या आदींची माहिती समाविष्ट करण्यात आल्याने विद्यापीठांच्या कुलगुरूंनीही त्यास पसंती दर्शविली आहे.
- राजाभाऊ आहिरे पाटील, श्री राजलक्ष्मी प्रकाशन, औरंगाबाद
...................

Tuesday, August 10, 2010

अनुभूती

अनुभूती
जया सद्‌गुरू तारू पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे ।
जया आत्मनिवेदन तरांडे । आकळिले ।।
सद्‌गुरुंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते. पण प्रत्यक्षात ही साधना सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरूमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्‌गुरू देतात. त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्‌गुरुंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत अशी अनुभूती येते. पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी अवधानाचा वाफसा असणे आवश्‍यक आहे. तरच गुरूमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. हे बीज वाया जाणार नाही ना? अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहते. काळजी वाटते पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरवते हे सद्‌गुरूच आहेत. हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. आपल्या डोळ्यावरची ही झापड सद्‌गुरू दूर करतात आणि आपणा दृष्टी देतात.

Monday, August 9, 2010

वाफसा

वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनया ऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।।
शेतात बी पेरण्यासाठी जमिनीत वाफसा असावा लागतो. पावसाळ्यात पेरणी करताना जमिनीतील पाण्याचा निचरा होऊन जमीन वाफश्‍यावर येणे आवश्‍यक आहे. वाफसा येतो तेव्हाच शेतकरी पेरणी करतात. तसेच खते, तणनाशके, कीडनाशके यांचा वापर करतानाही जमिनीत वाफसा असणे आवश्‍यक आहे. सद्‌गुरुकडून सतत प्रेमाचा, ज्ञानाचा वर्षाव होत असतो. भक्त या प्रेमाच्या रसात डुंबून जातो. पण सद्‌गुरुंचा अनुग्रह होण्यासाठी भक्ताचे मन वाफशावर येणे आवश्‍यक असते. मनाचा वाफसा तयार झाला की, सद्‌गुरू त्यामध्ये गुरुमंत्राची पेरणी करतात. ते बीज वाया जाऊ नये याची काळजी घेतात. बी जमिनीत वाढते. यासाठी शेतकरी त्याच्या वाढीच्या योग्य कालावधीत खते देतात. पिकात वाढलेली तणे काढतात. सद्‌गुरू भक्ताला योग्य वेळी उपदेश करून त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी त्याला प्रोत्साहित करतात. यामुळे भक्ताला अध्यात्माची गोडी लागते व त्याची प्रगती होते. काही कालावधीने हे बीज फुलोऱ्यावर येते. त्यालाही आत्मज्ञानाची फुले लागतात. ही फुले इतरांच्यावर भक्तीचा रस ओततात. अशी ही भक्तीची परंपरा आपल्या देशात अनादी कालापासून अखंड सुरू आहे.

Sunday, August 8, 2010

सन्मार्गाची दृष्टी

दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडू जैसा ।।
तो माझा ठायीं तैसा । मी तयामाजीं ।।
दिवा आहे तेथे प्रकाश आहे. यांचे जसे ऐक्‍य आहे. तसे संत जिथे असतात तेथे चैतन्य वास करीत असते. दिवा जसा अंधार दूर करतो. तसे संत भक्तांच्या आयुष्यातील अंधार दूर करतात. भक्तांच्या ह्रद्‌यात भक्तीचा मळा फुलवितात. अंधकारमय जीवन चैतन्याने भरून टाकतात. यासाठी संतसंग करावा. त्यांच्या सहवासाने आयुष्यात सन्मार्गाची वाट दृष्टीस पडते. दिवा जसा स्वतः जळतो व दुसऱ्याला प्रकाश देतो तसे संत भक्ताचे सर्व अपराध स्वतः घेऊन त्याला सन्मार्ग दाखवितात व भक्ताचे जीवन प्रकाशमान करून टाकतात. त्याला दृष्टी देतात. स्वतःच्या पातळीवर आणून बसवतात.

Saturday, August 7, 2010

अभ्यास

इये अभ्यासी जे दृढ होती । ते भरवसेंनी ब्रह्मत्वा येती ।
हे सांगतियाची रीती । कळले मज ।।
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास हा आवश्‍यक आहे. आजकाल राजकारणात फक्त निवडणूक लढविणे आणि ती जिंकणे याचाच अभ्यास केला जातो. विकासकामांवर फारसा भर दिला जात नाही. आपले पद खुर्ची कशी टिकवून ठेवायची यावरच भर दिला जातो. याचेच सतत चिंतन, मनन, अभ्यास केला जातो. अनेक खासदार, मौनी खासदार म्हणून संसदेत ओळखले जातात. पण ते दरवेळी निवडून येतात. मतदार संघातील प्रश्‍नांची त्यांना जाण नसते पण मतदार कसे मत देतील याचाच त्यांचा अभ्यास असतो. यामुळेच सध्या देशाचा विकास खुंटला आहे. अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. नुसती मते मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. अभ्यास कशाचा करायचा हे देखील महत्त्वाचे आहे. परीक्षेत मार्क कसे पडतील याचेच नियोजन करून तसा अभ्यास केला जातो. यामुळे सध्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळविणारे अनेक विद्यार्थ्यी गुणवत्ता यादीत पाहायला मिळतात. पण संशोधनात्मक वृत्ती त्यांच्यात वाढीस लागायला हवी तरच त्या गुणवत्तेचा खरा फायदा होईल. राजकारण्यांनी फक्त मतांचा अभ्यास न करता विकासात आडकाठी ठरलेल्या प्रश्‍नांचा अभ्यास करायला हवा. खरा मुरब्बी राजकारण्याला प्रश्‍न हाताळण्याची खरी जाण असते. विकास साधून मते मिळविणारेच खरे राजकारणात टिकून राहतात, हे विसरता कामा नये. अध्यात्मात साधनेतून ब्रह्मत्वाकडे जाता येते. पण यासाठी साधना कशी करायची याचा अभ्यास हवा.

Wednesday, August 4, 2010

लहरींचा शोध

ऐसी शरीरा बाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे ।
तंव आतु त्राय मोडे । मनोधर्माची ।।
पूर्वीच्या काळी साधनेसाठी डोंगर कपारीत गुहांची निर्मिती केली जात होती. पण साधनेसाठी गुहाच का? हा प्रश्‍न प्रत्येकाला पडला असणार. पूर्वी तितके ध्वनी प्रदूषणही नव्हते. सध्याच्या आधुनिक युगात ध्वनी प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा काळात साधनेसाठी गुहांचा वापर केला जात नाही पण त्याकाळी गुहेत जाऊन साधना केली जात होती. विद्युत लहरी दिसत नाहीत. त्या वातावरणात असतात. या लहरींचा परिणाम आपल्या मनावर होतो. वातावरणातील या लहरी गुहेमध्ये पोहोचू शकत नाहीत. पोहचल्यातरी त्याची तीव्रता खूपच कमी असते. नगण्य असते. याचे उत्तम उदाहरण सांगता येऊ शकेल म्हणजे गुहेत मोबाईलला रेंज मिळत नाही. पण त्या काळी हे तंत्रज्ञान नव्हते. मग या लहरींचा शोध नेमका केव्हा लागला. आपल्या साधुसंतांना या लहरींची कल्पना निश्‍चितच असणार. म्हणूनच तर त्यांनी साधनेसाठी गुहांची निर्मिती केली. पण काही असो शरीरा बाहेरच्या या लहरींच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी गुहेत साधना केली जात होती. मनाला स्थिर ठेवण्यासाठी किती खोलवर विचार त्याकाळी केला जात होता. हे यातून दिसते.