Tuesday, July 27, 2010

जागृती

सायंकाळची वेळ होती. रामू कृषी पदवीधर होऊन गावाकडे परतला होता. एस.टी.तून उतरताना त्याचा मित्र सुनिल त्याला भेटला.
काय रे राम्या, कसं येण झालं ? गावकडची आठवण बिठवण कशी काय आली ?
अरे सुनिल, खूप गावाची खूप आठवण येते रे. सह्याद्रीच्या डोंगरकपारीत वसलेलं आपुला हा गाव खूपच सुंदर आहे रे. येथून जाण्याची इच्छाच होत नाही. तु कसा आहेस ?
"बरा आहे. पण काय र समदा बदलाईस बर का? आवाजात सुद्धा शहरी बाज आलाय तुझा. पण काय रे समद्या सामानासह तू कसा काय परतलाय?'
"अरे माझे शिक्षण पूर्ण झाले. आता मी कृषी पदवीधर झालो आहे. वाटत आता गावाच्या विकासातच लक्ष घालाव. गावातील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान शिकवाव व प्रगतीशील शेतकरी बनवाव'
" अर पण तु गावात राहून करणार काय? सगळी शिकल्याली पोर शहराकडे जायची भाषा करतात. त्यासाठी आईबापाशी भांडतात. अन तू शिकून इथ येऊन गावात या खोपटात बसतान मांडणार?'
" हो, मी इथेच येणार गावातील आपल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आहे. फळबाग लागवड, पोल्ट्री उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग उभे करणार आहे.'
"बरं बाबा मी चलतो. आपण उद्या चावडीच्या पारावर भेटू'
बऱ्यांच दिवसांनी रामू आपल्या गावच्या वाड्यात प्रवेश करतो. रामूचे वडील शाळेत मुख्याद्यापक आहेत. पण कामानिमित्त ते बाहेरगावीच असतात. आठवड्यातून घरी येतात. आई घरकाम पाहात शेती पाहाते.
दुसऱ्या दिवशी रामू गावच्या चावडीच्या पारावर जातो. सगळी शेतकरी मंडळी नेहमी प्रमाणे राजकिय गप्पात रंगलेली असतात. वृत्तपत्राची पाने चाळत त्यांच्या राजकिय गप्पा अधिकच रंगत असतात.
"काय पाव्हन, कनच्या गावच'
" आबा, तुम्ही ओळखल नाही मला. मी मुख्याद्यापकांचा मुलगा'
" आरं, रामू किती मोठा झालास. वळखलाच नाहीस किंर. कसा आहीस. बर चाललय नव्ह'
"हो ठिक चाललय. आबा आपल्या गावात सोसायटी होती ना?'
" हो व्हती बाबा पण समद बंद पडलय आता. कर्जाच्या ओझ्यान सगळ बुडाल. मधमाशापालनाचा व्यवसायही गेल्या तीन चार वर्षापासून बंद पडलाल. समद राजकारणात बुडाल रे"
"काय म्हणता काय?'
"तू त्यात पडू नक बाबा शाहण्याच काम नव्ह ते. ते समद घाणेरड राजकारण हाय. समद्यांची वाट लागलीया. पतसंस्था बुडाली. त्यात गोरगरीबांची पुंजी अडकलीया'
हे ऐकून रामू नाराज होतो. गावाचा फेर मारण्यासाठी आणि गावात आणखी काय बदल झालेत हे पाहण्यासाठी तेथून बाहेर पडतो.
दुसऱ्या दिवशी रामू असाच गावचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. गाव कामगार पाटलाच्या लिंबूच्या बागेत त्याला लोकांची गर्दी दिसली. गर्दी कसली जमली आहे या उत्सूकतेने तो तेथे गेला. पण त्यांने पाहीले की लिंबावरील "लिफ मायनर' या किडीची पुजा गावकरी करीत आहेत. यामध्ये गावातील प्रतिष्ठीत सुशिक्षित महिलाही आहेत. हे पाहून तो आश्‍चर्यचकीत झाला.
"काय कसली पुजा चालली आहे.'
" अरं रामू पाटलांच्या लिंबावर नागाच्या छटा उमटल्यात. त्याची पुजा चाललीया'
रामू हे पाहून हसू लागला. त्यांने गावकऱ्यांना ही पानावरील किड असल्याचे समजाविण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी त्यालाचा खुळ्यात काढले.
"अहो, माझ समजून घ्या. ही किड लिंबूवर्गीय फळझाडाची नंबर एकची शत्रू आहे. या किडीची अळी कोवळी पाने पोखरून पानातील हरितद्रव्य खात पुढे जाते. त्यामुळे तिच्यामागे पानावर पारदर्शक नागमोडी पोखरलेली चंदेरी पट्टे पडत जातात. यालाच तुम्ही नागछटा म्हणून पुजा करत आहात. ही सगळी अंधश्रद्धा आहे.'
पण गावकऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. अशा घटनांना रामू नाराज झाला. त्यांने गाव सोडून शहरात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांना समजावणे तितके सोपे नाही. असे त्याला वाटते. जाताना तो गावच्या चावडीच्या फळावर या किडीबाबत माहिती मात्र लिहीतो.
पानातील हरितद्रव्य हे झाडाचे अन्न तयार करण्याचे मूळ साधन आहे. तेच ही किड खावून नाहीसे करते. त्यामुळे किड लागलेली पाने आकाराने लहान होतात व चुरगळली जातात. पाने आखडतात. सुकतात. गळून पडतात. झाडाची वाढ खुंटते. असा मजकूर तो फलकावर लिहीतो.
काही दिवसांनी गावकामगार पाटलाची बाग सुकल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येते. रामू सांगत होता. ते खरे आहे. हे लक्षात येते. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. व रामूला गावात बोलावून घेता.
रामू आता गावात सुधारणा करू लागला आहे. पाण्याची समस्या त्याने सोडवली आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ केली आहे. फळावर प्रक्रिया करणारे उद्योग त्यांने सहकारातून उभारले आहेत. आज तो गावातील एकटाच प्रगतशील शेतकरी नाही तर सारा गावच त्यांने प्रगतशील शेतकऱ्यांचा केला आहे.

Tuesday, July 20, 2010

तेजाची वाट

जे जया वाटा सूर्य जाये । तेउते तेजाचे विश्‍व होये ।।
तैसे तया पावे ते आहे । तोचि म्हणउनी ।।
आदर्शवादी व्यक्ती, संत ज्या मार्गाने जातात. त्या वाटावर आनंदाचे नंदनवन फुलते. यामुळे अशा महंत व्यक्ती आपल्या घरी याव्यात अशी इच्छा आपण मनी धरतो. अशा संतांचे चरण आपल्या हुंबऱ्याला लागावेत. त्यांच्यातुन ओसंडणाऱ्या प्रेमाने मनातील नाराजी, यातना दूर पळतात. त्यांच्या विचारांनी, उपदेशांनी दैनंदिन जीवनात उत्साह वाढतो. अशा या तेजस्वी संतांचा नित्य सहवास लाभल्यास आपणही तेजस्वी होऊन जाऊ. माउली, तुकोबांच्या पालख्या आता पंढरीत दाखल झाल्या आहेत. वारीचा मार्ग ज्ञानोबा, तुकोबांच्या जयघोषाने चैतन्यमय होतो. असे चैतन्य आपल्या गावाही निर्माण व्हावे यासाठी केवळ देहु, आळंदीहून निघणाऱ्या पालख्या आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघू लागल्या आहेत. पावसहून स्वामी स्वरुपानंदांची, सासवडहून सोपानदेवांची, त्र्यंबकेश्‍वरहून निवृत्तीनाथांची तसेच इतर अनेक संतांच्या पालख्या पंढरीत येतात. आपल्या गावाची पायवाटही चैतन्यमय व्हावी हीच या वारकऱ्यांची इच्छा असते. विठोबांच्या दर्शनाने त्यांच्यात पुन्हा पुढच्यावर्षी दिंडीत सहभागी होण्याचे बळ मिळते. त्यांचे सारे शरीर वारीच्या ओढीने तेजस्वी होते.

Tuesday, July 13, 2010

विवेकाचे गाव

ते विवेकाचे गाव । की परब्रम्हींचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रम्हविद्येचे ।।
आदर्श गाव योजनेचे संकल्पना सध्या अनेक गावात राबविण्यात येत आहे. पण पूर्वी जेव्हा ही कल्पना राबविण्यात आली तेव्हा अध्यात्माची जोड त्याला देण्यात आली होती. देव देवळावर जनतेचा विश्‍वास असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर लोकांचा यावरील विश्‍वास अधिकच वाढू लागला आहे. मनाच्या शांतीसाठी लोक याकडे वळताना पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी गावातील अनेक तंटे हे चावडीमध्ये सुटायचे नाहीत पण ग्राम देवळात ते सहज सुटायचे. पिढ्यान पिढ्या चालत आलेले वैर एका झटक्‍यात देवळात सुटल्याची अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. आदर्श गावाच्या निर्मितीसाठी मंदीरांचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही. सध्या अनेक गावात दुपारच्या वेळी पत्त्याचे खेळ रंगतात. अशा चंगळवादी संस्कृतीला मार्ग दाखविण्याची आज गरज आहे. काळ बदलत चालला आहे. पूर्वीचे दिवस आता राहीले नाहीत. रिकाम टेकड्या माणसांना आता काही कालावधीत जगणे असह्य होणार आहे. यासाठी गावातील मंदीरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि भरकटलेल्या जनतेला वास्तवाचे भान करून देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विवेकी गावे तयार करण्याची गरज आहे. अशा गावात ब्रम्हविद्या नांदते हे विचारात घ्यायला हवे.

राजेंद्र घोरपडे,
पुणे

Friday, July 9, 2010

खरा सन्याशी

खरा सन्याशी
आणि मी माझे ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण ।।
पार्था तो सन्यासी जाण । निरंतर ।।
खरे नुकसान मीपणामुळेच होते. हट्ट असावा पण तो कशाचा असावा याला महत्त्व आहे. अंहकाराचा हट्ट नको. हिटलर, सद्दाम हुसेन हे शुर होते, महत्त्वकांक्षी होते. सतत जिंकण्याची त्यांना हौस लागली होती. जग जिंकायला ते निघाले होते. जगावर आपली सत्ता असावी हे त्यांचे स्वप्न होते. या हट्टा पायी या त्यांच्या मीपणामुळे झाले काय? हा इतिहास सांगण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. जगावर आपली सत्ता असावी यासाठी अनेक राज्यांनी युद्धे केली. पण माउलीने जगावर राज्य कसे करायचे हे सांगते. ही सत्ता कशी मिळवायची. एका जागी बसून साऱ्या जगाचे भूत- भविष्य जाणणे ही जगावर सत्ता मिळविल्या सारखेच आहे. दुसऱ्याला शरण येण्यासाठी भाग पाडून जगावर सत्ता मिळविण्यापेक्षा स्वतःतील अहंकार, मीपणा सोडून खरा सन्याशी होऊन आत्मज्ञानी होणाराच खरा महासत्ताक आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, July 8, 2010

श्रवणातून मोक्ष

श्रवणातून मोक्ष

तैसा मनाचा मारु न करिता । आणि इंद्रिया दुःख न देता ।।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचीमांजी ।।

ग्रामीण भागात आजही मृत्यूशय्येवर पडलेल्या व्यक्तीसमोर देवाधर्माची पुस्तके वाचण्याची पद्धत आहे. यामागे नेमका कोणता हेतू कोणता? अध्यात्मामध्ये नुसते मन लावून ऐकल्यानेही मोक्षाचा लाभ होतो. मृत्यूसमयी तुमचे जे विचार मनात घोळत असतात ती गती पुढील जन्मी मिळते. मनुष्य देहात जन्म घेण्याचा मुख्य उद्देश हा मोक्ष मिळविणे हा आहे. मृत्यूसमयी जर तुमच्या मनात देवाचे नाम स्मरण होत राहील तर त्याला सहजच मोक्ष प्राप्त होतो. यासाठी सतत नामस्मरणार राहणे हे चांगले. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुंची भक्ती यासारखी सोपी वाट नाही. गुरुमंत्राचे सतत नामस्मरण केल्याने मुक्तीचा मार्ग सुकर होतो. संत गोरा कुंभार मातीला आकार देता देता नामस्मरण करत असते. कोणत्याही कामात असताना नामस्मरण सतत करावे. नामामध्येच शक्ती आहे. यासाठी सतत नामस्मरणात असावे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, July 7, 2010

आत्मज्ञानासाठी गुरुसेवा

आत्मज्ञानासाठी गुरुसेवा
ते ज्ञान पै गा बरवे । जरी मनी आथि आणावे ।।
तरी संता या भजावे । सर्वस्वेशी ।।
जे ज्ञानाचा कुरूठा । तेथ सेवा हा दारवंटा ।।
तो स्वाधीन करू सुभटा । वोळगोनी ।।
आत्मज्ञानी होण्यासाठी सतसंग हा आवश्‍यक आहे. गुरुकृपेशिवाय आत्मज्ञानाचा लाभ होत नाही. आत्मज्ञानाची ओढ लागली, गोडी लागली की सहजच पाऊले गुरुच्या शोधात बाहेर पडतात. पण इथे गुरु भेटल्यानंतर जसा शिष्य गुरुच्या शोधात असतो तसेच गुरुही शिष्याच्या शोधात असतो याची अनुभुती निश्‍चितच येते. गुरु कसा ओळखावा हा सर्वांचा नेहमीचा प्रश्‍न आहे. देशात उपदेश सांगणारे अध्यात्मावर बोलणारे निरुपण करणारे असंख्य गुरु आहेत. पण खरा गुरु हा मनकवडा असतो. तो तुमच्या मनातील सर्व गोष्टी जाणतो. त्याच्या चरणी लीन झाल्यानंतर तुम्हाला शांती लाभते. मनाच्या शांतीनंतर गुरुंचा अनुग्रह होतो. यासाठी भक्ती- सेवा करावी लागते. सेवा याचा अर्थ साधना असा आहे. मनाच्या शांतीसाठी साधना आवश्‍यक आहे. मग अंतःकरणात आपोआप बदल घडतो. आपल्या वागण्यात, बोलण्यात मृदुता येते. जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. यातूनच खऱ्या शांतीचा बोध होतो. आत्मज्ञानाचीही अनुभुती येते.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, July 6, 2010

आली आषाढी

आली आषाढी
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी का कठीणु जाहला ।।
तरी हाची अनुष्ठिला । भला देखे ।।
विद्यार्थ्याने अभ्यास करणे हा त्याचा धर्म आहे. शेतकऱ्यांने शेतात कष्ट करणे हा त्याचा धर्म आहे. कर्मचाऱ्यांनी स्वतःवर पडलेली जबाबदारी न चुकता पार पाडणे ही त्याचा धर्म आहे. स्वतःचे कर्तव्य हाच खरा धर्म आहे. आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्याने साधना करणे हा त्याचा धर्म आहे. हा धर्म पाळताना अनेक अडचणी येतात. पण त्या कठीण प्रसंगाना सामोरे जावे. न डगमगता, न भिता आपल्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करणे हाच खरा धर्म आहे. शेती करताना नुकसान झाले म्हणून शेती सोडून देणे हा धर्म नाही. शांततेने त्यावर विचार करून त्यात प्रगती साधने आवश्‍यक आहे. त्यातच खरे धर्माचे पालन आहे. अनेक जण असे म्हणतात की साधना करता अनेक अडचणी येतात. वेळच मिळत नाही. काहींना काय करावे हेच सुचत नाही. साधना होतच नाही म्हणून ती टाळणे योग्य नाही. साधनेची गोडी लागावी लागते. गोडी लागली की ती आपोआप होते. आपण जे कर्म करतो त्याची गोडी लागावी लागते मग कंटाळा येत नाही. शेतीच्या कामाची गोडी लागली तर प्रगतीशील शेतकरी होण्यास फारसा वेळ लागत नाही.

राजेंद्र घोरपडे
पुणे

Monday, July 5, 2010

आली आषाढी

आली आषाढी

सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे
आणि लाभालाभ न धरावे, मनामांजी
एथ विजयपण होईल, का सर्वथा देह जाईल
हे आधिची काही पुढील , चिंतावेना

आषाढीची वारी सुरु झाली. ज्ञानोबा- तुकोबांच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल झाल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने अद्यापही शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त करत आहेत. अशा या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी बेजार झाला आहे. आणि आशातूनच तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. अशा निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची खरी गरज आहे. वारीचा आनंद अशा शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. मन ज्ञानेश्‍वरीत डुबवायला हवे. शेतात अधिक उत्पन्न झाले म्हणून हरळूनही जाता कामा नये आणि निसर्गाच्या अवकृपेने शेत वाया गेले म्हणून निराश होऊनही बसू नये. कर्जाचे ओझे वाढेल याची चिंता करण्याची गरज नाही. शांत मनाने पुन्हा प्रयत्न करीत राहणे हा माऊलीचा उपदेश अंगिकारायला हवा. कर्जामुळे जीवन संपविण्याचा विचार मनात घोळत असेल तर तो पुसून टाकायला हवा. यासाठी माऊलीच्या उपदेशांच्या रसात डुंबायला शिकले पाहीजे. माऊली प्रेमाने भरविते ते खायला शिकले पाहीजे. कर्जबाजारी झालेतर कोणी फासवर देत नाही. मग चिंता कशाची ? जीवन संपविण्याचा विचार कशासाठी ? शेती एकदा धोका देईल दोनदा देईल पण तिसऱ्यांदा तरी निश्‍चितच आधार देईल. कर्जाचे ओझ्यातून एकदा तरी मुक्ती मिळेल. यासाठी जीवन संपवण्याच विचार योग्य नाही. अपयश पदरी आल्यावर बोलणारे अनेक असतात पण चिंता न करण्याचा सल्ला देणारी माऊलीच असते. काही होत नाही काम करत राहा यश येईल असा आधार देणारी माऊलीच असते. तिच्या आधारावर जगायला शिकले पाहीजे. मग आत्महत्येचा विचार कधीही मनाला स्पर्ष करणार नाही.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, July 2, 2010

आली आषाढी

आली आषाढी आषाढी
जडली भाव भक्तीची कडी

दुमदुमु लागला विठ्ठल विठ्ठलाचा नाद
वारी वाटेवर गुंफला नामजपाचा निनाद

पावसाच्या सरींनी केले साफ मन
शुद्ध भक्तीची बीजे रोवली ध्यानात

नाभी एकवटली, टक स्थिरावली भूस्थानी,
कुंडलीनी झाली जागृत, झाले विठ्ठलाचे दर्शन

राजेंद्र घोरपडे,
पुणे